घातक रसायने, जिवाणू आपल्या मसाल्यांत असल्याचे परदेशी यंत्रणांकडून आपणास कळत असेल तर आपले अन्न प्रशासन नक्की करते काय?

मसाल्याचे पदार्थ ही खास भारताची जगास देणगी. येथील लवंग, तमालपत्र, काळी मिरी, वेलची इत्यादी घटकांनी जगभरातील अनेकांच्या भोजनास स्वाद दिलेला आहे. ख्रिास्तपूर्व कालापासून भारतातून मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होत होती… आशिया खंडातील इंडोनेशियादी देश भारतातून मसाले घेऊन जात. भूमध्य समुद्रमार्गे हे मसाले युरोप खंडात पोहोचत. या मार्गावर मसाल्यांची त्या वेळी इतकी गजबज होती की त्याचे नावच त्यामुळे ‘इन्सेन्स रूट’ असे पडले. भारतातील या मसाल्यांचे अत्यंत प्रगत व्यापार केंद्र म्हणजे केरळातील कालिकत. मलबार प्रदेशातील हे शहर- आताचे कोझिकोड- त्या वेळी जागतिक व्यापार मार्गावर होते. तथापि एके काळी जगभरातील नागरिकांच्या अन्नाची चव वाढवणाऱ्या या भारतीय मसाल्यांचा लौकिक मातीस मिळण्याचा धोका आहे. अन्न दर्जाबाबत अत्यंत जागरूक असलेल्या विकसित देशांतील अनेकांनी भारतीय मसाल्यांतील भेसळ दाखवून दिली असून महासत्ता होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील अन्न सुरक्षा यंत्रणांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आधी सिंगापूर, मग हाँगकाँग आणि आता अमेरिकेसारख्या देशाने भारतीय मसाल्यांत किती घातक पदार्थ असतात हे दाखवून दिले आहे. अमेरिकेने तर गेल्या काही महिन्यांत भारतातून त्या देशात निर्यात झालेल्यांतील जवळपास एकतृतीयांश मसालासाठा खाण्यास अयोग्य म्हणून परत पाठवला. अमेरिकेने आपल्या मसाल्यांस त्यांच्या देशात पाऊलही टाकू दिले नाही. या काळात भारतीय मसाले घेऊन गेलेल्या जवळपास ११ बोटींस अमेरिकेने प्रवेश नाकारला. या मसाल्यांत ‘साल्मोनेला’ या जिवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळला. त्याआधी सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनीही भारतीय मसालेसाठे परत पाठवले. त्यात कर्करोगास आमंत्रण देणारे घातक रसायन आढळले. जे झाले ते कशामुळे याची चिकित्सा यानिमित्ताने व्हायला हवी.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी

प्रथम ‘साल्मोनेला’विषयी. या जिवाणूच्या प्रसाराचे सर्वात मोठे कारण कोणते? अस्वच्छता. या जिवाणूची बाधा जीवघेणी नक्कीच नाही. तथापि अन्नाद्वारे पोटात गेल्यावर हे जिवाणू फैलावतात आणि आतड्यांतील त्यांच्या मुक्कामाने ढाळ लागू शकते वा पोटदुखी होते. बालके अथवा वृद्धांत ही दोन्ही लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसतात. हा खास तिसऱ्या जगातल्या देशांमधील जिवाणू. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर शत्रुपक्षात साल्मोनेलाची बाधा होऊ देऊन नागरिकांची पचनसंस्था निकामी करण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर विकसित देशांनी योजलेल्या उपायांमुळे हा जिवाणू तेथून जवळपास हद्दपार झालेला आहे. तथापि विकसित देशांतून परागंदा झालेला विषमज्वर ज्याप्रमाणे आपल्या देशात अजूनही आढळतो त्याचप्रमाणे साल्मोनेलाचा संचारही आपल्याकडे सुखेनैव सुरू असल्याचे दिसते. विषमज्वर काय वा साल्मोनेला काय! उभयतांचे मूळ अस्वच्छता! ती तर आपल्याकडे मुबलक. त्यामुळे अमेरिकेत गेलेल्या पदार्थांत या विषाणूचे वास्तव्य आढळणे ही बाब आपल्यासाठी तर अजिबात धक्कादायक नाही. धक्का बसला अमेरिकी निरीक्षकांस जेव्हा त्यांनी या मसाला उत्पादकांचे भारतातील ‘कारखाने’ पाहिले. कळकट भांडी, यातले- त्यात- त्यातले- यात करण्याची सर्रास सवय आणि गचाळ कर्मचारी इत्यादींच्या मुबलक दर्शनाने या अमेरिकी निरीक्षकांचे डोळे पांढरे झाले नसल्यास नवल. हे झाले अमेरिकेने आपले मसाले का नाकारले त्यामागील कारण. अस्वच्छता हे तसे आपले जनुकीय वैगुण्य असल्यामुळे हे असे घडले असावे. तथापि सिंगापूर आणि हाँगकाँग यांनी घातलेल्या मसालाबंदीमागील कारण अधिक गंभीर आहे. भारतातून त्या देशांत गेलेल्या मसाल्यांत काही घातक कार्सिनोजेन रसायने आढळली. ज्या घटकांमुळे कर्करोग होतो हे नि:संशय सिद्ध झाले आहे त्या घटकांस कार्सिनोजेन असे म्हणतात. त्यांचा उगम काय असावा? ही रसायने एरवी दोन कामांसाठी वापरली जातात. कीटकनाशन आणि अन्नघटकांचे आयुष्य अधिकाधिक लांबवणे. म्हणजे हे अन्नघटक दीर्घकाळ टिकावेत, त्यांच्या रसास्वादास बाधा येऊ नये वा त्यांची उपयुक्तता कमी होऊ नये यासाठी हे रसायन वापरले जाते. ते भारतीय मसाल्यांत आढळले, असे या दोन देशांचे म्हणणे. ते अर्थातच आपल्या कंपन्यांस अमान्य. तथापि विज्ञानात ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ असे सप्रमाण सिद्ध करता येत असल्याने आपल्या कंपन्या काय म्हणतात यापेक्षा त्या उत्पादनांचे रासायनिक पृथक्करण काय सांगते हे अधिक महत्त्वाचे आणि निर्णायक ठरेल. या सगळ्या प्रकारामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात.

जसे की आपल्या अन्न सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी नक्की काय? ही असली घातक रसायने, जिवाणू आपल्या मसाल्यांत असल्याचे परदेशी यंत्रणांकडून आपणास कळत असेल तर मग ही आपली यंत्रणा नक्की करते काय? यापेक्षाही गंभीर मुद्दा असा की ही उत्पादने परदेशी- त्यातही विकसित देशांत- गेली म्हणून त्यांत असे काही घातक असते हे आपणास कळले तरी. मग देशातल्या देशातच विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचे वास्तव किती भयानक असेल या कल्पनेनेच अंगावर काटा यावा. मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके आढळली म्हणून विकसित देश भारतीय द्राक्षांच्या बोटीच्या बोटी परत पाठवतात; तरी आपणास काही वाटत नाही. आपल्या फळांच्या दर्जाविषयी ‘ते’ संशय घेतात. ‘अज्जिबात साइड इफेक्ट्स नसतात’ असे निर्बुद्ध वर्णन केल्या जाणाऱ्या आपल्या अनेक तथाकथित ‘देसी’ औषधांना विकसित देश बंदरातही येऊ देत नाहीत. आपले काही हुशार उद्याोजक विकसित देशांसाठी एक आणि ‘देसी’ नेटिव्हांसाठी दुसरे अशी दोन दर्जाची उत्पादने बनवतात. म्हणजे ‘त्यांच्या’ देशात न चालणारी गोलमाल आपल्या देशात सहज गोड मानून घेतली जाईल, याची शाश्वती त्यांना असते. आपल्या देशातील औषध प्रमाणीकरण यंत्रणांकडे पुरेसा कर्मचारी वर्गच नाही. खुद्द चीनमध्येही न बनवले जाणारे अनेक पदार्थ आपल्याकडे ‘चायनीज फूड’ म्हणून सर्रास विकले जातात आणि ते खाणाऱ्या अनेकांना त्यात जगाने बंदी घातलेले ‘मोनोसोडियम ग्लुटोमेट’ (अजिनोमोटो) बचकभर घातलेले असते हे ठाऊकच नसते. ज्यांनी यावर कारवाई करायची त्या यंत्रणा ‘तोडपाणी’ उद्याोगांसाठी मशहूर. विकसित देशांनी कित्येक दशकांपूर्वी ज्यावर बंदी घातली ते ‘डीडीटी’ नामक कीटकनाशक आपल्याकडे अत्यंत लोकप्रिय. हे सर्वच क्षेत्रांबाबत घडते. म्हणजे भारतीय कंपन्या जे पेय ‘स्कॉच’ म्हणून येथे खपवतात ते मद्या परदेशांत आपल्या कंपन्यांस ‘रम’ म्हणून विकावे लागते. कारण तेच. उत्पादनाचा आणि एखाद्या उत्पादनासाठी लागणाऱ्या घटकांचा दर्जा. सिंगापूर, हाँगकाँग आणि अमेरिका यांनी जे काही केले त्यावरून या दर्जाबाबतच प्रश्न निर्माण होतात.

आणखी एक मुद्दा. या मसाल्याचे बहुतेक ग्राहक हे परदेशस्थ भारतीय असणार, हे उघड आहे. म्हणजे युरोपीय वा अमेरिकी गौरवर्णीय कुटुंबास मालवणी वा तंदूर वा सार-सांबार मसाल्याची गरज लागत असेल ही शक्यता कमीच. म्हणजे हे सर्व मसाले- निदान प्राधान्याने- त्या त्या देशांतील भारतीयांच्या वा भारतवंशीयांच्याच मुदपाकखान्यात स्थिरावणार. याचाच दुसरा अर्थ असा की या मसाल्यांचे देशी उत्पादक त्यांच्या संशयास्पद उत्पादनांमुळे परदेशी भारतीयांच्याच आयुष्याशी खेळणार! ज्यांच्याकडून डॉलरद्रव्य कमवायचे त्यांच्याच जिवास हे आपले उत्पादक धोका देणार! तेव्हा ज्यांच्याकडून द्रव्य मिळते त्यांच्या आरोग्यासाठी तरी आपल्या यंत्रणांनी दर्जाबाबत सावधानता बाळगायला हवी. दर्जा ही केवळ बाजारपेठेत विक्रीपुरती गरज नसते. तो न पाळून देशी निवासी उत्पादक अनिवासी भारतीयांचीच फसवणूक करत आहेत. हे आणखीच वाईट.