अलीकडची पक्षत्यागप्रसंगी विठ्ठलचरणी लीन होण्याची प्रथा पाहता आपणास या राजकीय वाऱ्यांत इतके स्मरले जाईल असे त्या आद्य खऱ्या विठ्ठलासही कधी वाटले नसणार.

अजितदादा पवार आणि पाठोपाठ शरद पवार यांचे मेळावे चांगलेच गाजले. अजितदादा यांचा मेळावा ‘मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट’च्या उच्च शिक्षणासाठी स्थापित संस्थेच्या प्रांगणात झाला तर त्यांचे काका शरदराव आपल्या गुरूच्या स्मरणार्थ उभारलेल्या यशवंतराव चव्हाण संस्थेतून बोलते झाले. या दोन ठिकाणांहून या काका-पुतण्यांनी एकमेकांविरोधात रणशिंग फुंकले. शरदरावांच्या तुलनेत अजितदादांचे शिंग जरा जोरात वाजले. नाही म्हटले तरी वयामुळे फरक पडतोच. त्यात अजितदादा रागावलेले. त्यामुळे तो जोषही शिंगातून सर्वदूर पसरला. अजितदादांचे भाषण राजकीय कमी आणि कौटुंबिक अधिक म्हणायला हवे. त्यावरून बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे या अन्य लोकप्रिय काका-पुतण्यांतील संघर्षांची आठवण व्हावी. काकांनी माझ्यावर अन्याय केला, भाजपशी हातमिळवणी करावी ही काकांचीच इच्छा होती, काकांनी मला तोंडघशी पाडले, काकांमुळे मी खलनायक ठरतो अशा ‘काका किश्याचा’छाप पद्धतीने त्यांनी आपली बाजू मांडली. त्यामुळे त्यांचे आयुष्य किती काकाकेंद्रित आणि काकावलंबी होते ते समोर आले. त्यांनी आपली बाजू जोरात मांडली हे बरे झाले. अन्यथा वेगळे होण्यामागील कारण काय, हा प्रश्न पडला असता. त्यांनी तो पडू दिला नाही. तसे करताना अजितदादांनी पवार कुटुंबीयांची एक परंपरा मोडली. ती म्हणजे घरातील भांडणे चव्हाटय़ावर न आणण्याची. अजितदादांच्या तुलनेत काका शरदरावांचे भाषण तसे मलूलच म्हणता येईल. या संपूर्ण भाषणात त्यांनी आपल्या शीघ्रकोपी पुतण्याविषयी फार काही भाष्य केले नाही, ही बाब उल्लेखनीय. संपूर्ण महाराष्ट्राने मोठय़ा चवीने पाहिलेला हा सर्वात लोकप्रिय फॅमिली ड्रामा ठरू शकेल. त्यामुळे त्याची चर्चा करणे आवश्यक.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Attempt to spread poison in the name of caste PM Modi criticizes opponents
जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

ते करताना अजितदादांनी आपली विकासाची व्याख्या सांगितली असती तर सध्याच्या विकासाभिमुख राजकारणावर प्रकाश पडला असता. राष्ट्रवादी सत्तेवर असताना सोलापूर आदी प्रांताचे पाणी पळवण्यापासून ते राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पिळवणुकीपासून ते सहकारी साखर कारखाने खासगी झाल्यावर स्वस्तात पदरात पाडून घेण्यापर्यंत अनेक आरोप अजितदादांवर झाले. आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या परीने या आरोपांस हातभार लावलेला. तेव्हा राष्ट्रवादी सत्तेत असताना अजितदादांना करायला मिळाला तो ‘विकास’ नव्हता काय? आणि सत्ता गेल्यामुळे त्यात खंड पडल्याने पुन्हा त्या ‘विकासा’स हातभार लावायला मिळावा म्हणून त्यांना भाजपशी हातमिळवणी करण्याची घाई झाली होती काय, याचीही उत्तरे त्यांच्या भाषणातून मिळाली असती तर त्यांनी फुंकलेले रणशिंग सुरेलही वाटले असते. अजितदादांचे भौगोलिक सहकारी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत जाण्याचे कारण ‘‘शांत झोप मिळते’’ असे नमूद केले होते. अजितदादा बारामतीचे तर हर्षवर्धन इंदापूरचे. तेव्हा या हर्षवर्धनांप्रमाणे शांत झोपेसाठी आपणास भाजप साहचर्याची गरज आहे किंवा काय, हा मुद्दाही स्पष्ट झाला असता तर अधिक रास्त ठरले असते. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे क्षणचित्र म्हणजे आपल्या काकांस त्यांनी दिलेला निवृत्तीचा सल्ला. त्याचे काय करायचे अथवा नाही, हा काका-पुतण्यांचा प्रश्न. पण हा सल्ला देताना त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी ही उदाहरणे दिली नसती तर बरे झाले असते. निवृत्त होणे आणि निवृत्त करणे यातील फरक त्यांनी लक्षात घ्यायला हवा होता. 

तिकडे शरदराव म्हणाले ‘‘भाजपबरोबर गेला तो संपला’’. यावर त्यांचा विश्वास असेल तर अजितदादा म्हणतात त्याप्रमाणे भाजपशी आपण वाटाघाटी मुळात केल्याच का, याचाही खुलासा काकांनी करायला हवा. हाच आरोप पवार यांच्यावर अन्यही काही करतात. पवार मागच्या दरवाजाने भाजपशी बोलत होते, हा संशय अंमळ सर्वानाच आहे. भाजपचे नेतेही तसे सांगतात. एकटय़ा पवारांचेच मौन तेवढे यावर अजून आहे. तेव्हा इतिहासाच्या कोणत्या तरी टप्प्यावर वर्तमानात पवार यांना भाजपशी झालेल्या कथित हातमिळवणी प्रयत्नांचा खुलासा करायला हवा. खरे तर त्याच वेळी भाजपनेही पवार आपल्याला ‘चालणार’ होते का, या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर ते कोणत्या निकषांवर हे एकदा तरी स्पष्ट करावे. कारण भाजपच्या विचारकुलातील अनेक अनुयायांचा उपवास शरद पवार यांच्या नामोच्चारानेही मोडतो. जातीयवाद, भ्रष्टाचार, अल्पसंख्यानुनय इत्यादी अवगुणवैशिष्टय़धारी शरद पवार यांनाही आम्ही सत्तेसाठी गोड मानून घेऊ शकतो असे एकदा भाजपने जाहीर केले की सगळेच प्रश्न मिटतील. त्यासाठी वाटल्यास शरद पवार आणि भाजपाध्यक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी. किंवा ‘पवार-भाजप नात्यांचे अर्थ’ यावर उत्तन येथे कार्यशाळा ठेवावी. एकदाचा हा प्रश्न तरी संपेल.

पण शरदराव वा त्यांचे पुतणे अजितदादा या दोहोंच्या तुलनेत भाषणे लक्षणीय ठरली ती इकडून छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आदींची आणि तिकडून सुप्रिया पवार यांची. सुप्रिया यांच्या भाषणात नेहमीची भाऊबीज नव्हती. एरवी त्यांचे दादा-प्रेम तसे ओसंडून वाहत असते. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे त्रिकुटी सरकार सत्तेवर आले तेव्हा सुप्रियाताई या भाजपच्या भोज्यास हात लावून परतलेल्या आपल्या दादाच्या कौतुकास जातीने हजर होत्या. त्या वेळी ‘लोकसत्ता’ने ‘ताई आणि दादा’ या संपादकीयाद्वारे (शुक्रवार, २९ नोव्हेंबर २०१९) या बंधू-भगिनीप्रेमावर भाष्य केल्याचे चाणाक्षांस स्मरेल. तेव्हाचे त्यांचे बंधुप्रेम यशवंतराव चव्हाणच्या मंचावरून दिसले नाही. बाबांना त्रास देणाऱ्या दादाशी आता कट्टी असे काही त्यांनी सांगायला हरकत नव्हती. असो. पण खरी कमाल केली ती छगन भुजबळ, मुंडे, पटेल आदी प्रभृतींनी. यातील पटेल सोडून देण्यास कोणाची हरकत नाही. कारण पटेल यांस कोणाचे काय पटेल आणि ते का, हे सत्य आता सर्वास पटण्यासारखे आहे.

भुजबळ यांनी पवार यांस थेट विठ्ठलाच्या पायरीवरच नेऊन ठेवले. त्यामुळे एकंदर महाराष्ट्रात आणि भुजबळ यांच्यासारख्यांच्या आयुष्यात विठ्ठल नक्की आहेत तरी किती, हा प्रश्न पडतो. त्यांनी आधी बाळासाहेब ठाकरे यांस सोडले तेव्हा त्यांचे दैवत बाळासाहेब होते. शिवसेना सोडली तेव्हा राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे या विठ्ठलास बडव्यांचा वेढा पडल्याबद्दल शोक व्यक्त केला. भुजबळ, राज, नारायण राणे यांच्यासाठी बाळासाहेब हे असे विठ्ठल होते. भुजबळ यांच्या ‘त्या’ विठ्ठलाची जागा त्याचे मित्र शरदराव यांनी घेतली. नारायणरावांसाठी आधी काँग्रेसची रखुमाय होती आणि आता तर भाजपत आल्यावर अनेक विठ्ठल आहेत. राज ठाकरे स्वत:च स्वत:चे विठ्ठल बनले. आता त्यांच्या पक्षातलेही-जे काही मोजके उरले आहेत ते- आपल्या विठ्ठलाला बडव्यांचा वेढा पडल्याचे सांगतात. भुजबळही आपापल्या परीने जमेल तितके नाशकापुरते का असेना असे विठ्ठल झाले. मुंडे यांना मात्र रखुमाईचा शाप भोवला. असो.  अलीकडे ही अशी पक्षत्यागप्रसंगी विठ्ठलचरणी लीन होण्याची प्रथाच पडल्याचे दिसते. आपणास या राजकीय वाऱ्यांत इतके स्मरले जाईल असे त्या आद्य खऱ्या विठ्ठलासही कधी वाटले नसणार. हे सगळे पाहिल्यावर काहींस महाराष्ट्र म्हणजे ‘‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’’ झाला की काय असा प्रश्न पडण्याचा धोका असल्याने त्यावर सुरेश भटांच्या कवितेतील ‘‘मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या.. विठु काय बेमानांना पावणार आहे’’ हा उतारा आधीच दिलेला बरा.

Story img Loader