वयाच्या ७३ व्या वर्षी ‘प्रिन्स’पद संपून राजा झालेल्या चार्ल्स यांच्यापुढील आव्हाने राजवाडय़ांच्या भिंतींमधील आहेत; तशीच ती हे राजवैभव देणाऱ्या देशासमोरीलही आहेत..

कालपर्यंत नातू म्हणून लहानग्याच्या नजरेने ज्याच्याकडे पाहिले जात होते तो आज वृद्ध पितामह म्हणून समोर आल्यास जे होईल ते इंग्लंडचे राजे चार्ल्स (तिसरे) यांच्याबाबत होत असेल. गेली ७३ वर्षे चार्ल्स यांची ओळख ‘प्रिन्स’ अशीच होती. पण सात दशकांचे संपन्न सम्राज्ञीपद भोगून मातोश्री एलिझाबेथ ख्रिस्तवासी झाल्या आणि सहस्रचंद्रदर्शनापासून अवघी सात वर्षे दूर असलेला प्रिन्स हा किंग चार्ल्स बनला. हा या शतकातील ऐतिहासिक क्षण. तो अनुभवण्यासाठी शब्दश: जगभरातून लाखो जण गेले १० दिवस लंडनकडे धाव घेत आहेत. वास्तविक ब्रिटनची अर्थव्यवस्था चिंता करावी अशी. पण राणीच्या निधनाने अचानक पर्यटकांची रीघ त्या देशाकडे लागली आणि राणी आपल्या मरणातही त्या देशास श्रीमंत करून गेली. हे असे झाले कारण राणीच्या जगण्यातच एक उच्च सांस्कृतिक ऐश्वर्य होते. ते तिच्या मृत्यूनंतरही पाझरत राहिले. राणीच्या व्यक्तिमत्त्वातील ही श्रीमंती केवळ उच्चपदी आरूढ होण्याची संधी कोणास मिळाली म्हणून येतेच असे नाही. हाती असलेले अधिकारही ही श्रीमंती मिळवून देतातच असे नाही. जडजवाहीर वा उंची वस्त्रप्रावरणांनी ती श्रीमंती मिळते असे म्हणावे तर तेही नाही. ही सर्व दुय्यम साधने. मुळात अंगी काही असेल तर या साधनांमुळे ते उठून दिसते. तसे काही नसेल तर पद गेले की व्यक्तीही विस्मृतीच्या अडगळीत पडतात. लंडन, एिडबरा, कार्डिफ अशा ज्या ज्या ठिकाणी राणीचे पार्थिव गेले तेथील प्रचंड, उत्स्फूर्त गर्दी राणी असण्याचे मोठेपण ती नसल्यानंतरही कायम कसे राहील हे दाखवून देणारी. ती पाहिल्यावर राजपुत्राचा राजा झालेल्या चार्ल्स यांस आपल्यावरील अपेक्षांच्या डोंगराचा आवाका लक्षात आला असेल. त्याच्या दबावाखाली कोणतीही व्यक्ती पिचून जावी इतका त्याचा आकार. म्हणून निम्म्यापेक्षाही अधिक आयुष्य राजपुत्र म्हणून व्यतीत केलेल्या आणि आयुष्याच्या अखेरीस राजेपद मिळालेल्या चार्ल्स यांच्यासमोरील या आव्हानांचा आढावा समयोचित ठरावा.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Rebel Vani Umarkhed, Mahayuti Vani, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडी, महायुतीतील बंडखोरांना घरचा रस्ता
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी

त्यांची आव्हाने ही अनेक राजवाडय़ांच्या भिंतींमधील जशी आहेत तशीच ती हे राजवैभव देणाऱ्या देशासमोरीलही आहेत. प्रथम घरगुती आव्हानांविषयी. त्याची सुरुवात कनिष्ठ बंधू राजपुत्र अँड्रय़ू याचे काय करायचे या प्रश्नापासून होईल. तीन वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी मुलाखतीत अमेरिकेतील लैंगिक स्वैराचारी जेफ्री एपस्टिन याच्याशी अँड्रय़ू यांचे मैत्र असल्याचे उघड झाले आणि एकच गहजब उडाला. परिणामी त्यांच्याकडील शाही जबाबदाऱ्या काढून घ्याव्या लागल्या. यंदाच्या जानेवारी महिन्यात त्यांचे सर्व लष्करी पदाधिकार आणि राजनैतिक अधिकार गेले. आता ते ‘रॉयल हायनेस’ ही उपाधी लावू शकत नाहीत. तथापि ते अद्यापही ‘डय़ूक ऑफ यॉर्क’ आहेतच. तेव्हा त्यांचे पुढे काय करायचे याचा निर्णय चार्ल्स यांस करावा लागेल. तो कटू नसण्याचीच शक्यता अधिक. एका बाजूने कनिष्ठ बंधूंचे हे आव्हान आणि दुसरीकडे धाकटय़ा चिरंजीवांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची चिंता. या राजपुत्र हॅरी याने अमेरिकी अभिनेत्री मेगन मार्केल हिच्याशी विवाह केला. ती कृष्णवर्णीय नव्हे; पण तिच्या थोरल्या जावेसारखी श्वेतवर्णीयदेखील नाही. तिने आणि पती हॅरी याने राजघराण्यावर वांशिक दुजाभावाचा आरोप केला आणि राजघराण्याची वस्त्रे उतरवून अमेरिकेत आपली चूल मांडली. यामुळे कुटुंबात नाही म्हटले तरी दुभंग झालाच. चार्ल्स यांच्या या दोन सुना आजेसासूच्या निधनाने एकत्र आल्या खऱ्या. पण हा दुभंग बुजवण्याचे, निदान कमी तरी करण्याचे, आव्हान नव्या राजासमोर असेल. या जोडीला काही वैयक्तिक आरोपांचेही त्यांस निराकरण करावे लागेल. हा आरोप राजे चार्ल्स यांचे उजवे हात गणले जाणारे सहकारी मायकेल फॉसेट यांच्यावर झाला. चार्ल्स यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या काही धर्मादाय संस्थांसाठी काही सौदी धनवानांकडून मानमरातबाच्या बदल्यात देणग्या घेतल्याचे आरोप झाले. लंडन पोलिसांकडून त्याची रीतसर चौकशी सुरू असून यात काही तथ्य असल्याचे आणि त्यातही राजे चार्ल्स यांचा काही त्याच्याशी संबंध असल्याचे अद्याप आढळलेले नाही. राजेपदी आरूढ झाल्यावर हे प्रकरण तडीस नेण्याचे आणि ते तसे जात असल्याचे सर्वास दिसेल हे पाहण्याची अतिरिक्त जबाबदारी आता त्यांची. हे झाले कौटुंबिक आणि वैयक्तिक आव्हान.

हेही वाचा >>> अग्रलेख : देवेंद्रीय आव्हान : २.०

पण नव्या राजाची खरी कसोटी लागेल ती देशासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्यात सरकारला ते कशी साथ देतात या मुद्दय़ावर. राणीची आणि त्यांचीही आवडती स्कॉटलंडची भूमी आपली वेगळेपणाची मागणी पुन्हा रेटू लागली असून या मुद्दय़ावर परत जनमत घेतले जाईल. गेल्या जनमतप्रसंगी राणीने स्कॉटिशांस ‘विचार करून मत द्या’ असा प्रेमळ आग्रहाचा सल्ला दिला. त्याचा परिणाम झाला आणि स्कॉटिशांनी त्यात इंग्लंडमध्येच राहण्यातच कौल दिला. इतक्या वर्षांनंतर हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे आणि आता राणी नाही. याबरोबरच स्कॉटलंडला उर्वरित ब्रिटनप्रमाणे ब्रेग्झिटही मान्य नाही. आपण युरोपचाच भाग असायला हवे, असे त्या प्रांताचे म्हणणे. म्हणजे या मुद्दय़ावरही तो प्रांत आणि अन्य इंग्लंड यांच्यात एकवाक्यता नाही. दुसरा असा प्रांत म्हणजे वेल्स. वास्तविक राजे चार्ल्स जवळपास ७३ वर्षे ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ होते. आता ही उपाधी त्यांच्या थोरल्या चिरंजीवाकडे- विल्यम्स याच्याकडे- गेली. पण तरीही वेल्स आणि अन्य इंग्लंड यांतील दरी काही त्यांना मिटवता आलेली नाही. गेल्या दहा दिवसांत राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवासमवेत जवळपास दीड हजार किलोमीटरच्या प्रवासात राजे चार्ल्स यांस आपल्या देशवासीयांकडून अपूर्व प्रेमाचाच अनुभव आला. एिडबरा, कार्डिफ, लंडन सर्वत्र त्यांच्यावर प्रेमाचा वर्षांव झाला. त्यास काहीसा अपवाद फक्त वेल्समधील कार्डिफ परिसरात एका प्रसंगाचा. ‘‘आम्हास चूल पेटवण्यासाठी इंधन नाही आणि तुमच्या आईच्या अंत्यसंस्काराचा खर्च आम्ही करायचा’’ असा त्रागा एका त्रस्त नागरिकाने केला. पण हा एकच प्रसंग. एवढेच या सोहळय़ाचे एकमेव गालबोट.

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘फेडरर रिपब्लिक’..

ते तेवढय़ापुरतेच राहील हे पाहण्याची जबाबदारी आता राजे चार्ल्स यांची. कमालीचा मृदूपणा, स्त्रणतेतून येणारे मार्दवी-माधुर्य आणि अंगभूत क्षमाशीलता यांच्या जोरावर राणी एलिझाबेथ यांनी साम्राज्ञीपदाचा काटेरी मुकुट सहज सांभाळला. यातील नसलेले काही गुण चार्ल्स यांना अंगी बाणवावे लागतील. त्याची गरज किती आहे हे गेल्या १० दिवसांतील अमाप गर्दीने त्यांस दाखवून दिले असेल. राणीच्या अंत्यदर्शनाचा प्रतीक्षा काळ परवाच्या शनिवारी तर २४ तासांवर गेला. तरीही अक्षरश: हजारो जण थंडीवाऱ्याची पर्वा न करता रात्रंदिवस रांगेत थांबून ही वेदना सहन करीत होते. यात वृद्ध-तरुण इतकेच काय पण बालकेही होती. डेव्हिड बेकहॅमसारख्या कमालीच्या लोकप्रिय खेळाडूने अंत्यदर्शनासाठी १३ तास रांगेत काढले आणि हे दर्शन जेव्हा त्यास झाले तेव्हा त्यास अश्रू आवरणे अवघड गेले. यात रांगेचा नियम पाळणाऱ्या बेकहॅमचा मोठेपणा दिसलाच. पण त्याच्या मोठेपणासाठी नियमांस मुरड न घालणारी व्यवस्था त्याहून अधिक मोठी ठरली. सुसंस्कृत पाश्चात्त्यतेचे आकर्षण असणारे लक्षावधी गेले दहा दिवस शक्य असेल तर प्रत्यक्षपणे नसेल तर दूरचित्रवाणीद्वारे हा शतकातील उदात्त सोहळा अनुभवत होते. पद, अधिकार, सत्ता, मत्ता या पार्थिव घटकांपेक्षाही मानवतेचे तत्त्व अधिक मोठे असते. ती संस्कृती या मानवतेतील स्खलनशीलता स्वीकारणारी. राणी एलिझाबेथ यांचे आयुष्य काही संपूर्ण निर्दोष आणि निर्विवाद होते; असे नाही. कोणत्याही मर्त्य मानवाप्रमाणे त्यांच्या हातूनही प्रमाद घडले. पण ते मान्य करून पुढील आयुष्यात त्यावर मात करण्याची क्षमता आणि शक्यता त्यांच्या आयुष्यातून दिसते. जनसामान्यांस ती भावली असणार. पण भावण्याचे बटबटीत भावनिक प्रदर्शन अजिबात या अंत्ययात्रेत नव्हते. निर्बुद्ध आणि निरर्थक वादावादीस चर्चा मानण्याच्या आजच्या काळात पाश्चात्त्य वृत्तवाहिन्यांनी तितक्याच घनघोर गांभीर्याने या सोहळय़ाचे प्रक्षेपण केले. अलीकडच्या इतिहासातील हा सर्वात भव्य अंत्यसोहळा! हे मोठेपण मागून, प्रयत्नांच्या पराकाष्ठेने, आकाराने मिळणारे नाही. ते का आणि कोणास मिळते हे समजून घेणे आणि स्वीकारणे हीच राणीस खरी आदरांजली. आता त्या मोठेपणाच्या सावलीत राजे चार्ल्स यांना आपल्या आयुष्याची शोधयात्रा सुरू ठेवावी लागेल. आरती प्रभु एका कवितेत लिहितात : ‘‘होईल बाबा प्रधान / राखील तो इमान / सुखी रे सुखी राज्य सारे चुटकीत तो करील.. तो एक राजपुत्र!’’ हे इमान राखण्याची कसोटी आता राजे चार्ल्स यांची.