‘त्या’ नोटिशीची दखल घेताना हिंडेनबर्गने कोणतीही भारतीय वित्तसंस्था, गुंतवणूक कंपनी करू धजली नसती, अशी कृती केली.

ज्यावर आपले नियंत्रण नाही, जो आपल्याला मोजत नाही आणि आपण ज्याचे काहीही वाकडे करू शकत नाही अशावर कारवाई करण्याचा देखावा अंतिमत: अंगाशी येतो आणि तो करणाऱ्यास अधिक उघडे पाडतो. गेल्या वर्षी गाजलेल्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या नव्याने सुरू झालेल्या अध्यायातून असे होण्याचा धोका संभवतो. हिंडेनबर्ग या बाजारपेठ सल्लागाराचा अहवाल गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला. त्यात अदानी समूहावर अनेक कथित आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका होता. समूहातील कंपन्यांच्या ताळेबंदातील फसवाफसवी, प्रत्यक्षात काहीही उद्याोग नसलेल्या कंपन्यांकडून झालेली प्रचंड गुंतवणूक, कंपन्यांच्या समभागांत अचानक झालेली अकारण दरवाढ, हे फुगलेले समभाग पुन्हा तारण ठेवून त्यावर घेतले गेलेले कर्ज, कंपनीच्या उच्चपदस्थांतील अनेक जण एकमेकांचे नातेवाईक असणे आणि त्यामुळे प्रत्यक्ष सूचिबद्ध कंपन्यांचे नियंत्रण मध्यवर्ती कुटुंबाहातीच असणे इत्यादी मुद्दे होते. या कंपनीचे मुख्य प्रवर्तक गौतम अदानी यांचा लहान भाऊ राजेश आणि मेहुणा समीर वोरा यांच्या व्यवहारांवरही या अहवालात चिखलफेक होती. त्यानंतर कंपनीचे समभाग गडगडले आणि ‘अदानी इंटरप्रायझेस’च्या संभाव्य २० हजार कोटी रुपयांच्या समभाग विक्रीवर त्याचा परिणाम झाला. यावर पुरेसा गोंधळ उडाल्यानंतर आपल्या भांडवली बाजारपेठ नियंत्रकाने, म्हणजे ‘सेबी’ (सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) या यंत्रणेने, समग्र चौकशी करणे, अदानी आणि संबंधितांनी काहीही गैरव्यवहार केला नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाणे हे सगळे ओघाने आलेच. येथवर सर्व ठीक. पण यानंतर ‘सेबी’ने हिंडेनबर्गलाच नोटीस पाठवली. राजापेक्षाही अधिक राजनिष्ठा दर्शवणारा हा अतिउत्साह अखेर ‘सेबी’च्या अंगाशी तर येणार नाही ना, हा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial sebi issues show case notice to hindenburg in case of financial malpractice on adani group amy
First published on: 04-07-2024 at 05:39 IST