अलोकशाही मार्गांचे सर्रास समर्थन करणाऱ्यावर हल्ला झाला. या हल्ल्याच्या राजकीय फायद्यातोट्याचीच गणिते मांडली जाणार…

अमेरिकेचे माजी… आणि आता कदाचित संभाव्य… अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचार सभेत गोळ्या झाडल्या गेल्याने लोकशाहीची जननी नसलेली अमेरिका चांगलीच हादरलेली दिसते. असे होणे साहजिक. अध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि अमेरिकी लोकशाहीत हिंसाचारास स्थान नाही, असे म्हटले. हे त्यांचे विधान वयपरत्वे होणाऱ्या विस्मरणाचे निदर्शक ठरते. याचे कारण अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासावर रक्ताचे मुबलक शिंपण झालेले आहे. या देशाच्या चार अध्यक्षांचे प्राण हिंसाचारात गेलेले आहेत आणि डझनभर अध्यक्ष/ उपाध्यक्ष/ अध्यक्षपदाचे उमेदवार अशा हल्ल्यांत जायबंदी झालेले आहेत. ट्रम्प यांच्याच पक्षाचे अब्राहम लिंकन हे अशा हल्ल्यात मारले गेले आणि त्याच पक्षाचे रोनाल्ड रेगन जखमी झाले. रेगन हे चित्रपट कलाकार होते. अध्यक्षपदावर असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याने साऱ्या जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. जगभरातून त्यांच्या प्रकृतीची चौकशी होऊ लागली. त्यावर; ‘‘चित्रपटांत काम करत असताना जगाने माझ्याकडे याच्या निम्मे लक्ष जरी दिले असते तरी मी राजकारणात आलो नसतो’’, असे उद्गार रेगन यांनी काढले. त्यांची विनोदबुद्धी हल्ल्यातही शाबूत होती आणि त्या वेळचे वातावरण निकोप होते. राजकारणातील प्रतिस्पर्ध्यास शत्रू मानायची प्रथा अजून सुरू व्हायची होती. तेव्हा त्या वेळी रेगन यांनी जे हसत-खेळत सहन केले तसे ट्रम्प करण्याची सुतराम शक्यता नाही. तेवढी त्यांची सांस्कृतिक उंची नाही आणि तेवढा पोक्तपणाही त्यांच्या ठायी नाही. या घटनेकडे शुद्ध राजकीय दृष्टिकोनातूनच पाहिले जाणार आणि या हल्ल्याच्या राजकीय फायद्यातोट्याचीच गणिते मांडली जाणार. तेव्हा अमेरिकेतच असे होणार असल्याने ट्रम्प यांच्या भारतीय भक्तांस येथे उचंबळण्यात हशील नाही. हे सांगावे लागते याचे कारण राजकीय समजेच्या बाबतीत बौद्धिक दिव्यांगांची एक नवी पिढीच्या पिढी आपल्याकडे सध्या वयात आलेली आहे. खुद्द इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे सार्वत्रिक वाभाडे काढले जात असताना हे भारतीय अर्धवटराव येथे त्यांच्यासाठी पूजापाठ करतात आणि आता ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अमेरिकेतच साधक-बाधक चर्चा सुरू झालेली असताना ही मंडळी ट्रम्प यांची आणि त्यांच्या हल्लेकऱ्याची भारतीय आवृत्ती शोधू पाहतात. त्याची गरज नाही.

Loksatta editorial Finance Minister Nirmala Sitharaman in the budget on the states of Andhra Pradesh and Bihar
अग्रलेख: विश्वासामागील वास्तव!
Bigg Boss Marathi Season 5 Siddharth Jadhav Angry On Janhvi Killekar for insulted pandharinath kamble
“एकदा का तो सुटला की तुझी…”, पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीवर भडकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला…
अग्रलेख : आठवेल का सारे…
kamala harris face donald trump in the 2024 us presidential polls
­­­­अग्रलेख : ‘कमला’ पसंत?
Union Budget 2024 Key Announcements in Marathi
अग्रलेख : अधिक राजकीय!
Loksatta editorial Prime Minister Narendra Modi optimistic remarks about Maharashtra economic development in Mumbai
अग्रलेख: ‘महाशक्ती’चे ‘रिटर्न गिफ्ट’!
Bangladesh Protest Live Updates in Marathi| Sheikh Hasina Resigns Live Updates in Marath
अग्रलेख : एक ‘बांगला’ बने न्यारा…
Loksatta editorial Nitin Gadkari letter to Finance Minister Nirmala Sitharaman regarding taxation of life insurance and medical insurance
अग्रलेख: गडकरींच्या गुगलीचे गारूड!

राजकारणात कमालीचा विद्वेष वाढवण्यास सुरुवात ट्रम्प यांचे पूर्वसुरी धाकटे जॉर्ज बुश यांनी केली. ‘‘तुम्ही आमच्याबरोबर आहात किंवा विरोधात’’, असे फक्त दोन पर्यायांचे राजकारण त्यांचे. आता ट्रम्प पाहिले की ते बरे होते असे वाटते. किंबहुना ट्रम्प यांच्या तुलनेत रेगन हेदेखील सुसह्य सज्जन भासतात यावरून या गृहस्थाने राजकारणाचे किती खातेरे केले हे लक्षात येते. अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर आपल्या बिनडोक समर्थकांना ‘कॅपिटॉल हिल’वर सशस्त्र हल्ला करण्याची चिथावणी देणाऱ्या या इसमाकडून सभ्य राजकारणाची अपेक्षा करणार तरी कशी? अमेरिकेच्या इतिहासात कधी कोणास न सुचलेला उद्याोग या ट्रम्प यांनी पराभवानंतर केला. आज त्यांच्यावरील हल्ल्याने जगास जितका धक्का बसला नसेल त्याच्या किती तरी पट भूकंप ट्रम्प यांच्या सशस्त्र बंडाच्या चिथावणीने झाला. त्याआधी आणि त्यानंतरही ट्रम्प आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. त्यांच्या त्या वेळच्या कृत्यांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. वास्तविक त्या एका कृत्यासाठी ट्रम्प यांस निवडणूक लढवण्यास प्रतिबंध केला जायला हवा. कारण लोकशाही मार्गावर विश्वास नसलेली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात किती प्रामाणिक हेतूने उतरेल हा प्रश्न. तेव्हा अलोकशाही मार्गांचे सर्रास समर्थन करणाऱ्यावर निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होत असताना हल्ला झाला त्यामागील हे एक कारण.

दुसरे असे की अमेरिकेतील मुक्त बंदूक धोरण. हा त्या देशास लागलेला शाप आहे आणि त्यात आतापर्यंत शेकड्यांनी प्राण गमावलेले आहेत. दुकानातून खेळणे आणावे तितक्या सहजपणे त्या देशात सर्व प्रकारच्या बंदुकांची खरेदी करता येते. औषधांच्या दुकानात तिकडे डॉक्टरांच्या सहीशिक्क्याशिवाय साधी सर्दीपडशाची औषधेही मिळत नाहीत. पण बंदुका, काडतुसे मात्र सर्रास खरेदी करता येतात. या ‘बंदूक संस्कृती’विरोधात अनेक शहाण्यासुरत्यांनी आतापर्यंत अनेकदा आवाज उठवला. पण हे धोरण काही बदलले जात नाही. मुक्त बंदूक धोरणाचे ट्रम्प हे खंदे समर्थक. अलीकडेच राष्ट्रीय बंदूकधाऱ्यांच्या संघटनेत भाषण करताना ट्रम्प यांनी आपण कसे या धोरणाचे पाठीराखे आहोत हे मिरवले. अमेरिकेतील वाढत्या हिंसाचारामागे मुक्त बंदूक धोरणाचा दोष नाही; तर वाढते मानसिक असंतुलन हे त्याचे कारण आहे, असे ज्ञान या महाशयांनी पाजळले होते. ‘व्हाइट हाऊस’मध्ये माझ्याइतका खमका मुक्त बंदूक धोरण समर्थक कोणी नाही, अशीही बढाई त्यांनी मारली. त्याच मुक्त बंदूक धोरणाने काय होऊ शकते याची चुणूक ट्रम्प यांना या हल्ल्याने मिळाली असेल.

अर्थात म्हणून ट्रम्प या धोरणास विरोध करतील अशी आशा बाळगणे मूर्खपणाचे. उलट या फसलेल्या हल्ल्याचे रूपांतर न फसणाऱ्या राजकीय कथानकात कसे करता येईल, याचाच प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. ते साहजिक. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा हल्ला ट्रम्प यांच्यासाठी ‘परमेश्वराचा प्रसाद’च म्हणायचा. आधीच ‘‘तुरळक कोठे केस रुपेरी, डोईस टक्कल छान’’, असे ‘म्हातारा इतुका’ बायडेन पावलापावलावर फाफलत असताना त्यांचे आव्हानवीर ट्रम्प यांच्याबाबत असे घडणे बुडत्या बायडेन यांना अधिक बुडवणारे ठरू शकेल. अमेरिका आज कधी नव्हे इतकी दुभंगलेली आहे. या दुभंगात ट्रम्प यांचा मोठा वाटा. वाटेल तितकी फेकूगिरी करण्यापासून हास्यास्पद धोरण-भाष्य करण्यापर्यंत ट्रम्प यांच्या लीलांचा पाढा वाचावा तितका कमीच. अशी व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी खात्रीशीर विजेती मानली जात असेल तर ती बाब त्या व्यक्तीच्या मोठेपणापेक्षा अमेरिकेच्या कमीपणाची निदर्शक ठरते. वास्तविक आताही जे घडले त्यातून सुरक्षा यंत्रणांतील त्रुटी समोर आल्या. आजी-माजी अध्यक्ष जेव्हा कोठे जातात तेव्हा त्यांच्या समारंभ स्थळ परिसरातल्या सर्व इमारतींवर सुरक्षा यंत्रणांची नजर असते. दुरून महत्त्वाच्या व्यक्तीचा ‘वेध’ घेता येऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. हे आताच नेमके कसे झाले नाही, असा प्रश्न. त्यामुळे उलट ट्रम्प यांच्या मुळावर ‘आतलेच’ कोणी असल्याची कट-कथा रचली जाईल आणि विद्यामान प्रशासनालाच ते कसे नकोसे झाले आहेत असा प्रचार-प्रसार केला जाईल. त्यात सुरक्षा यंत्रणांनी मारेकऱ्यास ठार केल्याने ही कहाणी अधिकच गूढ होण्याचा धोका संभवतो.

हे सर्व टाळण्यासाठी प्रशासनाने उलट ट्रम्प यांच्यासारख्या हटवाद्यास अधिक संरक्षण द्यायला हवे होते. झाले उलटेच. जे झाले त्याची किंमत बायडेन आणि डेमॉक्रॅटिक पक्षाला तर द्यावीच लागेल; ती अमेरिकेस मोठ्या प्रमाणावर चुकवावी लागेल. मारेकऱ्याची गोळी ट्रम्प यांच्या कानशिलास रक्तबंबाळ करून गेली असेल. पण प्रत्यक्षात मारेकऱ्याने अमेरिकेच्याच कानफटात लगावली, हे निश्चित. त्या धक्क्यातून हा देश कसा सावरतो ते पाहायचे.