क्रीडा स्पर्धा नियोजन म्हणजे केवळ संकुलांची उभारणी नाही, तर त्यासाठी अवाढव्य नियोजन, सखोल समन्वय लागतो.  या स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत तरी तो पुरेसा दिसून आला नाही.

क्रिकेटमधील ‘महासंग्रामा’ला गुरुवारी अहमदाबादेत सुरुवात झाली असे म्हणावे, तर अशा प्रसंगी समर्पक असे बिगूल सोडाच, पण पिपाण्यांचा आवाजही कोठे कानावर पडला नाही. प्रेक्षकसंख्याही एखाद्या रणजी सामन्यासाठी असावी, तशी उदासीन. सव्वा लाखाच्या मैदानामध्ये ३० हजारांचीही उपस्थिती नव्हती. आगामी निवडणुकांसाठीची प्रचारव्यग्रता असेल किंवा इंग्लंड- न्यूझीलंड सामना पुरेसा महत्त्वाचा नसेल, किंवा या स्टेडियममधील पुढील काही अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांसाठी सदेह उपस्थिती अधिक महत्त्वाची वाटली म्हणून असेल, पण राष्ट्रीय आणि बीसीसीआय नेतृत्वही या सामन्याकडे फिरकले नाही. इंग्लंड- न्यूझीलंड उद्घाटनाचा सामना, तोही अहमदाबादेत होणे हे यापूर्वीही घडले होते. १९९६ मधील विश्वचषक स्पर्धेची सुरुवात इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानेच झाली होती. फरक इतकाच, की तेव्हा मैदानाचे नाव होते सरदार पटेल स्टेडियम! आता त्याच मैदानाचे रूपडे पालटून तेथे उभे राहिले आहे अजस्र नरेंद्र मोदी स्टेडियम! आवाका वाढला, प्रतिष्ठा वाढली. अशा वेळी भारतीय संघ सोडून इतर कुण्या संघाचा सामना खेळवला जाणे आणि त्या सामन्याला सर्वोच्च नेतृत्वाची उपस्थिती असणे हे समीकरण बहुधा आवाका आणि प्रतिष्ठा अशा दोहोंसाठी प्रशस्त ठरत नसावे. या मैदानावरच १४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना खेळवला जात आहे. त्या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सामन्याकडे जगाचे लक्ष लागलेले असल्यामुळे आणि मोदी हे जगन्मान्य नेतृत्व असल्याचे सिद्ध झाल्यामुळे ती शक्यता नाकारता न येण्यासारखीच. कारण त्या सामन्यास आवाका आहे, प्रतिष्ठा आहे आणि प्रसिद्धीझोतही! अहमदाबादमधील ‘त्या’ सामन्याआधी उद्घाटन सोहळा झाला होता. तसा तो अगदी परवाच्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीसही झाला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मात्र असा सोहळा घेण्याची गरज संयोजकांना – म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीला वाटली नाही. तो होणार की नाही याविषयी आणि झालाच का नाही याविषयीदेखील अधिकृत निवेदन आजतागायत प्रसृत झालेले नाही. गंमत म्हणजे याविषयी बीसीसीआय सोडून इतरेजनच या कृतीचे समर्थन करत आहेत. अशा वेळखाऊ आणि खर्चीक सोहळय़ांपेक्षा थेट स्पर्धेलाच सुरुवात झालेली केव्हाही उत्तम, असा या मंडळींचा दावा. तो बिनतोडच. पण हे सगळे ठरवून झाले, की निरुत्साह किंवा क्षमतेअभावी झाले याचाही शोध घेतला पाहिजे. कारण मुद्दा उद्घाटन सोहळय़ाचा नाही आणि तेवढय़ापुरता तो मर्यादितही नाही.  

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

तब्बल ४० वर्षांनी म्हणजे इंग्लंड- १९८३ नंतर क्रिकेटमधील ही सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा एकाच देशात भरवली जात आहे. दरम्यानच्या सर्व स्पर्धाचे एकापेक्षा अधिक यजमान व सहयजमान होते. इतकी मोठी स्पर्धा भारतामध्ये – एकटय़ा भारतामध्ये – भरवली जाणार हे काही वर्षांपूर्वीच ठरले होते. तरीदेखील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात ऐन वेळी वेळापत्रक आणि स्थळपत्रक जारी करण्याचा मान या स्पर्धेकडे जातो! यातून नियोजनाचा अभाव तेवढा दिसतो. परत त्यातही नऊ सामन्यांच्या तारखांमध्ये सातत्याने बदल करावे लागले. यात अहमदाबादमधील भारत-पाकिस्तान सामन्याचाही समावेश आहे. हा सामना सुरुवातीस १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. पण तो नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे क्रिकेट सामन्यासाठी वेगळा मोठा पोलीस बंदोबस्त पुरवता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत अहमदाबाद पोलिसांनी दाखवली. तेव्हा सामना १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला खेळवण्याचे ठरले. असाच काहीसा प्रकार हैदराबादमधील सामन्यांच्या बाबतीत घडला. याचा अर्थ बीसीसीआयने कार्यक्रम पत्रिका आखताना संबंधित ठिकाणांच्या पोलीस आणि प्रशासनाशी सल्लामसलत केली नव्हती. तीच बाब सामन्यांच्या तिकिटांची. तेथेही निव्वळ घोळच. सामन्याची तिकिटे उपलब्ध आहेत, की विकली गेली याविषयी चौकशी केली की बीसीसीआय संबंधित तिकीटविक्री संकेतस्थळाकडे बोट दाखवणार नि ते संकेतस्थळवाले बीसीसीआयकडे. या गोंधळामुळे तिकिटांविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे प्रवास नियोजन आणि वास्तव्य नियोजन करणेही अनेकांस जिकिरीचे होऊन बसले. जगभर हल्ली क्रीडा पर्यटन हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला आहे. परंतु इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमी आणि पर्यटक यापुढे भारताच्या नावापुढे फुलीच मारतील, अशा या घडामोडी आहेत.

यानिमित्ताने क्रीडा स्पर्धा यजमान म्हणून आपल्या मर्यादा उघडय़ा पडतात. नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरातच ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारले जात आहे. २०४० मधील ऑलिम्पिक यजमानपद मिळवण्याचे आपले उद्दिष्ट आहे आणि तसे झाल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल उपलब्ध असावे या विचारातून ते उभारले जात आहे. परंतु क्रीडा स्पर्धा नियोजन म्हणजे केवळ संकुलांची उभारणी नव्हे. यासाठी अवाढव्य नियोजन आणि सखोल समन्वय लागतो. या स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत तरी तो पुरेसा दिसून आला नाही.

अर्थात हे सुरुवातीचे दिवस आहेत. शिवाय सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू असून, त्या स्पर्धेत भारतीय खेळाडू अभूतपूर्व यश मिळवत असल्यामुळे त्या स्पर्धेच्या तुलनेत माध्यम आणि चर्चेच्या अवकाशात क्रिकेटला म्हणावे तसे स्थान मिळालेले नाही. पण ही परिस्थिती लवकरच बदलेल. रविवारी भारताचा पहिला सामना आहे आणि अपेक्षेनुसार भारताची कामगिरी चांगली झाली, तर जनमानसाचा लोलक पुन्हा क्रिकेटकडे सरकण्यास वेळ लागणार नाही. अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामना आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला कधीही हरवलेले नाही. परंतु क्रिकेट हा अद्भूत अशाश्वततेचा खेळ मानला जातो आणि कोणत्याही दिवशी काहीही घडू शकते. तेव्हा अहमदाबादेतील बरा-वाईट असा कोणताही निकाल स्वीकारण्याचे भान विद्यमान भारतातील किती क्रिकेटरसिकांमध्ये आहे हेही यानिमित्ताने दिसून येईल. काश्मीरमधील विभाजनवादी घुसखोरीला पाठबळ पुरवत असल्यामुळे पाकिस्तानशी द्विराष्ट्रीय क्रिकेट खेळणे आपण थांबवले आहे. पण आयसीसी स्पर्धामध्ये आपण द्विराष्ट्रीय संबंधांचा मुद्दा आणू शकत नाही, त्यामुळे तेथे पाकिस्तानशी खेळावेच लागते. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना सर्वाधिक चर्चेतला ठरतो. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत तो अहमदाबादेतच खेळवण्याचा बीसीसीआय सचिव जय शहा प्रभृतींचा धोरणीपणा कौतुकपात्र असाच. परंतु याच जयभाईंनी आशियाई क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष या नात्याने अलीकडेच आशियाई चषक स्पर्धेअंतर्गत पाकिस्तानातील काही सामने हट्टाने श्रीलंकेत हलवले, कारण त्यांना भारताला पाकिस्तानात खेळवायचे नव्हते! पाकिस्तानसाठी अन्यायकारक ठरलेला हा बदल बीसीसीआयच्या ताकदीपुढे आशियाई क्रिकेट परिषदेला स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमी भूमीवर अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामना वस्तुनिष्ठ आणि खिलाडू नजरेतून पाहिला जाईल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी जय शहा कशी पार पाडतात, याविषयी रास्त संदेह उपस्थित होतो. त्या सामन्यास कदाचित नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सर्वोच्च राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कुणी सांगावे, पण मोदी यांचा नाटय़मयतेचा सोस पाहता ते या सामन्यास पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनाही आमंत्रित करू शकतात. तसे झाल्यास पाकिस्तानशी समांतर मुत्सद्देगिरीची (ट्रॅक टू डिप्लोमसी) मागणी फार काळ थोपवून धरता येणार नाही. अर्थात या झाल्या जरतरच्या बाबी. तूर्त बीसीसीआय आणि सरकारी यंत्रणांचे उद्दिष्ट विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनाचे असले पाहिजे. त्या आघाडीवर अजून तरी पितृपक्षीय उदासीन शांतता दिसून येते. १९८७, १९९६, २०११ सालच्या विश्वचषकांच्या तुलनेत ती ठळक दिसून येते. उत्सव पर्व सुरू होण्याआधी ती झटकणे गरजेचे आहे.