अर्थव्यवस्था पंधराव्या क्रमांकावर असूनही युरोपीय फुटबॉल, विम्बल्डनसारख्या स्पर्धांत स्पेन अव्वल ठरतो; तो खेळावरल्या प्रेमामुळे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवार- १४ जुलैहा क्रीडाप्रेमींच्या आनंदविश्वात ‘स्पॅनिश संडे’ म्हणून नोंदला जाईल. जेमतेम पाच कोटभर लोकसंख्येच्या स्पेन या युरोपीय देशाची अर्थव्यवस्था पंधराव्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या तिनांत यावे यासाठी त्या देशाचा अजिबात आटापिटा नाही. पण तरीही शेकडो खेळाडूंतून वैयक्तिक कौशल्याची अंतिम कसोटी असलेल्या टेनिसच्या विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद स्पॅनिश कार्लोस अल्काराझ याने यंदाही आपल्याकडे राखले आणि त्याच वेळी सांघिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आणि अंतिम फेरीत तब्बल २४ देशांचा सहभाग असलेल्या फुटबॉलमधील युरो चषकावरही स्पेनने आपले नाव कोरले. कोणत्याही देशास अभिमानास्पद अशा या कामगिरीसाठी स्पेनचे अभिनंदन करावे तितके कमीच. युरो चषकातील स्पर्धा दर चार वर्षांनी होते आणि विम्बल्डन दरवर्षी. गतसाली अल्काराझ याने पहिल्यांदा विम्बल्डन जिंकली आणि यंदा तर फ्रेंच ओपनचे विजेतेपदही त्याने पटकावले. गतवर्षीप्रमाणे यंदाही विम्बल्डनच्या अंतिम फेरीत त्याचा मुकाबला नोवाक जोकोविच याच्याशी झाला. पण गतवर्षीप्रमाणे यंदा या अंतिम सामन्यात चुरस मात्र नव्हती. अल्काराझ याने आपल्या तडाखेबंद खेळाने जोकोविचला सरळ तीन सेटमधेच गारद केले. लंडनमधे विम्बल्डनचा हा अंतिम सामना संपल्यानंतर जर्मनीची राजधानी बर्लिन येथे युरो चषकाचा अंतिम सामना सुरू झाला. त्यात स्पेनच्या तरुण संघाने इंग्लंडच्या अत्यंत अनुभवी, तारांकित खेळाडूंनी भरलेल्या संघास २-१ असे पराभूत केले. अशा तऱ्हेने एकाच दिवसात खऱ्या अर्थाने दोन जागतिक दर्जाची अजिंक्यपदे स्पेनने पटकावली. ही कामगिरी अनेकार्थांनी ऐतिहासिक आणि दखलपात्र ठरते.

कारण हे दोनही खेळ मोजके पाच-दहा देशच खेळतात असे नाही. फुटबॉल तर २०० हून अधिक देशांचा खेळ आणि टेनिस असाच वैश्विक. या दोनही खेळांची संस्कृती स्पेनने आनंदाने जोपासली. अलीकडच्या पिढीस स्विस फेडररशी समांतर राफेल नडाल ठाऊक. पण त्याहीआधी कोन्चिता मार्टिनेझ, कार्लोस मोया, फ्रेंच ओपन विजेता जुआन फेर्राव, महिलांची अरांक्सा सांचेझ अशा अनेकांनी स्पॅनिश टेनिसचा पाया रचला. फुटबॉल संस्कृती तर स्पॅनिश मातीत रुजली आणि फोफावली त्यास १२५ वर्षांहून अधिक काळ लोटला असेल. आणि फुटबॉलच्या खेळात स्पेनने फक्त स्वदेशी स्वार्थ पाहिला नाही. पुढे जागतिक स्तरावर नाव काढलेल्या खेळाडूंच्या पहिल्या पदलीला स्पेनच्या मातीने पाहिलेल्या आहेत. या देशातील बार्सिलोना, रेआल माद्रिद अशा एकापेक्षा एक सरस क्लब्जनी फुटबॉल आणि सर्व देशीय फुटबॉलपटूंवर आणि मुख्य म्हणजे खेळावर मनापासून प्रेम केले. मग तो अर्जेंटिनाचा मेसी असेल वा पोर्तुगाल/ ब्राझील या दोन स्वतंत्र खंडांतील दोन रोनाल्डो असोत किंवा नवख्या क्रोएशियाचा लुका मॉद्रिचसारखा वेगळ्याच प्रतिभेचा खेळाडू असो. स्पेनच्या अंगाखांद्यावर सगळे आनंदाने ‘खेळले’ आणि स्पेननेही त्यांना तितक्याच प्रेमाने वागवले. फेडररबरोबर दंतकथा बनून गेलेल्या नडालने तर स्पेनमध्ये अकादमी काढली आणि पुढच्या पिढ्यांत असे खेळाडू निपजत राहतील याची तजवीज केली. नडालच्या या कष्टांची तुलना आपल्या पुलैला गोपीचंदशी होऊ शकेल. स्पॅनिश नागरिक मुळातच क्रीडाप्रिय. बाकी काही नाही तरी निदान सायकलिंग तरी ते करतातच करतात आणि दररोज व्यायामशाळांत जाणाऱ्या स्पॅनियार्डचे प्रमाणही अन्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे अनेक स्पर्धांत या देशाचे खेळाडू नाव काढतात आणि अनेक क्रीडा स्पर्धा स्पेन आयोजितही करते. ‘बसून खाणारे’, बैठ्या उद्याोगांत रमणारे बहुसंख्य, कसल्याही क्रीडासंस्कृतीशी गेल्या कित्येक पिढ्यांचा परिचय नाही आणि पुढच्याही काही पिढ्यांचा तो प्रस्थापित होण्याची शक्यता नाही आणि तरीही गल्ल्याकडे लक्ष ठेवून, कंत्राटदारांच्या भल्यासाठी ऑलिम्पिक भरवण्याचा हुच्चपणा स्पेनने कधी केला नाही. बार्सिलोनात स्पेनने १९९२ साली ऑलिम्पिक भरवले खरे. पण त्यात १३ सुवर्ण पदकांसह २२ पदके जिंकून पदक तालिकेत पाचवा क्रमांक पटकावला. म्हणजे इतक्या खेळांत त्या देशाने क्रीडा गुणवत्ता दाखवली.

वास्तविक युरोपातील अन्य अनेक देशांप्रमाणे त्या देशाचा इतिहासही राजकीय, आर्थिक अस्थैर्याचा राहिलेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपासून ते १९७५ पर्यंत त्या देशाने हुकूमशाही अनुभवली. फ्रान्सिस्को फ्रँको या लष्करशहाच्या ‘आणीबाणी’त दोन लाख लोकांचे शिरकाण झाले. पण नंतर त्या देशाचे राज्यकर्ते हा ‘काळा अध्याय’ उगाळण्यात वेळ घालवत बसले नाहीत. त्यांनी देश उभारणीस महत्त्व दिले. त्याचमुळे आज हा देश विकसितांत गणला जातो आणि ‘झारा’, ‘मँगो’ इत्यादी त्या देशाचे स्थानिक ब्रँड्स जागतिक बाजारपेठ काबीज करताना दिसतात. आज आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ऑलिव्ह ऑइलच्या वापराची टूम सगळीकडे दिसते. या तेलाच्या निम्म्या बाजारपेठेवर स्पेनचा हक्क आहे. ऑलिव्हच्या एकूण उत्पादनातील ४० टक्के ऑलिव्ह स्पॅनिश मातीत पिकतात. याचा अर्थ आज या देशात सर्व काही उत्तम आहे आणि स्पॅनिशांचे कपडे सुखी माणसांचे सदरे म्हणून वाटावेत असे नाही. कॅटलान आदी प्रांतांचे समाजजीवनावर असलेले प्राबल्य आणि त्या प्रांताची अधिकाधिक स्वायत्ततेची मागणी इत्यादी मुद्द्यांवर स्पेनमधेही जनमत विभागलेले आहे आणि विकासाच्या समानतेचे आव्हान त्या देशासही आहे. अगदी अलीकडे स्पेनचे वर्णन ‘कमकुवत लोकशाही’ (फ्लॉड डेमॉक्रसी) असे केले जात असे. कारण न्यायपालिका नियंत्रित करण्याचा त्या देशाच्या सरकारचा प्रयत्न. पण तो अयशस्वी ठरला आणि स्पेन स्थिरावला.

या देशातील नागरिकांच्या रक्तातच जग पादाक्रांत करण्याची ईर्षा असावी. आपल्या खंडप्राय देशास सुमारे सात हजार किमी किनारपट्टी आहे तर स्पेनसारख्या लहानशा देशास ती आठ हजार किमी आहे. पण फरक असा की स्पेनने आपली दर्यावर्दीता राखली आणि ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा। किनारा तुला पामराला’ असे ‘गर्वगीत’ कुसुमाग्रजांनी ज्याबाबत लिहिले तो अमेरिका ‘शोधणारा’ कोलंबस येथून निपजला. वास्को-द-गामा शेजारील पोर्तुगालचा. तो भारतात पोहोचला. पण भारताच्या शोधात निघालेल्या कोलंबसाचे पाऊल अमेरिकेवर पडले. म्हणजे अमेरिकेच्या ऐवजी कोलंबस भरतभूवर येता तर इतिहासास वेगळे वळण लागते. अर्थात भूतकाळात या जर-तरला अर्थ नसतो. भविष्य घडवण्यात रस नसणारे आणि तशी कुवत नसणारे फक्त इतिहास चिवडत बसतात. वास्तविक आधुनिक कादंबरी—डॉन किहोट्टे (मराठी उच्चार क्विझोट) — जगास दिली ती स्पॅनिश लेखकाने. ‘मातादोर’ (भ्रष्ट उच्चार मॅटेडोर), ‘आर्मदा’, दुपारच्या डुलकीचा ‘सिएस्टा’, हाथरसला झालेले ‘स्टॅम्पीड’, सर्वत्र संचार असलेले ‘कॉक्रोच’, दुर्गम भागांतून लढणारे ‘गुरिल्ला’, झुळकीची ‘ब्रीझ’, मर्दानी ‘माचो’, ‘प्लाझा’… असे अनेक शब्दही मूळ स्पॅनिश.

आणि आता नडालनंतर टेनिसमधला अल्काराझ आणि फुटबॉल गाजवणारा यमाल हे दोघेही स्पेनचे. स्पेनच्या युरो विजयात यमालची भूमिका अनन्यसाधारण आहे. यातील अल्काराझ हा आहे जेमतेम २१ वर्षांचा आणि यमाल तर फक्त १७. हे तरुण तारे क्रीडाजगतावर बराच काळ तळपतील, इतके आश्वासक मानले जातात. हा खरा ‘लोकसंख्या लाभांश’ (डेमोग्राफिक डिव्हिडंड). एकाच देशाने तो इतका दिला म्हणून ही कौतुकाची थाप.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spain tops in european football competitions like wimbledon amy
Show comments