भाषा हा सामूहिक वारसा, तिच्या रक्षणाची जबाबदारी सगळय़ांची. भाषांचे दस्तावेजीकरण, शिक्षणाचे सुलभीकरण होण्यासाठी शब्दकोश आवश्यकच..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जागतिकीकरण, इंटरनेट यांच्या रेटय़ात भाषिक राजकारण अधिक गुंतागुंतीचे होत असताना छोटय़ा समूहांची भाषा टिकणे तर अधिकच मोलाचे..
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ऱ्हासाची उदाहरणे सातत्याने समोर येत असतानाच्या विषण्ण वर्तमानात कुठून तरी पाव्याचे मंजूळ सूर उमटावेत तशी पावरी भाषेसंदर्भातली बातमी आहे. महाराष्ट्रात नंदुरबार परिसरात, मेळघाट तसेच मराठवाडय़ाच्या काही भागात शतकानुशतके राहणाऱ्या पावरा आदिवासींची ही बोलीभाषा. आपल्या देशामध्ये असलेल्या हजारो भाषा, बोलींपैकी एक. या पावरी भाषेमधल्या साडेचार हजार शब्दांचा कोश तयार झाला असून त्याचे ७ ऑगस्टला प्रकाशन होणार आहे हे ते शुभ वर्तमान. हा शब्दकोश मुख्यत्वे शालेय विद्यार्थ्यांसाठी असून त्यात पावरीमधील शब्दांना मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द देण्यात आले आहेत. साडेचार हजार ही शब्दसंख्या फार नाही असेही कदाचित कुणाला वाटू शकते. पण आपल्या देशातील आदिवासींचे सामाजिक- सांस्कृतिक- प्रादेशिक स्थान आणि विकासाचा असमतोल हे समीकरण लक्षात घेतले तर या कामाचे महत्त्व ठसठशीतपणे जाणवू शकते. पुण्यामुंबईतील शिष्टसंमत वर्तुळाच्या बाहेरचे रसरशीत जग नजरेस पडू शकते. आणि एरवीचा प्रमाणभाषेचा, तसेच आताच्या काळातील ‘एक देश एक भाषा’सारखे आग्रह या जिवंतपणावर कसा वरवंटा फिरवत आहेत, तेही लक्षात येऊ शकते. या उपक्रमाच्या निमित्ताने खरे म्हणजे भाषा, बोली, भाषासंस्कृती, कोशनिर्मिती या सगळय़ावर चिंतन आणि चर्चा होणे अपेक्षित आहे. पण अलीकडच्या काळात सगळय़ाच बाजूंनी निर्माण झालेला झाकोळ आणि या गोष्टींबाबत प्रत्येकाच्याच टोकदार झालेल्या अस्मिता पाहता भाषा, संस्कृती, प्रथा-परंपरा अशा सगळय़ा गोष्टींबद्दल अगत्याने काही बोलणेदेखील धाडसाचे ठरू लागले आहे.
पहिल्यांदा कोशनिर्मितीबद्दल. अलीकडच्या ‘गूगलम् शरणम्’ म्हणणाऱ्या पिढीला कोश या प्रकाराबद्दल किती उत्सुकता, आत्मीयता, कुतूहल असेल हा प्रश्न आहेच, पण वेगवेगळे कोश म्हणजे भाषेची समृद्धी मिरवण्याचे दालन कसे आहे हे त्यांना आवर्जून सांगण्याची गरज आहे. या बाबतीत मराठी किती श्रीमंत आहे, हे मराठी भाषेतील कोशांच्या यादीवर नजर टाकल्यावर लक्षात येते. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या पुढाकाराने महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित झाले आणि त्यानंतर अनेकांच्या परिश्रमातून भारतीय संस्कृतीकोश, चरित्रकोश, विश्वकोश, म्हणींचा कोश यांसह अनेक कोशांची निर्मिती मराठी भाषेत झाली. ज्ञानोपासनेचे व्रत, एखाद्या विषयाचा ध्यास, संशोधनाची चिकाटी, अविरत परिश्रम या सगळय़ाशिवाय कोशनिर्मिती अशक्य आहे. इंटरनेटचा अल्लाउद्दीनचा दिवा हाताशी नव्हता तेव्हाच्या काळात अनेक प्रज्ञावंतांनी कोशनिर्मितीच्या पातळीवर डोंगराएवढे काम करून ठेवले असले तरी पावरी कोशनिर्माते सांगतात तो एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणवत्ता असूनही आदिवासी मुलांच्या शिक्षणात भाषिक अडसर हा मोठा अडथळा ठरतो, म्हणून ही पावरी भाषेतील शब्दकोशाची निर्मिती केल्याचे ते सांगतात. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असली तरी वेगवेगळय़ा ठिकाणच्या बोली, वेगवेगळय़ा समूहांच्या वेगवेगळय़ा भाषा प्रमाण मराठीपेक्षा वेगळय़ा आहेत. घरी-दारी आपापल्या भाषेत बोलणारे मूल शाळेत जाऊ लागले की त्याला ती प्रमाणभाषा शिकावी लागते. ती हळूहळू शिकता येतेही, पण सुरुवातीला ती समजत नाही म्हणून साहजिकच परकी वाटू लागते. म्हणजे एके काळी एतद्देशीयांना इंग्रजी जेवढी परकी वाटत असे तितकीच या मुलांसाठी आजही मराठी प्रमाणभाषा परकी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, हीच परिस्थिती आहे. जी भाषा त्यांच्या कधी कानावरच पडलेली नसते, तीमधून शिकावे लागणे हे त्या पाच-सात वर्षांच्या जीवावर अन्याय करणारे ठरते. याचा विचार फारसा केला जात नाही, पण तो कधी तरी करणे आवश्यक आहे. या बाबतीत पुण्यामुंबईतल्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना जमेस धरण्याची गरज नाही कारण आजकाल ती जन्मल्यापासून बाराखडीऐवजी एबीसीडी गिरवू लागतात आणि उच्च शिक्षणाच्या मिषाने ती थेट इंग्लंड-अमेरिकेतच जातील अशी स्वप्ने त्यांचे आईबाप बघत असतात. इथल्या भाषेशी, संस्कृतीशी, समाजाशी त्यांचा कसलाच संबंध येऊ नये अशी व्यवस्था केल्यानंतर इथल्या प्रसारमाध्यमांमधून, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांमधून मराठीची कशी वाट लागत चालली आहे, असा गळा काढायला ते मोकळे होतात. तो वेगळा मुद्दा. पण मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवले जावे, ते शक्य नसेल तर त्यांच्या मातृभाषेतील शब्दांना प्रचलित महत्त्वाच्या भाषेत कोणते शब्द आहेत, याची ओळख करून देणारा कोश निर्माण करावा ही कल्पनाच भाषेसंदर्भात उभारी देणारी आहे. यामधून पावरी भाषेचे दस्तावेजीकरण तर झालेच आहे शिवाय ती भाषा बोलणाऱ्या मुलांच्या शिक्षणातील मोठा अडथळा दूर होतो आहे. भिलाला, निहारी या बोलीभाषांमधील कोशनिर्मितीचे कामही पूर्ण होत आले आहे. २०१३ साली अहिराणी भाषेचा शब्दकोश तयार झाला. या पद्धतीने राज्याच्या इतर भागात राहणाऱ्या वेगवेगळय़ा बोली भाषा बोलणाऱ्या समूहांमधील जाणत्यांनी पुढाकार घेतला आणि त्या त्या भाषेत अशा पद्धतीच्या कोशनिर्मितीचा घाट घातला तर मोठे काम उभे राहीलच शिवाय त्या त्या भाषांचे दस्तावेजीकरण, शिक्षणाचे सुलभीकरण होईल.
एवढा सगळा घाट घालण्याची गरजच काय असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. त्याचे उत्तर कोणत्याही कॅलक्युलेटरवर मिळत नाही. कारण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे ही आकडेमोडीच्या, फायद्यातोटय़ाच्या पलीकडे असतात. ज्ञात आकडेवारीनुसार जगात आजघडीला ७ हजार ७१७ भाषा बोलल्या जातात. भारतीय संविधानाने आठव्या अनुसूचीमध्ये २२ भाषांची नोंद केली, पण २०११ च्या जनगणनेतील माहितीनुसार, १२१ भाषा अशा आहेत, ज्या बोलणाऱ्यांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या समूहांनी आपापल्या मातृभाषा म्हणून जनगणनेत नोंदवलेल्या भाषांची संख्याही प्रचंड आहे. भाषेसंदर्भातली लक्षात घेण्याची पहिली गोष्ट म्हणजे ही पृथ्वी जशी आपण कोणीही निर्माण केलेली नाही, पण तिच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या सगळय़ांची आहे, तशीच कुठलीही भाषा कुणा एका माणसाने निर्माण केलेली नाही, पण तिच्या रक्षणाची जबाबदारी सगळय़ांची आहे. आदिमानवाच्या हुंकारापासून विकसित, उत्क्रांत होत गेलेले भाषा हे मानवी संस्कृतीचे फार मोठे संचित आहे. प्रत्येक भाषा तिची तिची संस्कृती घेऊन आजच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. दर पिढीगणिक तिच्यात भर पडत गेली आहे. ती बदलत गेली आहे. माणसाइतकीच ती जिवंत आहे.
काळाच्या ओघात काही भाषा संपून गेल्या, काही वरचढ ठरल्या, काही उत्क्रांत झाल्या, पण ते त्या त्या स्थानिक पातळीपुरते होते. पण गेल्या दोनअडीचशे वर्षांतील औद्योगिकीकरण, जागतिकीकरण या प्रक्रियांच्या रेटय़ात भाषिक राजकारण अधिक गुंतागुंतीचे होत गेले. दूरचित्रवाणीसारख्या माध्यमांनी सांस्कृतिक सपाटीकरणाला मोठा हातभार लावला आणि त्याचा सगळय़ात मोठा परिणाम भाषांवर झाला. व्यापाराची आणि नंतर आर्थिक समृद्धीची भाषा म्हणून इंग्रजीला महत्त्व आले. इंटरनेटमुळे जग जवळ आले, पण सगळय़ांना समजणारी एक समान भाषा असणे आवश्यक होऊन बसले. या सगळय़ात होणाऱ्या भाषिक पीछेहाटीला कसे तोंड द्यायचे हा भारतीय भाषांपुढे असलेला तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यात राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली ‘एक देश, एक भाषा’ हे धोरण हळूहळू पुढे रेटले जात आहे. विविध रंगांची, वासांची फुले असलेला गुच्छ काढून टाकून फक्त कमळाचा गुच्छ पुढे करण्यासारखे हे आहे. अर्थात हे इतके सोपे नाही, कारण भाषा माणसाला त्याच्या अस्तित्वाइतकीच प्रिय असते. त्याला शक्य असेल तर तो ती टिकवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतो. निदान काही माणसे तरी तसा विचार करतात. पावरीचा शब्दकोश हा त्यातलाच एक प्रयत्न. पावरीच्या पाव्याचे सूर मंजूळ वाटत आहेत, ते त्यामुळेच.