मनमोहन सिंग यांच्यासारखी व्यक्ती जाते तेव्हा त्यांनी काय कमावले, यापेक्षा मागे राहिलेल्यांनी काय गमावले याचा जमाखर्च मांडणे उर्वरितांसाठी उपयोगाचे…

ही २००९ सालातल्या जूनची गोष्ट. विख्यात गायिका शमशाद बेगम यांस पद्माभूषण देण्याचा सोहळा राष्ट्रपती भवनात होता. त्यावेळी एक महिला त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली: मी तुमची खूप मोठी चाहती आहे. ते ऐकून सुखावलेल्या शमशाद साहिबा शुक्रिया अदा करत तीस विचारत्या झाल्या: आप क्या करती हो. ती महिला म्हणाली ‘‘काही नाही, मी गृहिणी आहे’’. त्यावर आश्चर्यचकित झालेल्या शमशाद बेगम यांचा त्या महिलेस प्रश्न होता: यहाँ कैसे? त्या प्रश्नावर एक मंद स्मित करीत ती महिला म्हणाली: मेरे शोहर प्राईम मिनिस्टर है! मनमोहन सिंग हे त्या महिलेचे शोहर. हा कमालीचा साधेपणा ही मनमोहन सिंग यांची आणि त्यांच्या कुटुंबाची ओळख. ती त्यांच्या धवल पंजाबी पेहेरावाइतकी आयुष्यभर निष्कलंक राहिली. एक नोकरशहा, आर्थिक सल्लागार, अर्थभाष्यकार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि नंतर सलग दहा वर्षे पंतप्रधान ही त्यांच्या आयुष्याची चढती भाजणी तब्बल ७० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यानंतर आता अनंतात विलीन होईल. हा क्षण मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण नक्की काय गमावले याचा आठव समोर मांडण्याचा. सर्वसाधारणपणे या निमित्ताने गौरवांकित गवगवा होईल तो त्यांच्या आर्थिक सुधारणांचा. त्यांनी अर्थमंत्री म्हणून देशास कसे प्रगतिपथावर नेले त्याचा. आणि पंतप्रधानपदावरील त्यांच्या कारकीर्दीचा. तसे होणे योग्यच. शेवटी सामान्यजनांच्या नजरेतून यशाचे मोजमाप हे त्या व्यक्तीने काय कमावले यात असते. तथापि मनमोहन सिंग यांच्यासारखी व्यक्ती ज्यावेळी जाते त्यावेळी त्यांनी काय कमावले यापेक्षा मागे राहिलेल्यांनी काय गमावले याचा जमाखर्च मांडणे उर्वरितांसाठी उपयोगाचे असते.

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!

हेही वाचा >>> डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद पणाला लावून भारताला जागतिक नकाशावर कसं आणलं?

शालेय वयातच अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवणारे गरीब घरातले मनमोहन कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, लबाडीच्या राजकारणात हात बरबटवलेले नसताना, पंतप्रधानपदापर्यंतच्या शिखराकडे नजर ठेवत त्या दिशेने आपली कारकीर्द बेतत नसताना त्या पदावर जातात ते या देशातील राजकीय व्यवस्थेचे यश असते. तथापि सत्तासोपानाच्या पायऱ्या न चढता थेट सर्वोच्च पदी नेमली गेलेली व्यक्ती हुकूमशाही वृत्ती दर्शवण्याचा धोका असतो. कारण लोकशाही ही मुंबईतील लोकलसारखी अनेकांस सामावून घेणारी असावी लागते. मनमोहन सिंग यांना कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यापर्यंत असे काही कोणास सामावून घ्यावे लागले नाही. तरीही लोकशाही मार्गाने निवडून येणाऱ्या नेत्यांपेक्षा मनमोहन सिंग हे सर्वार्थाने अधिक लोकशाहीवादी होते. लोकशाही हे तत्त्व म्हणून सिंग यांच्या अंगी पुरते भिनलेले होते. त्याची प्रमुख उदाहरणे दोन: स्वत: उच्च दर्जाचे अर्थवेत्ते असलेले मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान यासारख्या सर्वोच्च पदी नेमले जातात तेव्हा त्यांचा महत्त्वाचा निर्णय असतो रंगराजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञास सल्लागारपदी नेमणे, हा. दुसरे उदाहरण त्यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टप्प्यातले. त्यांचे एकेकाळचे सहकारी माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या पत्नी ईशर यांनी दिल्लीत एका परिसंवादात उपस्थित राहण्याचे निमंत्रण मनमोहन सिंग यांस दिले. विषय अर्थशास्त्र आणि नियोजन यांच्याशी संबंधित असल्याने सिंग त्यास हजर राहिले. त्या वेळी त्यांच्या समोरच त्यांच्या ‘यूपीए’ सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका झाली. त्यात सर्वात धारदार टीकास्त्र चालवणाऱ्या तरुण प्राध्यापकास सिंग यांनी देशाचा अर्थसल्लागार नेमले आणि नंतर त्याच्याकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद दिले. रघुराम राजन ही आठवण आजही सांगतात. पंतप्रधानपदावरील व्यक्ती त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकारवरील टीकेची इतकी सहिष्णू वृत्तीने दखल घेते आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी टीकाकारांपुढे सहकार्याचा हात मागते हे सच्चा लोकशाहीवादीच करू शकतो.

हेही वाचा >>> Manmohan Singh : माहिती अधिकार कायदा : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकि‍र्दीतील मैलाचा दगड

मनमोहन सिंग असे होते. खरे तर त्यांच्या एका अर्थसंकल्पामुळे या देशाच्या अंगणात लक्ष्मीची पावले उमटली. त्यांनी २४ जुलै १९९१ या दिवशी मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे देशाची आर्थिक कवाडे सताड उघडली गेली आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ भारताकडे वळला. त्यावेळचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी अर्थसंकल्प मांडला गेला त्याआधी दुपारी एक पत्रकार परिषद घेऊन आयात, गुंतवणूक यावरील अनेक निर्बंध उठवले. यातून ‘पंतप्रधान पत्रकार परिषद घेत’ ही एकच बाब लक्षात घेणे चुकीचे. पंतप्रधानांनी ही पत्रकार परिषद अर्थसंकल्पाच्या दिवशीच घेतली कारण आपल्या सर्व घोषणांचा अंतर्भाव हा अर्थसंकल्पात होईल हा त्यामागचा राव यांचा विचार. यातून आपल्या मंत्र्यालाही त्याच्या कर्तबगारीचे श्रेय द्यायला हवे, एवढा मोकळेपणा त्यांच्याकडे होता आणि सर्व प्रकाशझोत फक्त आपण आणि आपल्यावरच राहावा ही त्यांची वृत्ती नव्हती हे जसे दिसते तसेच असे काही क्रांतिकारक निर्णय पेलण्याची सिंग यांची क्षमता किती होती हेदेखील दिसून येते. तरीही अर्थशास्त्रातले सर्व काही आपणालाच ठावे असा त्यांचा आविर्भाव कधीही नव्हता. रंगराजन, रघुराम राजन आदींच्या त्यांनी केलेल्या नेमणुकांतून हे दिसून येते. मृदू आणि मस्तवाल या दोन टप्प्यांतच राजकारण्यांस अनुभवण्याची सवय लागलेल्या भारतीयांस सिंग यांच्या रूपाने मृदू तरीही ठाम राजकारणी पाहता आला. आर्थिक विषयांची आणि देशापुढील प्रश्नांची सखोल समज हे या ठामपणामागचे कारण. त्यामुळेच ‘व्हेन मनमोहन सिंग स्पीक्स, पीपल लिसन’ अशी सहज दाद त्यावेळचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली होती. या दोघा नेत्यांची विशेष मैत्री असल्याचे ऐकिवात नाही. पण जगभरातील नेत्यांच्या पहिल्या पसंतीचे नेते असा लौकिक त्यांनी २०१० पर्यंत कमावल्याचे ‘न्यूजवीक’ने नोंदवले होते.

हेही वाचा >>> Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?

पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकीर्दीत अणुकराराच्या मुद्द्यावर त्यांनी आपले पंतप्रधानपदच नव्हे तर सारे सरकारच पणास लावले. ‘‘माझे सरकार पडले तरी बेहत्तर; पण अणुकरार मागे घेणार नाही’’ ही अशक्त म्हणून हिणवल्या गेलेल्या सिंग यांची कृती पुढील काळात स्वत:चे सरकार वाचवण्यासाठी चार-चार सुधारणा विधेयके मागे घेणाऱ्या नेत्यांस काही शिकवू शकली नाही, यास काय म्हणावे? दुसरे असे की त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्यांनी सिंग यांच्या या अणुकरारावर अश्लाघ्य शब्दांत टीका केली आणि नंतर सत्तेवर आल्यावर त्याच अणुकराराचा पाठपुरावा केला. तरीही एव्हाना पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या सिंग यांनी ‘‘बघा… शेवटी मीच बरोबर ठरलो’’ असा परिचित राजकीय विजय कधीही साजरा केला नाही. तशी संधी खरे तर २०१४ नंतर सिंग यांच्यासमोर अनेकदा आली. मग तो ‘मनरेगा’चा मुद्दा असो वा ‘आधार’ कार्ड असो वा ‘वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ असो. ज्यांनी ‘मनरेगा’स ‘‘मूर्तिमंत भ्रष्टाचार’’ म्हटले, ‘आधार’ कार्ड कल्पनेस ‘‘घटनाबाह्य’’ ठरवले आणि ‘जीएसटी’ ‘‘होऊ देणार नाही’’ असा निर्धार केला, त्यांच्यावरच या सर्व योजना राबविण्याची वेळ आली. हा खरा काव्यात्मक न्याय.

म्हणजे मनमोहन सिंग यांनी जे जे केले ते ते तसेच नंतरच्या काळात राबवले गेले. तथापि हे त्यावेळेस सिंग यांच्या काँग्रेस पक्षास कळले नाही, हे खुद्द मनमोहन सिंग यांचे तसेच देशाचेही दुर्दैव. राहुल गांधी यांची त्या काळातील अध्यादेश फाडण्याची तडफदार (?) कृती आणि सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील ‘राष्ट्रीय सल्लागार परिषद’ यामुळे सिंग यांचा अधीक्षेप होत गेला हे अमान्य करता येणार नाही. ज्या काँग्रेस पक्षाने सिंग यांस पंतप्रधानपद दिले त्याच काँग्रेस पक्षाच्या धुरीणांनी या पदावरील सिंग यांस दुसऱ्या खेपेस सन्मानाने काम करू दिले नाही. आज काँग्रेस राजकीय पक्ष म्हणून जी तळमळ दाखवतो त्याच्या निम्मे जरी शहाणपण तो पक्ष सिंग यांच्या दुसऱ्या खेपेस दाखवता तर त्या पक्षाची आज ही दशा न होती. सिंग यांचे मोठेपण असे की हे सर्व त्यांनी सहन केले आणि कधीही पक्षांतर्गत वा बाहेरील विरोधक यांच्याविषयी अवाक्षर काढले नाही. विरोधकांनी तर त्यावेळी अण्णा हजारेदी बुणग्यांना पुढे करून मनमोहन सिंग यांस घायाळ केले आणि बाबा रामदेव यांच्यासारख्यांनी त्यावेळी सिंग यांस अर्थशास्त्रावर सुनावले.

भारतीय राजकारणाचा हा तळबिंदू होता. त्यात मनमोहन सिंग यांच्यासारखी सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती गुरफटली गेली हा आपला राजकीय दैवदुर्विलास. हे सर्व हलाहल मनमोहन सिंग यांनी सहज प्राशन केले. तरीही ते कधी कडवट झाले नाहीत. यंदा एप्रिल महिन्यात त्यांची राज्यसभा मुदत संपली त्यावेळी ‘लोकसत्ता’ने ‘बडबड बहरातील मौनी’ (४ एप्रिल) या संपादकीयाद्वारे त्यांच्या कारकीर्दीचा यथोचित आढावा घेतला. आता ते गेले. संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ मार्तंडाचे वर्णन तापहीन असे करते. म्हणजे आपल्या तेजाने इतरांस न जाळणारा सूर्य. ‘लोकसत्ता’ परिवाराची या मधुरमार्दवी मार्तंडास मन:पूर्वक आदरांजली.

Story img Loader