कुणीही येऊन मुंबईत मराठी भाषा नाही आली तरी चालते असे म्हणेल तर ते कसे काय चालेल? असे तमिळनाडूमध्ये तिथल्या भाषेबद्दल म्हटले तर चालते काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की ‘मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे’ असे कुणी म्हटले म्हणून लगेच मुंबईतून मराठी भाषा हद्दपार होत नाही आणि आणि ‘आपल्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता’ अशी नंतर सारवासारव केली गेली तरी ‘बुंद से गयी’ ही वस्तुस्थिती काही टळत नाही. पण तरीही या विधानाची दखल घ्यावी लागते कारण म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये… १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून मराठी माणसाने त्याची मुंबई परत मिळवली आहे ती काय कुणीही यावे आणि इथली स्थानिक भाषा असलेल्या मराठीला अशा टपल्या माराव्यात यासाठी? मुंबईत मराठी भाषेला डिवचण्याचा, कमी लेखण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. तसे प्रयत्न याआधीही झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व आस्थापनांच्या पाट्या मराठीत असायला हव्यात, असा आग्रह धरला गेल्यानंतर त्याविरोधात काही जण न्यायालयात जाण्याचेही प्रकार घडले आहेत.
आपण जिथे व्यवसाय करतो तिथल्या स्थानिक भाषेला तिचे वाजवी महत्त्व देण्याऐवजी तिचे अस्तित्वच नाकारावे, असे संबंधित व्यावसायिकांना का वाटत असावे? हिंदी चित्रपटांमध्ये तर घरातली नोकरमंडळी मराठी दाखवत मराठी ही या पातळीवरच्या लोकांची भाषा असते, असे सूचित करण्याचे प्रकार सर्रास घडतात. मुंबईतील मराठी माणसांकडे, मराठी भाषेकडे, मराठी संस्कृतीकडे बाहेरून येणारे कसे बघतात, याचे हे एक प्रकारे द्याोतकच. ते तसे बघतात म्हणून जवळपास आठ ते दहा कोटी लोकांची भाषा असलेल्या मराठीचे भाषिक महत्त्व काही कमी होत नाही. अर्थात मुंबईबाहेरून येणाऱ्या सगळ्याच अमराठी लोकांची मराठी भाषेबद्दल अशी भूमिका असते, असेही नाही. आपण जिथे राहतो, जिथे रोजीरोटी कमावतो, तिथल्या स्थानिक भाषेचे ऋण मान्य करण्यात कमीपणा न वाटणारे कितीतरी अमराठी लोक आहेत. बाहेरून येऊन इथल्या मराठी भाषेच्या वातावरणात दुधामधल्या केशरासारखे विरघळून गेलेलेही अनेक जण आहेत. त्यांच्याबद्दल कुणाला काही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण मुंबईच्या बहुसांस्कृतिकतेचे कौतुक केल्याचे दाखवत मराठीबद्दल मात्र आडून आडून आकस दाखवायचा, हे फक्त ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखे नाही, तर त्यामागे त्यापलीकडचे बरेच काही आहे.
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महाराष्ट्रात असणे ही कुणाची दुखरी नस आहे, हे कधीच फारसे लपून राहिलेले नाही. तिच्यावर कब्जा मिळवण्याचे राजकारण ‘एक देश एक भाषा’ या मार्गाने जाऊ पाहते आहे, ही गोष्टही ‘अशी’ अधूनमधून येणारी विधाने सूचित करत असतात. पण त्याहीपलीकडचा मुद्दा आहे अर्थकारणाचा. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी तिचे अर्थकारण मराठी माणसाच्या ताब्यात नाही, मुंबईतल्या मराठी माणसाने एकेकाळी श्रमांची निर्मिती करत आपली एक संस्कृती उभी केली होती. मुंबईत मराठी भाषा दुमदुमत होती. पण असे असले तरी मराठी माणसाने मुंबईत कधीच पैशांची निर्मिती केली नाही. त्यामुळेच गेली काही वर्षे तो सातत्याने मुंबईतून बाहेर फेकला जातो आहे. मुंबईतला मराठी टक्का कमी होत जाणे हे दुर्दैवी खरेच, पण त्यामुळेच आम्ही तुम्हाला मोजत नाही, इथल्या अर्थकारणावर तुमचा नाही, तर आमचा ताबा आहे, हे सातत्याने मराठी माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने खिजवून सांगितले जाते. त्याच्या भाषेबद्दल त्याला हिणवणे हे त्याचेच एक माध्यम.
खरेतर १६६१मध्ये पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना आंदण दिलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक अर्थात कॉस्मोपोलिटन आहे. अठरापगड जातींचे, धर्मांचे, वेगवेगळ्या समाजांचे, वेगवेगळ्या देशांचे लोक इथे कसे राहात होते याची अनेक वर्णने वाचायला मिळत असली तरी तिचे मूळ मराठी हे कुणीच नाकारत नाही. तिनेही कधीच कुणालाही नाकारले नाही, मिनी भारत म्हणता येईल अशा पद्धतीने तिने येतील त्या सगळ्यांना त्यांच्या भाषा, संस्कृतीसह सामावून घेतले आहे. देशातल्या सगळ्या भाषांचे संमेलन भरवता येईल इतके बहुभाषिक लोक खरोखरच मुंबईत सापडतील. मराठीबरोबरच कन्नड, तमिळ, गुजराती, हिंदी, उर्दू यांच्यासह इतर माध्यमांच्या शाळाही मुंबईत चालवल्या जातात.
अशा पद्धतीने मराठी माध्यमाच्या शाळा या इतर राज्यांमध्ये चालवल्या जातात का? तमिळनाडूमध्ये अगदी चेन्नईत जाऊन इथे तमिळ भाषा नाही आली तरी चालेल असे म्हणण्याची कुणाची तरी हिंमत होईल का? फार दूर कशाला शेजारच्या गुजरात राज्यात तरी गुजराती वगळता इतर कोणती भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असेल का? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त प्रमाणात महाराष्ट्रात बोलल्या जातात. म्हणजे त्रिभाषासूत्र हे धोरण सगळ्यात जास्त प्रमाणात महाराष्ट्रातच कळत-नकळत राबवले गेले आहे. पण हे होत असताना एकीकडे राज्यकर्त्यांची मराठी भाषेबद्दलची उदासीनता, दुसरीकडे मराठी माणसाची स्वत:च्या भाषेबद्दलची शहामृगी वृत्ती आणि तिसरीकडे बाहेरून येणाऱ्यांचा मराठी भाषेबद्दलचा हडेलहप्पीपणा यामुळे मुंबई-पुणे या शहरांमध्ये मराठी भाषेचे पाऊल मागे पडायला लागले आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा मराठी भाषेची लिपी म्हणून मोडी लिपी स्वीकारली जावी, असा एक प्रस्ताव पुढे आला होता, असे सांगितले जाते. पण तो बाजूला पडून मराठीसाठी देवनागरी लिपी स्वीकारली गेली आणि तिचे हिंदीशी साधर्म्य असल्यामुळे बहुसांस्कृतिक मुंबईत हिंदीभाषकांचे एक प्रकारे फावले. हळूहळू दाक्षिणात्यांचे मुंबईतले प्राबल्य कमी होत जाऊन उत्तर भारतीयांचे वाढले. उत्तम इंग्रजी येत असेल तर अतिउच्च आर्थिक स्तरात आणि कामचलाऊ हिंदी बोलत बाकी सर्व स्तरांत कुणीही अगदी सहज मुंबईत तरून जाऊ शकतो, अशी मुंबईमधली वास्तव परिस्थिती आहे, हे मान्य केले पाहिजे. पण म्हणून कुणीही येऊन मुंबईत मराठी भाषा नाही आली तरी चालते असे म्हणेल तर ते कसे काय चालेल? असे तमिळनाडूमध्ये तिथल्या भाषेबद्दल म्हटले तर चालते काय? इंग्लंडमध्ये असा विचार तरी करता येईल का? अमेरिकेत शिकायला आणि काम करायला जाण्याआधी आपली पोरे स्पॅनिश भाषेच्या शिकवण्या लावतात त्या काय उगाचच? फ्रान्समध्ये नोकरी करायला जाणाऱ्या भारतीय माणसाला फ्रेंच बाराखडी गिरवावी लागते आणि केरळमध्ये फिरायला जाणाऱ्या केरळेतर पर्यटकांना मल्याळम येणाऱ्या कुणाचा तरी हात धरावा लागतो.
तुम्हाला जगात कुठेही जायचे असेल, तिथला समाज समजून घ्यायचा असेल तर तिथल्या भाषेच्या पोटात शिरावेच लागते. स्थानिक संस्कृती, स्थानिक भाषा यांचा आदर राखावाच लागतो. हा आदर फक्त तिथल्या स्थानिकांचा नसतो, तर त्या भाषेची, संस्कृतीची निर्मिती करणाऱ्या, तिचा प्रवाह अखंड वाहता ठेवणाऱ्या पूर्वसुरींबद्दलचा असतो. वेगाने तंत्रज्ञानशरण होत चाललेल्या आजच्या जगासमोर सांस्कृतिक सपाटीकरणाचा मोठा धोका उभा आहे. जगात सगळीकडेच वेगवेगळ्या भाषांपुढे त्या नष्ट होत जाण्याचा धोका आहे. भाषा ही त्या संस्कृतीचे शारीर रूप असते हे लक्षात घेतले तर आपण काय गमावतो आहोत, हे लक्षात येते. अशा परिस्थितीत कोणत्याही भाषेबद्दल आकस व्यक्त करण्यापेक्षा तिचे सांस्कृतिक संचित कसे जपता येईल, हा विचार करणे अधिक उमदेपणाचे ठरेल. आपली बहुसांस्कृतिकता, बहुभाषिकता जपत मुंबईने हा उमदेपणा दाखवला आहे. तिची ही ‘भाषा’ बाकीचे कधी शिकणार?