आपल्याविरोधात लष्करी बंड झाल्याची कबुली रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना द्यावी लागणे, ही वाटते त्यापेक्षा किती तरी मोठी घटना! गेली २३ वर्षे अत्यंत निर्घृणपणे रशियाचे नेतृत्व केल्यानंतर, हजारो जणांना निजधामास पाठवल्यानंतर, पत्रकार-राजकीय विरोधकांना नामशेष केल्यानंतर, खऱ्याखोटय़ा लढतीत चेचनियाच्या नागरिकांची अमानुष कत्तल केल्यानंतर आणि जॉर्जिया, युक्रेन यांच्याविरोधात युद्ध लादल्यानंतर पुतिन यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा कोणी तरी पुढे आला ही सर्वार्थाने अत्यंत ऐतिहासिक घटना!! त्यांना आव्हान देणाराही खरे तर पुतिन यांनीच निर्माण केलेला. वॅग्नेर ग्रुप हे रशियाचे खासगी लष्कर. येवजेनी प्रिगोझिन हा या खासगी ठगटोळीचा प्रमुख. एकविसाव्या शतकाची पहाट होत असताना आणि पुतिन हे रशियाची सत्ता बोरीस येल्तसिन यांच्याकडून हस्तगत करीत असताना ज्या खासगी उद्योजकांस मोकळे रान दिले गेले त्यांतील हा एक. पुतिन यांचा उजवा हात अशीच त्याची ओळख.

पुतिन यांना अधिकृतपणे ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या ते इतके दिवस या वॅग्नेर टोळीकडून करवून घेत. गेली नऊ वर्षे या खासगी टोळीतर्फे पुतिन यांनी युक्रेन आदी परिसरात मनास येईल तशा हत्या करवल्या. रशियात कायद्यानुसार ‘खासगी लष्कर’ राखण्यास मनाई आहे. तरीही पुतिन यांच्या आशीर्वादाने अशी टोळी अस्तित्वात आली आणि पुतिन यांच्यासाठी वाटेल ती अनैतिक कृत्ये ती अबाधितपणे करीत राहिली. तथापि, युक्रेनच्या युद्धात रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी आपल्याच सैनिकांविरोधात हल्ला घडवून आणला, असे या प्रिगोझिन याचे म्हणणे. तेव्हापासून त्याचे आणि रशियाच्या लष्कराचे बिनसले. यात प्रिगोझिन याच्या म्हणण्यात तथ्य किती हे कळण्यास मार्ग नाही. कदाचित या वॅग्नेर टोळीचे वाढते प्राबल्य पाहून रशियाच्या लष्कराला त्याचा काटा काढावासा वाटला, असेही असेल. रशियातील बेबनाव लक्षात घेता असे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काहीही असो. पण तेव्हापासून वॅग्नेर टोळी आणि रशियाचे अधिकृत लष्कर यांत चकमकी झडू लागल्या. या वॅग्नेर टोळीला रशियानेच शस्त्रास्त्र पुरवठा केलेला. एके काळी त्याच्या टोळीचे ५० हजारांपर्यंत सदस्य होते. त्यातील अनेक रशियन लष्कराकडूनच मारले गेले.

loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
RSS chief Mohan Bhagwat remark on Manipur violence
अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…
Maratha reservation, Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
old man suicide rumour, lohmarg Police,
ठाणे : प्रवाशांसोबतच्या वादानंतर वृद्धाने आत्महत्या केल्याची अफवा; अफवांवर विश्वास ठेवू नका, लोहमार्ग पोलिसांचे आवाहन
What is the price of gold on Shri Krishna Janmashtami
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सोन्याचे दर बघून ग्राहक चिंतेत.. झाले असे की…
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Family members appeal not to believe rumors about Badlapur harassment case
त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन

लष्कर आणि खासगी लष्कर यांतील या संघर्षांच्या तीव्रतेचा अंदाज पुतिन यांस आला नसणे शक्य आहे. अथवा पुतिन यांची दिशाभूल खुद्द लष्करानेच केली असण्याचीही शक्यता नाकारणे अवघड. अखेर या बेबनावात या वॅग्नेर गटाने शनिवारी एक लष्करी केंद्रच ताब्यात घेतले आणि पुतिन यांना पहिला मोठा दृश्य हादरा बसला. दूरचित्रवाणीवरून या उठावाची कबुली पुतिन यांस द्यावी लागली यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात यावे. त्यानंतर या वॅग्नेर गटाचा पूर्ण बीमोड करण्याचे आदेश त्यांनी लष्करास देणे अपरिहार्य होते. परिस्थिती इतकी गंभीर की, राजधानी मॉस्कोत आणीबाणी लादण्याची वेळ पुतिन यांच्यावर आली. यानंतर आता पुढील २४ तास पुतिन यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. या काळात त्यांस तातडीने या खासगी टोळीचा बीमोड करता आला नाही तर परिस्थिती अधिकाधिक त्यांच्या विरोधात जाऊ लागेल, यात तिळमात्र शंका नाही. ताज्या वृत्तानुसार पुतिन मॉस्को सोडून गेल्याचे वृत्त आहे. तसे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा निष्कर्ष काढता येईल. क्षुद्र, स्वार्थी हेतूने व्यवस्थाबाह्य ताकदीस सत्ताधाऱ्यांनी जवळ केले की काय होते, याचे हे आणखी एक उदाहरण. यातून लगेच पुतिनशाहीचा अंत होईल, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. पण, पुतिन यांच्या शेवटाची ही सुरुवात ठरेल, हे निश्चित. पुतिन यांचा हा वॅग्नेर-वांधा त्यांच्या राजवटीसाठी मृत्युघंटा ठरेल. तसे झाल्यास लोकशाही मार्गाने सत्ता मिळवून हुकूमशाही राबवणाऱ्या जगातील आणखी एका सत्ताधीशाचा हा अंत असेल. जगातील समस्त लोकशाहीप्रेमी या क्षणाच्या प्रतीक्षेत असतील.