इस्लामी मूलतत्त्ववाद आणि सत्ता कुणाचीही असली तरी लष्कराचीच सद्दी या पाकिस्तानी रोगांना इम्रान खान यांचे राजकारण पुन्हा खतपाणी घालते आहे..
समस्त पाकिस्तानी जनतेचे लक्ष सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आणि त्यांतील शेवटच्या चेंडूंवर झालेल्या दोन पाठोपाठच्या पराभवांकडे लागलेले असावे. क्रिकेट हाच (दुसरा) श्वास आणि क्रिकेट हाच (दुसरा) धर्म हे समीकरण घट्ट रुजलेल्या पाकिस्तानी समाजामध्ये क्रिकेटमधील पराभवाइतका (तोही भारताविरुद्ध शेवटच्या चेंडूवर) मोठा राष्ट्रीय शोकप्रसंग असू शकत नाही. त्यामुळे क्रिकेटच्याच मैदानावर काही तरी संस्मरणीय जिंकून दाखवलेल्या इम्रान खान या उत्तम कर्णधार परंतु बद्दड राजकारणी ठरलेल्या इसमाकडे पुन:पुन्हा जाण्याचे प्राक्तन काही त्या देशाला चुकलेले दिसत नाही. एखादाच खेळ, एखादीच उत्कट विषयवस्तू असे सगळे एकाच एका विषयाभोवती फिरत राहिले, तर शाश्वत तोडगा सापडू शकत नाही. कारण समस्यांचे, समाजाचे स्वरूप व्यामिश्र असते. पाकिस्तानातील राजकारण पुन्हा एकदा इम्रान खानभोवती भ्रमण करू लागले आहे, हे त्या देशाच्या दृष्टीने एकाच वेळी शोकान्तिका आणि परिस्थितीजन्य विनोद ठरण्याची शक्यता आहे. याचे कारण वारंवार अवकाश आणि संधी मिळूनही तेथील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना बदलत्या काळासोबत नवीन, उत्साहवर्धक, आशादायी असे काहीही सादर करता आलेले नाही. जगभरातच एकुणात जुनेजाणते पक्ष जीर्णजर्जरच नव्हे, तर हतबल झालेले दिसतात ते आजूबाजूच्या बदलांना आणि परिस्थितीला जोखण्यात आलेल्या ढळढळीत अपयशामुळे आणि/किंवा दाखवलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे, तसेच पालटलेली परिस्थिती स्वीकारण्यासाठी लागणाऱ्या विशाल हृदयीपणाच्या अभावामुळे. पाकिस्तानात पीएमएल (नवाझ) व पीपीपी, इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष, अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आणि भारतात काँग्रेस अशी काही उदाहरणे. यांपैकी काँग्रेस वगळता बाकीच्यांकडे कायदेमंडळात जागा मुबलक असतील, परंतु कोणाचीही प्रशासनावर पकड नाही. त्या पक्षांचे राजकारणी स्वत:ला असुरक्षित आणि देशाला अस्थिर मानण्यातच विसावा शोधतात. पाकिस्तानात स्थिर आघाडी सरकार असूनही, इम्रान खान यांच्या रेटय़ामुळे ते अस्थिर, अस्वस्थ भासू लागले आहे. कारण भावनिक आव्हान करून जनतेचा बुद्धिभेद करण्याचे चातुर्य इम्रान यांच्या अंगवळणी उतरले आहे. त्यांचा पराभव एप्रिल महिन्यात नॅशनल असेम्ब्लीत झाला, तो ढासळत्या आर्थिक परिस्थितीला विटून त्यांच्याच पक्षातील खासदारांनी त्यांची पाठ सोडल्यामुळे. परंतु आपल्याविरुद्ध पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि अमेरिकी प्रशासनाने विरोधकांना हाताशी धरून कट केला, असा कांगावा इम्रान यांनी सुरुवातीपासून रचला आणि तो पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या मतदारांच्या गळी उतरवण्यात इम्रान खान यशस्वी ठरले. याच लाटेवर स्वार होऊन आता खाँसाहेब प्रदीर्घ पदयात्रेवर निघाले आहेत. या पदयात्रेची परिणती पाकिस्तानला अधिक अस्थिर बनवण्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते का, हे अभ्यासणे आपल्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.
हेही वाचा >>> इम्रान यांच्या कार्यकर्त्यांना ‘निवारा बंदी’; मोर्चाच्या थेट प्रक्षेपणास माध्यमांना मनाई
इम्रान यांचा धीर बळावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, पाकिस्तानी लष्कर आणि त्यातही इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) हे दोन बलाढय़ घटक प्रथमच इम्रान यांच्या लोकप्रियतेसमोर काहीसे बावचळलेले भासतात. आयएसआयप्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम आणि आयएसआय प्रवक्ते लेफ्टनंट जनरल बाबर इफ्तिकार यांनी अलीकडेच अभूतपूर्व पत्रकार परिषद घेऊन लष्कराची हकनाक बदनामी सुरू असल्याची व्यथा मांडली. ‘हकनाक बदनामी’ सुरू होण्याचे तात्कालिक कारण म्हणजे, पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियात तेथील पोलिसांकडून ‘चुकून झालेली’ हत्या. हे शरीफ इम्रान यांचे कट्टर समर्थक आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे कडवे टीकाकार होते. त्यांच्या जिवाला धोका असल्याची चाहूल लागताच इम्रान यांनीच मागे त्यांना पाकिस्तान सोडून जाण्यास सांगितले होते. त्यांना अशा विचित्र प्रकारे संपवले जाणे हे इम्रान यांच्या पथ्यावर पडले. कारण ‘केनियाच्या पोलिसांची चूक’ हा निव्वळ बनाव होता, हे पाकिस्तानातील बारके पोरही सांगू शकेल! त्यांना संपवण्यात पाकिस्तानी लष्कराची काही ना काही भूमिका आहेच. सत्तेबाहेर काढले जाऊनही इम्रान यांचा राजकारणातील प्रभाव दूर झालेला नाही, हे अलीकडे त्यांच्या पक्षाला पोटनिवडणुकांमध्ये मिळालेल्या यशावरून स्पष्ट होते. वरकरणी इम्रान हे पाकिस्तानातील सत्तारूढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट (पीडीएम) या आघाडीच्या विरोधात लाहोर ते इस्लामाबाद पदयात्रा करत असले, तरी त्यांचे खरे लक्ष्य पाकिस्तानी लष्कर आहे. खरे तर २०१८ मध्ये लष्कराच्या मदतीनेच इम्रान यांना सत्ताफळे चाखायला मिळाली. नवाझ शरीफ यांना देश सोडायला लावून जनरल बाजवा यांनी त्यांच्या काही पूर्वसुरींप्रमाणेच पाकिस्तानात स्वत:च्या सोयीचे सत्तांतर घडवून आणले. इम्रान यांच्याकडून तीन वर्षांची मुदतवाढही पदरात पाडली. पण इम्रान यांनी लष्करी कारभारात नको इतके लक्ष घालण्यास सुरुवात केल्यामुळे जनरल बाजवा आणि त्यांचे कमांडर सावध झाले.
या संघर्षांत पहिली ठिणगी आयएसआयप्रमुखांच्या नियुक्तीवरून पडली. तत्कालीन प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांनाच मुदतवाढ देण्याविषयी इम्रान आग्रही होते. त्यामुळे या पदावर लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांना नेमण्याची शिफारस जनरल बाजवा यांनी करूनही सुरुवातीस त्याकडे इम्रान यांनी दुर्लक्ष केले. अखेरीस जनरल बाजवा यांनी फैज यांची पेशावर कोअरचे प्रमुख म्हणून रवानगी केली आणि अंजुम यांची आयएसआयप्रमुखपदावर नियुक्ती केलीच. नोव्हेंबरमध्ये जनरल बाजवा निवृत्त होत असून, नवीन लष्करप्रमुखपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. सध्याचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी अद्याप त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. पण निवड प्रक्रियेवर इम्रान यांचा प्रभाव दिसून येत असल्याचा आरोप मात्र त्यांनी केला. जी व्यक्ती अलीकडेच सत्ताच्युत झालेली आहे आणि निरनिराळय़ा चौकश्यांचा ससेमिरा जिच्यामागे लावण्यात आला आहे, ती तरीही लष्करप्रमुख निवडीसाठी वजन वापरू शकते अशी कबुलीच शाहबाझ यांनी देऊन टाकली. यातून इम्रान यांनी पाकिस्तानी लष्करामध्ये काय स्वरूपाचा गोंधळ उडवून दिला याचा अंदाज बांधता येऊ शकतो. इम्रान यांचा प्रयत्न लष्करप्रमुखपदावर त्यांच्याशी विशेष स्नेह असलेले फैझ हमीद यांना आणण्याचा राहील. असे स्नेहांकित लष्करप्रमुख लाभल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या मदतीने २०२३ मधील निवडणूक जिंकण्याचा- किमान सत्तासोपान सुनिश्चित करण्याचा इम्रान यांचा मनसुबा दिसतो.
म्हणजे बेसुमार महागाई, दिशाहीन राज्यकारभार, विक्राळ बेरोजगारी, चिरंतन दारिद्रय़ यांच्यापासून ‘हकीकी आझादी’ किंवा खरे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इम्रान यांची पदयात्रा सुरू झालेली नाही हे उघड आहे. यातून त्यांना यश मिळाले आणि समजा इम्रान २०२३ मध्ये पुन्हा सत्ताधीश झाले, तर पाकिस्तानात काय दिसून येईल? तेहरीक-ए तालिबान पाकिस्तान, तेहरीक-ए लबैक अशा अतिकडव्या धार्मिक दहशतवादी संघटना फोफावतील. लष्कर-ए तोयबा, जैश-ए मोहम्मदसारख्या संघटना आणि त्यांचे म्होरके कदाचित मुख्य प्रवाहात येतील. ओसामा बिन लादेन बहुधा अधिकृतरीत्या ‘शहीद’ म्हणून घोषित होईल. ‘मुस्लीम उम्मा’ किंवा मुस्लीम भ्रातृवंशाचे नेतृत्व करण्याची खाँसाहेबांची तीव्र इच्छा असल्यामुळे पाकिस्तानचे झपाटय़ाने ‘शरियाकरण’ होईल. इम्रान खान यांचे आकलन आणि आकांक्षा इतपतच मर्यादित, तरीही विखारी. बालपणी बरणीतल्या राक्षसाची गोष्ट सर्वानी वाचली असेल. हा राक्षस जितक्यांदा बरणीत जातो, तितक्यांदा त्याला मुक्ती देणारा कोणी तरी प्रकटतो आणि हे चक्र सुरूच राहते. पाकिस्तानात मूलतत्त्ववाद आणि लष्करशाहीचा हा राक्षस जितक्यांदा बरणीत जातो, तितक्यांदा त्याला बाहेर काढणारा एखादा इम्रान खान प्रकटतो. ही पाकिस्तानची शोकान्तिका आहे आणि दक्षिण आशियाचे ठसठसते गळू!