इस्लाम धर्मीयांचे नुकसान जसे त्या धर्मातील तर्कदुष्टांनी केले तसेच ते ठिकठिकाणच्या पुरोगामी म्हणवणाऱ्यांनीही केले. अमेरिकेसारख्या देशातही हेच झाले. आता यापुढे सर्व देशांतील सर्व विचारींना आपापल्या धोरणांचा फेरविचार करावा लागेल.
साधारण ३४ वर्षांपूर्वी ९/११ घडण्यास १९ वष्रे असताना लेबनॉनमध्ये झालेल्या पहिल्या आत्मघातकी हल्ल्यात ५० जणांचे प्राण गेले. त्यानंतर पुढच्याच वर्षी १९८३ साली लेबनॉनमध्येच बरुत येथे अमेरिकेच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात अनेक जणांनी प्राण गमावले. त्यानंतर प्रत्येक वर्षी जगाच्या कोणत्या ना कोणत्या शहरात अतिरेकी संघटना दहशतवादी हल्ले करीत आल्या आहेत आणि अनेक जण हकनाक मरत आले आहेत. रोम, लॉकरबी बॉम्बिंग, फिलिपिन्समधील मनिला येथे अध्यक्ष बिल िक्लटन यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न, टीडब्ल्यूए विमानाचे अपहरण, इस्रायलमध्ये झालेले विविध दहशतवादी हल्ले, १९९३ साली युसूफ रामझी याने पहिल्यांदा न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेला हल्ला, त्यानंतर त्याचे पाकिस्तानात लपून राहणे, रावळिपडीत..म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयानजीक.. सापडणे, पुढे भारतात संसदेवर झालेला हल्ला, इंडोनेशियातील बॉम्बिंग, त्यानंतर २००१ साली सप्टेंबर महिन्यात घडलेले ९/११, त्याच वर्षी पुढच्याच महिन्यात जम्मू काश्मीर विधानसभेवर झालेला हल्ला, त्या आसपास झालेले विविध िहसक प्रकार, कासाब्लांकासारख्या ठिकाणचा दहशतवादी हल्ला, लंडन, माद्रिद आदी शहरांतील दहशतवादात अनेकांचे प्राण जाणे, पुढे मुंबईने अनुभवलेले भीषण २६/११, इजिप्तमधील शर्म अल शेख, बाली बॉम्बिंग, इस्लामाबादेतील मेरिएट हॉटेलवर झालेला हल्ला, मॉस्को, अलेक्झांड्रा, बगदाद, मोगादिशू, चीन, येमेनची राजधानी साना, आपल्याकडील हैदराबाद, अमेरिकेतील बोस्टन, नायजेरियातील बोको हराम या संघटनेने आधी कॅमेरून आणि नंतर नायजेरियात घडवलेला उत्पात, चेचन्या, पॅरिस आदी ठिकाणी झालेला भीषण रक्तपात, पॅरिसमध्येच शार्ली एब्दोसारख्या व्यंगचित्र नियतकालिकावर झालेला हल्ला, अलीकडे पुन्हा त्याच शहरात झालेले हल्ले आणि काल कॅलिफोíनया येथे एका दाम्पत्याने घडवून आणलेले नृशंस हत्याकांड आदी अनेक उदाहरणे तपशीलवार सांगता येतील. या सर्वात एक समान धागा आहे. तो म्हणजे या सर्व दहशतवादी कृत्यांमागे इस्लाम याच धर्मातील अतिरेकी आहेत. परिणामी जगभरात इस्लाम आणि त्या धर्मातील अर्निबध अतिरेकी यांच्या संबंधांवर चर्चा सुरू झाली असून यास हाताळायचे कसे, या प्रश्नाने सगळेच बेजार दिसतात. नेमकी हीच अवस्था अमेरिकेतील न्यूयॉर्क पोस्ट या नियतकालिकाने अध्यक्ष बराक ओबामा यांना विचारलेल्या प्रश्नातून दिसून येते. ‘‘सध्या जे काही सुरू आहे, त्यास आता तरी तुम्ही इस्लामी दहशतवाद म्हणून संबोधणार का? तसे संबोधण्यासाठी तुम्हास आणखी कशाची आवश्यकता आहे’’, हा या नियतकालिकाचा थेट सवाल आहे.
ओबामा या प्रश्नाचे उत्तर देवोत वा न देवोत. जगातील जनतेने या प्रश्नाचे आपल्यापुरते तरी उत्तर दिले असून त्याबद्दल इस्लाम धर्मातील अतिरेकी अनुयायांस जबाबदार धरले आहे. याचा परिणाम म्हणून जगातील अनेक देशांत इस्लामविरोधात भावना तीव्र होऊ लागल्या आहेत आणि हे जागतिक शांततेसाठी चांगले लक्षण नाही. युरोपातील ऑस्ट्रियापासून ते अटलांटिक पलीकडील अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत इस्लाम धर्मीयांबाबत संशयाचे वातावरण तयार होऊ लागले असून त्यास इस्लामी धर्मीयच प्रामुख्याने जबाबदार आहेत. या दहशतवादाची सुरुवात अर्थकारणातून झाली असली तरी पुढे त्यातील अर्थ कधी सुटला आणि दहशतवाद्यांच्या नाडय़ा अतिरेकी धर्मवाद्यांच्या हाती कधी गेल्या ते संबंधितांना लक्षातही आले नाही. पन्नासच्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष जनरल ड्वाईट आयसेनहॉवर यांनी मुस्लीम ब्रदरहूडचा प्रमुख हसन अल बन्ना याचा थेट व्हाइट हाउसमध्येच पाहुणचार केला. त्यांचीच री कमी-अधिक प्रमाणात सर्वच अमेरिकी अध्यक्षांनी ओढली. त्यासाठी त्यांनी कारण दिले ते सोविएत रशियाच्या साम्यवादी प्रभावास रोखण्याचे. त्याच हेतूने अमेरिकेने सौदी अरेबियाच्या साहाय्याने ओसामा बिन लादेन यास हवेतितके मदरसे स्थापू दिले आणि त्याच हेतूने अमेरिकेने जनरल हमीद गुल आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल झिया उल हक यांच्यासारख्या नतद्रष्टास पोसले. त्याही वेळी इस्लामी धर्मवाद्यांना अमेरिकेकडून मिळणारी मदत ही झिया यांच्या स्विस बँकेतील खात्यात जात होती, हे अमेरिकेसह सर्व संबंधितांना माहीत होते. तरीही त्याची फिकीर केली गेली नाही. त्याही वेळी आपण दिलेल्या पशातून अफगाणिस्तानातील धर्मवादी अफू लागवड करून तरुणांना अमली पदार्थाच्या व्यसनजाळ्यात ओढले जात आहे, हे संबंधितांना माहीत होते. तरीही त्याकडे कानाडोळा केला गेला. त्याही वेळी आपल्या मदतीचा उपयोग भारतविरोधी काश्मीर फुटीरतावाद्यांना पोसण्यात खर्च होत आहे, हे संबंधितांना माहीत होते. तरीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. आता हे सर्व पाप अंगाशी आले असून अतिरेकी इस्लामी धर्मवादाचा हा भस्मासुर जागतिक शांततेच्या मस्तकावर हात ठेवू पाहात आहे. सुरुवातीस या सर्व धर्मवाद्यांनी अमेरिका आणि पाश्चात्त्य विरोधातील संतापाचा हुंकार म्हणून दहशतवादाचा आसरा घेतला. इस्लामी भूमीतील तेलावर संपन्न आणि गबर होणाऱ्या पाश्चात्त्य देशांनी तेलभूमीतील जनतेस मात्र गरीबच ठेवले, आपल्या संपत्तीत कधीही सामावून घेतले नाही त्याचा राग म्हणून इस्लाम धर्मीयांतील माथेफिरूंनी प्रथम शस्त्र हाती घेतले. परंतु पुढे ते अलगदपणे धर्मवाद्यांहाती गेले. परिणामी सांप्रत काळी अन्य धर्मीय विरुद्ध इस्लाम अशी अवस्था होताना दिसते. हे धोकादायक आहे.
यातून सहीसलामत बाहेर पडावयाचे असेल तर इस्लामी धर्मीयांतील नेमस्तांनाच पुढाकार घ्यावा लागेल. आपल्या धर्मातील मूलतत्त्ववादी अतिरेकी मंडळींना बाजूस सारून सामान्य इस्लाम धर्मीयांचे हित जोपासण्यासाठी इस्लाम धर्मीयांनाच पुढे यावे लागेल. त्यासाठी प्रसंगी अन्य धर्मीयांतील मध्यम मार्गीयांच्या हाती हात मिळवण्याचे धारिष्टय़देखील त्यांना दाखवावे लागेल. त्याच वेळी तोंडदेखल्या पुरोगामींची साथदेखील इस्लामी नेतृत्वास सोडावी लागेल. याचे कारण इस्लाम धर्मीयांचे नुकसान जसे त्या धर्मातील तर्कदुष्टांनी केले तसेच ते ठिकठिकाणच्या पुरोगामी म्हणवणाऱ्यांनीही केले. अमेरिकेसारख्या देशातही हेच झाले. यहुदी धर्मीय आणि इस्रायल यांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीस उतारा म्हणून त्या देशाने इस्लामींचे अतिरेकी लाड केले. आपल्याकडे या लांगूलचालनाचे स्वरूप वेगळे होते. स्वधर्मीयांवर टीकेचे आसूड ओढताना आपल्याकडील बोगस पुरोगाम्यांनी इस्लामी धर्मातील अतिरेकाविरोधात सोयीस्करपणे मिठाची गुळणी धरली. तसे करण्यात त्यांचा नामर्दपणा आणि स्वार्थ दोन्ही होते. या लबाडांमुळे इस्लाम धर्मीयांतील सुधारणावादी घटकांना कधीही पािठबा मिळाला नाही. त्या धर्मातील महिलांची होणारी आबाळ, एकंदरच शिक्षणाचा, आणि त्यातही आधुनिक शिक्षणाचा अभाव आणि यामुळे निर्माण झालेले मागासपण कमी व्हावे यासाठी आपल्यासारख्या देशांत कधीही प्रयत्न झाले नाहीत. शहाबानोसारख्या प्रकरणात अत्यंत घातक भूमिका घेऊन राजीव गांधी यांच्यासारखा आधुनिक राजकारणीदेखील इस्लामचा मुद्दा आला की आपला विवेक कसा गहाण ठेवतो हे साऱ्या देशाने पाहिले.
या दांभिक राजकारणाचा परिणाम दुहेरी झाला. एका बाजूला इस्लामी मूलतत्त्ववाद वाढू लागला आणि दुसरीकडे त्यास प्रत्युत्तर म्हणून िहदू वा अन्य धर्मीयांची एकारलेली एकजूट तयार होऊ लागली. आता सर्व देशांतील सर्व विचारींना आपापल्या धोरणांचा फेरविचार करावा लागेल. तसा तो केला जावा यासाठी खुद्द इस्लाम धर्मीयांनी पुढाकार घ्यावयास हवा आणि आयसिस, तालिबान, अल बद्र, लष्कर ए तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन आदी दहशतवादी संघटनांचा जाहीर निषेध करावा. या सर्व संघटनांच्या राजकीय मागण्या असू शकतात. परंतु त्या रेटण्यासाठी दहशतवाद हा मार्ग कदापिही असू शकत नाही. कोणत्याही धर्माने केली तरी िहसा निषिद्धच असते. आणि असावयास हवी. तेव्हा हे केले नाही तर आपलाच धर्म संकटात असल्याची जाणीव इस्लाम धर्मीयांना होईल. तसे झाल्यास वेगळ्या अर्थाने इस्लाम खतरे में असेल आणि त्यामुळे त्या धर्माचे अधिकच नुकसान होईल.