वाङ्मय कालबा होणार असेल, तर मग त्या वाङ्मयाचा उपयोग केवळ अभ्यासकांपुरता उरतो, हे सार्वत्रिक सत्य रोअल्ड डाल यांच्या बालसाहित्याला का लागू होऊ नये?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भलत्याच कारणासाठी चर्चेत आलेल्या त्या दिवंगत लेखकाचे नाव तद्दन इंग्रजी. स्पेलिंगनुसार त्या नावाचा उच्चार ‘रोआल्ड डाहल’ असा होईल- पण संभाषणांतला रूढ उच्चार मात्र ‘रोअल्ड डाल’ असाच. त्याच्या पुस्तकांच्या २५ कोटी प्रती आजवर खपल्या आहेत, त्याने लिहिलेल्या ४९ पुस्तकांपैकी १८ बालकादंबरिका आहेत आणि तेवढय़ाच संख्येची पुस्तके त्याने प्रौढ वाचकांसाठीही लिहिली असली तरी इतिहासात बालकादंबरीकार म्हणूनच त्याची नोंद राहील. या लेखकाच्या मृत्यूनंतर सुमारे ३३ वर्षांनी तो पुन्हा चर्चेत आला, याचे कारण त्याच्या पुस्तकांमधले शब्द बदलले जाण्यावरून वाद सुरू झाला. हे शब्द वरवर पाहाता साधेच. उदाहरणार्थ ‘फॅट’ किंवा ‘जाडय़ा’ असा शब्द. तो बदलून तिथे ‘इनॉर्मस’ किंवा ‘अवाढव्य’ असा शब्द वापरायचा, ‘त्या साऱ्या चेटकिणी खोटय़ा केसांचा टोप लावत, टोपाखाली साऱ्याच जणी टकलू होत्या टकलू!’ हे वाक्य मवाळ करून ‘या चेटकिणी केसांचा टोप लावत. महिला अनेक कारणांसाठी केसांचा टोप वापरतात आणि त्यात गैर काही नाही’ अशी वाक्ये लिहायची.. असे सध्या सुरू आहेत. ‘पफिन’ हे बालसाहित्याचे बडे प्रकाशक आणि लेखकाचे सर्व हक्क सांभाळणारी ‘द रोअल्ड डाल स्टोरी कंपनी’ यांनीच ठरवून हा प्रकार आरंभला असल्याची बातमी गेल्या आठवडय़ात आली, त्यामुळे ब्रिटन व अमेरिकेतले अनेक साहित्यप्रेमी, अभिव्यक्तिस्वातंत्र्यप्रेमी चिडले आणि ‘आमच्या मुलांच्या बालमनांची फाजील काळजी करू नका.. डाल यांचे लिखाण जसे आहे तसेच वाचता येऊ द्या..’ अशी मागणी सुरू झाली. त्यावर प्रकाशक आणि स्वामित्वहक्कवाले ढिम्मच राहिल्यानंतर खरे प्रश्न निर्माण होतात आणि ते केवळ रोअल्ड डालपुरते न उरता, एकंदर पुनर्लेखनाच्या उद्योगापर्यंत जातात, म्हणून हा विषय महत्त्वाचा.
आपल्याकडले पुनर्लेखनाचे उद्योग सुरू असतात ते हुळहुळय़ा पण अतिआक्रमक अस्मितावाद्यांकडून. पण इथे हे पुनर्लेखन चालू आहे, ते चक्क पुरोगाम्यांकडून! बरे त्यांना विरोध करणारे प्रतिगामीच आहेत असेही नाही. उलट तेही पुरोगामीच. पाश्चात्त्य प्रगत देशांमध्ये हल्ली हुळहुळय़ा नवपुरोगाम्यांचा एक वर्ग उदयाला आला आहे. राजकीय-सामाजिकदृष्टय़ा आत्यंतिक योग्य ठरेल अशा छापाची वाक्ये, तसेच शब्द हे लोक वापरत असतात. म्हणजे लिंगभावाबद्दल जागरूकता दाखवायची म्हणून ‘तो’ किंवा ‘ती’ असा थेट उल्लेख पूर्णच टाळून सरसकट साऱ्या स्त्री/ पुरुष/ एलजीबीटीक्यू यांचा उल्लेख ‘तें’ (इंग्रजीत ‘दे’) असाच हे लोक करतात. कुणालाही ‘लुकडा’ किंवा ‘जाडा’ म्हणायचे नाही, डोईवर केस नसलेल्यांबद्दल ‘टक्कल आहे’ असा उल्लेख टाळायचा, इतका शुद्धतावाद हे नवपुरोगामी लोक जपतात. वर आम्ही मानव समाजाबद्दल जागरूक आहोत आणि तुम्हाला आमच्याइतकेच जागरूक करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असा टेंभाही यापैकी अनेक जण मिरवतात. या जागरूकपणाची खिल्ली उडवण्यासाठी अशा नवपुरोगाम्यांना ‘वोक’- हल्लीहल्लीच फार जाग आलेले- या शेलक्या विशेषणाने ओळखले जाते. नेमस्तपणाच्या नावाखाली आपापल्या आरामखुर्च्या न सोडणाऱ्या आणि जळजळीत वास्तवाला न भिडताच जगाला शहाणपणा शिकवू पाहणाऱ्या लोकांची खिल्ली उडवण्याचा प्रघात जुनाच आहे आणि जागतिकही. तो या ‘वोक’ लोकांच्या निमित्ताने पाश्चात्त्य देशांत पुन्हा रुळतो आहे इतकेच.
रोअल्ड डाल यांच्या पुस्तकांमधील बदलांमागे हा असलाच ‘वोक’पणा असल्याची टीका झाली, पण हे शब्दबदलू लोक नेमके आहेत कोण याचा शोध काहींनी घेतला तेव्हा कळले की, या कामात ‘इन्क्लूझिव्ह माइण्ड्स’ या नावाची एक संस्थाच गुंतलेली आहे. तिची मदत प्रकाशक आणि रोअल डाल स्टोरी कंपनी यांनी पुस्तके बदलण्यासाठी घेतली आहे. या ‘इन्क्लूझिव्ह माइण्ड्स’वरही ‘वोक’ असा शिक्का मारता येईल का? ‘मुलांचे जग तरी निकोप असू द्या. मोठय़ांच्या जगातली विषमता, तिथला विखार हे सारे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी बालवाङ्मयाचा वापर तरी करू नका’ एवढेच या संस्थेचे ध्येय. ते चांगलेच, पण या आग्रहातूनही दोन प्रश्न उरतात.
त्यापैकी पहिला प्रश्न अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा. दुसरा गतकाळात कधी तरी घडून गेलेल्या अभिव्यक्तीकडे आजच्या नजरेने पाहायचे का, असा. या दोन्ही प्रश्नांचे तिखट एकत्रीकरण रोअल्ड डाल प्रकरणाने आपल्यापुढे आणले आहे. केवळ त्यांच्यापुढे नव्हे.. आपल्यापुढेसुद्धा. ‘आला आला आग्या वेताळ, त्याच्या डोक्यात असतो जाळ। कोळसे खातो कराकर; राकेल पितो डबाभर। डोक्यावरती कढई धरून, भुते घेतात स्वैपाक करून। केसामधून उठतात ज्वाळा, सगळे न्हावी भितात त्याला’ या विंदा करंदीकरांच्या ओळी बालमनातला विस्मय जागा करणाऱ्या आणि लहानग्यांनाही ‘कल्पित’ म्हणजे काय याची पक्की जाण देणाऱ्या आहेत.. पण उद्या ‘इन्क्लूझिव्ह माइण्ड्स’ने म्हणा किंवा अन्य एखाद्या संघटनेने म्हणा, ‘‘या कडव्यातल्या अखेरच्या ओळीतील शेवटून तिसरा शब्द जातिवाचक असल्यामुळे तो वगळू या, शिवाय याच ओळीत भीती या भावनेचे उदात्तीकरण आहे, ते टाळू या’’ अशा सूचना केल्या तर? – तर विंदांच्या त्या बिच्चाऱ्या आग्या वेताळाच्या टाळूवरला जाळ विझूनच की हो जाईल! किंवा ‘श्यामची आई’मधला, श्याम मोळीवाल्या म्हातारीला मदत करतो, हा प्रसंग वाचून पाहा.. ती मोळीवाली तेव्हा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील असल्याने श्यामकडे लोक ‘अरे काय करतोस हे’ अशा नजरेने पाहू लागले. त्यांना शांत करण्यासाठी श्यामने, ‘मी आंघोळ करणार आहे लगेच’ असे सांगितले.. हा प्रसंग मानवमुक्तीच्या कल्पना आणि समाजाच्या त्या-त्या वेळच्या धारणा यांमधल्या तत्कालीन तफावतीवर प्रकाश टाकणारा. त्या धारणांना दुर्लक्षून काही चांगले करताही येत नाही, याचा धडा देणारा. ‘इन्क्लूझिव्ह माइण्ड्स’ सारखी संस्था जर आपल्याकडे असेल, तर हा अख्खा प्रसंगच काढून टाकावा लागेल.
आपल्याकडे बालवाङ्मयाबाबत हे असे आग्रह कुणी मांडत नाही, हे चांगलेच आहे. पण म्हणून, गतकाळातल्या अभिव्यक्तीकडे आपण निकोपपणे पाहातो का? ती अभिव्यक्ती ज्या परिस्थितीत झाली होती ती परिस्थिती तर आज नाहीच, पण तेव्हाच्या परिस्थितीत ती अभिव्यक्ती ज्या कारणांसाठी झाली होती ती कारणेही जशी आज नाहीत- हे लक्षात घेतो का आपण? घेत असतो, तर ‘रामचरितमानस’मधल्या ‘ताडन के अधिकारी’वरून आजही वाद होण्याचे कारण काय? रामकथा रसाळपणे सांगणारे एक हिंदी काव्य, एवढीच त्या ग्रंथाची महती आज उरल्याचे आपण मान्य करत असतो, एखाद्या काव्यग्रंथाला विनाकारण पवित्र वगैरे मानत नसतो, तर आजचे प्रश्न उद्भवले असते का? ‘राजसंन्यास’ हे एक नाटक आहे आणि त्यात छत्रपती शिवरायांबद्दल अनुदार उद्गार काढणारा जिवाजीपंत कलमदाने हे निव्वळ एक कुटिल-पाताळयंत्री खलपात्र आहे, हे लक्षात घेतले असते तर पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडला गेला असता का? वाङ्मय कालबा होणारच असेल, तर त्या वाङ्मयाचा उपयोग केवळ अभ्यासकांपुरता उरतो, हे सार्वत्रिक सत्य रोअल्ड डाल यांच्या बालसाहित्यालाही का लागू होत नाही?
एक साधे कारण म्हणजे सोस.. जुने जपण्याचा सोस तर आहे, पण ते नव्याने वापरता आले पाहिजे, हा सोस! जुनी पैठणी कुणी नेसत नाही म्हणून तिचा ‘शरारा’सदृश पोशाख शिवण्याचा सोस हाही याच प्रकारचा असतो.. पण मग समजा कुणी, ‘बनारसी साडीचा शरारा जास्त शोभला असता..’ म्हणाले, तर आपल्याकडली जुनी साडी बनारसी नव्हती, पैठणीच होती- हे मान्य करण्याचा तरी प्रामाणिकपणा हवा की नको? ..तोही नसला तर रोअल्ड डालच्या प्रकाशकांसारखी गत होते.