सौरवने जे प्रश्न उपस्थित केले असतील किंवा तो ते उपस्थित करण्याची शक्यता नेहमीच असायची, त्यांच्या आसपासही बिन्नी पोहोचणार नसल्याचा अंदाजच बलवत्तर ठरतो का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय क्रिकेटच्या जाज्वल्य इतिहासात केवळ दोनच क्रिकेटपटूंना देशाच्या क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची धुरा सांभाळण्याचे पुण्य लाभले. महाराजकुमार ऑफ विजयनगरम् आणि सौरव गांगुली हे ते दोघे. रॉजर बिन्नी हे आता या लघुमालिकेतील तिसरे पुण्यवान ठरतील. ते १८ ऑक्टोबर रोजी सूत्रे स्वीकारतील. मावळता अध्यक्ष सौरव गांगुलीला ज्ञात-अज्ञात कारणांस्तव अध्यक्षपदाची दुसरी टर्म स्वीकारण्याची ‘परवानगी’ मिळाली नाही. बीसीसीआयचे चिटणीस जय शहा यांना अशा प्रकारे परवानगी देण्याचे वा न देण्याचे बहुतांच्या अधिकारकक्षेबाहेरील असल्यामुळे ते दुसरी टर्मही चिटणीसपदावर कायम राहतील. केवळ सौरवलाच गाशा गुंडाळायला लावला असे वाटू नये, यासाठी इतर जबाबदाऱ्यांचेही खांदेपालट झालेले दिसतात. मुंबईतील धडाडीचे भाजप नेते आशीष शेलार खजिनदार बनतील. ‘सर्वाचेच लाडके’ राजीव शुक्ला पुन्हा एकदा उपाध्यक्ष राहतील, तर खजिनदारपदावरील अरुण धुमल हे आता आयपीएलच्या संचालक सभेचे अध्यक्ष बनतील. ते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे नातेवाईक. आसाम सरकारचे महाधिवक्ता देवजित सैकिया हे नवे सहसचिव बनतील. ते आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांचे निकटवर्ती. सौरव गांगुलीच्या मंडळातील तो स्वत: आणि सहसचिव केरळचे जयेश जॉर्ज वगळता बाकीचे त्याच किंवा भिन्न पदांवर पुन्हा नियुक्त झाले आहेत. सौरवलाही आयपीएल संचालक सभेचे अध्यक्षपद देऊ करण्यात आले होते, म्हणे. परंतु तो प्रस्ताव पदावनतीसम वाटल्यामुळे सौरवने नाकारल्याची चर्चा आहे. एके काळी या देशात बीसीसीआयचा अध्यक्ष हा पंतप्रधानांइतका किंवा काही वेळा त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान मानला जायचा, असेही कुणी म्हणेल. राजकारण, उद्योग, कायदा अशा विविध क्षेत्रांतील मातबरांनी या पदामध्ये विशेष रस दाखवला आणि काही वेळा कर्तृत्वाची छापही सोडली. हे पद प्राधान्याने क्रिकेटपटूंनाही दिले गेले पाहिजे, असे न्यायव्यवस्थेने बजावल्यानंतर पहिल्यांदा सौरव गांगुलीला आणि आता रॉजर बिन्नीला या पदावर बसवले गेले. हे क्रिकेटपटूंचे  सबलीकरण म्हणावे, तर सौरवला आणखी एक टर्म तो पात्र असूनही का दिली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

त्याविषयी चर्चा आवश्यक ठरते, कारण बीसीसीआयच्या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी सौरव हा एकमेव क्रिकेटपटू होता. निव्वळ क्रिकेटपटूच नव्हे, तर यशस्वी कर्णधार आणि नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात गोऱ्या क्रिकेट परिप्रेक्ष्यात भारतीय क्रिकेटची ओळख ठसवणारा अवलियाही होता. त्याच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात; त्याच्या प्रभावाविषयी नाही. तीन वर्षांपूर्वी तो बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवडून आला, त्यानंतर त्याला फारशी छाप पाडता आली नाही, हे एक त्याच्या गच्छंतीचे कारण असू शकते. तसे ते असल्याचे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी बोलून दाखवल्याचा दावा काही माध्यमे करतात. तो खरा असेल, तर याच्याइतका मोठा विनोद दुसरा नाही. अध्यक्षपदावर असताना एकदा राजीनामा द्यावा लागलेले आणि एकदा हकालपट्टी झालेले हेच ते श्रीनिवासन! आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी यांचेच जामात चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचे सीईओ असताना तुरुंगाची हवा खाऊन आले. अशी व्यक्ती सौरवचे गुणात्मक मूल्यांकन करू धजते आणि ते सौरवच्या गच्छंतीचे कारण ठरू शकते, हे एकाच वेळी विनोदी आणि गंभीरही आहे. त्याच्याविषयी निर्णयाची मीमांसा करताना उपस्थित केले गेलेले आणखी एक कारण म्हणजे, भाजपची ‘ऑफर’ त्याने धुडकावली हे! प्राधान्याने पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि काही बंगाली माध्यमांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. भाजपचा बंगालमधील चेहरा सौरव असेल, अशी चर्चा भाजप वर्तुळातूनच गेली काही वर्षे सुरू होती. मध्यंतरी भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा सौरवच्या कोलकात्यातील घरी भोजनास गेले, त्या वेळची छायाचित्रेही समाजमाध्यमांमध्ये झळकली होती. पण सौरव अजूनही भाजपमध्ये नाही हे वास्तव आहे नि त्याला बीसीसीआयमध्ये सर्वोच्च पदावर अजूनही काम करायचे होते, हेही! त्याच्या तीन वर्षांच्या कामगिरीवर केंद्रातील एक प्रभावी मंत्रीही नाराज होते, असेही वृत्त प्रसृत झाले आहे.

या सगळय़ा शक्याशक्यता चघळाव्या लागतात आणि त्यातून आडाखे बांधावे लागण्याची वेळ येते, कारण प्रस्तुत क्रिकेट यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या संवाद-संज्ञापनामध्ये वेळ व्यतीत करण्यास कधीही तयार नसते. केंद्रातील सत्तारूढ भाजपचा बीसीसीआयमध्ये वावर व प्रभाव आहे आणि संवादाविषयी त्यांनाही विलक्षण अनास्था वाटते हा योगायोग नाही. त्यामुळे सौरव गांगुलीला नक्की कोणत्या अपयशापायी पद टिकण्यास मुकावे लागले, त्याच्याकडून कोणत्या अपेक्षा होत्या, दुहेरी हितसंबंधांबाबत त्याच्याविषयी सातत्याने उपस्थित होणाऱ्या आक्षेपांचे काय झाले, हे सार्वजनिक परिप्रेक्ष्यात कधीही प्रकटणार नाही. हे सगळेच निर्णय एखाद्या पोलादी पडद्याआडून घेतले जातात आणि उत्तरदायित्वाची चर्चाही या पोलादी पडद्यापल्याड पोहोचत नाही.

हे उत्तरदायित्व केव्हा तरी प्रस्थापित करावेच लागेल, कारण प्रश्न तर असंख्य आहेत. २०१३ नंतर या बलाढय़, श्रीमंत मंडळ परिचालित आणि अब्जभर क्रिकेटप्रेमींच्या देशाला एकही आयसीसी करंडक जिंकता का आला नाही? टी-२० संघाचे नेतृत्व आणखी काही काळ करण्याची विराट कोहलीची इच्छा असताना, त्याला संधी का दिली गेली नाही? आयपीएल भविष्यात चार ते पाच महिने खेळवण्याविषयी नियोजन सुरू आहे त्याचे काय? तसे झाल्यास बाकीच्या क्रिकेट स्पर्धाचे काय? अलीकडच्या काळातील बहुतेक महत्त्वाचे क्रिकेट सामने अहमदाबादेतील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमलाच का बहाल केले जाताहेत? गेली काही वर्षे बीसीसीआयच्या वतीने महत्त्वाच्या मालिकांची संघनिवड समाजमाध्यमांवर जाहीर करण्याचे सोपस्कार का उरकले जाताहेत? माध्यमांना प्रश्न विचारण्याची संधीच मिळू नये, हे विद्यमान राष्ट्रीय धोरण आता क्रिकेटच्या बाबतीतही अंगीकारले जात आहे का? आता थोडेसे बीसीसीआयच्या नवोदित अध्यक्षांविषयी. रॉजर बिन्नी हे उत्तम गोलंदाज होते आणि बऱ्यापैकी फलंदाजीही करायचे. १९८३ मधील विश्वचषक, १९८५ मधील चँपियन्स करंडक या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धामध्ये त्यांनी सर्वाधिक बळी घेऊन भारतीय दिग्विजयात मोलाची भर घातली, हेही मान्यच. कपिलदेव, सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर अशा प्रतिभावानांच्या मांदियाळीत निखळ मेहनत आणि अबोल कर्तृत्वाने अधूनमधून तळपणाऱ्यांपैकी ते अग्रणी. ते युवा संघाचे प्रशिक्षकही होते आणि सध्या कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण यापलीकडे त्यांचे कर्तृत्व फारसे नाही. कुशल प्रशासक, उत्तम प्रशिक्षक किंवा प्रतिभावान क्रिकेटपटू-कर्णधार ते कधीही नव्हते. शिवाय त्यांचे वय सध्या ६७ वर्षे असल्यामुळे, नियमानुसार त्यांना सत्तरीपर्यंतच एक टर्म मिळेल. सौरवने जे प्रश्न उपस्थित केले असतील किंवा तो ते उपस्थित करण्याची शक्यता नेहमीच असायची, तशा प्रश्नांच्या आसपासही बिन्नी पोहोचणार नाहीत हा त्यांच्या निवडीमागील पहिला अघोषित निकष असावा. आपल्या देशात हल्ली बहुतेक सर्व सरकारी आणि सरकारनियंत्रित आस्थापनांमध्ये अनाम किंवा अबोल किंवा दोन्ही असलेल्यांनाच सर्वोच्च पदांवर बसवले जाते, हा योगायोग नाही. बिन्नी यांना शुभेच्छा देत असताना या वास्तवाची जाणीव झाल्यावाचून राहात नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर बिन्नी असले, तरी बिनीचे शिलेदार वेगळेच आहेत. तेच या ‘मायाधेनु’ला खऱ्या अर्थाने वेसण घालणार हेही स्पष्ट आहे. त्यासाठी यंदा तर निवडणुकीचा फार्सही करण्याची गरज पडली नाही, हेही उल्लेखनीय.