स्पेनच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या नडालने मातीवरील निष्णात टेनिसपटूपेक्षाही मातीतल्या माणसाची ओळख जिवंत ठेवली.

‘तू मला माझा खेळ बदलायला लावलास. तुझ्यामुळे मी टेनिसचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घ्यायला लागलो…’ टेनिसविश्वातील आजवरच्या वादातीत सर्वाधिक लोकप्रिय टेनिसपटू रॉजर फेडररने, टेनिसकोर्टवर त्याच्यासमोर बऱ्याचदा भारी ठरलेला राफाएल नडाल या त्याच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्याप्रति काढलेले हे गौरवोद्गार. त्याची गरज बहुधा फेडररला वाटली, कारण हे दोघेही प्रतिस्पर्धी कमी आणि मित्रच अधिक होते. समाजमाध्यमावर प्रसृत गौरवपत्रात फेडररने आणखीही काही लिहिले आहे. २००४ मध्ये ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकल्यानंतर फेडरर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. त्यानंतर दोनच महिन्यांनी मायामीतील एका स्पर्धेत त्याचा सामना स्पेनच्या एका युवा, पीळदार शरीरयष्टीच्या टेनिसपटूशी झाला. तो म्हणजे राफाएल नडाल. त्या सामन्यात नडाल सहज जिंकला. तेव्हापासून एक समीकरण तयार झाले, जे जवळपास दोन दशके टिकले. टेनिसमधला फेडरर तो एकच. त्याला हरवणारा नडाल तोही एकच! या दोहोंच्या मागोमाग नोव्हाक जोकोविच आला आणि प्रदीर्घ वाटचालीत त्यांच्यापेक्षाही अधिक ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे नावावर करता झाला. तो अजूनही खेळतो आहे. पण फेडरर आणि नडालसारखे अढळपद त्याला लाभू शकलेले नाही. ते का याची चर्चा करण्याची अर्थातच ही वेळ नव्हे. फेडरर त्याचा अखेरचा सामना खेळला, त्या वेळी नडाल त्याच्या विरुद्ध नव्हे, तर बरोबरीने खेळत होता. दुहेरीचा तो सामना दोघांनीही टेनिस कोर्टच्या एकाच बाजूस खेळलेला बहुधा एकमेव. नुकताच नडाल कारकीर्दीतला त्याचा शेवटचा सामना खेळला, त्या वेळी फेडरर त्याच्या बाजूला नव्हता. याची बोच फेडररला जाणवत असावी. नडालच्या कारकीर्दीची अखेर फेडररप्रमाणे थाटामाटात झाली नाही. तो सामना हरला आणि ती स्पर्धाही डेव्हिस चषक म्हणजे सांघिक स्पर्धा होती. या बाबतीत फेडररपेक्षा नडाल अधिक स्थितप्रज्ञ आणि कमी भावनावश असाच. नाही म्हणायला फेडररच्या त्या शेवटच्या सामन्यात त्याची गौरवपर चित्रफीत सुरू असताना दोघेही बाजूला बसून रडले. फेडररला त्याचा तो क्षण अनुभवू देण्यात नडालचा वाटा मोठा होता. त्याची खरे तर काय गरज होती? त्याने फेडररपेक्षा अधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली आणि फेडररला अधिक सामन्यांमध्ये हरवलेही. मात्र जनमानसातले फेडररचे स्थान नडाल खूप आधीपासून ‘ओळखून’ आहे. ते हिसकावण्याचा, फेडररची प्रतिमा ओरबाडण्याचा प्रयत्न नडालने कधीही केला नाही, हे त्याचे नि:संशय मोठेपण. फेडररला लाभलेले ते अढळपद व्यक्तिपूजेपेक्षा कमी नव्हते. पाश्चिमात्य परिप्रेक्ष्यातील हे खास पौर्वात्य वास्तव स्वीकारण्याचे बंधन नडालवर नव्हते. फेडररच्या साथीने त्याचा अखेरचा सामना आपण खेळलो जरूर, पण रसिकमानसातील सिंहासनावर त्याच्या बरोबरीचे आपले स्थान नाही, हे नडालने केव्हाच स्वीकारून ठेवले आहे. या स्वीकृतीस उच्चकोटीचा मोठेपणा लागतो. तो कसा हे पाहण्यासाठी जरा मागे जाऊन आकड्यांचा धांडोळा घ्यावा लागेल.

judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Loksatta samorchya bakavarun Supreme Court Article Prohibition of conversion of places of worship
समोरच्या बाकावरून: हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे?

हेही वाचा :अग्रलेख : जरा हवा येऊ द्या!

२००३ मध्ये फेडररने त्याची पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा विम्बल्डनला जिंकली. त्याने चौथ्या फेरीत त्यावेळचा विम्बल्डनसम्राट पीट सॅम्प्रासला हरवून त्याचे साम्राज्य खालसा केले. त्याच्या देदीप्यमान वाटचालीची ती सुरुवात. त्या वाटेत दोनच वर्षांनी नडाल ‘आडवा’ आला. २००५ मधील फ्रेंच खुल्या स्पर्धेत फेडरर अव्वल मानांकित होता, पण त्याला चौथ्याच फेरीत नडालने धूळ चारली आणि पुढे ती स्पर्धाही जिंकली. वर्षभरापूर्वीच नडालने त्याला मायामीत हरवले होते, याचा उल्लेख याआधी आलेलाच आहे. नडाल तेथून सुरुवातीला फ्रेंच स्पर्धेच्या लाल मातीवर सातत्याने जिंकू लागला. त्याच वेळी फेडरर विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन, अमेरिकन स्पर्धा जिंकू लागला होता. पण फ्रेंच स्पर्धेत फेडररला नडालचा अडथळा कधीही ओलांडता आला नाही. तर हिरवळीवर फेडरर अपराजित होता. या नियमाला अपवाद ठरले २००८ मधील विम्बल्डन. त्या वर्षी प्रथमच नडालने फेडररचे विम्बल्डनमधील अढळपद भेदले. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतही नडालने फेडररला हरवले. हा वरचष्मा पुढे अनेक वर्षे दिसून आला. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन अजिंक्यपदासाठी झालेल्या सामन्यात हे चक्र भेदून फेडररने नडालला हरवले. या दोघांमध्ये झालेल्या शेवटच्या ग्रँड स्लॅम सामन्यात म्हणजे विम्बल्डन २०१९ च्या उपान्त्य सामन्यातही फेडररने बाजी मारली. या दोहोंतील द्वंद्वामध्ये नडालच २४ विरुद्ध १६ असा सरस ठरला. तर ग्रँड स्लॅम स्पर्धेत हे समीकरण १० विरुद्ध ४ असे नडालचे वर्चस्वदर्शक दिसून येते. या काळात फेडररही अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये जिंकत होताच. मात्र नडालसमोर त्याला अनेकदा हार पत्करावी लागली. नडालला फेडररइतकी लोकप्रियता लाभली नाही याचे एक कारण हे असू शकते. नडालची ओळख एक उत्कृष्ट खेळाडू अशी होतीच. पण त्याहीपेक्षा अधिक ती ‘फ्रेंच स्पर्धेच्या लाल मातीवरील निष्णात’ अशी काहीशी मर्यादित राहिली. शिवाय ‘फेडररला सातत्याने हरवणारा’ हे बिरुद त्याच्या नावापुढे चिकटवले गेले. फेडररची खेळाडू आणि माणूस म्हणून लोकप्रियता अफाट होती. त्याला कोणी तरी सातत्याने हरवतो हे वास्तव पचवणे कित्येकांसाठी अशक्य होते. नडालसाठी ते अधिक दुर्दैवी ठरले.

हेही वाचा : अग्रलेख : नगरांचे नागवेकरण

खरे म्हणजे नडालही फेडररसारखाच विनम्र आणि दिलेर वृत्तीचा खेळाडू. त्याच्या ताकदीसमोर काही वेळा फेडररची नजाकत फिकी ठरायची. टेनिसच्या सौंदर्यशास्त्रात ताकदीपेक्षा नजाकतीचे कौतुक अंमळ अधिकच. नजाकत ही उपजत असते. त्या बाबतीत सारेच समान भाग्यशाली नसतात. ताकद कमवावी लागते. वाढवावी लागते. जपावी लागते. नडालच्या तंदुरुस्तीच्या संकल्पना टोकाच्या होत्या. कोर्टवर त्याचा वावर चित्त्याची चपळाई आणि वाघाच्या ताकदीची अनुभूती द्यायचा. पाच-पाच सेट खेळूनही नडालचा तजेला आणि ऊर्जा अखेरपर्यंत टिकून राहायची. त्याची किंमत त्याला मोजावी लागली. तंदुरुस्तीच्या तक्रारींमुळे, फेडररसारख्या इतर कोणत्याही आघाडीच्या टेनिसपटूच्या तुलनेत नडाल अधिक जायबंदी झाला नि टेनिसकोर्टपासून दूर राहिला. त्या विश्रांती विरामांमध्ये नडालने जे गमावले, त्यापेक्षा किती तरी अधिक उपलब्ध काळात कमावले.

हेही वाचा : अग्रलेख : विकासासाठी वखवखलेले…

लाल मातीच्या कोर्टवर त्याचे सर्वाधिक प्रेम होते. बहुधा इतर कोणत्याही कोर्टपेक्षा या कोर्टवर शारीरिक चिवटपणाचा कस सर्वाधिक लागतो, म्हणूनही असेल. नडालने फ्रेंच स्पर्धा १४ वेळा जिंकली. इतर कोणत्याही टेनिसपटूकडून नजीकच्या भविष्यात तरी, फ्रेंच काय पण इतर कोणत्याही प्रकारच्या कोर्टवर असे वर्चस्व प्रस्थापित होण्याची शक्यता शून्य. आपण ‘वन कोर्ट वंडर’ राहू नये, याची जाणीव नडालला फार आधीपासून होती. यासाठी त्याने साक्षात फेडररला विम्बल्डनमध्ये हरवून दाखवले. वयाच्या २४ व्या वर्षी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा किमान एकदा जिंकणारा तो सर्वांत युवा टेनिसपटू ठरला. फेडररच्या कौतुकात आकंठ बुडालेल्यांनी कदाचित या कीर्ती शिखरांकडे काहीसे दुर्लक्ष केले. त्याचा कोणताही विषाद नडालच्या मनात नव्हता, किंवा असला तरी त्याने तो बोलून दाखवला नाही. महत्त्वाची स्पर्धा जिंकल्यानंतर करंडकाचा चावा घेऊन आपल्यातल्या लोभस बाल्याचे प्रदर्शन करण्यापलीकडे त्याच्या भावनाही कोर्टवर फार कधीच प्रकट झाल्या नाहीत. टेनिस कोर्टवर आणि टेनिस खेळावर नडालने प्रेम केले. हे फेडररच्या चाहत्यांपेक्षाही अधिक आणि आधी फेडररने ओळखले. त्यामुळेच नडालच्या निवृत्तीनंतर त्याच्या हृदयात झालेली कालवाकालव इतरांपेक्षा वेगळी ठरते. नडालने फेडररच्या चाहत्यांना जितके नाही, तितके फेडररला तरी जिंकून घेतलेच! स्पेनच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या, वाढलेल्या नडालने मातीतल्या सच्चेपणाला कधी अंतर दिले नाही. मातीवरील निष्णात टेनिसपटूपेक्षाही मातीतल्या माणसाची ओळख जिवंत ठेवली.

Story img Loader