गाण्यासाठी नुसता आवाज सुरेल असणे पुरेसे नाही. स्वरनाटय़ उभे करण्याचीही क्षमता असावी लागते. सुलोचनाबाईंच्या प्रत्येक गीतात हे नाटय़ जबरदस्त रीतीने उमटले..

कोणाचे मूल्यमापन कशाच्या आधारे करायचे याबाबत जनामनांत सांस्कृतिक घोळ असला, की सुलोचनाबाईंच्या खणखणीत पहाडी आवाजापेक्षा त्या डोक्यावर पदर घेऊन लावणी म्हणतात, याचेच कौतुक होणे आश्चर्य नाही. मराठी सांस्कृतिक संवेदना ‘प्रियेचे झोपडे’ (बंगला नव्हे) वर्णनाऱ्या भावगीतांनी, अप्रतिम गायकीच्या नाटय़गीतांनी आणि अभिजनांसाठी शास्त्रीय संगीताने बांधल्या जात होत्या तेव्हाचा हा काळ! अशा वातावरणात ‘धाटाधाटानं उभारी धरली, नाही वाढीस जागा उरली’ असे न लाजता सांगत ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला..’ अशी सणसणीत हाळी आली तेव्हा दोन हात केळीच्या पानावर पंचपक्वान्ने अपेक्षित असताना एकदम एकाने नळीचा रस्सा वाढावा, असे झाले असणार. सुलोचना चव्हाण यांच्या गाण्याने मराठी संगीतविश्वात एक नवी चव आली. त्यांचे मोल हे आहे, पण ते तेवढेच नाही.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…

लावणी हा केवळ ‘पिला हाऊस’ वा चौफुल्यात चोरून जाऊन चव घ्यायचा पदार्थ नाही. उत्तम लावणी गायन हे नाटय़संगीतइतकेच वा ठुमरी, दादरा, गझलइतकेच उत्तम उपशास्त्रीय गायन आहे, हे सुलोचनाबाईंनी रुजवले आणि लावणी शृंगारिक असते म्हणून लावणी गायिकाही ‘तशा’ असतात हा सोयीस्कर गैरसमजही दूर केला, हे त्यांचे कर्तृत्व! साक्षात मलिका-ए-गझल बेगम अख्तरसाहिबांनी गले लगाकर सुलोचनाबाईंना दाद दिली, ती केवळ दोघींच्या गायनाच्या जातकुळीची मिठी नव्हती. तर तो उभयतांच्या गानप्रकाराच्या वेदनेचाही संगम होता. ही वेदना आता शांत झाली.

गाण्यासाठी नुसता आवाज सुरेल असणे पुरेसे नाही. त्यामध्ये स्वरनाटय़ उभे करण्याचीही क्षमता असावी लागते. सुलोचनाबाईंच्या प्रत्येक गीतात हे नाटय़ इतक्या जबरदस्त रीतीने उमटत असे, की ते गीत, शब्द कमालीच्या उंचीवर जात. हे सारे त्यांनी स्वत:हून आत्मसात केले, हे विशेष. प्रत्यक्ष गायनाचे शिक्षण न घेता त्या असे गाणे सादर आणि साजरे करू शकल्या. त्यासाठी लागणारी निरीक्षणशक्ती त्यांच्याकडे होती. ती अनेकांकडे असेही. परंतु त्याहीपलीकडे जाऊन, स्वत:ची शैली निर्माण करण्याइतका अधिकारी आत्मविश्वास असावा लागतो. तो त्यांच्या ठायी होता. आचार्य प्र. के. अत्रे यांच्या चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांनी सुलोचनाबाईंकडून लावणी गाऊन घेतली. ती त्यांची पहिली लावणी. त्याआधी सी. रामचंद्र, मुश्ताक हुसेन आदी संगीतकारांकडे मन्ना डे ते महमंद रफी, शमशाद बेगम ते गीता दत्त अशा अनेकांसह त्यांनी गायन केले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचे पहिले रेकॉर्डिग झाले होते, यावरून त्यांच्यातील गाण्याची उपज आणि उमज किती खोल होती हे कळेल. मन्ना डे यांच्यासमवेत त्यांनी ‘भोजपुरी रामायण’ गायले होते, हे तर आज अनेकांच्या स्मरणातही नसेल. पुढे ‘सवाल माझा ऐका’ चित्रपटाच्या रौप्य महोत्सवापर्यंत त्यांच्या आवाजाचा, त्यातही लावणी गायनाचा लौकिक चांगलाच पसरला. त्यामुळेच १९६५ मध्ये पुण्याच्या ‘आर्यन टॉकीज’मधील एका कार्यक्रमात आचार्य अत्रे यांनी सुलोचनाबाई या महाराष्ट्राच्या ‘लावणीसम्राज्ञी’ आहेत, हे जाहीर करून टाकले. अत्रे यांनीच द्वाही फिरवली म्हटल्यावर ही उपाधी त्यांना कायमचीच चिकटली. ज्या काळात पाश्र्वगायनात सुरेल आणि तरल भावना व्यक्त करण्याची ताकद असलेले आवाज होते, त्याच काळात त्यांनी आपलेही स्थान भक्कम केले, ते केवळ गीतातील स्वरनाटय़ाच्या आधारे. ज्या वयात लावणी नुसती ऐकली तरी घरात ओरडा खावा लागे- त्यांनी तो त्यांच्या आईकडून अनेकदा खाल्ला- त्याच वयात त्या या अस्सल मराठमोळय़ा संगीतात रमू लागल्या. 

चित्रपटाचा प्रेक्षक केवळ शहरातच नसतो, याचे भान या क्षेत्रातील मंडळींना येत असतानाच सुलोचनाबाईंचा प्रवेश झाला. परिणामी लावणी गावी, तर त्यांनीच, असा दंडकच निर्माण झाला. चित्रपटातील त्यांचा ग्रामीण बाज केवळ नव्या प्रेक्षकांना खेचण्यासाठी नव्हता. ते या समाजातील राजकारण, समाजकारण आणि सत्ताकारण यावर त्यांचे स्टेटमेंट होते. ‘कसं काय पाटील बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का’ हे गाणे पोहोचविण्यासाठी नुसता आवाज उपयोगाचा नाही. त्यातील पाटीलपण आणि आसपासचे राजकारण/ समाजकारण माहीत असावे लागते. सुलोचनाबाईंच्या गाण्यात ही समज होती. ‘माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतो’ मधला ‘मा’ आणि ‘झ्या’मधला हेलकावा फक्त सुलोचनाबाईंच्या आवाजाने जाणवतो. असे संगीत तयार करणारे वसंत पवार, राम कदम यांच्यासारखे कमालीचे प्रतिभावान कलावंत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेमके गाऊ शकणाऱ्या गायकाचे असणे, हे फार महत्त्वाचे. सुलोचनाबाई नेमक्या तिथे होत्या.

गाण्यातील शब्दांचा वापर करताना, त्यातील अस्तरात लपलेल्या नाटय़ाकडे लक्ष देण्याचे कसब त्यांच्याकडे होते, त्यामुळे त्यांच्या गीतांनी, विशेषत: लावण्यांनी सारा महाराष्ट्र दुमदुमून गेला. ‘पाडाला पिकलाय आंबा’ या गीतातील त्यांच्या आवाजातील नखरे जेवढे सुस्पष्ट होते, तेवढाच ‘कळीदार कपुरी पानं’मधील अतिशय तरल शृंगार, ‘कसं काय पाटील बरं हाय का’ या गीतातील बेरकीपणा, ‘खेळताना रंग बाई होळीचा’मधील चोळीचा कोना फाटतानाची केवळ आवाजातून घेतलेली वेलांटी हे सारे उच्च दर्जाचे होते. त्यांची अनेक गीते प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळत राहिली, याचे कारण त्यांच्यापाशी असलेली ही अंगभूत क्षमता.

त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या, तथापि खासगी जीवनात अतिशय आदबशीर असणाऱ्या सुलोचनाबाईंचे जगणे मध्यमवर्गीयच होते. घर, संसार थाटून त्यातच त्या रमल्या. प्रचंड लोकप्रियतेच्या लाटांवर विराजमान होतानाही, सुलोचनाबाईंनी आपला शालीनपणा कधी सोडला नाही. कलावंत म्हणून अनेकांकडे असणारे स्तोम त्यांनी कधीच माजू दिले नाही. कलावंत आणि माणूस यांच्यात असणारा फरक त्यांना समजला होता, त्यामुळे केवळ श्रोत्यांना आवडते म्हणून किंवा धनप्राप्तीसाठी त्यांनी आपल्या जगण्याच्या पद्धतीत कधीच बदल होऊ दिले नाहीत. चित्रपटासारख्या रुपेरी आणि रंगेल दुनियेत त्या स्वच्छ आणि टिपूर चांदण्यासारख्या चमचमत राहिल्या, ते केवळ आपल्या गायनकलेच्या आधारे. जो काही रगेलपणा आणि नटखटपणा असेल, तो केवळ गाण्यापुरता. गीताला न्याय द्यायचा, तर त्यातील भावभावनांना पूर्णपणे समजून घेणे आवश्यकच! भक्तिभाव असेल, तर तो त्याच उत्कटतेने सादर करण्यासाठीची कलात्मक तन्मयता त्यांच्यापाशी होती. सुलोचनाबाईंना मराठी जनांनी जी अभूतपूर्व दाद दिली, ती या क्षमतेला होती. त्या मात्र असल्या प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमी दूर राहिल्या. आपण बरे, की आपले काम, हा त्यांच्या जगण्याचा मंत्र. तोरा मिरवत सतत माध्यमांसमोर येण्याची हौस त्यांना कधीच नव्हती. त्यामुळे त्यांना त्याचे कधी आकर्षणही वाटले नाही. त्यांच्या गाण्याचे मोठेपण मुंबई वा पुणे आकाशवाणीने ओळखण्याआधी रेडिओ सिलोनने ते लक्षात घेतले होते, ही बाब उल्लेखनीय. कुणालाही हेवा वाटावा असे यश पदरात असताना, त्याकडे सावधतेने पाहण्याचा त्यांचा स्वभाव, हे त्यांचे शहाणे वेगळेपण. सुलोचनाबाईंनी लावणीतल्या ठसक्याला जसा न्याय दिला, तसाच भक्तिभावाला आणि तरल संवेदनांनाही दिला. म्हणूनच कलेच्या झगमगत्या दुनियेत त्या अढळपदी पोहोचल्या. शब्दांतील भाव केवळ स्वरनाटय़ातून साकार करणाऱ्या या कलावतीला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, हे येथील कलासक्त उमदेपण.

त्या वेळचा हा आंतर-समाजीय सुसंस्कृतपणा लक्षात घ्यावा असा. ब्राह्मण माडगूळकरांनी ‘बामणाचा पत्रा’तून केवळ पाहिलेल्या- केलेल्या नव्हे- शेतातल्या उसाला कोल्हा लागत होता आणि वसंत पवार यांच्या संगीतात मूळ कदमांची चव्हाण झालेल्या सुलोचनाबाई ते सुरेलपणे महाराष्ट्रभर सांगत होत्या. सुधीर फडक्यांच्या हिंदूत्ववादी अंगणातल्या जाळीत करवंद पिकत होती आणि माणिक वर्मा ते सानुनासिक स्वरात सांगत ‘पुढचं पाऊल’ टाकत होत्या. काव्य-शास्त्र-संगीत हा त्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचा पदर होता आणि सुलोचनाबाई त्यावरचा जरतारी मोर! तो सांस्कृतिक पदर आपण हरवत असताना त्यावरच्या त्या मोराचे गमावणेही ओघाने आलेच. सुलोचनाबाईंना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

Story img Loader