वाघ वाढले यात आनंद मानण्याचे दिवस सरून त्यांचे आयुष्य सुखकर कसे होईल या दृष्टीने विचार करण्याची वेळ माया व बजरंगमुळे आली आहे.

ऐन उमेदीच्या काळात वलयांकित आयुष्य जगणाऱ्याला आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकीपणाला सामोरे जावे लागणे ही मानवी जीवनात तशी सामान्य बाब. एखाद्याचे असे एकाकीपणात जगणे समोर आले की समाजमन हळहळते. अनेकदा याचा उलगडा त्याच्या मृत्यूनंतरच होतो. तेव्हा या हळहळीची तीव्रता अनेकदा अनुभवास येते. काही वर्षांपूर्वी परवीन बाबीचा झालेला मृत्यू किंवा अगदी अलीकडे रवींद्र महाजनींना आलेले मरण ही त्यातली प्रातिनिधिक ठरावी अशी उदाहरणे. हे मानवाच्या बाबतीत होते तसेच प्राण्यांच्या बाबतीतही घडते का? घडले तर आपण त्याकडे कसे बघतो? असे व्हायला नको होते यापलीकडे आपल्या प्रतिक्रिया कधी जातात का? मानव असो वा प्राणी, कुठल्याही सजीवाच्या बाबतीत हे घडायला नको यासाठी आपल्याकडून कृतीपर हालचाली होतात का? काया, वाचा, मन असलेल्या मानवाच्या व्यक्तिगत आयुष्यात कशाला डोकवायचे असे म्हणत त्याच्या एकाकी जगण्याकडे दुर्लक्ष करणे एखादवेळी समजून घेता येईल, पण फक्त काया व मन असलेल्या प्राण्यांच्या बाबतीत ही भूमिका योग्य कशी ठरू शकते? हे सारे प्रश्न उपस्थित झालेत ते ताडोबातील ‘माया’च्या बेपत्ता होण्याने. पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली ही वाघीण गेले तीन महिने दिसेनाशी झाली आहे. वन कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केल्यावर तिच्या अधिवासात हाडांचा सांगाडा मिळाला. तो तिचाच असल्याची चर्चा सुरू झाली. डीएनए चाचणीनंतर याचा उलगडा होईलच, पण यानिमित्ताने वाघांच्या वृद्धत्वाचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला.

gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
painted stork death loksatta news
नागपुरात नायलॉन मांजाचा पहिला बळी…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
Do You Know Which Animals can survive without oxygen
Animals That Live Without Oxygen: अविश्वसनीय! पण ‘हे’ प्राणी जगात ऑक्सिजनशिवाय जगू शकतात; कोणते ते घ्या जाणून…

२०१० पासून पांढरपवनी अधिवासात राहून लाखो पर्यटकांच्या ‘दिला’चा ठाव घेणाऱ्या वलयांकित मायाचे हरवणे आयुष्याच्या उतारवयातील एकाकी जगण्याची जाणीव करून देणारे, चटका लावणारे आणि त्यासोबतच अनेक प्रश्न उपस्थित करणारे. वार्धक्यात असे विजनवासी जिणे कुणाच्याही वाटय़ाला येऊ नये ही भावना तशी सार्वत्रिक. म्हणूनच वृद्धांची काळजी, त्यांचे संगोपन यासाठी झटणाऱ्यांची संख्याही अलीकडच्या काळात वाढत चालली आहे. केवळ माणूसच नाही तर पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही समाजात सजगता आली आहे. अशांचे मरण तरी किमान सुखकर व्हावे हाच यामागचा हेतू. त्याच न्यायाने वाघ व अन्य प्राण्यांकडेही बघायला हवे असा संदेश मायाच्या विषयाने साऱ्यांना दिला आहे. अवघे तेरा ते सोळा वर्षांचे आयुर्मान असलेल्या वाघांना उतारवयात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शिकारीची क्षमता गमावून बसलेला, सारी गात्रे शिथिल झालेला हा रुबाबदार प्राणी पोटाची भूक शमवण्यासाठी वणवण भटकत असतो. कुठे तरी आश्रय मिळेल या आशेवर जगत असतो. अशा स्थितीत त्याला काय हवे ते बघणे, त्याला शिकार मिळेल की नाही हे बघणे, त्याच्यावर सतत देखरेख ठेवणे हे काम व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनांचे. त्यात थोडी जरी कुचराई झाली की या मुक्या प्राण्याच्या एकाकी जगण्यातील संकटाच्या छटा आणखी गडद होत जातात.

मायाच्या अधिवासात सांगाडा सापडण्याच्या दोन दिवस आधी याच ताडोबा परिसरात खडसंगीजवळ बजरंग या वृद्ध वाघाचा मृतदेह आढळला. चौकशीतून कळले की तो त्याच परिसरात ‘छोटा मटका’ या नावाने परिचित असलेल्या वाघाने केलेली शिकार खायला गेला होता. त्यातून दोघांत झुंज झाली व बजरंगला जीव गमवावा लागला. वन खात्याने या मृत्यूची नोंद ‘अधिवासासाठी लढाई’ अशी केली आणि बजरंगच्या मृत्यूवर पडदा टाकला. वृद्ध वाघांच्या बाबतीत हे घडतेच. पण शेवटी हा निसर्गचक्राचा नियम, त्याला कोण काय करणार असा पवित्रा घेत किती काळ स्वस्थ बसायचे? वाघ हा जंगल पर्यटनाच्या साखळीतला अतिशय महत्त्वाचा घटक. या पर्यटनाचा अख्खा डोलाराच त्याच्या ‘दिसण्या’वर उभा असेल तर वृद्धापकाळात त्याची विशेष काळजी घेणे सरकारचे कर्तव्य ठरत नाही काय? जसे वय झालेल्या माणसांना आपण जास्त हालचाल करू देत नाही, त्यांना दगदग व्हायला नको याची काळजी घेतो, तशी या प्राण्यांच्या बाबतीत घ्यायला काय अडचण आहे? अशा वृद्ध वाघांच्या संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या विशेष सूचना नाहीत. मात्र अशा वाघांच्या अधिवासातले पर्यटन नियंत्रित करावे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याचे पालन खरोखर होते का? असे वय झालेले वाघ एकाकी पडतात. अगदी वृद्ध व्यक्तींसारखेच. त्यामुळे त्यांना आणखी त्रास व्हायला नको याची काळजी घेतली जाते का? एकांतवास व एकाकीपणा यात फरक आहे. तो जाणून घेतच या प्राण्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला हवे ही भावना अजूनही सरकारी पातळीवर रुजली नाही हेच या घटना दाखवून देतात. वाघ वाढले यात आनंद मानण्याचे दिवस आता सरले. आता गरज आहे ती त्यांचे आयुष्य सुखकर कसे होईल हे बघण्याची. त्या दृष्टीने विचार करण्याची वेळ माया व बजरंगमुळे आली आहे. उण्यापुऱ्या साडेतेरा वर्षांच्या आयुष्यात पाच वेळा प्रसवलेल्या मायाने तीन वेळा मानवांवर हल्ले केले. त्यात ठार झालेले तिघेही वन कर्मचारी होते. शासकीय कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नात हे तिघे तिच्याजवळ गेले व जीव गमावून बसले. यावरून या प्राण्याला एकांतवास किती प्रिय हेच दिसून येते. तिच्या या कृतीची चिकित्सा करत किमान शेवटच्या काळात तरी तिच्या अधिवासाभोवतालचे पर्यटन कमी करता आले असते. असे नियंत्रण देखरेख कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती निर्माण करत असते.

मानवाचा वावर कमी झालेला दिसला की वाघही मुक्तपणे संचार करायला लागतो. त्याला न्याहाळण्याची प्रक्रिया अधिक बारकाव्याने राबवता येते व त्यानुसार सोयी उपलब्ध करून देता येतात. प्राण्यांच्या देखरेखीतले हे साधे तत्त्व. मात्र अलीकडे पर्यटन व त्यातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीच्या नादात साऱ्यांनाच त्याचा विसर पडला आहे. अर्थकारणाच्या या लालसेतून वाटाडय़ा, हॉटेल्स व रिसॉर्टचे मालक आणि कर्मचारी अशी युतीच जन्माला आली आहे. त्यात भर पडते ती उत्साही पर्यटकांची. कुठेच वाघ दिसला नाही तर जा पांढरपवनीला ‘माया’ नक्की दर्शन देईल असे निरोप जन्म घेतात ते या युतीतून. मायाचे वय झाले, आता तिला त्रास देण्यात अर्थ नाही असा परोपकारी विचार मागे पडतो तो यातून. घरातल्या वृद्धांच्या बाबतीत आपण असे वागतो का असा साधा प्रश्नही यातल्या कुणाला पडत नाही. वाघच दिसला नाही तर पर्यटक गर्दी कसे करणार या चिंतेने व्यवस्थापनाला ग्रासलेले असते. त्यामुळे त्यांच्याकडूनही या कृतीकडे काणाडोळा होतोच. ही वृत्ती जोवर बदलणार नाही तोवर वाघाचे जीवन सुखकर होणार नाही. माणूस असो वा वाघ, यापैकी कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही हे खरेच, पण त्यांना स्वस्थ जीवन जगता यावे यासाठी जसे मानवी जीवांसाठी प्रयत्न होतात तसेच वाघांसाठीही व्हायला हवेत. त्यासाठी व्याघ्र प्राधिकरणानेही त्यांच्या दृष्टिकोनात बदल करण्याची वेळ आता आली आहे. देशात वृद्धत्वाकडे झुकलेले वाघ नेमके किती? तिथे पर्यटकांचा वावर नेमका कसा? त्यांच्या अधिवासाची स्थिती नेमकी काय? यावर विचार करून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी व्हायला हव्यात. आजमितीस अशी कोणतीही आकडेवारी या प्राधिकरणाकडे उपलब्ध नाही. एखादा वाघ जखमी झाला अथवा मानवावर हल्ले करता झाला की तेवढय़ापुरती तत्परता दाखवायची एवढय़ाने काम भागणारे नाही.

देशात वाघ कमी होते तेव्हा तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना काळानुरूप बदलायला हव्यात. आता वाघाची संख्या वाढली आहे, हे लक्षात घेत त्यांचे जीवनमान कसे उंचावेल या दृष्टीने विचार व्हायला हवा. माणूस प्रगत होत गेला तसतसे त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वृद्धापकाळ हा प्रत्येकासाठी संवेदनशील विषय ठरू लागला. त्यातून अनेक नवे उपाय जन्मले. त्याच दृष्टिकोनातून आता वाघांकडे बघायला हवे, तरच आपल्या सुसंस्कृतपणात भर पडेल. माया असो, बजरंग असो वा एखादा प्रसिद्धीच्या झोतात असलेला माणूस. यांच्या एकाकीपणातून ओढवलेल्या मृत्यूची चर्चा तरी होते, पण अनाम अवस्थेत जगणाऱ्या शेकडो वाघांचे काय, या प्रश्नावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता आली आहे.

Story img Loader