श्याम बेनेगल यांनी सिनेमाची दृश्यभाषा, दृश्यचौकटी, छायाप्रकाश यांमधल्या कौशल्यदर्शनावर न थांबता, लोकांना कळतील अशा गोष्टी सांगितल्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गल्लाभरू सिनेमापेक्षा निराळा सिनेमा करूनही यश मिळवेन, अशी जिगर श्याम बेनेगल यांच्या आधीदेखील अनेक दिग्दर्शकांकडे होती. गुरुदत्तचे ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’, त्याहीआधी बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ हे चित्रपट हिंदीत होतेच. बंगालीत १९५० च्या दशकातच सत्यजीत राय आणि ऋत्विक घटक, तर मल्याळममध्ये १९७२ पासून अडूर गोपालकृष्णन यांचे चित्रपट आले. तेव्हा बेनेगल यांना ‘समांतर सिनेमाचे जनक’ म्हणणे हे तात्पुरत्या माहितीवर ताव मारणाऱ्या निवेदकी बुद्धिमत्तेचे लक्षण. मुळात, मोठेपण हे पहिलेपणातच असते असे नाही. पहिले नसले, तरी बेनेगल मोठेच. त्यांचे मोठेपण सांगण्यासाठी एखादेच विशेषण वापरायचे तर, अतिवापराने गुळगुळीत झालेल्या ‘सिद्धहस्त’ या शब्दाकडे नव्याने पाहावे लागेल. व्यवसायाने छायाचित्रकार असलेल्या त्यांच्या वडिलांनी- श्रीधर बेनेगल यांनी- हौस आणि जिज्ञासेतून आणलेला १६ मि. मी. चलतचित्र कॅमेरा हे श्याम बेनेगल यांच्या ‘सिद्ध’पणाचे आद्या साधन. सिनेमाचे तंत्र, त्यातले दृश्यचौकटींचे आणि छायाप्रकाशाचे भान हे सारे वयाच्या बाराव्या वर्षापासून हाताळण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचा परिणाम असा की केवळ दृश्यानंदासाठी किंवा आपला दृश्य-विचार दाखवण्यासाठी अख्खा चित्रपट करण्याच्या फंदात श्याम बेनेगल कधी पडले नाहीत. पडले असते, तर त्यांच्यावरही आर्टफिल्मवाले असा शिक्का बसला असता आणि सामान्य भारतीयांपर्यंत त्यांचे काम पोहोचलेच नसते. तसे झाले नाही. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांतील दृश्यचौकटींचा अभ्यास वगैरेही होत असतो, पण सामान्य प्रेक्षकांना त्यांचा किमान एक तरी चित्रपट आठवतो, आवडतो. याचे कारण बेनेगल यांच्या ‘सिद्ध’ हातांतून- तंत्रावरल्या त्यांच्या हुकमतीतून त्यांनी निव्वळ स्वत:च्या कौशल्याचा बडिवार माजवला नाही. उलट ते कौशल्य त्यांनी गोष्टी सांगण्यासाठी वापरले. आपल्याच देशातल्या, निरनिराळ्या काळांतल्या, बहुतेकदा स्त्री-पुरुषांच्याच गोष्टी!

हेही वाचा >>> अग्रलेख: अब तक ५६!

पण या गोष्टींची निवड, त्या सांगण्याची पद्धत यांतून मात्र श्याम बेनेगल हे केवळ चित्रपट दिग्दर्शक म्हणून नव्हे समाजशास्त्रज्ञ म्हणूनही सामोरे येतात. ‘अंकुर’ हा १९७४ सालचा चित्रपट येण्यापूर्वी सरकारी खात्यांच्या, महामंडळांच्या प्रचारपटांसह तीनेकशे जाहिरातपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. हे काम करत असताना ‘अंकुर’ची कथा त्यांच्याकडे तयार होती… जाहिरातपटांचे वितरक मोहन बिजलानी यांची मदत नसती, तर ‘अंकुर’ उमललाच नसता. या बिजलानींच्या चोख ‘स्ट्रॅटेजी’मुळेच अंकुर सर्वदूर पोहोचला, याचा उल्लेख बेनेगल संधी मिळेल तेथे करत. ‘अंकुर’मध्ये जातिभेद, जातीमुळेच मिळालेली सत्ता आणि स्त्री-पुरुष आकर्षण यांची गोष्ट आहे. तथाकथित खालच्या जातीतली लक्ष्मी आणि तिच्या संमतीनेच तिचा उपभोग घेऊ पाहणारा जमीनदार-पुत्र सूर्या यांच्या या गोष्टीत अख्ख्या गावातला जातिभेद उलगडणारे प्रसंगही आहेत. पत्नी असताना दुसरीला ‘ठेवणे’- हेच सूर्याचा बापही पैसा आणि सत्तेच्या बळावर करतो, पण शिकलासवरलेला सूर्या लक्ष्मीला जिंकू पाहतो. लक्ष्मीचा अपंग, कुचकामी नवरा सूर्याला भेटण्यासाठी येतो तेव्हा त्याच्या हातात काठी दिसली म्हणून सूर्या त्याला अमानुषपणे फोडून काढतो. म्हणजे वैयक्तिक पातळीवर काहीएक शहाणपण आले तरी पुन्हा जातीचीच सद्दी सुरू राहते. पुढल्या १९७६ सालच्या ‘निशान्त’मध्ये गावातल्या जमीनदाराच्या सत्तेला धडा शिकवला जातो, पण प्रेमाची फरपट होते. गावातला शाळामास्तर- ज्याची पत्नी आता जमीनदाराच्या वाड्यात राहते- त्याच्यावरल्या अन्यायाची जाणीव आणि गावातल्या पुजाऱ्याने नीतिमत्तेशी बंडाची घातलेली सांगड यांमुळे अखेर बंड घडते. पण शाळामास्तराची पत्नी स्वत:च्या निर्णयाने वाड्यात आलेली असू शकते, हे कोणीही लक्षात घेत नाही. ‘मंथन’ हा खरे तर ‘अमूल’साठी- गुजरातमधल्या सहकारी दूध चळवळीसाठी- बेनेगलांमार्फत बनवला गेलेला चित्रपट. पण त्याचीही गोष्ट सांगण्याचे स्वातंत्र्य बेनेगलांना मिळाले आणि विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे यांच्या साथीने बेनेगल यांनीही ते पुरेपूर घेतले. व्हर्गीस कुरियन यांच्या यशोगाथेऐवजी दूध-उत्पादक शेतकऱ्यांमधले ताणेबाणे ‘मंथन’ने मांडले आणि सहकाराबद्दलची जाग आणणारा ‘सुसेटी आपणी छे… आप्पणी, आप्पणी…’ हा नसिरुद्दीन शाह यांच्या तोंडचा संवाद अजरामर ठरला. ‘भूमिका’ हा सरळच हंसा वाडकर यांच्या ‘सांगत्ये ऐका…’ या आत्मवृत्तावर बेतलेला चित्रपट. पण त्यानेही नायिकेभोवतीचे पुरुष, त्यांच्या पुरुषीपणाच्या कल्पना यांचे दर्शन घडवले. स्त्रीवर ताबा मिळवू पाहणाऱ्या पुरुषांची स्पर्धा बऱ्याच नंतरच्या ‘सरदारी बेगम’मध्येही दिसली. बेनेगलांच्या नायिकाच अधिक कणखर, अविचल भासल्या… कारण त्यांनी गोष्ट तशी मांडली आणि पुरुषांना आत्मपरीक्षणाची संधी दिली. पण समाजातला बदल हा दिसण्याजोग्या वेगात कधीही घडत नसतो, यावर बेनेगल यांचा ठाम विश्वास असावा. त्यांच्या अनेक चित्रपटांतला समाज स्थितीवादीच दिसतो. मात्र, समाजाच्या या स्थितीवादाला छेद देणाऱ्या गोष्टी सांगण्याची खुमखुमी बेनेगलांना होती.

हेही वाचा >>> अग्रलेख: कोणते आंबेडकर?

समाजाचे सखोल निरीक्षण बेनेगल यांच्या चित्रपटांतून झाले, याचे श्रेय अनेकांचे असेल. पण चांगले सहकारी मिळवणे आणि टिकवणे यासाठी संघटनकौशल्य लागते. ते बेनेगल यांच्याकडे असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा सरळपणा. प्रसंगी जुन्या वळणाचा वाटेल इतका सरळपणा. पण जुने वळण म्हणजे काय, आधुनिकता म्हणजे काय, भारतीय सिनेमा आणि जागतिक सिनेमा यांचे नाते काय याविषयी त्यांची मते अभ्यासू होती आणि कृतिशीलसुद्धा. ‘गाण्यांविना भारतीय सिनेमा असू शकत नाही,’ आणि ‘गाण्यांमुळेच भारतीय सिनेमा निव्वळ करमणूकप्रधान झाला’- ही दोन्ही मते योग्यच मानणाऱ्या बेनेगल यांनी त्यावर कृतीतून काढलेला तोडगा म्हणजे त्यांच्या चित्रपटांतली गाणी! मग ते ‘मंथन’मधले ‘म्हारो गाम…’ असो की ‘कलयुग’मधली छोटी बहू सुप्रिया पाठक हिच्या टेपरेकॉर्डवर नेहमी वाजणारे ‘क्या है तेरा गम बता…’ असो, किंवा ‘मण्डी’तल्या शबाना आझमीने ठसक्यात गुणगुणलेले ‘उजला कपडा पैनू नक्को’… ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या ‘कुंकू’ चित्रपटानंतर गाण्यांचा एवढा विचार बेनेगलांनीच केला. वनराज भाटियांच्या संगीतामुळे बेनेगलपटांतली गाणीही गाजलीच, पण गाणी स्वीकारूनही वास्तववादी चित्रपट बनवता येतो, त्यासाठी प्रेक्षकसुद्धा मिळवता येतो, हे बेनेगलांनी सिद्ध केले. हे आपण ‘भारतीय सिनेमा’ वाढावा म्हणून करतो आहोत, याची खूणगाठ पक्की असल्यानेच ‘सूरज का सातवाँ घोडा’, ‘झुबेदा’, ‘मम्मो’, ‘त्रिकाल’ असे सांस्कृतिक वैविध्य त्यांच्या चित्रपटांनी सहज स्वीकारले. यापैकी ‘मम्मो’ची कथा तयार नव्हती- वर्तमानपत्रातला ६०० शब्दांचा वृत्तलेख वाचून हा चित्रपट सुचला. बेनेगलांचे त्याहीपुढले कर्तृत्व म्हणजे कथाप्रधान नसलेल्या विषयांवरच्या त्यांच्या चित्रवाणी- मालिका. ‘भारत एक खोज’मध्ये नेहरूंची सहृदय- पण दूरस्थ लेखनशैली पचवून, तिला नेहरूंच्या भूमिकेतले निवेदक रोशन सेठ यांच्यापुरतेच ठेवून या मालिकेचे गोष्टिवेल्हाळ रूप बेनेगलांनी साकारले. त्यातले महात्मा फुले किंवा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला सवयीचे नव्हते, पण हे अधिक खरे आहेत एवढे विवेकीजनांनी स्वीकारले. ‘संविधान’ ही राज्यसभा टीव्हीसाठी केलेली दहा भागांची मालिका घटना समितीतल्या चर्चांवर आधारलेली आहे. तीत एखाद्या पात्राची आठी, एखाद्याचे स्मित, एखादी नजरानजर यांतून केवळ मानवी भावनांचे नव्हे तर रागलोभयुक्त माणसांकडून राष्ट्रनिर्मिती कशी होत असते याचेही दर्शन बेनेगलांनी घडवले. ‘संविधान’मधल्या चर्चा, ‘निशान्त’मधली गावकी आणि ‘मंथन’मधली ‘सुसेटी’ अर्थात सहकारी सोसायटी यांमधून भारताच्या समूहमनाचे बारकावे बेनेगलांनी टिपले.

गोष्टी सांगून – त्याही इतक्या बारकाईने मूर्तिमंत करून- काय मिळवायचे होते बेनेगलांना? आपल्या देशाची स्थिती-गती मांडणारा हा दस्तावेज आहे, एवढे भान बेनेगलांना निश्चितपणे होते, हे नुकतेच ‘मंथन’च्या प्रिंटचे पुनरुज्जीवन झाले तेव्हाच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले. तो दस्तावेज तर आहेच, पण गोष्ट सांगण्याच्या मिषाने बेनेगल भारताबद्दलच्या भाष्याची वाट आखून देतात… दिग्दर्शक हा चित्रपटाचा विधाताच, या नात्याने ते या भाष्याचे विधाते ठरतात. या भारत भाष्य- विधात्याला ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.