साधारण ७३ वर्षांपूर्वी १९५१ साली मुंबईतल्या माहीममधल्या चाळीत एका खोलीच्या घरात बावी बेगम यांच्या पोटी पहिला मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा त्या बेगमचे शोहर अल्लारखा कुरेशी यांनी त्या अर्भकाच्या कानात अल्लाच्या आशीर्वाद वचनांआधी तबल्याचे बोल ऐकवले. त्या वेळी बावीजान रागावल्या. त्यावर ‘तबल्याचे बोल ही ‘कुरआन’च्या आयतांइतकीच पवित्र इबादत आहे’ असे अल्लारखा आपल्या बीबीस समजावते झाले. जन्मल्या जन्मल्या ‘अडगुलं मडगुला’ऐवजी आडा-चौताल कानात साठवून घेणारा हा मुलगा अवघ्या तिसऱ्या वर्षी तबल्यावर बसला आणि १२ व्या वर्षी त्याची पहिली बैठक झाली. इतकेच नव्हे तर अमेरिकेतल्या विद्यापीठात जेव्हा तो शिकवू लागला तेव्हा त्याने विशीही गाठलेली नव्हती. तबला हाच ज्याचा श्वास होता, तबला हाच ज्याचा प्राण होता, तबला हेच ज्याचे जगणे होते आणि अल्लारखा त्याच्या कानात सांगून गेले त्याप्रमाणे तबला हीच ज्याची ‘इबादत’ होती त्या झाकीर हुसेन यांनी आज अमेरिकेत आपला अखेरचा श्वास घेतला. तबलजी, तबलापटू, पट्टीचे तबलिये इत्यादी शब्द त्यांची ओळख, त्यांचे मोठेपण, त्यांची कारकीर्द आणि त्यांनी आपणास काय दिले हे सांगण्यास कमालीचे अपूर्ण आहेत. झाकीर हुसेन यांच्यासारखा ‘पूर्णकलाकार’ कसा आकारास येतो हे लक्षात घेतल्याखेरीज त्यांचे जाणे म्हणजे काय हे लक्षात येणार नाही.
झाकीर अशा भारतात, अशा काळात जन्मले की त्यांच्या दिवसाची सुरुवात सरस्वती वंदनेने होत असे, नंतर माहीमच्या दर्ग्यात दुआ झाल्यानंतर ‘कॉन्व्हेन्ट स्कूल’मधे येशूसमोरील प्रार्थनेने कोवळी उन्हे उतरत. पुढील आयुष्यात ‘फ्यूजन’ त्यांना सहजसाध्य का झाले हे यावरून लक्षात येईल. त्या वेळचा भारत हा मूर्तिमंत फ्यूजन होता आणि झाकीर हुसेन ‘त्या’ भारताचे पाईक होते. पंजाब घराण्याची दिलेरी, इस्लामच्या सुफी पंथातून आलेली फकिरी आणि घरंदाज गाण्याबजावण्यातून आलेली लकेरी ही त्यांच्या रक्तात होती. वडील गंडाबंद गुरू होते तरी पारंपरिक उस्तादांसारखे झापडबंद नव्हते. घराणे ही सोय आहे, ती सौंदर्यासक्तीच्या आड येऊ द्यायची नसते हे झाकीर यांना वडिलांकडून उमगले. सिनेसंगीत म्हटले की लाहौलबिलाकुवत म्हणत अल्लारखांनी कधी तोबा तोबा केले नाही. ते स्वत: चित्रपट संगीतकार होते आणि संगीतातील विविध प्रयोग ही त्यांची खासियत होती. झाकीर हुसेन यांनी ती अधिक उंचीवर नेली. तथापि प्रयोगात, आविष्कार यातील नावीन्यासाठी ओळखले जाणारे अल्लारखा गुरू म्हणून कमालीचे कडवे कडक होते. झाकीर यांची तालीम पहाटे तीनच्या ठोक्यास सुरू होत असे. त्यासाठी तबल्याआधी त्यांना हात साफ करावे लागत ते तबलासदृश भरीव लाकडाच्या ओंडक्यांवर. ‘‘त्या घट्ट खोडांवर वाजवून वाजवून नखांतून रक्त येत असे, पण अब्बाजान तालीम थांबवत नसत’’, अशी आपल्या तालमीविषयीची आठवण झाकीर हुसेन यांनीच पुढे एकदा सांगितली आहे. त्यांच्या बोटांचा स्पर्श झाल्या झाल्या तबला आणि डग्गा का बोलू आणि गाऊ लागत याचे उत्तर त्यांच्या या ओंडक्यावरील तालमींत आहे. लहानपणी असे आणि इतके कष्ट घेतलेले हात जेव्हा तबल्यावर पडत तेव्हा समोरून ‘क्या बात है’ची दाद हा केवळ प्रतिध्वनी ठरत असे. असा प्रतिध्वनी झाकीरजींच्या कानी आयुष्यभर पडत आला. खरे तर झाकीरजी अभिनेतेच व्हायचे. ‘मुगल-ए-आझम’मधे पोरसवदा सलीमच्या भूमिकेत खरे तर झाकीरजीच दिसणार होते. तशी शिफारस खुद्द दिलीप कुमार यांनी केली होती. पण अल्लारखांना हे दिल बहकावे मंजूर नव्हते. संगीत हीच झाकीर यांची प्राथमिकता राहील याबाबत ते डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत. अल्लारखा यांचा चित्रपट दुनियेस नकार नव्हता. तर संगीत सोडून अभिनय वगैरे करण्यास त्यांचा विरोध होता. म्हणूनही असेल मग झाकीरजी चित्रपटांशी सुरुवातीच्या काळात तरी संगीतसंबंधच ठेवते झाले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या पहिल्यावहिल्या ‘पारसमणी’तील ‘वो जब याद आये, बहोत याद आये’ या ठुमरी अंगाने जाणाऱ्या अजरामर गाण्यात उठून ऐकू येणारा ठेका झाकीरजींचा. पुढे स्वत: संगीतकार झाल्यावर ‘मि. अँड मिसेस अय्यर’ या चित्रपटात ‘किथे मेहेर अली’ हे गाणे त्यांनी ‘पिया बसंती रे…’वाल्या सुलतान खाँ यांच्या ओढत्या आवाजात गाऊन घेतले. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही कपोलाच्या ‘अपोकॅलिप्स नाऊ’ आणि देव पटेल याच्या अलीकडच्या ‘मंकी मॅन’चे संगीत झाकीरजींचे. आपल्या सई परांजपे यांच्या ‘साज’मध्ये तर त्यांनी भूमिकाही केली.
शास्त्रीय संगीत हे आपल्या अस्तित्वाचे इतके अविभाज्य अंग बनल्यानंतर झाकीरजींना अन्य सांस्कृतिक सांगीतिक प्रयोग करावे असे वाटणे ओघाने आलेच. खुद्द अल्लारखा यांनी असे पाश्चात्त्य-पौर्वात्य संगीताच्या मिलाफात पायाभूत काम केले होते. ते आणि सतारिये रविशंकर यांनी घालून दिलेल्या मार्गानेच मग झाकीरजींनी वाटचाल केली. न्यू यॉर्कमधे विख्यात गिटारिस्ट जॉन मॅक्लॉफ्लिन यांच्याशी झालेल्या दोस्तान्यातून त्यांचा ‘शक्ती’ बँड आकारास आला. आपल्याकडे ‘माठ’ ज्याला म्हणतात तशा मडक्यासदृश आकाराच्या ‘घटम’वाद्याचे वादक टी. एच. विनायक्रम, व्हायोलीनवादक एल. शंकर हे त्यांचे यातील सहवादक. म्हणजे एकाच वेळी हिन्दुस्थानी, कर्नाटकी आणि पाश्चात्त्य सांगीतिक कलेचे हे संयुक्त सादरीकरण. नंतर व्हॅन मॉरिसन, मिकी हार्ट, जाझ संगीतातील तालवादक गिवोनी हिदाल्गो, जेरी गार्सिया अशा अनेक पाश्चात्त्य कलाकारांबरोबर त्यांनी उत्तमोत्तम संगीतप्रयोग केले. भारतात आवर्जून उल्लेख करावा असा त्यांचा प्रयोग म्हणजे बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया, गिटारवादक ब्रिजभूषण काब्रा, संतुरकार शिवकुमार शर्मा यांच्यासमवेत सादर केलेला ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा संगीतसंग्रह. शास्त्रीय संगीताचा कान असो वा नसो ‘कॉल ऑफ द व्हॅली’मधल्या अहिर भैरवाच्या अल्लद बासरीने, त्याला लाटांसारखी साथ देणाऱ्या मंदमार्दवी गिटारच्या नादाने, उगवतीच्या कोवळ्या उन्हात लहान बालिकेच्या पैंजणस्वरांनी धावत येणाऱ्या संतुरने आणि या सगळ्या निसर्गचित्रास धक्का लागणार नाही याची खबरदारी बाळगत तालसाथ देणाऱ्या तबल्याने ज्यांची एकही सकाळ उजाडली नसेल अशी व्यक्ती कितीही जगली तरी तिच्या आयुष्यात उजाडले असे म्हणता येणार नाही. भारतीय संगीताचे समग्र भारतपण झाकीरजी, शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरासिया यांच्या अनेक संयुक्त वा एकट्या-दुकट्या प्रयोगातून दिसून येते.
झाकीरजी हे असे संगीत आयुष्यभर रसरशीतपणे जगले. कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही एखाद्या तरुण नवशिक्यास साथ देण्यात आणि ती देताना त्यास ‘सांभाळून’ घेण्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटत नसे. त्यामुळे भीमसेनजी, वसंतराव, किशोरीबाई वगैरेंना तोलामोलाची संगत केल्यानंतर पुढच्याच बैठकीत एखाद्या पहिलटकरासही ते तितक्याच उत्साहाने सोबत करत. वसंतरावांबरोबरची त्यांची एखादी बैठक म्हणजे दोन बुलेट ट्रेनची स्पर्धा असे, तर भीमसेनांबरोबर त्यांना ऐकताना दोन रत्नजडित बलदंड ऐरावत झुलत झुलत चालल्याचा भास होत असे. गायकाबरहुकूम स्वत:त असे बदल करण्याइतका मोठेपणा ही झाकीरजींची खासियत. आपण साथ देत आहोत यांचे भान न सोडण्याइतका भव्य मोठेपणा स्वत: महामोठे एकल कलाकार असतानाही त्यांच्या ठायी होता. आणि महत्त्वाचे असे की त्यांचा तबला फक्त बोलत नसे. तो ‘गात’ असे. हा ‘गाणारा’ तबला समेवर येताना गायकाकडे झुकत झाकीरजींच्या तोंडाचा एखाद्या लहान मुलासारखा होणारा चंबू हे मोठे विलोभनीय दृश्य. त्यात त्यांचा तो नर्तकी केशसंभार! या सगळ्यामुळे झाकीरजी तबल्यावर असले की तो एक समग्र सांगीतिक अनुभव व्हायचा. त्यांची या तबल्यावर इतकी हुकमत होती की त्यातून वाटेल ते ध्वनी, नाद निर्माण करून अचंबित करणाऱ्या श्रोत्यांस त्यांच्या ‘हाताखालची’ तबला-जोडी सजीव आहे की काय, असे वाटे. हे असे प्रेक्षकांना रिझवणे ही चमत्कृती होती, झाकीरजींसारख्या उंचीच्या कलाकाराने त्यांचा आधार घेऊ नये हे खरे. पण त्यांच्या मते तबला त्यामुळे अधिक लोकप्रिय होण्यास मदत होते. हा तबला हे त्यांचे सर्वस्व.
त्यासाठीच ते जगले. खरे तर ७३ हे काही जाण्याचे वय नव्हे. नुकताच तर त्यांचा ‘ग्रॅमी’ सन्मान झालेला. ‘अजून तितके काही हातून चांगले झालेले नाही, बरेच करायचे आहे’, असे ते म्हणत. आणि ते अचानक गेलेच. समेवर यायच्या आधीच! आता आता कुठे मैफल जमू लागलेली, एक ठहराव आलेला आणि बैठकीची आस लागलेल्यांच्या कानावर अचानक त्यांच्या जाण्याची बातमी आली. गदिमा असते तर त्यांनी विचारले असते ‘आला नाहीत तोवर तुम्ही जातो म्हणता काय?’. या प्रश्नास झाकीरजी आता उत्तर देणार नाहीत. समस्त ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे या जिवंत कलाकारास आदरांजली.