…अशांच्या शिरावर पद्माविभूषण वा भारतरत्नचे मुकुट चढवण्यामागे जे आपले नाहीत त्यांस आपल्याकडे वळवणे हा विचार असेल, आणि ते कौतुकास्पद खरेच…

सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर बिहारचे कर्पुरी ठाकूर यांचे कार्य निश्चितच निर्विवाद. तथापि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकूर यांस ‘भारतरत्न’ जाहीर करणे हा आणखी एक ‘मास्टरस्ट्रोक’ असे हातास हात लावून ‘मम’ म्हणणाऱ्यांस वाटत असेल तर राजीव गांधी यांनी १९८८ साली तमिळनाडूचे एमजी रामचंद्रन यांस दिलेल्या ‘भारतरत्न’चेही कौतुक करावयास हवे. त्यावेळी एमजीआर यांस भारतरत्न दिले जाण्याची संभावना आज ज्यास नवनैतिकवादी असे म्हटले जाते त्या वर्गाने राजकीय निर्णय अशी केल्याचे अनेकांस स्मरेल. किंवा २०१४च्या लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसने महाराष्ट्राकडे आशाळभूतपणे पाहात सचिन तेंडुलकर यांस भारतरत्न जाहीर केले त्याच्याशीही या निर्णयाची बरोबरी होऊ शकेल. किंवा २०१९ साली पूर्व पादाक्रांत करावयाची निकड असल्याने एकाच वर्षी प्रणब मुखर्जी आणि आगळे संगीतकार भूपेन हजारिका यांस भारतरत्नने गौरविण्याच्या निर्णयाचा दाखलाही या संदर्भात दिला गेल्यास ते अयोग्य ठरणार नाही. किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांस ‘पद्माविभूषण’ने गौरवण्याचा निर्णयही या मालिकेत बसू शकेल. राजीव गांधींच्या एमजीआर यांस, काँग्रेसच्या सचिन तेंडुलकरांस भारतरत्न निर्णयामागे राजकीय विचार होता असे म्हणावयाचे असेल तर आता ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करण्यामागे तो नाही, असे म्हणता येणार नाही. आगामी निवडणुकांत बिहारच्या नितीशकुमार यांच्या जनता दलाची साथ नसणे, लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने नितीशकुमार यांची संगत करणे आणि एकूणच वातावरणात अन्य मागासांच्या जनगणनेची मागणी पुढे येणे या सगळ्याचा विचार ठाकूर यांची निवड ‘भारतरत्न’साठी करण्यामागे नसेलच असे म्हणता येणे अवघड. या मुद्द्यावर आतापर्यंत जे काही घडले त्यापेक्षा वेगळे काही विद्यामान सत्ताधाऱ्यांनी केले नाही, इतकाच या चर्चेचा अर्थ. तथापि या निमित्ताने सध्याच्या राजकारणाचा वेध घेणे उद्बोधक आणि मनोरंजकही ठरावे.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

उद्बोधक अशासाठी की यातून विरोधकांतील दुही अधिक रुंद करण्याचा भाजपचा प्रयत्न आणि त्यांस येत असलेले यश ठसठशीतपणे समोर येते. विरोधी गटांतील नेत्यांस आपल्या पक्षात आणवून त्याच्या हस्ते उर्वरित विरोधकांची कोंडी करण्याचे भाजपचे यशस्वी प्रारूप यातून दिसून येते. उदाहरणार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, मणिपूरचे एन. बीरेन सिंग, त्रिपुराचे माणिक साहा, हवाई वाहतूक खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उद्याोगविषयक एका खात्याचे मंत्री नारायण राणे इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील. हे सर्व मान्यवर मूळचे भाजपचे नाहीत. काँग्रेस, शिवसेना इत्यादी पक्षांतून ते भाजपवासी झाले आणि केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा यशस्वीपणे टाळून महत्त्वाची पदेही मिरवू लागले. आज परिस्थिती अशी की मूळचे भाजपवासी काय लढतील इतक्या प्राणपणाने हे सर्व आपापल्या मूळ पक्षांशी दोन हात करताना दिसतात. राहुल गांधींचे एकेकाळचे निकटवर्तीय आसामचे मुख्यमंत्री हिमंता सर्मा वा उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे उजवे हात महाराष्ट्राचे विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपापल्या राज्यांत आपापल्या मूळ पक्षांशी भाजपपेक्षाही अधिक आक्रमकपणे लढू लागले आहेत. या मंडळींची कार्यक्षमता इतकी की त्यामुळे त्या त्या राज्यांत मूळ भाजपवासीयांस फार काही करण्याची गरज लागत नाही. आतापर्यंत अनेक पक्षांनी सत्तांतरे अनुभवली. त्यातून सरकारे पाडली गेली आणि नवे घरोबेही तयार झाले. पण यजमानाची वहाणच यजमानास गार करण्यासाठी वापरली जाण्याचा हा प्रकार राजकारणास तसा नवाच म्हणायचा. हे सर्व करणाऱ्यांस स्वत:च्या राजकीय कौशल्याची इतकी खात्री आहे की बाहेरून आलेल्यांचे कोडकौतुक करताना स्वघरातील अनेकांकडे दुर्लक्ष होते याचीही तमा बाळगण्याची गरज संबंधितांस राहिलेली नाही. हा एक मुद्दा.

आणि दुसरे असे की विरोधकांच्या घरात दुफळी निर्माण करण्याचे विद्यामान सत्ताधीशांचे कसब. तेही तसेच वादातीत म्हणायला हवे. म्हणजे असे की प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न देण्याचा निर्णय मूळ काँग्रेसनेही कधी घेतला नसता. ते भाजपने करून दाखवले. आयुष्यभर काँग्रेसी सत्ता भोगणाऱ्या प्रणबदांची कन्या अलीकडे काँग्रेसवर दुगाण्या झाडताना दिसली. त्यावरून भाजपची ही चाल नाही म्हटले तरी यशस्वी ठरली म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांस पद्माविभूषणाने गौरवण्याचा निर्णयही असाच धक्कादायक. महाराष्ट्र भाजपच्या मते तर पवार हे मूर्तिमंत भ्रष्टाचाराचे प्रतीक. पवार यांचे राजकारण कायमच भाजपविरोधी राहिलेले आहे आणि तरी ते कसे आपल्याबरोबर येण्यास उत्सुक होते वा आहेत ते दाखवण्यात भाजपला कायमच स्वारस्य राहिलेले आहे. पण भाजपविरोधी पक्षांची सत्ता असतानाही पवार यांस दुसऱ्या क्रमांकाच्या नागर उपाधीने गौरविण्यात आले असते किंवा काय, याबाबत शंका आहे. पण ते काम भाजपने केले. असे करून पवार हे आपणास ‘जवळचे’ आहेत असा संदेश दिला गेला. यापेक्षाही या राजकारणाचे अधिक बोलके उदाहरण म्हणजे मुलायमसिंह यादव यांस मरणोत्तर पद्माविभूषण उपाधीने सन्मानित केले जाण्याचे. वास्तविक भाजपचे समग्र राजकारण मुलायमसिंह यांची संभावना त्यांच्या हयातीतच ‘मुल्ला’ अशा विशेषणाने करण्यात गेले. ‘मुल्ला मुलायम’ हा भाजपचा अत्यंत तिटकाऱ्याचा शब्दप्रयोग होता. मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष अल्पसंख्याक धार्जिणा नव्हे तर थेट अल्पसंख्याकवादीच मानला जातो. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर मुलायमसिंह यांची भूमिका ही भाजपच्या पसंतीस पडेल अशी कधीच नव्हती. इतकेच नव्हे तर अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार करण्यापर्यंत मुलायमसिंह गेले. त्यामुळे ते, त्यांचा पक्ष आणि भाजप यांच्यात कायमच विळ्या-भोपळ्याइतके, किंवा साप-मुंगुसाइतके सख्य होते. हे झाले राजकारण. पण मुलायमसिंह यांनी कुख्यात दिल्ली बलात्कार प्रकरणात अत्यंत आक्षेपार्ह भूमिका घेतली होती आणि ‘‘मुलगे चुका करतात, या असल्या (म्हणजे बलात्कार) गुन्ह्यांसाठी त्यांना फाशी देण्याची गरज काय?’’ अशा अर्थाच्या त्यांच्या विधानाची भाजपसकट सर्वांनी निर्भर्त्सना केली होती. तरीही अशा व्यक्तीस मरणोत्तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देणे हे भाजप आणि हिंदुत्ववादी गटांतील अनेकांस चक्रावून टाकणारे होते.

आताही कर्पुरी ठाकूर यांच्या ‘भारतरत्न’ने अनेकांस असे बुचकळ्यात टाकले असणार. विशेषत: भाजप आणि हिंदुत्ववाद्यांच्या गोटातील अनेक मान्यवर अद्यापही शासकीय सन्मानाच्या, तसेच मंत्रीपदादी नेमणुकांच्या प्रतीक्षेत असताना अन्य विचारधारांतील मान्यवरांचा असा गौरव सातत्याने केला जात असल्याने ‘आपल्यापेक्षा परके बरे’ असा संदेश भाजपवासीयांत जाण्याचा धोका संभवतो. विद्यामान सरकारने गौरविलेले मुखर्जी, पवार, मुलायमसिंह, ठाकूर हे कोणत्याही अंगाने हिंदुत्ववादी विचारधारेस जवळचे नाहीत. यातील मुलायमसिंह, कर्पुरी ठाकूर हे तर समाजवादी. इतिहासात समाजवादी गोटातील विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारशी साम्यवाद्यांसमवेत भाजपने सत्तासोबत केली खरी. पण वैचारिकदृष्ट्या ही विचारधारा भाजपच्या धर्मप्रेमी भूमिकेशी कोणत्याही अर्थी सुसंगत नाही. पण तरीही ही विचारधारा शिरोधार्य मानणाऱ्यांच्या शिरावर पद्माविभूषण वा भारतरत्नचे मुकुट चढवले गेले. असे करण्यामागे जे आपले नाहीत त्यांस आपल्याकडे वळवणे हा विचार असेल आणि ते कौतुकास्पद खरेच. त्याचवेळी जे आपले आहेत, उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्या विचारधारेचे अनुयायी, ते आपल्याकडून अन्यत्र जाणार कोठे असा विचार नसेलच असे नाही. राजकीयदृष्ट्या यशस्वी ठरल्याने भाजपस घरच्यापेक्षा दारचे जवळचे वाटत असावेत. पण ही उपेक्षा घरचे किती सहन करणार हा प्रश्न.

Story img Loader