अमीन सयानींचा आवाज हा जनसामान्यांच्या रसिकतेचा आवाज ठरला, तर फली नरिमन यांच्या विचारांतून लोकशाहीप्रेमाचा सच्चा सूर उमटला..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉइस कल्चर’ या शब्दप्रयोगातल्या ‘कल्चर’चा शब्दकोशातला अर्थ जरी ‘संस्कृती’ असा असला, तरी इथे तो ‘आवाजाची जपणूक, संवर्धन’ अशा अर्थाने वापरला जातो हे अनेकांना माहीत आहे. आवाज-जपणुकीच्या कार्यशाळाही हल्ली वारंवार होतात, पैका मोजून त्यांत प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही बरीच असते, कारण आवाज हे आपले भांडवल असू शकते आणि त्याचे मूल्यवर्धन आपण केले पाहिजे याची जाणीव आज अनेक तरुणांना असते. ही जाणीव अशी सार्वत्रिक होण्यामागे जो इतिहास आहे, त्याचे इतिहासपुरुष म्हणजे अमीन सयानी. भारतभरात रेडिओचा प्रसार होऊ लागला तो स्वातंत्र्योत्तर काळात आणि नेमके तेव्हापासून अमीन सयानींचे नाव नभोवाणीशी जुळले. काळ बदलत गेला, पण सयानी ज्या जनप्रिय हिंदी सिनेसंगीताच्या कार्यक्रमाचे निवेदन करीत त्यात कोणताही खंड पडला नाही. नेहरूकाळ सरला, बांगलादेश मुक्त झाला, आणीबाणी लादली गेली, फुटीरतावाद बोकाळला, संगणकयुगाची नांदी ऐकू येऊ लागली, मंडल विरुद्ध मंदिर या राजकारणाने देशाला ग्रासले… अशा सर्व काळात सयानींचा आवाज हा जनसामान्यांच्या साध्याभोळ्या रसिकतेचा आवाज ठरला! हे एवढे बदल राजकारणात झाले तरी भारतीयांना निर्लेपपणा जपता येतो याचे कारण आपल्या देशाची राज्यघटना, याची नेमकी जाणीव असलेले विधिज्ञ फली एस. नरिमन हेही याच काळाचे सहभागी- साक्षीदार… ‘भारताचे महान्यायअभिकर्ता’ हे पद आणीबाणी घोषित झाल्यानंतर झुगारून पुन्हा वकिली करणारे, लवाद-प्रक्रिया ही खटलेबाजीला पर्याय ठरू शकते यावर विश्वास असलेले आणि कायद्याविषयीच्या जाणकारीने अनेक ग्रंथ लिहूनही ‘यू मस्ट नो युअर कॉन्स्टिट्युशन’ हे पुस्तक जनसामान्यांसाठी लिहिणारे फली नरिमन हे वयाच्या ९५ व्या वर्षी वारले आणि अमीन सयानी ९१ व्या वर्षी. मुंबईच्या झेवियर्स कॉलेजातून नरिमन पदवीधर झाले त्या वर्षी अमीन सयानींनी त्याच महाविद्यालयात प्रवेश केला. या दोघांची वाटचाल एका मार्गावरली अजिबात नाही. पण फली नरिमन हे निव्वळ कायदेपंडित नव्हते तर लोकशाहीप्रेमींचा आवाज होते. गेल्या आठवड्यात लोपलेल्या या दोघा आवाजांपैकी आधी अमीन सयानींबद्दल.

कारण हा आवाज घराघरांत अधिक पोहोचलेला आहे. वयाच्या सुमारे नव्वदीपर्यंत आवाजाचा तजेला कायम राखणारे अमीन सयानी हे मूळचे गुजराती असले तरी नभोवाणी- निवेदक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली ती मुंबईत. या आर्थिक राजधानीतल्या हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड असे कुणी म्हणत नसे तेव्हाच्या काळात- म्हणजे सुमारे १९७० सालापर्यंत- सयानींची लोकप्रियता वाढतच राहिली. निव्वळ आवाजावरच मिळवलेली ही लोकप्रियता पार ‘वरच्या पायरीवर’ जाऊन स्थिरावली आणि त्याच उच्चस्थानी राहिली. हिंदी चित्रपटसंगीत हा भारताने जगाला दिलेला नवा प्रकार आहे आणि त्याच्या सुवर्णकाळाचे आपण साक्षीदारच नव्हे तर त्यातले सहभागीदेखील आहोत, याची जाणीव खुद्द सयानींनाही होण्यासाठी एकविसावे शतक उजाडावे लागले असेल. ज्या ‘बिनाका गीत माला’ या प्रायोजित कार्यक्रमाने त्यांना एवढी लोकप्रियता मिळवून दिली, त्यातल्या ‘बिनाका’ कंपनीचे नाव कधीच बदलले, इतकेच काय पण त्या कार्यक्रमात वाजणारी गाणी ज्या ‘एचएमव्ही’ कंपनीने ध्वनिमुद्रिकांवर आणली तिचेही नाव इतिहासजमाच झाले… पण त्या कार्यक्रमातून हिंदी सिनेसंगीताच्या बहरकाळाचा जो पट उलगडला, तो मात्र आजही सयानींच्या आवाजातल्या निवेदनासह मोबाइलच्या पडद्यांवरही उपलब्ध आहे. या आवाजातून त्या काळातल्या जनप्रियतेची नाडी काय होती याचाही अंदाज बांधता येत राहील. श्रोते अमीन सयानींवर फिदाच होते, पण त्यांचे अनुकरण त्या वेळी गल्लीबोळांपासून ते तीनमजली षण्मुखानंद सभागृहापर्यंत होणाऱ्या वाद्यावृंद-कार्यक्रमांच्या निवेदकांनी केले. सयानींच्या निवेदनाला नादमयता असे. ‘याच संगीतकाराच्या गाण्याला १९६० मध्येही पहिले स्थान मिळाले होते’ ही एरवी साधीच वाटणारी माहितीसुद्धा सयानींच्या मुखातून, ‘‘इन्हीके मधुर गीत की गूंज पंद्रह साल पहले भी गूंजी थी… उन्नीससौ साठमे बना वह गीत था इतना सुरीला, कि चोटी के पायदान पर ही रहा’’ अशा आतषबाजीसारखी ऐकू येई. ‘रेडिओ सिलोन’चे ध्वनिमुद्रण जेव्हा मुंबईच्या धोबीघाट भागातल्या ‘झेवियर्स तंत्र विद्यालया’तून होत असे, तेव्हा अमीन हे शेजारच्याच झेवियर्स कॉलेजात शिकत होते आणि त्यांचे थोरले बंधू हमीद हे त्या ध्वनिमुद्रण केंद्रात नोकरीस असल्याने अमीन यांचीही येजा त्या केंद्रात सुरू असे. तिथेच २५ रुपयांत भरपूर काम करण्याची जी जबाबदारी अमीन यांनी स्वीकारली, तीच ‘बिनाका गीतमाला’!

त्या वर्षी- १९५२ मध्ये फली नरिमन हे नानी पालखीवालांचे सहकारी वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयात रुजू झाले होते. तेथून १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करू लागले त्या वर्षी बिनाका गीतमालेतील उच्च स्थानावरले गाणे ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे होते आणि महान्यायअभिकर्त्याचे पद चालून आल्याने नरिमन यांचाही प्रवास बहरू लागला होता. पण मग ‘बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई’ या गाण्याला गाजवणारे १९७५ हे वर्ष उजाडले. लोकशाही टिकवण्याची जाणीव सोबत घेऊनच नरिमन यांनी त्या वर्षी सरकारी पद सोडले. पुढे न्यायमूर्तीपदालाही नकार दिला. त्याऐवजी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणे त्यांनी पसंत केले आणि पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयांतर्गत लवादाच्या कामात सहभागी होऊन, तेथेही ते उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचले. न्यायाधीश नियुक्तीचे सारे खटले, गोलकनाथ आणि केशवानंद भारती ही संविधानाच्या स्थैर्याचा फैसला करणारी प्रकरणे यांचे ते साक्षीदार. आंतरराष्ट्रीय वाणिज्य लवादांच्या प्रक्रियेतही सहभागी होत असल्याने, भोपाळ वायुगळतीच्या पीडितांना नुकसानभरपाई देण्याचा खटलाही त्यांनी लढवला- पण तो युनियन कार्बाइड कंपनीचे वकील म्हणून! नरिमन यांना ‘कायदा क्षेत्रातले भीष्माचार्य’ म्हणण्याला ही- कधीकाळी ‘कौरवां’ची बाजू घेतल्याची- काळी किनारही आहे. पण नरिमन यांचे मोठेपण असे की, ‘मी चुकीच्या बाजूने लढत होतो ही जाणीव मला होईपर्यंत फार उशीर झाला होता’ अशी स्पष्ट कबुलीही त्यांनी दिली. त्यांचे ‘बिफोर द मेमरी फेड्स’ हे आत्मचरित्र प्रांजळपणाचा वस्तुपाठच आहे.

पण नरिमन यांचे खरे मोठेपण वयाच्या नव्वदीनंतर त्यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकांतून दिसले. ‘संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार राजकारण्यांना जरूर आहे- पण असा कोणताही प्रयत्न फसेल’ असे म्हणणारे फली नरिमन. हिंदू धर्माच्या पायावर भारताची उभारणी करण्याचे समाधान निव्वळ प्रतीकात्मकच ठरेल, तुम्ही महिलांना दुय्यम स्थान देणार का? जातिसंस्थेचे सावट गेली इतकी वर्षे संविधानावर आहे त्याचे काय करणार? असे अप्रिय प्रश्न त्यांच्या स्पष्टवक्तेपणातूनच मुखर होत होते. संसदीय लोकशाहीला वेस्टमिन्स्टर प्रारूप म्हणा की संविधानालाच वसाहतवादी ठरवा- पण याच संविधानामुळे लोकशाहीच नव्हे तर देशही टिकला आहे, हा त्यांचा विश्वास होता.

नरिमन यांचा आवाज हा लोकशाहीप्रेमाचा सच्चा सूर होता. बिनाका गीतमालेत सन १९५३ च्या ‘ये जिंदगी उसी की है…’पासून सुरू झालेला जनप्रिय सिनेसंगीताचा प्रवास १९९३ च्या ‘चोली…’ गीतापर्यंत जाऊन दोन वर्षांनी ‘तुझे देखा तो ये जाना सनम’पर्यंत आला, यातून लोकांची जी शहाणीव दिसते तीच आपल्या राजकीय- वैधानिक संस्कृतीतही दिसली, तर आपल्या संस्कृतीचे आवाजच बळकट होणार आहेत. संस्कृती एकसुरी कधीच नसते, तिला अनेक पदर- त्यांची अनेक टोके असतात, याची जाणीव देणाऱ्या या दोघांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial program statement of amin sayani popular hindi cinema music voice culture broadcasting of radio amy