पहलगाममध्ये २६ पर्यटक आणि एका स्थानिकाचा बळी घेणाऱ्या नृशंस हल्ल्यानंतर तातडीने फटका बसला आहे तो काश्मीरच्या पर्यटनाला. असे अनेक आघात काश्मीर खोऱ्याला आजवर सहन करावे लागले आहेत. त्या प्रत्येक वेळी पर्यटनावर अवलंबून असलेल्या काश्मिरींच्या आकांक्षांची राख झाली, पण भारतीयांना आपल्या देशाचा अविभाज्य भाग असलेल्या या नंदनवनाचे आकर्षण इतके की, त्या राखेतूनही काश्मीरच्या पर्यटनाने उभारी धरली. तसे कदाचित आताही होईल. पाकिस्तान-पुरस्कृत काश्मिरी दहशतवाद, त्यास अनेक वर्षे काही स्थानिक नेत्यांकडूनही- कुटिलपणाने किंवा बेअक्कलपणे- होणारे सहकार्य, त्या राज्यातल्या बेरोजगारांना हेरून फुटीरतावादाच्या नादी लावण्याचे दहशतवाद्यांचे डावपेच, ते गेल्या सात-आठ वर्षांपर्यंत यशस्वी झाल्याने सुरक्षा दलांवर आणि अमरनाथ यात्रेकरूंच्या तांड्यांवर बेछूट दगडफेक करण्यात गल्लोगल्लीच्या तरुणांचा सहभाग… या साऱ्याला मनोमन वैतागलेले नागरिक भारताच्या या राज्यात होते आणि राज्याचा दर्जा गेला तरी असे नागरिक आजही आहेत, याचा पुरावा म्हणजे काश्मीरचे वाढते पर्यटन. पण पर्यटक म्हणून गेलेले लोक आजवर तसे सुरक्षित असत. ‘बंद’मुळे एखाददोन दिवस फुकट जाणे किंवा खोऱ्यातील गडबड अधिक वाढली म्हणून सहलच अर्ध्यावर रद्द करावी लागणे असे चटके काही पर्यटकांनी यापूर्वी भोगले असतील. मात्र पर्यटकांचा जीव सुरक्षित नाही, अशी दहशत पहिल्यांदाच पसरल्यामुळे- आणि समाजमाध्यमांवरील प्रचारखोर या दहशतीविरुद्ध उपाय म्हणून भलभलते काहीबाही सुचवू लागल्यामुळे- काश्मीरला जाऊ इच्छिणाऱ्यांचा गोंधळ वाढला आहे हे निश्चित. पहलगामच्या बेलगाम हत्याकांडानंतर सरकारच्या आणि तपास यंत्रणांच्या पातळीवर उपाय होत राहातील; पण ‘एकदा तरी काश्मीर पाहावे, जमल्यास पुन:पुन्हा तिथे जावे’ या भारतीय ऊर्मीवरच आता घाला येतो आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

ही अशी यापूर्वी कधीही न आलेली वेळ निव्वळ तुकडा-तोड निर्णय घेण्याची नसते. अभूतपूर्व संकटातून मार्ग काढण्यासाठी माणूस काय किंवा समाज काय, आत्मपरीक्षणही करतो. सरकारच्या पातळीवर होणाऱ्या उपायांचे परिणाम सर्वांनाच झेलावे लागतील हे खरेच, पण शाश्वत शांतता हवी असेल तर निव्वळ राजकीय, पोलिसी वा लष्करी आणि प्रशासकीय उपायांइतकीच सामाजिक बाजूही महत्त्वाची असते. काश्मीरच्या शांततेची ही सामाजिक बाजू भक्कम करण्याची जबाबदारी सर्वच भारतीयांवर आहे. मग ते काश्मीरमध्ये राहणारे असोत वा चार दिवसांच्या मौजमजेसाठी तेथे जाणारे असोत किंवा तिथे प्रत्यक्ष गेले काय, न गेले काय- काश्मीर आपलेच आहे आणि त्या भागाचाही विकास आपल्याला हवा आहे, असे मानणारे असोत. काश्मीरचे लोक आणि भारताच्या अन्य प्रांतांतले लोक यांच्या संबंधांचा विचार इथे महत्त्वाचा ठरतो. हे संबंध आजवर विषम राहिलेले आहेत. विश्वासातली, भारतीय म्हणून एकमेकांशी नात्यातली ही विषमता फार पूर्वीपासूनची आहे. तिची उदाहरणे केवळ शोधनिबंधांमध्ये किंवा तत्सम अभ्यासवाङ्मयात नव्हे तर जुन्या चित्रपटांसारख्या सांस्कृतिक वारशातही सापडतात. काश्मीरच्या सामीलनाम्यानंतर अडीच वर्षांच्या आत लोकप्रियतेची शिखरे गाठणारा राज कपूरचा ‘बरसात’ पाहा. दोन काश्मिरी स्त्रिया आणि त्यांना भुरळ पाडणारे दोघे काश्मीरबाहेरचे पुरुष यांची ती कहाणी. ‘परदेसी’वर विश्वास ठेवूच नये असे या स्त्रियांना सांगणारे अनेक, तरीसुद्धा दोघीही प्रेमासाठी झुरतात. अखेर एकीचे प्रेम सफल होते- तेही तिचा प्रियकर प्रामाणिक असतो म्हणूनच; पण दुसरीचा जीव गेल्यावर तिला खेळवणाऱ्या पुरुषाला उपरती होते ती काहीच उपयोगाची नसते. ‘कश्मीर की कली’मध्ये दल सरोवरात फुले विकणाऱ्या गरीब शर्मिला टागोरचे भाग्य राजघराण्यातल्या आणि आईपासून दूर राहण्यासाठी काश्मीरमध्ये आलेल्या शम्मी कपूरमुळे उजळते; तर ‘जब जब फूल खिले’मधल्या गरीब काश्मिरी घोडेवाल्या शशी कपूरचे प्रेम अव्हेरणारी श्रीमंत घरची पर्यटक नंदा, अखेरीस त्याची माफी मागते. यानंतरच्या चित्रपटांमध्ये काश्मीर आले ते निव्वळ निसर्गसौंदर्यापुरते- ‘खूबसूरत तसबीर’ म्हणून. पण १९९२ मधल्या ‘रोजा’ने, त्याहीनंतरच्या ‘मिशन कश्मीर’ने दहशतवाद्यांवर साहसी मात करण्याचे स्वप्न दाखवले, तर २०१४ मधल्या ‘हैदर’ने शेक्सपिअरच्या हॅम्लेटला पडलेला अस्तित्वाचा सवाल आजच्या काश्मीरसंदर्भात प्रेक्षकांपुढे मांडला. हिंदी चित्रपट हा स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाचा ‘मुख्य प्रवाह’ हे समीकरणच गडगडू लागेपर्यंत काश्मीरकडे पाहण्याची या चित्रपटांची दृष्टी एक तर अनाठायी दया-करुणेची, नाही तर काश्मीरला निव्वळ एक निसर्गसुंदर पार्श्वभूमी मानण्याची आणि अलीकडे काश्मीरकडे ‘समस्या’ म्हणून पाहण्याची होती, असे दिसून येते.

याच प्रवृत्ती आजसुद्धा पर्यटकांमध्ये आहेत, हे अगदी कालपरवाच्या प्रतिक्रियांतूनही उघड होते आहे- ‘काश्मिरी लोक खूप अगत्यशील आहेत, चांगले आहेत. पर्यटनावरच त्यांचे पोट अवलंबून असल्याची जाणीव त्यांना आहे’ अशा करुणामय प्रतिक्रिया यांत आघाडीवर आहेतच. पण ‘आमची ट्रिप एकदमच ‘स्मूथ’ झाली होती’ म्हणत, भारताच्या या अविभाज्य भागात फक्त पर्यटकाची भूमिका निभावणारेही नागरिकही आहेत… आणि ‘जालीम उपाय’ सुचवणारे तर गेल्या दोनतीन दिवसांत प्रचंड संख्येने दिसताहेत. या जालीम उपायांची ऊर्मी केवळ आजकालची आहे असे अजिबात नाही. अधूनमधून ती भारताच्याच अन्य राज्यांमध्ये राहणाऱ्या काश्मिरींविरुद्ध व्यक्तही होत असते. देशाच्या कोणत्याही भागात रहिवासाचा आणि व्यवसायाचा हक्क २०१९ च्या ऑगस्टनंतर तर जितका अन्य राज्यांतल्या लोकांचा आहे तितकाच काश्मिरींचाही आहे. ‘अनुच्छेद ३७०’ निष्प्रभ झाल्याने त्यात कमीजास्त काही उरलेले नाही. पण शिकण्यासाठी किंवा ‘जगायला’ अन्य राज्यांत येणाऱ्या/ यावे लागलेल्या काश्मिरींना संशयाच्या नजरांपासून ते मारहाणीपर्यंत सारे काही- २०१९ च्या आधी आणि नंतरही- झेलावे लागलेले आहे. यातून उघड होणारे कटू सत्य असे की, काश्मिरी लोक ‘आपल्यासारखेच’ असू शकतात, यावर आपला विश्वास नाही. तो नसण्याचा दोषारोप निव्वळ काश्मिरींवर करून कसे चालेल? टाळी एकाच हाताने कशी वाजेल? ‘जम्मूपासून आम्ही पुढे आठ/दहा दिवस एकच गाडी केली होती- चालक फार चांगला मिळाला होता आम्हाला’ अशा अनुभवांचे कारण हे फक्त आम्हीच नशीबवान, असे कसे असू शकेल?

पर्यटक म्हणून आपला काश्मीरशी संबंध काही दिवसांपुरताच येणार हे खरे. पण भारताचे नागरिक म्हणून, भारताच्या या अविभाज्य भागाशी आणि त्यातल्या नागरिकांशी आपला संबंध एरवीही असायलाच हवा. तो कसा असावा हे फक्त सत्ताधाऱ्यांनी, फक्त सीमेपलीकडच्या आणि अलीकडच्या दहशतवाद्यांनी आणि फक्त या किंवा त्या टोकाची मते असणाऱ्या काहींनी का म्हणून ठरवायचे? ते आपणच ठरवावे लागेल. सर्वच्या सर्व भारतीय नागरिकांनी आपसांत किमान समतेची वर्तणूक ठेवावी, ही आपल्या राज्यघटनेची अपेक्षा आहे, त्या अपेक्षेला जागल्यामुळेच आपल्या राष्ट्राचा सांविधानिक पाया भक्कम राहू शकणार आहे, एवढा विवेक बाळगावा लागेल.

काश्मीरच्या सहलीनंतर हॉटेल-व्यवस्थापकांचे, वाहनचालकांचे मोबाइल क्रमांक आपल्या संपर्कयादीत नुसतेच उरतात; तिथून आणलेली क्रिकेटची बॅटही जुनी होते; अक्रोड/केशर संपून जातात; पण हौसेने आणि घासाघीस करून आणलेली पश्मिना शाल मात्र टिकते, उपयोगीसुद्धा पडते. तिच्या लोकरीचा तो पिसासारखा स्पर्श हवाहवासा असतो. ते उबदार वस्त्र जपले जाते, नीट हाताळले जाते… अशीच काश्मीरचीही जपणूक करायची तर, पाखरांनी आपापले पंख मिटल्यासारखी नुसती आपल्याच अंगाभोवती शाल लपेटून चालणार नाही- पाखरेसुद्धा पंख पसरल्याखेरीज झेप घेऊ शकत नाहीत, हे लक्षात ठेवून त्या शालीसकट हात फैलावून स्वागत करण्याची वृत्ती हवी… मग आपल्यालाही पश्मिन्याचे पंख फुटलेले असतील!