करोनाकाळाच्या आधीही बॉलीवूडचे काही चित्रपट आपटत होतेच; पण २०१९ पेक्षा दुप्पट हिंदी चित्रपट यंदा आपटले, याचे खापर केवळ ‘ओटीटी’वरच फोडायचे का?

आपल्या जगण्याचा भाग असली तरी काही क्षेत्रे दुर्लक्षित राहतात किंवा त्यांची दखल तुच्छतानिदर्शक प्रतिक्रियांतून घेतली जाते. असे एक क्षेत्र म्हणजे ‘बॉलीवूड’. सर्वसामान्य भारतीयांची अभिव्यक्ती ही चित्रपटांच्या आधारे होत असते आणि या चित्रपटांतील संगीत हे विविध वयांत त्याच्या भावभावनांचे वाहक राहिलेले असते. एका अर्थी चित्रपट आणि त्यातील गाणी हे त्या त्या काळचे लोकवाङ्मय आणि त्यातील संगीत हे लोकगीत. स्वातंत्र्याच्या उदयकाळात दिलीपकुमारचा ‘शहीद’, राज कपूरचा काश्मिरी मुलीची तगमग दाखवणारा ‘बरसात’ आदी चित्रपट गाजले आणि यानंतरच्या दशकात भारतात अजस्रपणे निर्माण झालेल्या कारकुनाच्या जागा व्यापणे हे जगण्याचे ईप्सित होते त्या काळात प्रदीपकुमार वा भारतभूषण हे चेहऱ्यावर माशीसुद्धा बसली नसती अशा तोंडवळय़ांचे इसम नायक ठरले, नंतरच्या स्थिरावलेल्या काळात मनोरंजनात शम्मी कपूर, देव आनंद इत्यादींची चलती होती आणि तीट लावल्यासारखी दु:खदर्शनाची तहान दिलीपकुमार, राज कपूर भागवत होते. पाठोपाठ सुस्थित अशा गुलछबू वातावरणात राजेश खन्ना ‘जिंदगी इक सफर है सुहाना..’ वगैरे गाऊन गेला आणि आणीबाणी आणि आसपासच्या अशांत काळाने ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ घडवला. उदारीकरणाने आलेल्या समृद्धीत श्रीमंतीचे अभिमानी प्रदर्शन करणाऱ्या काळात ‘दिल चाहता है’ घडून गेला. आपले चित्रपट प्राय: आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणे नायकप्रधान राहिले. ही चर्चा आणखी अशीच बरीच पुढे नेता येईल. पण येथे उद्देश तो नाही. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने ‘बॉलीवूड’च्या सद्य:स्थितीबाबत प्रसृत केलेला वृत्तलेख हे या विषयास भिडण्याचे कारण. 

Flexicap, mutual funds, flexicap fund,
म्युच्युअल फंडातील उभारता ‘फ्लेक्झीकॅप’ – ३६० वन फ्लेक्झीकॅप फंड
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
India fight against poverty, poverty, India, poverty news,
भारताचा गरिबीशी लढा कितपत यशस्वी?
book The only person you are destined to become is the person you decide to be
क्षमताविकासाचे सूत्र
how much should a person both above and below 60 years old walk everyday
६० वर्षांवरील वा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीने नियमित किती चालले पाहिजे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Pune Municipal Corporation, death certificate pune,
मरणानेही सुटका नाही!
Charlotte Wood novel Stone Yard Devotional
बुकरायण: आस्तिक-नास्तिकतेचे मुक्त चिंतन…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा काळाच्या पडद्याआड, अनेकांना समृद्ध करणाऱ्या खास माणसाची कारकीर्द कशी होती?

‘रॉयटर्स’नुसार यंदाच्या आठ महिन्यांत बॉलीवूडतर्फे २६ नवे चित्रपट आले. त्यातील तब्बल २०, म्हणजे ७७ टक्के इतके सपाटून आपटले. निर्मिती खर्चाची किमान ५० टक्केही वसुली जे करू शकत नाहीत, त्या चित्रपटांस ‘आपटले’ हे विशेषण जोडले जाते. हे आपटलेल्या चित्रपटांचे प्रमाण करोनापूर्वीच्या २०१९ या वर्षांपेक्षा यंदा दुप्पट आहे. यंदा हे चित्रपट वगळता अन्य चित्रपटांचा गल्लाही साधारण ४५ टक्क्यांनी आटला. आपल्याकडे चित्रपटांच्या खर्चाची ७५ टक्के इतकी वसुली चित्रपटगृहात जाऊन, पदरमोड करून चित्रपट पाहणाऱ्यांकडून होते. पण अलीकडे चित्रपटगृहात जाण्याचेच प्रमाण घटल्याने या वसुलीतही चांगलीच घट झाली. करोनाकाळ घरोघर ‘ओव्हर द टॉप’- म्हणजे ओटीटी- माध्यमांद्वारे चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अतोनात वाढली. संचारबंदीच्या काळात असे होणे साहजिक. आज आपल्या १४० कोटी लोकसंख्येतील सुमारे ३५ ते ३६ कोटी नागरिक, म्हणजे २५ टक्के, घरातल्या घरात हा ‘ओटीटी’चा आनंद घेतात. करोनापूर्व २०१९ सालात ओटीटीचे प्रमाण जेमतेम १२ टक्के होते. साहजिकच त्या काळात चित्रपटांचा वार्षिक गल्ला २०० कोटी डॉलर्सपर्यंत गेला. ती बॉलीवूडची सर्वोच्च कमाई. करोनाकाळात ती जी घटली ती आता पूर्वपदावर येता येत नाही. त्यासाठी काय करायचे हा बॉलीवूडसमोरील यक्ष प्रश्न. आमिर खान आणि अक्षयकुमार यांच्या दोन चित्रपटांच्या दणदणीत अपयशाने तो अधिकच गंभीर होताना दिसतो. आमिरच्या ‘लालसिंग चढ्ढा’ने जेमतेम ५६ कोटी रु. कमावले. ही रक्कम त्याच्या खर्चाच्या २५ टक्के इतकीही नाही. अक्षयकुमारचा भगिनीप्रेमाने ओतप्रोत भरलेला ‘रक्षाबंधन’ही गाळात गेला. भाऊबहिणींच्या अतूट प्रेमप्रदर्शनाचे मूल्य जेमतेम ३७ कोटी. या चर्चेत ही दोन नावे घेतली कारण ती प्रातिनिधिक आहेत.

याचा अर्थ ‘राष्ट्रद्रोही’ आमिरचा चित्रपट जसा पडला तसाच किंवा अधिक ‘राष्ट्रप्रेमी’ अक्षयचाही गडगडला. आमिरचा चित्रपट पाडण्याच्या श्रेयावर नवराष्ट्रप्रेमी बहिष्कारवाद्यांनी दावा सांगू नये म्हणून हे मुद्दाम नमूद करावे लागते. या मंडळींची चित्रपट पाडण्याची ताकद खरी असती तर सत्ताधाऱ्यांना राखी बांधणाऱ्या अक्षयचे ‘रक्षाबंधन’ यशस्वी करता आले असते. पण तसे झालेले नाही. शिवाय परदेशात ‘लालसिंग’ची कामगिरी बरी असल्याचे दिसते. म्हणजे या बहिष्कारवाद्यांना परदेशातील देशप्रेमींची अजिबात साथ नसावी. यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे याच काळात दक्षिणी चित्रपटांचे न भूतो न भविष्यति असे यश. ‘पुष्पा- द राइज’ या एकेकाळी सरसकट अंडुगुंडु म्हणून हिणवल्या जाणाऱ्या दक्षिणी चित्रपटाने फक्त देशभरातून सुमारे ३२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘ब्रँड’ अभ्यासक संदीप गोयल यांच्या अलीकडील लेखानुसार या चित्रपटाचा ‘नायक’ अल्लु अर्जुन हा हिंदी चित्रपटातील अक्षयकुमार, शाहरूख, अमिताभ, क्रिकेटपटू विराट कोहली इत्यादी जाहिरात चेहऱ्यांस मागे टाकून नवा ‘जाहिरातनायक’ होऊ घातला आहे. भाषिक चित्रपटनायक असूनही काही आंतरराष्ट्रीय ब्रँड आपल्या उत्पादन प्रसारासाठी बॉलीवुडी नायकांस बाजूस सारून त्याच्याशी करार करू लागले आहेत. या वास्तवदर्शनानंतरचा प्रश्न म्हणजे : हे असे का होत असावे.

‘ओटीटी’ आदी नवमाध्यमांस यासाठी दोष दिला जात असला आणि काही प्रमाणात ते रास्तही असले तरी ते आणि तेवढेच कारण या दारुण अवस्थेमागे नाही. अनेक चित्रपट अभ्यासकांच्या मते चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब मनोरंजन करून घेणे अधिकाधिक खर्चीक होणे हे यामागील एक कारण आहेच. पण हिंदी चित्रपटांतील दिवसागणिक पातळ होत जाणारा मजकूर (कण्टेण्ट) यास अधिक जबाबदार आहे. इतके दिवस हे नाच-गाणे खपून गेले कारण महत्त्वाच्या विषयास भिडणारे, काहीएक निश्चित भूमिका घेऊन चित्रपट निर्माण करणारे अन्य भाषिक इतक्या जोरकसपणे समोर येत नव्हते. त्यामुळे बॉलीवूडवाल्यांचा पोकळपणा खपून गेला. तंत्रज्ञानाने ही दरी भरून काढल्याने अन्य भाषिक उत्तम चित्रपटांस हल्ली अधिक गर्दी होते. साठ-सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत ‘तरक्कीपसंद’ विचारधारा घेऊन चित्रपटनिर्मिती होत होती. या मंडळींच्या ‘इप्टा’ संघटनेशी संबंधित निर्माते, कलाकार आदींनी एकापेक्षा एक उत्तमोत्तम चित्रपट रसिकांसमोर दिले. बलराज सहानी, कैफी आजमी, विमलदा, साहिर लुधियानवी, एके हंगल ते गुलजार व्हाया गिरीश कर्नाड, श्याम बेनेगल ते नसिरुद्दीन शहा यांच्यापर्यंत ही रेषा येते. आणि तेथेच थांबते. आज सर्वच चित्रपट बाजारू निघतात असे नाही. एखादा ‘आर्टिकल १५’ आजही हिंदीतून समोर येतो. नाही असे नाही. पण एकंदर सद्दी गल्लाभरूंचीच. झाडाभोवती किंवा क्लबात कंबरा लचकवत नाचणारे नायक आणि ओलेत्या नायिका किती काळ पाहणार, हाही प्रश्नच. त्या पार्श्वभूमीवर दक्षिणी चित्रपटांतील मुसमुसती वैचारिकता दर्शकांस अधिक भावत असेल तर ते साहजिकच म्हणायला हवे. म्हणजे एकेकाळी ऋत्विक घटक वा सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट सकस कथागुणांच्या मुद्दय़ावर ज्याप्रमाणे हिंदीवर मात करीत होता ते काम आज दक्षिणी सिनेमा करताना दिसतो. हे सत्य मान्य केले की अक्षयकुमारच्या ‘‘लोकांना काय हवे याचा आम्हास नव्याने विचार करावा लागेल. मी कोणते चित्रपट करत आहे आणि पुढे काय करायला हवे, याच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे,’’ या उद्गारांचे गांभीर्य लक्षात येते. ‘रक्षाबंधन’ गाळात गेल्यावर त्यास ही उपरती झाली. हिंदीतील ही बौद्धिक पोकळी दक्षिणी चित्रपट हिरिरीने भरून काढीत असताना या चर्चेत मराठी कोठेही नाही, हे सत्य स्वतंत्रपणे नमूद करण्याची गरज नाही, इतके ते उघड आहे. आशयघन कलाकृतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुरुदत्त यांचा चित्रपटाच्या मोहमयी दुनियेवरील ‘कागज के फूल’ म्हणजे एक मूर्तिमंत शोकात्म काव्य. त्या चित्रपटात कैफी आजमी ‘बिछडे सभा बारी बारी..’ अशी एक कालजयी नज्म लिहून गेले. आज बॉलीवूडची अवस्था अशी होऊ लागली आहे. सकस कथाबीजाकडे या मंडळींचे दुर्लक्ष असेच सुरू राहिले तर हे बिछडलेले परत येणार नाहीत.