विरोधी पक्ष म्हणून प. बंगालमध्ये भाजप हे करणारच. त्यांना तसे करण्याची संधी न देण्यात खरे शहाणपण आहे. त्याच्या अभावाचे प्रदर्शन ममताबाई सातत्याने करतात….

संदेशखाली प्रकरणाची बरोबरी मणिपूरशी करण्याचा अतिउत्साही भाजप खासदारांचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला असला तरी त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अजिबात कमी होत नाही. संदेशखाली हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून शंभरभर किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेले मागास ठिकाण. त्या परिसरात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने अनेक मजूर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याच्यावरील कारवाईसाठी त्यामुळे तेथे आंदोलन झाले आणि स्थानिक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी हा मुद्दा लावून धरला. भाजपने यात विशेष लक्ष घातले याचे साधे- आणि अर्थातच महत्त्वाचे- कारण म्हणजे संदेशखाली कथित अत्याचार प्रकरणातील आरोपी. त्याचे नाव शाजहान शेख. आपल्याकडे शहरे वगळता अन्यत्र अनेक प्रांतांत स्थानिक राजकीय दांडगेश्वरांची हुकूमत असते. पक्ष कोणताही असो. सत्ताधाऱ्यांस असे दांडगेश्वर हवे असतात आणि या दांडगेश्वरांस सत्ताधार गरजेचा असतो. पश्चिम बंगालात डावे जेव्हा सत्तेवर होते तेव्हाही अशा स्थानिक दांडगेश्वरांची संख्या मुबलक होती आणि डावे जाऊन तृणमूलची सत्ता आली तरी त्यांची संख्या कमी झालेली नाही. हा शाजहान शेख या अशांतीलच एक. ही असली मंडळी आपापल्या परगण्यात एक प्रकारची खंडणीखोरीच करीत असतात आणि सत्ताधीशांचे त्यास अभय असते. या शेखास असे अभय होते असा विरोधकांचा आरोप आहे. या अभयामुळेच सदर परिसरात त्यांची दांडगाई सुरू होती. त्यातूनच दमदाटी करून त्याने आपल्या इलाख्यात काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप आहे. त्यावरून गेले काही दिवस भाजप आणि तृणमूल पुन्हा एकदा हमरीतुमरीवर आले असून जे घडते आहे त्यावरून एक विदारक चित्र निर्माण होते.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
pune session court latest marathi news
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ
A school van driver molested a minor student for six months
नागपूर : संतापजनक! ‌अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा तब्बल सहा महिने अत्याचार

हेही वाचा >>> अग्रलेख: लेह-लडाखही लटकले…?

डाव्यांची दादागिरी मोडून ममता बॅनर्जी यांनी सत्ता खेचून आणली आणि नंतर तीन वेळा राखली असली तरी आपल्या राज्यात कायद्याचे राज्य निर्माण करण्यात त्यांना यश आले असे म्हणता येणार नाही. गुंडांच्या शाखांवरचा झेंडा तितका बदलला. डाव्यांच्या राज्यात ‘लाल सलाम’ म्हणत गुंडगिरी होत असे. ती जाऊन तृणमूलची भाषा आली इतकाच काय तो बदल. यासाठी केवळ त्या राज्यातील राजकीय पक्षांनाच दोष देणे अन्यायाचे ठरेल. यात त्या राज्यातील राजकीय संस्कृतीही तितकीच कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. डाव्यांच्या प्रदीर्घ राजवटीमुळे असेल किंवा त्याहीआधी भारत-पाकिस्तान फाळणीतील नोआखाली अनुभवल्यामुळे असेल; त्या राज्यातील राजकारणाची रक्तरंजितता काही कमी होताना दिसत नाही. तेव्हा अशा परिस्थितीत तृणमूलच्या शाजहान शेख याने असे काही केले नसेल असे जसे छातीठोकपणे म्हणता येत नाही तसेच त्याच्याविरोधात सत्यापेक्षा कांगावा अधिक नाही, असेही म्हणता येणार नाही. त्यात सदर आरोपीचे ‘शेख’ असणे भाजपच्या पथ्यावर पडले असणार. गेल्या विधानसभा निवडणुकांत प. बंगालातील अल्पसंख्याकांनी तृणमूलला मोठा आधार दिला. तेव्हा त्या पक्षापासून अल्पसंख्याकांस तोडण्यासाठी या घटनेचा उपयोग करण्याचा विचार भाजप नेतृत्वाच्या मनात आला असेल तर ते प्रचलित राजकीय संस्कृतीनुसारच झाले असे म्हणता येईल. याचे कारण साध्यसाधनविवेक वा नैतिकता इत्यादी मुद्दे भाजपने या शेखाविरोधात रान उठवण्यामागे आहेत असे असते तर तृणमूलातील भ्रष्टाचारी हिंदूंना भाजपने स्वत:च्या पदराखाली घेऊन पवित्र केले नसते. पण सदर प्रकरणातील आरोपी शेख असल्याने भाजप त्यास जवळ करणे शक्य नाही आणि या अल्पसंख्याकांची तृणमूलशी असलेली जवळीक सहन करणेही भाजपस अशक्य. तेव्हा हे प्रकरण गाजणार, गाजवले जाणार हे ओघाने आलेच. तसेच झाले. प. बंगालात प्रभाव विस्तारासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपच्या हाती तृणमूलने हे आयते कोलीत दिले आणि भाजपने त्याचा पुरेपूर वापर केला. त्यात भाजपला दोष देता येणार नाही. सदर प्रकरणी अधिक सजगता दाखवायला हवी होती ती सत्ताधारी तृणमूलने.

कारण विरोधी पक्षीयांची सत्ता असलेल्या राज्यात पराचा कावळा करण्यासाठी भाजप किती टपलेला असतो आणि त्यात भाजप-नियुक्त राज्यपाल किती उत्साही साथ देतात याचे असंख्य दाखले देता येतील. असे असताना भाजपला संधी मिळणार नाही, याची खबरदारी घेणे हे तृणमूलचे- म्हणजेच त्या पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे- कर्तव्य होते. ते त्यांनी निभावले नाही. तेव्हा भाजपवर या प्रकरणी राजकारण करत असल्याच्या ममताबाईंच्या आरोपात तथ्य कमी, कांगावा अधिक आहे. एक जागरूक विरोधी पक्ष म्हणून भाजप हे करणारच. त्यांना तसे करण्याची संधी न देण्यात खरे शहाणपण आहे. त्याच्या अभावाचे प्रदर्शन ममताबाई सातत्याने करतात. भाजप अनेक अंगांनी लढतो. याआधी महुआ मैत्रा प्रकरणातही हे वास्तव दिसून आले. त्याच प्रकारे इथेही भाजपच्या संसदीय शाखेने आपल्या विशेषाधिकाराचा भंग झाल्याचे कारण पुढे करीत या प्रकरणातील चौकशी वेगळ्याच पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्यांनी संदेशखाली येथील पीडितांच्या भेटीसाठी प्रयत्न केला असता त्यास ममता बॅनर्जी सरकारने विरोध केला, यापासून रोखले, असले थातूरमातूर कारण पुढे करत भाजप खासदारांनी केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे याची चौकशी करवण्याचा घाट घातला. सर्वोच्च न्यायालयाने हा डाव उधळला. पण त्यामुळे ममताबाईंना मिळणारा दिलासा क्षणिक असेल. कारण या प्रकरणातील आरोपीस अद्यापही अटक करण्यात त्यांच्या सरकारला यश आलेले नाही. हा शेख जोपर्यंत जेरबंद होत नाही तोपर्यंत भाजप हा विषय तापवणार.

हेही वाचा >>> अग्रलेख: मौनाचे मोल!

परंतु तसे करण्यामागे संदेशखाली येथील अभागी महिलांची काही दयामाया भाजपस येते, त्यांच्याविषयी काही सहानुभूती आहे असा विचार करण्याची अजिबात गरज नाही. इतकी अंधभक्ती केवळ भक्तांनाच शोभेल. याचे कारण महिला अत्याचार, सार्वजनिक जीवनात महिलांचा आदर वगैरे मूल्ये भाजपकडून पाळली जात असती तर मणिपुरी महिलांच्या अब्रूचे धिंडवडे जगाच्या चव्हाट्यावर मांडले गेले नसते. संदेशखाली प्रकरणाची तुलना मणिपुरात जे घडले त्याच्याशी करण्याचा प्रयत्न काहींनी केला. ते जमले नाही. मणिपुरातील महिलांना अद्याप न्याय मिळालेला नाही; हे सत्य. इतकेच काय भाजपसाठी स्त्रीदाक्षिण्य, महिलांचा ‘सम्मान’ इत्यादी मूल्ये खरोखरच महत्त्वाची असती तर त्या ब्रिजभूषणाचे काय हा प्रश्न समोर येतो. कुस्ती खेळात देशाचे नाव उजळ करणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर या ब्रिजभूषणाने केलेल्या अत्याचारांची दखल भाजपने किती त्वरेने घेतली हे सर्व देशाने पाहिले. तेव्हा तृणमूल काय किंवा भाजप काय! ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य. तेव्हा हा पक्ष चांगला की तो वाईट हा मुद्दाच नाही.

तर सध्याच्या राजकारणाची स्पर्धा हा तो मुद्दा आहे. ही स्पर्धा ‘तुम्ही वाईट, आम्ही चांगले’ अशी अजिबात नाही. ती आहे ‘आम्ही वाईट असू तर तुम्हीही चांगले नाही’; हे दाखवून देण्याची. आमच्याकडे ब्रिजभूषण आहे तर तुमच्याकडे शाजहान शेख. आमचे मणिपूर तर तुमचे संदेशखालीही मणिपूरच. असा हा सगळा प्रकार. इतके दिवस ही ‘व्हाॅटअबाऊटरी’ परिघावरच्या समाजमाध्यामांतील फुकट्या फॉरवर्डींपुरतीच मर्यादित होती. परंतु कडेचा गाळ जसजसा मध्ये येत गेला तसतशी ही ‘व्हाॅटअबाऊटरी’ राजकारणाच्या मध्यवर्ती युक्तिवादाचा भाग बनली. त्यामुळे सध्याचे राजकारण हे वाईटांचा वसंतोत्सव बनले आहे. हे सत्य स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा नैतिकवादी आणि नवनैतिकवादी यांच्यात आहे किंवा काय, हाच काय तो प्रश्न.

Story img Loader