बौद्धिक वा अन्य कर्तृत्वापेक्षा केवळ विचारधारेवरून ‘आपला’, ‘त्यांचा’ करण्याची राजकीय सवय पाहता राहुलराव आणि रणवीर यांचा गणंगपणा उठून दिसणारच…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोणत्याही पक्षाचे सरकार असो. त्यास आपल्या विचारांची माणसे जवळ करावीत असे वाटणे काही गैर नाही. अशी जवळ केली जाणारी माणसे त्या त्या विचारांचे झेंडे उघडपणे खांद्यावर घेऊन असतात असे नाही. पण त्यांच्या अभिव्यक्तीतून त्या त्या विचारांचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष सुगावा लागत असतो. हे ठरवून होते वा केले जाते असे म्हणता येणार नाही. पण तसे होते. त्यामुळे त्या त्या व्यवस्थेचे शहाणपण, बौद्धिक उंची या अशा जवळ केल्या गेलेल्यांच्या मूल्यमापनातून होत असते. म्हणून आपण जवळ करीत असलेली व्यक्ती नीट जोखणे, तिच्या वैचारिक निष्ठांपलीकडे जाऊन तिची बौद्धिक खोली/उंची मापणे गरजेचे. ही किमान तपासणी न केल्यास काय होते याची दोन उत्तम उदाहरणे समोर दिसतात. एक राहुल सोलापूरकर आणि दुसरे रणवीर अलाहाबादिया. यातील रणवीर हा अलीकडच्या काळातील अत्यंत लोकप्रिय यूट्यूबर. नवतरुण वर्गात तो चांगलाच परिचित. हे नमूद अशासाठी केले कारण त्याचा प्रेक्षकवर्ग लक्षात यावा म्हणून. पण राहुल सोलापूरकर यांच्याविषयी असे काहीच म्हणता येत नाही. ते वर्तमानात नक्की काय करतात किंवा त्यांची इतिहासातील कामगिरी काय याचा परिचय त्यांचे निकटवर्तीय वा शेजारी-पाजारी यांना तरी असेल किंवा काय हा प्रश्न. ‘सामना’ चित्रपटातले मास्तर हिंदुरावांच्या पैलवानास ‘‘आपल्या सुंदर बिनडोकपणाचं रहस्य काय’’ असा प्रश्न विचारतात. राहुलरावांना तोही विचारण्याची सोय नाही, इतके त्यांचे काम अनुल्लेखनीय. अलीकडे समाजमाध्यमांच्या उदयामुळे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांनी निर्बुद्धीकरणाबाबत समाजमाध्यमांशी स्पर्धा सुरू केल्यामुळे अनेक तोंडाळांस बरे दिवस आले आहेत. हे राहुल आणि रणवीरही या वाचाळ-काळाची फळे. एरवी या स्तंभाने दुर्लक्षावे इतकीच खरे तर यांची लायकी. तथापि या दोघांपेक्षा अशांना जवळ करणाऱ्या विचारधारेवर भाष्य करणे अगत्याचे असल्याने या अर्धवटरावांचा उल्लेख करावा लागतो याबद्दल खंत व्यक्त करून ही प्रस्तावना आटोपती घेणे इष्ट.
यातील सोलापूरकर काय काय बरळले याचा उल्लेख नव्याने करण्याची गरज नाही. दुसरीकडे रणवीर त्याच्या कार्यक्रमातील सहभागीस ‘‘तू पालकांना दररोज संभोग करताना पाहात बसशील की एकदा मध्ये पडून त्यांना कायमचे थांबवशील?’’ अशा अर्थाचा प्रश्न केल्याने संकटात पडला. नैसर्गिक शरीरधर्माविषयी बोलणे बिनडोकोत्तमांचे लक्षण. हा कार्यक्रम म्हणे विनोदी होता. रणवीरच्या या विधानात काय विनोद होता, हे त्याचे त्यास ठाऊक. यावर कोणा संस्कृतिरक्षकाने तक्रार केल्याने हा प्रकार गाजू लागला आणि संस्कृतिरक्षकांनी ठिकठिकाणी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करणे सुरू केले. खरे तर ज्याप्रमाणे यात विनोद नाही त्याचप्रमाणे या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी असेही काही नाही. मूर्खांचे अतिमूर्ख बरळणे इतकेच त्याचे स्वरूप. या अशा कार्यक्रमांस पाहणारे दिवसागणिक भूमिती श्रेणीने वाढणाऱ्या याच मूर्खसंप्रदायाचे प्रतिनिधी. त्यातही परत हा रणवीर अव्वल नाही. परदेशी ‘ओजी क्रू’ (ओरिजिनल गँगस्टर) या कार्यक्रमात सॅमी वॉल्श आणि अॅलन फँग यांनी अवघ्या काही आठवड्यांपूर्वी असाच्या असा प्रश्न केला होता आणि तो जसाच्या तसा या रणवीरने उचलला. हे असे करताना आपण कोणत्या देशात आहोत, पालक, त्यांची लैंगिकता इत्यादी विषयांची चर्चा करणे अब्रह्मण्यम असते इतकेही भान या रणवीरास राहिले नाही. त्यावर वादळ उठल्यानंतर माझे जरा चुकलेच असे म्हणत त्याने माफी मागून टाकली. अवाढव्य राहुलराव आणि पोरगेलासा रणवीर यांच्या प्रमादात हे एक साम्य.
आणि दुसरे साम्य म्हणजे या मंडळींस जवळ करणारे! हे उभयता स्वतंत्रपणे काही विशिष्ट कार्यक्रम, संस्था यांच्या व्यासपीठांवर दिसतात. यातील राहुलरावांनी ताज्या वादळानंतर ‘भांडारकर प्राच्यविद्या संस्थे’च्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. ते योग्यच. पण या पंडिती संस्थेच्या विश्वस्तपदी या इसमास मुदलात नेमले कोणी? त्यांचे त्या क्षेत्रातील योगदान काय? अलीकडे काहीही बरळण्यास संशोधन असे म्हणतात काय? तसे नसेल तर इतक्या ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या विश्वस्तपदी राहुलरावांची नेमणूक होतेच कशी? या प्रश्नाचे उत्तर विश्वकोश मंडळावर करण्यात आलेल्या नियुक्त्या पाहिल्यास मिळेल. साध्या अंकलिपी निर्मितीपासूनही ज्यांस चार हात दूर ठेवायला हवे त्यांच्या हाती विश्वकोश निर्मिती सुपूर्द केली जात असेल तर कोणाविषयी काय बोलणार? यातून असे करणाऱ्यांची केवळ वैचारिक आपलेपण शोधण्याची अपरिहार्यता तेवढी दिसून येते. या रणवीरच्या बाबतही हेच. त्याच्या पॉडकास्टला याच वैचारिक आपलेपणाच्या भावनेतून कोणी कोणी हजेरी लावली त्यांची नावे पाहिली तरी हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. विदुषी सुश्री स्मृती इराणी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुत्सद्दी एस. जयशंकर, नितीन गडकरी, पीयूष गोएल अशी किती नावे घ्यावीत? वास्तविक पत्रकारिता वा तत्सम क्षेत्रांत इतके मान्यवर आपल्याकडे आहेत की त्यातील कोणांस या मान्यवरांनी मुलाखती देणे अधिक सयुक्तिक ठरले असते. पण त्या सगळ्यांपेक्षा हा रणवीर या मंडळींस जवळचा वाटला. कारण? अर्थातच वैचारिक जवळीक. हे विचार-सौहार्द येथेच थांबत नाही. गेल्या वर्षी ८ मार्चला राजधानीत भारत मंडपम येथे त्याचा सत्कार साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला गेला. पंतप्रधानांनी जाहीरपणे त्याचे कौतुक केले आणि त्याची परतफेड या रणवीरने ‘‘मोदीजी यूथ की बाते करते है’’ अशा गौरवोद्गाराने केली. याच ‘यूथ की बात’ने त्यास आणि त्याच्या एकेकाळच्या समर्थकांस अखेर संकटात टाकले. पंतप्रधानांनी त्या कार्यक्रमात या रणवीरला शांत झोपेची गरज समजावून सांगितली. त्याची परतफेड या रणवीरने झोप उडवणाऱ्या वक्तव्याने केली.
हे होणारच होते. याचे कारण बौद्धिक वा अन्य कर्तृत्वापेक्षा केवळ विचारधारेवरून ‘आपला’, ‘त्यांचा’ करण्याची सध्याची राजकीय सवय. गुणवान हा गुणवान असतो. तो कोणत्याही विचारांचा असला तरी त्याचा सन्मानच व्हायला हवा आणि तो राज्यकर्त्यांनी वैचारिक कारणांसाठी केला नाही तरी अंतिमत: या असल्या गणंगांपेक्षा इतिहासाच्या विशाल पटलावर खऱ्या गुणवंतांचीच स्वाक्षरी राहते. हे असले राहुलराव आणि रणवीर पैशाला पासरीभर मिळतात. त्यांची नावे बदलत राहतात, इतकेच. दुसरी एक बाब आवर्जून यानिमित्ताने नमूद करायला हवी. ती म्हणजे या तथाकथित समाजमाध्यमी प्रभावक (इन्फ्लुएन्सर्स) वावदूक उच्छृंखलांच्या मागे राजकारण्यांनी इतके फरपटत जावे? अलीकडे राजकारणी स्वत:च्या आणि पक्षीय प्रचारासाठी या इन्फ्लुएन्सरांना जवळ करतात. हा खरे तर त्यांचा पराभव. समाजमाध्यमांतील क्षणिक लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी त्यांच्याकडून या असल्यांना जवळ केले जाते आणि नंतर हे किती पोकळ आहेत हे दिसल्यावर त्यांचीच अडचण होते. या असल्या सोम्यागोम्या पुरस्कार सोहळ्यांस पंतप्रधानांनी उपस्थिती लावावी? शिंगे मोडून ही मंडळी आणखी किती काळ वासरात मिसळत राहणार?
तेव्हा जे झाले त्याबद्दल चौकशी, पोलीस तपास वगैरे निरर्थक गोष्टींपेक्षा राजकारण्यांनी स्वत:स आणि स्वत:च्या जबाबदारीस अधिक गांभीर्याने घ्यावे. ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’ असे म्हणणारे संत गोरा कुंभार समोर संत-महंत आले तरी त्याचे डोके ‘तपासून’ मडके कच्चे की पक्के, ते सांगत. सत्ताधीशांनी तो आदर्श बाळगावा. तरच ‘तव झालो प्रसंगी गुणातीत’ याचा साक्षात्कार होईल. त्यासाठी आपल्यासमोरील मडकी तपासून घेणे महत्त्वाचे.