नवनव्या प्रवासी गाड्या, प्रत्येक गाडी वातानुकूल आणि डब्यांचेही खास प्रकार हे सारे करण्याआधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकडे पाहावे लागणारच…

जे अस्तित्वात आहे त्यात सुधारणा करायची नाही आणि नव्या घोषणा व कल्पना साकार करण्यासाठी कसे अहोरात्र काम करतो आहोत हे ठसवायचे, ही अलीकडच्या दहा वर्षांत राज्यकर्त्यांमध्ये विकसित झालेली पद्धत. सरकार नियंत्रित सर्वच यंत्रणांमध्ये त्याचे दर्शन होत असते. यातून सुधारणा आम्हीच केल्याचे अवडंबर उभे करता येते. पण आहे त्याचे काय, त्यात दुरुस्ती केव्हा होणार, असे प्रश्न कायम राहतात. या पार्श्वभूमीवर सोमवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताकडे बघितले की या पद्धतीतला फोलपणा ठसठशीतपणे दिसतो. दार्जिलिंगजवळ झालेल्या या दुर्घटनेत नऊ प्रवाशांना जीव गमवावा लागला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अपघात. त्याआधीच्या दोन कार्यकाळात ही अपघाताची शृंखला सुरूच होती आणि त्यात एकंदर ६४७ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. यापैकी सर्वात भीषण होता तो २०२३ मध्ये ओडिशात झालेला अपघात. तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने यात २९३ प्रवाशांचा जीव गेला. नित्यनेमाने इतके अपघात घडूनही ना देशाचे रेल्वेमंत्री बदलले ना रेल्वेच्या मूळ दुखण्याला हात घातला गेला. याचे एकमेव कारण दडले आहे ते सुरुवातीला उल्लेख केलेल्या पद्धतीत. विकास नुसता करून उपयोग नाही. तो दिसायला हवा ही आजची कार्यशैली. त्यातून प्राधान्य दिले गेले ते चकचकीतपणाला. म्हणजे रेल्वे स्थानक कसे असावे तर सुसज्ज, अगदी पंचतारांकित सुविधा असलेले. फलाट कसे असावेत तर लांबचलांब व गुळगुळीत. स्थानकांवर काय असावेत तर महागडी झगमगीत केशकर्तनालये, रंगीबिरंगी दुकाने, मोदींच्या छबीसोबत छायाचित्र काढता यावे म्हणून सेल्फीपॉइंट. प्रवासी गाड्या कशा असाव्यात तर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेससारख्या. त्याच्या आतली व्यवस्था कशी असावी तर विमान प्रवासाचीच ‘अनुभूती’ देणारी. या गाड्यांचे डबे कसे असावेत तर पूर्णपणे वातानुकूल. यातून प्रवास करणाऱ्यांना सुसह्य वाटले म्हणजे झाला रेल्वेचा कायापालट. इतका मर्यादित विचार असलेल्या या पद्धतीत एका महत्त्वाच्या गोष्टीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial safety of railway passengers railway accidents in west bengal amy
First published on: 19-06-2024 at 04:51 IST