फेडरर निवृत्त झाला, नडाल त्या वाटेवर आहे. त्या सुवर्णयुगातील जोकोविचला ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी नवीन पिढीशी टक्कर घ्यावी लागेल आणि ते सोपे दिसत नाही…
टेनिसला नवीन पिढीची गरज आहे. भविष्य अनिश्चित असले, तरी सुखावहच म्हटले पाहिजे…’ तीन सम्राटांच्या अनभिषिक्त मक्तेदारीच्या पार्श्वभूमीवर उमटलेले हे उद्गार कुण्या टेनिसरसिकाचे वा विश्लेषकाचे नाहीत. ते निघाले आहेत, यान्निक सिनेर या इटालियन नवोन्मेषी टेनिसपटूच्या मुखातून. एरवी इतक्या धाडसी विधानांबद्दल टेनिसमधील त्रिमूर्तींच्या भक्तांकडून सिनेरची शेलक्या शब्दांत निर्भर्त्सना झाली असती. आता ते संभवत नाही, कारण सिनेरने नुकतीच ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकून कारकीर्दीतले पहिलेवहिले ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावले आहे. हे करताना उपान्त्य फेरीत नोव्हाक जोकोविच या ‘मेलबर्नच्या मनसबदारा’ला त्याने मात दिली आहे. सर्बियाचा जोकोविच हा दहा वेळचा ऑस्ट्रेलियन टेनिस विजेता. टेनिसमधील महान त्रिमूर्तींपैकी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर निवृत्त झाला आहे आणि स्पेनचा राफेल नडाल त्या वाटेवर आहे. त्या सुवर्णयुगातील जोकोविच तेवढा अजूनही खेळतोय. परंतु ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यासाठी त्याला आता नवीन पिढीशी टक्कर घ्यावी लागेल आणि ते सोपे दिसत नाही. कारण कार्लोस अल्काराझ, यान्निक सिनेर आणि आणखी दोघे-तिघे हे केवळ कौशल्यवान टेनिसपटू आहेत असे नव्हे, तर जिंकण्याची विजिगीषा आणि क्लृप्ती या गुणांनीही युक्त आहेत. हे दोन घटक सर्वाधिक महत्त्वाचे. फेडरर-नडाल-जोकोविच यांच्या इतर प्रतिस्पर्ध्यांमध्ये तेच अभावाने आढळले. किंवा या तिघांनी खेळाचा दर्जा ज्या उंचीवर नेऊन ठेवला, तिथपर्यंत पोहोचणे बहुतांसाठी अशक्य होऊन बसले. याचे एक कारण म्हणजे हे तिघेही बराच काळ परस्परांशी खेळत राहिले आणि त्या द्वंद्वांमधून त्यांच्या खेळामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत गेली. वाढते वय, त्यामुळे स्वाभाविकपणे अधूनमधून उद्भवणाऱ्या आरोग्यसमस्या हेच काय ते त्यांच्या वाटचालीतले गतिरोधक ठरले. सिनेर, अल्काराझ, होल्गर रून यांच्या रूपाने टेनिसला नवे विजेते मिळत असतील, तर त्याचा फायदा खेळालाच होणार.
हेही वाचा >>> अग्रलेख : अमृतांजन..
याचे कारण बड्या तिघांनी ज्या प्रकारे टेनिसविश्वावर राज्य केले, ते बहुत काळ थक्क करणारे होतेच, पण हे वर्चस्व अखेरीस कंटाळवाणे आणि एकसुरी ठरू लागले होते. यासाठी आकडेवारीचा दाखला अप्रस्तुत ठरू नये. जवळपास दोन दशके या तिघांनी मिळून ६६ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. विम्बल्डन २००३ पासून फेडररच्या, फ्रेंच २००५ पासून नडालच्या आणि ऑस्ट्रेलियन २००८ पासून जोकोविचच्या विजयमालिकेला सुरुवात झाली. पुरुष एकेरीत हे तिघेही एकत्रितपणे ९२९ आठवडे पहिल्या स्थानावर राहिले. म्हणजे जवळपास साडेसतरा वर्षे! २००४ ते २०२३ या काळात तिघांपैकी एक तरी वर्षाअखेरीस पहिल्या स्थानावर राहिला. या नियमाला अपवाद केवळ २०१६ आणि २०२२ अशा दोनच वर्षांचा. याशिवाय या काळात तिघेही पहिल्या तीन क्रमांकांवर तब्बल आठ वर्षे राहिले. सन २००८ पासून २०१९पर्यंत अँडी मरे (३), स्टानिस्लॉस वावरिंका (३), हुआन मार्टिन डेल पोत्रो, मारिन चिलिच यांनाच या तिघांची सद्दी मोडून काढण्यात काही प्रमाणात यश आले. तरीदेखील ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या बाबतीत जोकोविच (२४), नडाल (२२) आणि फेडरर (२०) यांच्या आसपासही यांच्यापैकी कोणी पोहोचू शकले नाहीत. कदाचित आणखी कोणी पोहोचण्याची शक्यता नाही. २०२० पासून म्हणजे फेडरर निवृत्त झाल्यानंतर आणि नडाल उतरणीला लागल्यापासून डॉमनिक थिएम, डानिल मेदवेदेव, अल्काराझ आणि सिनेर यांच्यासारखे टेनिसपटू जिंकू लागले आहेत. यांपैकी थिएमने तिशी ओलांडली असून, मेदवेदेव तिशीच्या समीप आहे. त्या तुलनेत अल्काराझ आणि सिनेर हे विशीच्या आसपासचे आहेत, डेन्मार्कच्या रूनने तर विशीही ओलांडलेली नाही. ३६ वर्षीय जोकोविचने गतवर्षी तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या, त्यामुळे तो आणखी काही स्पर्धा जिंकण्याची शक्यता आहेच. तरीदेखील गेल्या तीनपैकी दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा युवा टेनिसपटूंनी जिंकल्यामुळे नवयुगाची सुखद जाणीव होऊ लागली आहे.
हेही वाचा >>> अग्रलेख : ‘फिक्सर’ची फजिती!
ती सुखद अशासाठी, विशेषत: नव्वदच्या दशकात आणि नवीन शतकाच्या सुरुवातीला पुरुष टेनिसमध्ये विलक्षण चुरस दिसून यायची. टीव्हीच्या माध्यमातून टेनिस हा खेळ भारतीय घराघरांत पोहोचला, त्या वेळी म्हणजे ऐंशीच्या दशकात बियाँ बोर्ग, जिमी कॉनर्स, जॉन मॅकेन्रो यांच्या लढतींनी या खेळातली खुमारी आकळू लागली. त्यांची जागा पुढे इव्हान लेंडल, मॅट्स विलँडर, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग यांनी घेतली. प्रत्येकाची सद्दी सर्वांगीण नाही, पण विशिष्ट मैदानपृष्ठांवर. त्याची वेगळी गंमत होती. नव्वदच्या दशकात ‘गर्दी’ वाढू लागली आणि पीट सँप्रास, जिम कुरियर, आंद्रे आगासी, गोरान इवानिसेविच यांनी रंगत वाढवली. कधी पॅट कॅश किंवा मायकेल श्टीश विम्बल्डनमध्ये प्रस्थापितांना धक्के द्यायचे, कधी १७ वर्षांचा मायकेल चँग किंवा ३५ वर्षीय अँडर्स गोमेझ फ्रेंच खुल्या स्पर्धेत विजेते ठरायचे. यांनी एकेकदाच स्पर्धा जिंकली, पण चुरस विलक्षण वाढवली. फेडरर २००३ मध्ये विम्बल्डन विजेता ठरला, त्याच्या आधीच्या पाच वर्षांमध्ये ११ वेगवेगळ्या टेनिसपटूंनी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून दाखवली. या विविध रंगांच्या पटावर फेडरर-नडाल-जोकोविच यांचे तिरंगी स्वामित्व एकल, एकसुरी वाटू लागले होतेच. प्रत्येकाच्या बाबतीत प्रश्न हा, की कौतुक तरी किती काळ आणि किती प्रमाणात करत राहायचे? फेडरर आणि नडाल तर अस्सल ‘मर्यादापुरुष’. त्या तुलनेत उच्छृंखल स्वभावामुळे जोकोविचच्या कारकीर्दपटामध्ये जरा अधिक रंगत निर्माण झाली खरी. पण त्याला कधीही आणि कितीही मोठी कामगिरी करूनही आदरभावाच्या आघाडीवर फेडररची उंची किंवा नडालची खोली गाठून दाखवता आली नाही. त्यामुळे इतर दोघांच्या अनुपस्थितीत जोकोविचचे जिंकत राहणे कदाचित कर्कश भासू शकते आणि त्यामुळे झेपेनासे ठरू शकते. म्हणूनच नवीन टेनिसपटूंच्या आगमनाची झुळूक सुखद ठरू लागली आहे. या सगळ्या कालखंडात महिला टेनिसमध्ये पुरुषांच्या तुलनेत कितीतरी अधिक वैविध्य आणि चुरस पाहावयास मिळाली हे त्रिवार सत्य. त्यामुळेच ‘कोण जिंकणार’ हा क्रीडा क्षेत्रातील अनादि अनंतकाळ चालत आलेला प्रश्न महिला टेनिसच्या बाबतीत आजही रंगतदार चर्चा घडवून आणू शकतो. पुरुष टेनिसविश्व आता कुठे त्या चुरशीच्या दिशेने मार्गक्रमित होऊ लागले आहे. अल्काराझ किंवा सिनेर यांनी जेतेपदे पटकावताना पाच सेटपर्यंत टिकून राहण्याची हुन्नर आणि हिंमत दाखवलेली आहेच. सिनेरने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात दोन सेटची पिछाडी भरून काढून सामना आणि स्पर्धा जिंकली. अल्काराझनेही गतवर्षी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात जोकोविचला पाच सेट्सच्या प्रदीर्घ लढतीमध्ये हरवून दाखवले होते. यांच्या जोडीला स्टेफानोस त्सित्सिपास, अलेक्झांडर झ्वेरेव, रून, मेदवेदेव आणि दस्तुरखुद्द जोकोविच असे मोजके टेनिसपटू चमकत राहतील अशी अपेक्षा आहे. पण फेडरर-नडाल किंवा नडाल-जोकोविच यांच्यातील द्वंद्वाचा दर्जा सिनेर-अल्काराझ द्वंद्वामध्ये गेल्या वर्षभरात अनेकदा दिसून आला आहे. अस्सल टेनिसरसिकाला अशा दर्जाचीच आस असते. तेव्हा एकीकडे प्रस्थापित त्रिमूर्ती अस्ताला जात असताना नवे द्वंद्व आणि टेनिसपटू अजून काही वर्षे पारणे फेडत राहतील हे नक्की. ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा २०२४ चे म्हणूनच महत्त्व. फेडररने २००३ मध्ये विम्बल्डनसम्राट पीट सँप्रासची सद्दी मोडली आणि नव्या युगाला सुरुवात झाली. त्याची पुनरावृत्ती सिनेरने जोकोविचला हरवून त्याची ऑस्ट्रेलियन स्पर्धेतली सद्दी मोडून होत असेल, तर अशा उत्थानाचे स्वागतच. खांदेपालटाची खुमारी टेनिसमध्ये केव्हाही न्यारी आणि हवीहवीशीच!