महाराष्ट्राने कालौघात दिवाळीच्या परंपरा जपतानाच बदलत्या जीवनशैलीप्रमाणे सुयोग्य बदल केले, पण आता या बदलांचा सांधा निसर्गचक्राशीही जुळावा..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘पावसाळय़ानंतरचा ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाखा हळूहळू विरत जातो तसतशी दिवाळीची चाहूल लागते. घरातल्या कढयांमध्ये उकळणाऱ्या तेलामध्ये करंज्या आणि चकल्या तळायला सुरुवात होते आणि हवेतल्या गारव्याने ऋतुबदलाची घंटा किणकिणायला सुरुवात करतो. हवा बदलते, वातावरणातही आल्हाद येतो आणि पावसाळय़ात बदललेले सृष्टीचे सारे रंग नव्याने खुलून येतात.’ – गेली कित्येक शतके हे ऋतुचक्र असेच सुरू असतानाही माणसांना प्रत्येक ऋतूमध्ये दरवर्षी बदल होत असल्याची जाणीव मात्र होतच राहाते. यंदा उकाडा जरा वाढलाच आहे असे म्हणणाऱ्यांना काहीच दिवसांत थंडीही वाढल्याचा भास व्हायला लागतो. हे सारे निसर्गनियमाने घडत असले, तरी त्यात काळाच्या विशिष्ट टप्प्यांवर बदल तर होत नसतील, अशी शंकाही मनाला चाटून जातेच. ‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ ही शाळेतल्या पाठय़पुस्तकातील कविता पाठ केली तरी दरवर्षी ७ जूनला येणारा पाऊस कितीही वाट पाहिली तरी जुलैपर्यंत येतच नाही. गेल्या काही वर्षांत तर दिवाळी आणि थंडीची सुरुवात हे भारतीयांचे हवामानाचे गणितही बदलून गेलेले दिसते. दिवाळी सुरू होता होता देशभरातील जवळजवळ प्रत्येक राज्यातच पाऊस पडत असल्याचे वर्तमान त्याची साक्ष आहे. मान्सून अधिकृतपणे परतल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केल्यानंतरही आता ऐन थंडीच्या मोसमात अशा वातावरणाने दिवाळीच्या खाणाखुणाच लपल्यासारख्या होतात. ‘नोव्हेंबरमध्ये दरवर्षीच पाऊस पडतो, एवढेच काय, पण दिवाळीच्या पाडव्याला पावसाची एखादीच हलकी सरही दरवर्षी येतेच,’ असे सांगणारे सांगली भागातले रहिवासी या अशा पावसाबद्दल आश्चर्य व्यक्त करत नाहीत हे जरी खरे असले तरी अन्यत्र अशा अवेळी येणाऱ्या अवकाळी पावसाबद्दल प्रत्येकाच्याच मनात शंकांचे काहूर मात्र निर्माण होतच राहते. वर्षभर कोणत्या ना कोणत्या भागात वेगवेगळय़ा कारणांनी पडणाऱ्या अशा पावसाने, सणावारांचे आपापल्या मनाशी असणारे संबंध बदलत जातात आणि आनंद-उत्साहाचे हवामानाशी जुळलेले अतूट नातेही विसविशीत होऊ लागते.
हेही वाचा >>> अग्रलेख : आधीच ‘फेक’; त्यात ‘डीपफेक’!
महाराष्ट्रातला सर्वाधिक वेगाने वाढणारा शहरी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहर ते बदलापूपर्यंतच्या परिसराला पावसाने गुरुवारी दिलेला तडाखा आकस्मिक या सदरातलाच होता हे खरे. या पावसाने शहरातल्या हवेची गुणवत्ता किंचितशी सुधारली हे त्यातल्या त्यात बरे. मात्र आधीच बिघडलेल्या हवेचे गणित दिवाळीतल्या फटाक्यांनी आणखी बिघडू द्यायचे किंवा नाही, याचा विचार समस्तांनाच करावा लागणार आहे. निसर्गाच्या वाटेला आपण शक्यतो जाऊ नये, असाच अचानक आलेल्या पावसाने दिलेला सांगावा आहे, हे तरी लक्षात घ्यायलाच हवे. हवेची गुणवत्ता बिघडण्यास कारणीभूत असलेले घटक दूर करण्याचे जे प्रयत्न सातत्याने करणे आवश्यक होते, त्याकडे सपशेल कानाडोळा झाल्यामुळे हे प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले. वायू-प्रदूषणात दिल्लीशी स्पर्धा करणाऱ्या मुंबईत तर सध्या रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारून धुलाई करणे, मुंबईत येणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या चाकावरील धूळ धुऊन काढणे, यांसारखे जे उपाय योजले जाणार आहेत, त्याने हवेची गुणवत्ता किती सुधारेल, हे सांगणे कठीणच आहे. तरीही अशा तात्पुरत्या आणि सामान्यांना ‘काही तरी केले जाते आहे’ एवढेच समाधान देणाऱ्या उपाययोजनांचा सरकारी सोस मात्र संपत नाही. पावसाने हवा स्वच्छ होते, ती थोडक्याच काळापुरती. त्यानंतर काही काळात ती हवा आणि त्यातील प्रदूषण पूर्ववत होते. ते थांबवायचे, तर त्यासाठी जालीम उपाय हवेत. ते करण्यासाठी हिंमत हवी आणि त्याहून अधिक म्हणजे इच्छाशक्ती हवी. मुंबईतील हवेने धोक्याची पातळी गाठेपर्यंत सर्व सरकारी पातळय़ांवर सारे काही आलबेल असल्याचाच आव होता. बांधकामांचा वेग नागरी सुविधा वाढवण्यासाठीच असल्याचा युक्तिवादही होत होता, त्यामुळे हवेच्या गुणवत्तेशी जीवनमानाच्या दर्जाची सांगड घालण्याची गरजही वाटत नव्हती. आता या प्रदूषणात दिवाळीतल्या फटाक्यांची भर पडणार आणि ते अधिकच वाढणार. विशिष्ट वेळातच फटाके वाजवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला, तरी त्याचे पालन कसे करता येईल, याबद्दलचे निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे अशा निर्णयांची अंमलबजावणी हीच अधिक डोकेदुखीची ठरणार.
हेही वाचा >>> अग्रलेख : जात आडवी येणार..
फटाके वायुप्रदूषणास कारणीभूत ठरतात, त्याचा सार्वजनिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो, हे आधीपासूनच माहीत असतानाही, अशा फटाक्यांच्या निर्मितीला किंवा विक्रीला कधीच आळा घातला गेला नाही. फटाक्यांमधून जे वायू निर्माण होतात, ते प्रदूषण वाढवणारे असतात आणि त्याचा आरोग्याशी थेट संबंध असतो, हे लक्षात घेऊनच आपण दिवाळी साजरी करायला हवी. निसर्गाच्या रौद्रतेपुढे आपली य:कश्चितता किती तरी वेळा अनुभवल्यानंतरही आपण जर जागे होणार नसू आणि समाज म्हणून आपली जबाबदारी लक्षातच घेणार नसू, तर त्याचे माप आपल्याच पदरात पडेल, हे नक्की. फटाके मूळचे चिनी. चीनशी भारतातील काही व्यापाऱ्यांचा अफू आदी पदार्थाचा व्यापार सुरू झाला होता तेव्हाच्या काळापासून ते भारतात आले, स्थिरावले आणि दिवाळीसारख्या सणाचा भाग झाले हे खरे, पण दिवाळीचे स्वरूप कालौघात बदलत गेलेले आहेच की. घरोघरीचा दिवाळी फराळ त्या-त्या कुटुंबातील महिलांनीच बनवायचा, पुरुषांनी मदतीच्या नावाखाली केवळ लुडबुड करायची हे चित्र बदलले, एका परंपरागत सक्तीपासून महिलांना मुक्ती मिळाली, घरगुती चवीचा फराळ करणारा सूक्ष्म/ कुटीर उद्योगही फोफावला हा बदल महाराष्ट्रातल्या शहरीकरणासोबत स्वीकारला गेला. हौस म्हणून फराळाचा एखादा पदार्थ करणे वेगळे आणि अख्ख्या फराळासाठी विभक्त कुटुंबातील नोकरदार महिलेने जादा मेहनत घेणे वेगळे, हा विवेक घराघरांतून जपला गेला. किंवा ‘दिवाळी पहाट मैफलीं’सारख्या सांस्कृतिक बदलांनाही समाज आवडीने स्वीकारतो, हे गेल्या दोन-अडीच दशकांत दिसले. फटाक्यांबद्दल संयमाने वागण्याची, बिनआवाजी फटाकेच उडवण्याची सुरुवात महाराष्ट्रात अनेकांनी यापूर्वी केली. पण आता त्याहीपेक्षा महत्त्वाचा निर्णय घेणे हा त्यापुढला बदल असायला हवा, असे निसर्ग आपल्याला बजावतो आहे. शहरोशहरी सर्वच ऋतूंत उडणारी धूळ आणि धूर हे प्रदूषक घटक दिवाळीला थंडीची चाहूल देणाऱ्या पहाटे ‘धुरक्या’चा उच्छाद वाढवतात आणि तो दुपापर्यंत कायम असतो, हे अनुभवल्यानंतर तरी फटाक्यांचा धूर काढणे बंद व्हायला हवे. मुंबई-कोकणासारख्या किनारपट्टीच्या प्रदेशात ऐन दिवाळीच्या दिवसांत धो-धो पाऊस हे चित्र आपल्या ऋतुचक्रातील बिघाडाची लक्षणेच दाखवणारे आहे. या सगळय़ाच्या मुळाशी समाज म्हणून आपण करीत असलेली कृतीही कारणीभूत असू शकते आणि दिवाळीचा आनंद फक्त फटाके वाजवण्यातच नसतो, याचे भान आले, तर परिस्थिती हळूहळू तरी आवाक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल. आनंदाची ठिकाणे बदलायला हवीत, हे जसे खरे, तसेच आनंदाच्या परीही विस्तारायला हव्यात. संगीताच्या श्रवणातून, दिवाळी अंकांच्या वाचनातून, चित्र आणि शब्दांतून येणाऱ्या अभिजात जाणिवांमधून जगणे अधिक संपन्न होऊ शकते, हे पुन:पुन्हा बिंबवत राहणे या घडीला महत्त्वाचे आहे. जगणे संपन्न होण्यासाठी भौतिक सुखाचाच आधार घ्यावा लागतो, या कल्पनेतून बाहेर पडण्यासाठी आता प्रत्येकानेच प्रयत्न करायला हवेत. बिघडलेली हवा पूर्ववत करणे, ही धोरणकर्त्यांची जबाबदारी असतेच. मात्र त्याबरोबरीने प्रत्येकाने त्यासाठी आपला वाटा उचलण्याची गरज नाकारून चालणार नाही. व्यापारीकरण आणि जाहिरातबाजी यातून कशाचीही ‘हवा’ करण्याचा आजचा काळ, दिवाळीच्या हवेचे तसे होऊ नये!