अमेरिकेच्या इतिहासातील दोन्ही सर्वाधिक म्हाताऱ्या अध्यक्षीय उमेदवारांची सत्तेची भूक उच्च कोटीची आहे आणि त्यासाठी निवडणूक लढवण्याची ऊर्जा अक्षय्य..

पायऱ्या चढतानाउतरताना काही वेळा धडपडणारा, भाषण करताना शब्दांचे विस्मरण होणारा सहस्राचंद्रदर्शनोत्तर विद्यामान अध्यक्ष एकीकडे… आणि… निवडणुकीला केवळ सत्तासोपानापर्यंत पोहोचण्याची शिडी मानणारा आणि कायद्याच्या नि कर्जफेडीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी(च) व्हाइट हाऊसचा आसरा शोधणारा, पत्नीच्या नावाचा उच्चार ‘मर्सिडीज’ असा करणारा अमृत महोत्सवोत्तर प्रतिस्पर्धी दुसरीकडे… जगातील सर्वशक्तिमान लोकशाही देशाला त्यांचा सर्वशक्तिमान अध्यक्ष निवडण्यासाठी अशा दोघांपलीकडे उमेदवार सापडू नये, ही म्हटले तर शोकान्तिका, म्हटला तर विनोद. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोहोंमध्ये लढत होईल, हे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. परवाच्या काही पक्षांतर्गत निवडणुकांपश्चात त्यावर शिक्कामोर्तब झाले. ट्रम्प (वय वर्षे ७७) आणि बायडेन (वय वर्षे ८१) हे अशा रीतीने अमेरिकेच्या इतिहासातले सर्वाधिक म्हातारे अध्यक्षीय उमेदवार ठरतात. पण दोघांचीही सत्तेची भूक उच्च कोटीची आहे आणि त्यासाठी निवडणूक लढवण्याची ऊर्जा अक्षय्य आहे. दोन्ही गुण कौतुकास्पदच. लोकशाही, अमेरिका आणि एकंदरीत मानवजातीविषयी दोहोंची मते दोन ध्रुवांवरची आहेत. पण ते महत्त्वाचे नाही. त्याहीपेक्षा दखलपात्र ठरते, दोघांनाही सध्याच्या घडीला जवळपास प्रत्येकी निम्म्या अमेरिकी मतदारांचा पाठिंबा आहे, ही बाब. साधारण अशी परिस्थिती गेल्या निवडणुकीतही दिसून आली होती. यंदा हे ध्रुवीकरण अधिक ठळक झाल्याचे आढळते. म्हणजे जो कोणी अध्यक्ष म्हणून निवडून येईल, तो अमेरिकेच्या जवळपास अर्ध्या पात्र मतदारांचा विलक्षण नावडता असेल. दोन्ही नेत्यांनी गेल्या महिना-दीड महिन्यामध्ये बहुतेक सर्व पक्षांतर्गत निवडणुका आणि मेळाव्यांमध्ये फारशा आव्हानांविना विजय मिळवला. बायडेन यांची या स्पर्धेतली दौड ट्रम्प यांच्यापेक्षाही अधिक यशस्वी ठरली. विद्यामान अध्यक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक असेल तर त्याला विरोध करणे सहसा टाळावे, या अमेरिकी राजकारणाच्या अलिखित पैलूचा फायदा बायडेन यांना झाला. तर ज्याने गत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जवळपास विजयाच्या काठावर नेले, त्याच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नसल्यामुळे स्वत:च्या पायावर धोंडा का मारून घ्या, असा विचार रिपब्लिकन नेत्यांनी आणि पक्षसदस्यांनी ट्रम्प यांना उमेदवारी देताना केला. या घडामोडी एका अत्यंत कळीच्या मुद्द्यापाशी येऊन थांबतात. तो मुद्दा म्हणजे सक्षम, सशक्त पर्यायाचा.

Arvind Kejriwal
Delhi : महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘या’ केंद्रशासित प्रदेशात राबवणार लाडकी बहीण योजना; नावनोंदणीही सुरू!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

सर्वप्रथम ट्रम्प यांच्याविषयी. ज्यांच्याविरोधात चार फौजदारी खटले दाखल झाले आहेत, असे ट्रम्प अमेरिकी अध्यक्षांच्या मांदियाळीतील एकमेवाद्वितीय. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन वेळा त्यांच्याविरोधात अमेरिकी काँग्रेसमध्ये महाभियोग आणला गेला. असा पराक्रम करणारेही ते एकमेव. या चार फौजदारी खटल्यांपैकी एक अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. २०२० मधील अध्यक्षीय निवडणूक निकालात हस्तक्षेप करताना, अमेरिकी काँग्रेस आणि अमेरिकी संविधानाविरोधात उठाव केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी रिपब्लिकन टोळीवाल्यांना कॅपिटॉल इमारतीवर चाल करून जाण्यास ट्रम्प यांनी चिथावले, या आरोपाची सुनावणी येत्या काही दिवसांत सुरू होईल. परंतु ट्रम्प यांनी या खटल्यांना बगल देण्याचे विविध मार्ग शोधून काढले आहेत. लोकशाही देशांमध्ये न्यायदान प्रक्रिया नेहमीच स्वत:चा असा वेळ घेत मार्गक्रमण करते. या गतीचा फायदा ट्रम्प उठवत आहेत. कायद्यासमोर वेळकाढूपणा करण्याचे तंत्र त्यांना फार पूर्वीपासून अवगत आहे. तशात अमेरिकी न्यायव्यवस्था आणि त्यातही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे ‘राजकीय’ असणे ट्रम्प यांच्यासारख्यांच्या पथ्यावर पडते. विशिष्ट विचारसरणीचे न्यायाधीश त्या विचारसरणीच्या अध्यक्षाला सहसा अडचणीत आणत नाहीत, हे अमेरिकी व्यवस्थेला ज्ञात होते. त्याचा असा गैरवापर ट्रम्प यांच्यासारखे घेतील, याची मात्र फारशी कल्पना बहुतांना नव्हती. कोलोरॅडो येथील सर्वोच्च न्यायालयाने संविधानाविरोधात उठाव केल्याच्या आरोपाखाली तेथील मतपत्रिकेवरून ट्रम्प यांचे नावच काढून टाकले. त्या निकालाला अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले. कारण तेथे रिपब्लिकन न्यायाधीशांचे प्राबल्य आहे. त्याबरोबरीनेच, अमेरिकी निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही, असा पोक्त विचारही तेथील न्यायाधीश करतात. अशा परिस्थितीत निवडणूक निकाल मान्यच न झाल्यामुळे एका पराभूत अध्यक्षाने थेट अमेरिकी काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी समर्थकांना चिथावले, तेव्हा त्याबद्दल अशा व्यक्तीस शासन झालेच पाहिजे हा विचार मागे पडू लागतो. अनेकांना हे अमेरिकी व्यवस्थेचे ठळक वैगुण्य वाटते. कारण संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतल्यानंतर, त्याच संविधानाविरोधात उठाव करते किंवा उठावास चिथावणी देते अशा व्यक्तीस अमेरिकेतील कोणतेही प्रशासकीय पद भूषवण्यास अपात्र ठरवण्याची तरतूद तेथील कायद्यातच आहे. पण त्या मुद्द्यावर जोरकस भूमिका तेथील रिपब्लिकनबहुल सर्वोच्च न्यायालयाने अद्याप तरी घेतलेली नाही.

ट्रम्प यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करून सर्वच खटल्यांच्या बाबतीत गोंधळ आणखी वाढवून ठेवला आहे. तो आहे अध्यक्षांना मिळणाऱ्या घटनादत्त कायदेशीर संरक्षणाचा. म्हणजे आपण ‘पापे’ केलीच नाहीत हा त्यांचा मुद्दा नाही, त्याबद्दल पश्चात्तापाचा तर प्रश्नही नाही. पण ‘पापे’ केली तेव्हा अध्यक्ष होतो म्हणून कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत! त्या मताचा प्रतिवाद कायदेशीर मार्गाने करायचा तर गुंतागुंत आणखी वाढणार. त्यात वेळही जाणार. हे अचूक हेरूनच ट्रम्प यांच्या चमूने प्रचाराची आखणी केलेली आहे. त्यांना रिपब्लिकन पक्षात आव्हान देणारे रॉन डेसांटिस, निकी हॅले, विवेक रामस्वामी स्वत:ला ‘ट्रम्पपेक्षा अधिक ट्रम्पवादी’ सिद्ध करायला गेले नि सपशेल फसले. ट्रम्प यांचा मुद्देसूद प्रतिवाद करून त्यांच्या अनेक दाव्यांतला फोलपणा दाखवून देऊ शकेल असे नेतृत्वच रिपब्लिकन पक्षात गेल्या दहा वर्षांत उभे राहू शकले नाही. शिवाय ट्रम्प यांना त्यांच्या वकुबाप्रमाणे वागू देण्यात पक्षाचे फार नुकसान होत नाही हे कळून चुकल्यावर तर त्या दिशेने फार प्रयत्नही झालेले नाहीत.

ट्रम्प यांच्याविरोधात उभे आहेत विद्यामान अध्यक्ष जो बायडेन. अमेरिकी राजकारणात नवीन शतकात ज्या मोजक्या विचारी राजकारण्यांचा उल्लेख करता येतो ते बहुतेक डेमोक्रॅटिक पक्षातच आढळतात. बराक ओबामा यांच्या अमदानीत बायडेन दोन वेळा उपाध्यक्ष होते. क्लिंटन दाम्पत्याचाही सहवास त्यांना लाभला आहे. परंतु अमेरिकी राजकारणात गेल्या दशकाच्या मध्यावर रौद्र बनलेल्या ट्रम्प-प्रवाहाचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यात कितपत आहे, हा प्रश्न उपस्थित करता येण्यासारखी परिस्थिती आहे. राजकीयदृष्ट्या बायडेन यांना ट्रम्प यांच्याइतका व्यापक पाठिंबा आहे का हा प्रश्न. अमेरिकेचे पूर्व आणि पश्चिम किनारे हे डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावबिंदू. गौरेतर, त्यातही आफ्रिकन-अमेरिकन, मुस्लीम आणि किनारी प्रदेशात वसलेले हिस्पॅनिक, तसेच युवा नोकरदार आणि उद्याोजक हा बायडेन यांचा पारंपरिक मतदार. या मतदारांस ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’सारखी स्वप्ने भुरळ पाडत नाहीत. हा मतदार जागतिक आर्थिक चढउतारांप्रति संवेदनशील असतो. त्या आघाडीवर अमेरिकेची – म्हणजे बायडेन प्रशासनाची कामगिरी आता कुठे बरी वाटू लागली आहे. लोकशाहीबाबत डेमोक्रॅटिक पक्षाची मूल्ये आणि बायडेन यांची मते एकाच प्रतलात आहेत. पण बेभान, बेलगाम नेतान्याहूंना गाझा बेचिराख करण्यापासून परावृत्त करण्यात ते नि:संशय कमी पडले आणि यातून बायडेन यांचा पारंपरिक मुस्लीम मतदार दुखावला. हा मतदार विचारी आहे, त्यामुळे बायडेन यांच्या चुकांना सहसा माफ करणारा नाही. ट्रम्प हे चुकाच करत नाहीत, असे त्यांचा मतदार मानून चालतो. ती सवलत बायडेन यांना नाही. म्हणूनच आगामी निवडणूक त्यांच्यासाठी अधिक खडतर ठरेल. दोन म्हाताऱ्यांत अधिक जरठ असलेले बायडेन या वाटेवर अडखळू शकतात.

Story img Loader