लालूंनी बदलत्या राजकीय वाऱ्यांना आपल्या शिडात भरून आपले जहाज पुढे ढकलण्याचा उद्योग कधी केला नाही. मुलायम यांनी मात्र चातुर्य दाखवत भाजपशी जुळवून घेतले..

ज्याप्रमाणे साने गुरुजींची ‘धडपडणारी मुले’ महाराष्ट्रात ओळखली गेली. त्याप्रमाणे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांची काही ‘धडपडणारी मुले’ राष्ट्रीय स्तरावर राजकारणात नावारूपास आली. लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंह यादव हे त्यांतील दोन सर्वार्थाने गाजले. लोहिया यांच्या समाजवादाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात कमालीचा, प्रसंगी अतार्किक वाटेल इतका, काँग्रेस-विद्वेष भरलेला होता. एखादा पक्ष बराच काळ सत्तेत राहिला की किंवा सर्वव्यापी झाला की त्या पक्षास आणि त्या पक्षाच्या विचारधारेविरोधात बुद्धिमंतांचा एक वर्ग आपोआप उभा राहू लागतो. हे नैसर्गिक असते. हे बुद्धिमंत मग त्या पक्षविरोधी विचारसरणीस आकार देतात आणि तिचे प्रसारक बनतात. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसविरोधी विचारधारेस लोहिया यांनी बौद्धिक चौकटीत बसवले. वास्तविक काँग्रेसची तत्कालीन अर्थनीती समाजवादी म्हणावी इतकी अर्थदुष्ट होती. पण तरी समाजवादी विचारवंतांच्या मते काँग्रेस भांडवलदार-धार्जिणी होती. असे आरोप करणाऱ्यांतले लोहिया हे बिनीचे विचारवंत. त्यांच्या बौद्धिक संपदेखाली नव्या युगाचे समाजवादी आकारास आले. जयप्रकाश नारायण हे लोहिया यांच्याच पिढीचे. लालू आणि मुलायम ही अशा नेत्यांची पुढची पिढी. या दोघांचा काँग्रेस-विरोध इतका टोकाचा होता की त्यामुळे आपण नकळत धर्मवाद्यांस मदत करीत आहोत, हेही त्यांस लक्षात आले नाही. त्याचा परिणाम असा की हे समाजवादी काँग्रेसविरोधी राजकारणात यशस्वी ठरले; पण तरी ते मुख्य प्रवाहाच्या काठावरचेच राहिले. नंतर तर काँग्रेसविरोध वगैरे मुद्दे नाममात्रच उरले आणि त्यांचे राजकारण मी, माझे, आमचे यापलीकडे जाऊ शकले नाही. देशाच्या मध्यवर्ती राजकारणास आकार देण्याची क्षमता असूनही यांच्याकडून ते झाले नाही. पण तरीही मुलायम यांचे राजकारण निश्चितच दखलपात्र ठरते.

india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा

‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो’ हे तत्त्व (?) मुलायमसिंह यांच्या राजकारणाचा गाभा. त्यांच्या सहा-सात दशकांच्या राजकारणात याचे प्रतिबिंब दिसते. जनेश्वर मिश्रा, आझम खान, बेनी प्रसाद वर्मा हे मुलायम यांचे समकालीन समाजवादी. तिघेही बरोबर असत. त्यातूनच त्यांच्याकडून समाजवादी पक्षाची (सप) स्थापना झाली. वास्तविक हे समाजवादी. त्या अर्थाने ते सर्वच धर्मीयांस समांतर वाटायला हवेत. तसे झाले नाही. मुलायमसिंह आणि त्यांचा पक्ष हिंदूपेक्षा मुसलमानांस अधिक जवळचा वाटू लागला. म्हणूनच मुलायमसिंह यांस ‘मुल्ला मुलायम’ असे टोपणनाव पडले. लोहियांच्या काँग्रेसविरोधामागे उच्च जातींचा विरोध हे एक कारण होते. याचे कारण त्या वेळी काँग्रेसचेच नेतृत्व बव्हंश: उच्चवर्णीय, त्यातही ब्राह्मण होते. लोहिया यांच्या लालू आणि मुलायम या चेल्यांनी त्यामुळे ‘पिछडय़ा’ जातीच्या लोकांस आपले म्हणून आपले राजकारण त्यांच्याभोवती फिरवत ठेवले. त्यात त्यांना निश्चित यश आले. पण फरक पडला तो इतकाच की एके काळी उत्तर प्रदेशात उच्चवर्णीयांची अरेरावी चालत असे, त्यांची जागा यादव-मुसलमान यांनी घेतली. म्हणजे गुणात्मक बदल घडला असे नाही. फक्त अत्याचार करणाऱ्यांचा वर्ग आणि वर्ण काय तो बदलला. ही मुलायम यांच्या राजकारणाची मर्यादा. ती ओलांडण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही.

वास्तविक तीन वेळा उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद, एकदा केंद्रात संरक्षणमंत्री, नंतरचा बहुतेक काळ दिल्लीत केंद्रीय राजकारणात इतके असूनही मुलायम हे उत्तर प्रदेशच्या बाहेर फारसे पोहोचू शकले नाहीत. अन्य राज्यांत त्यांच्या पक्षाच्या शाखा आहेत नाही म्हणायला. पण त्या केवळ मुसलमान वा यादव आदींचे दबावगट वाटाव्यात इतकीच त्यांची ताकद. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना उत्तराखंड मागणीसाठीचे निदर्शक अथवा अयोध्येत ऑक्टोबर १९९० मध्ये राम मंदिराच्या मागणीसाठी आलेल्या निदर्शकांवर गोळीबार करण्याइतका प्रशासकीय धाडसीपणा मुलायम यांनी दाखवला खरा. पण पुढे या आंदोलनाचा चेहरा असलेले कल्याणसिंह यांना भाजपने टाकल्यावर मुलायम यांनी त्यांच्याशी सख्य साधले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडल्यानंतर सत्तेसाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या सोनिया गांधी यांच्या काँग्रेसला मुलायम यांनी पाठिंबा दिला नाही. पण म्हणून त्यांचा काँग्रेसविरोध खरा होता, असेही नाही. नंतर अमेरिकेशी केलेल्या अणुकराराच्या मुद्दय़ावर प्रकाश करात यांच्या नेतृत्वाखालील मार्क्‍सवाद्यांनी जेव्हा मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढला तेव्हा मुलायमसिंह पुढे आले आणि त्यांनी आपल्या ‘सप’चा पािठबा देऊन ते सरकार वाचवले. मागास जाती-जमातींतील नवनव्या चेहऱ्यांस पुढे आणण्याचा मुलायमसिंह यांचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य. त्यातूनच ‘डाकूरानी’ फुलनदेवीस अभय मिळाले आणि पुनर्वसनाची संधीही. पण म्हणून महिलांविषयी मुलायमसिंह यांचा पवित्रा पुरोगामी होता असे म्हणता येणार नाही. बलात्काराचा इतका बाऊ करण्याचे कारण नाही, अशा अर्थाचे विधान करत ‘होतात मुलांकडून चुका कधी कधी’ असे म्हणण्याइतका कमालीचा बेजबाबदारपणा मुलायमसिंह यांनी वयाच्या पंचाहत्तरीत दाखवला होता, याकडे दुर्लक्ष करणे अवघड. त्यांच्या या भयानक विधानाची दखल संयुक्त राष्ट्रालाही घ्यावी लागली होती. तरीही मुलायम तेथेच थांबले असे नाहीत. ‘सामूहिक बलात्कार’ अशक्य आहे, असे त्यांचे मत. म्हणजे महिला सक्रिय सहभागी असल्याखेरीज ‘असे’ अत्याचार होऊ शकत नाहीत, असे त्यांना सुचवायचे होते. यावरही प्रचंड टीका झाली. पण मुलायम यांना आपले काही चुकले असे कधीही वाटले नाही. इतकेच काय, पण राजकारणात महिलांसाठी राखीव जागा असायला हव्यात हेदेखील त्यांना कधी मंजूर नव्हते. एका बाजूला समाजवादी म्हणावी अशी पार्श्वभूमी, दुसऱ्या बाजूला अमरसिंह यांच्यासारखे काहीही वैचारिक धरबंध नसलेले उद्योगी, तिसरीकडे ‘सहाराश्री’शी मैत्री आणि अमिताभ बच्चन यांच्याशी दोस्ताना, असे हे मुलायमसिंह नावाचे अजब रसायन.

दुसरे नामांकित यादव लालूप्रसाद यांच्यासारखी झकास राजकीय वक्तृत्वगुणांची साथ मुलायम यांना नव्हती. खरे तर उत्तर भारतीय राजकारण्यांचे वक्तृत्व कौतुकास्पद असते. मुलायमसिंह त्यास अपवाद. ही उणीव ते जमिनीवर कार्यकर्त्यांशी जोडून घेऊन भरून काढत. त्यांचा कार्यकर्त्यांचा गोतावळा हेवा वाटावा असा. राजकारणात कितीही उच्चपदावर गेले तरी त्यांचा हा जमीन-संपर्क कधी तुटला नाही. ‘नेताजी’ ही त्यांची राजकारणातील उपाधी. ती त्यांना शोभली. कारण मुलायमसिंह हे सर्वसामान्यांचे नेते होते. सुरुवातीच्या काळात या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी ते सायकलवरून पायपीट करीत. त्यामुळे हे वाहन ही त्यांच्या पक्षाची ओळख बनले. समाजवादी विचारांशी त्यांची कधीकाळी नाळ जुळलेली होती, त्याचे तेच एक प्रतीक तेवढे अखेपर्यंत राहिले.

बाकी मुलायमसिंहांच्या राजकारणाने उत्तरायुष्यात ‘परिवारवादी’ वळण घेतले. लालू आणि त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. तो असा की आपले ‘झाकून’ ठेवण्यासाठी लालूंनी बदलत्या राजकीय वाऱ्यांना आपल्या शिडात भरून आपले जहाज पुढे ढकलण्याचा उद्योग कधी केला नाही. मुलायम यांनी मात्र चातुर्य दाखवत भाजपशी जुळवून घेतले. इतके की ‘तुम्ही पुन्हा पंतप्रधान होणे हे देशासाठी आवश्यक आहे’ असे लाळघोटे विधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर थेट संसदेत करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळेही असेल पण मुलायमसिंह यांच्यामागे लालूंप्रमाणे ‘ईडी’, ‘सीबीआय’ वगैरेंचा ससेमिरा कधी लागला नाही. त्यामुळे मुलगा अखिलेश यादव भाजपविरोधात निवडणुका लढवत असताना तीर्थरूप मुलायमसिंह यांचे आयुष्य तसे सुखात गेले. समाजवादी मूल्यांशी बांधिलकी सांगत असतानाही स्वत:तील सरंजामीस धक्का न लावू देण्याचे अजब कसब मुलायमसिंह यांच्यात होते. त्या राजकीय चातुर्याचे मूर्तिमंत स्वरूप मुलायमसिंह यांच्या निधनाने कायमचे संपले.

Story img Loader