वैचारिकतेच्या पहिल्याच पायरीवर असलेल्या समाजास लोकशाही मूल्ये, सहिष्णुता आदीपेक्षा ‘काही तरी करून’ दाखवणारा नेता नेहमीच अधिक आवडतो; तसे हे एर्दोगान..
लोकशाहीच्या प्रतीकासमोर साष्टांग दंडवत घालून नंतर त्याच लोकशाहीस पायाखाली तुडवणाऱ्या जगातील नामांकित नेत्यांत तुर्कीचे अध्यक्ष रिसिप तयिप एर्दोगान हे अग्रस्थानी. ते तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडले गेले. अवघ्या काही महिन्यांपूर्वी ५० हजारांहून अधिक बळी घेणारा भूकंप, तुर्की चलनाच्या मूल्यात ८० टक्क्यांची झालेली घट आणि एकूणच वाढती आर्थिक आव्हाने लक्षात घेता एर्दोगान यांना निवडणूक जिंकणे अवघड जाईल, असे मानले जात होते. किंबहुना ते ही निवडणूक हरू शकतात, असाही काहींचा कयास होता. तसे झाले नाही. पण एर्दोगान यांना सहज विजयही मिळाला नाही. त्या देशाच्या घटनेनुसार अध्यक्षीय निवडणुकीत किमान ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याखेरीज विजय मिळत नाही. तसा तो एर्दोगान यांना मिळाला नाही. दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या पहिल्या फेरीत ते प्रतिस्पर्धी केमाल किलीकदारोग्लु यांचा निर्विवाद पराभव करू शकले नाहीत. म्हणून शनिवारी मतदानाची दुसरी फेरी घ्यावी लागली. तीत एर्दोगान यांनी विजयासाठी आवश्यक ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचे दिसते. म्हणजे ते आता अध्यक्षपदी २०२८ पर्यंत राहू शकतील. त्यानंतर जगातील लोकशाहीवादी हुकूमशहांचे प्रतीक असलेल्या व्लादिमिर पुतिन यांच्याप्रमाणे घटनादुरुस्ती करून अध्यक्षपद तहहयात आपल्याकडेच राहील असा बदल ते करणारच नाहीत, असे नाही. तशी शक्यता दाट असल्याने तुर्कीतील या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले होते.
याचे कारण एर्दोगान, हंगेरीचे व्हिक्टर ओर्बान, ब्राझीलचे बोल्सोनारो, इस्रायलचे नेतान्याहू आणि अन्य असे काही हे मतपेटीतून आकारास येणाऱ्या हुकूमशाहीचे प्रतीक आहेत. हे सारे पुतिन यांचे अनुयायी. निवडणुकीद्वारे सत्ता हाती आली की मिळालेल्या सत्ताधिकारांचा अनिर्बंध वापर करून विरोधकांना शब्दश: संपवायचे आणि नामशेष झालेल्या विरोधकहीन निवडणुकीतून पुन्हा सत्ता मिळवायची असे हे पुतिनी प्रारूप. ते सर्वप्रथम एर्दोगान यांनी अंगीकारले. पुतिन हे २००० पासून सत्तास्थानी आहेत. एर्दोगान यांना ती २००३ साली मिळाली. त्याआधी इस्तंबूलसारख्या शहराच्या महापौरपदावरून त्यांनी आपले उत्तम प्रतिमा-संवर्धन केले. व्यवसाय-स्नेही सुधारणावादी धडाडीचे नेतृत्व अशी आपली प्रतिमा बनेल याची चोख व्यवस्था एर्दोगान यांनी केली. तुर्कीच्या विकासाचे हे ‘इस्तंबूल प्रारूप’ चांगलेच लोकप्रिय झाले. एका शहराचा असा विकास करणारा नेता देशाच्या प्रमुखपदी गेल्यास आपली किती भरभराट होईल असे नागरिकांस वाटू लागेल यासाठी एर्दोगान यांच्या प्रयत्नांस यश आले आणि तुर्कीच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर मात्र स्वत:वरचा लोकशाहीवादी शेंदुराचा लेप तसाच राहावा असा प्रयत्नही त्यांनी केला नाही. त्यामुळे एर्दोगान यांचे खरे स्वरूप प्रकट झाले. त्यांच्यातील हुकूमशाही प्रवृत्ती उफाळून आल्या आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची भाषा करणारा हा नेता प्रत्यक्षात सर्वानाच झिडकारून ‘मी म्हणेन ती पूर्व’ असे वागू लागला.
म्हणूनच त्या देशातील प्रातिनिधिक, सांसदीय-सदृश लोकशाही जाऊन तिच्या जागी अध्यक्षीय लोकशाही अस्तित्वात आली. हा बदल एर्दोगान यांचा. अध्यक्षीय लोकशाहीत अध्यक्षास हवे ते अधिकार हाती घेता येतात. अशा व्यवस्थेत अध्यक्षास नकाराधिकारही मिळतो. एर्दोगान यांनी तो मिळवला आणि पाहता पाहता तुर्की या आधुनिक देशाचे रूपांतर एकाधिकारशाहीत झाले. विरोधकांस छळणे, खऱ्या-खोटय़ा कारणांसाठी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणे इत्यादी उद्योग सगळेच हुकूमशहा करतात. एर्दोगान यांची मजल विरोधकांस तुरुंगात डांबण्यापर्यंत गेली. आपणास विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह असे समीकरण एर्दोगान यांनी रुजवले आणि विरोधकांस हजारोंच्या संख्येने बंदिवान केले. सामान्य तुर्काना त्याच वेळी नवनवे हमरस्ते, नवनवे विमानतळ आणि नवनव्या पायाभूत सोयीसुविधा मिळाल्या. वैचारिकतेच्या पहिल्याच पायरीवर असलेल्या समाजास लोकशाही मूल्ये, सहिष्णुता आदीपेक्षा ‘काही तरी करून’ दाखवणारा नेता नेहमीच अधिक आवडतो. या ‘काही तरी करून’ दाखवण्याबदल्यात आपण काय गमावणार आहोत याचे भान अशा जनतेस नसते. त्यामुळे हे कथित धडाडीवीर नेहमीच लोकप्रिय ठरतात. त्यात या धडाडीस उत्तम वक्तृत्वाची जोड असेल तर तलवारीच्या धारेस जणू सुगंधाचीच जोड! एर्दोगान यांस ती मिळाली. त्यामुळे त्यांच्या राजवटीचे पहिले दशक सुखेनैव पार पडले.
पण २०१३ नंतर मात्र एर्दोगान यांचे खरे रूप समोर येऊ लागले. त्या काळात एक तर त्यांनी लोकशाहीचे स्वरूप बदलले आणि दुसरे म्हणजे त्यानंतर तुर्कीची अर्थव्यवस्था रसातळास जाऊ लागली. चलनाचे मूल्य या काळात प्रचंड घटले आणि गुंतवणूक आकसल्याने बेरोजगारीतही वाढ होऊ लागली. यानंतरच्या काळात एर्दोगान यांच्यातील हुकूमशहास धर्मवादाची जोड मिळाली. खरे तर केमाल पाशा याच्यासारख्या अत्यंत दुर्मीळ इस्लामी सुधारणावाद्याची ही भूमी. पण एर्दोगान यांनी ती पुन्हा धर्मवादाच्या मार्गावर नेली आणि अत्यंत लोभस असा आधुनिक तुर्की पाहता पाहता इस्लामी हिजाबात गुंडाळला गेला. हेगाया सोफायासारख्या त्या देशातील धर्मनिरपेक्ष वास्तूत पुन्हा नमाज पढला जाऊ लागला. कोणताही हुकूमशहा संकटसमयी धर्म आणि राष्ट्रभावनेस हात घालतो. एर्दोगान यांनी तसे केले. या प्रवासात सुधारणावादी पाश्चात्त्य देशांची साथ सुटणे ओघाने आलेच. म्हणून तुर्की अमेरिका-केंद्री ‘नाटो’ गटाचा सदस्य असूनही रशियाच्या पुतिन यांच्या जवळ अधिकाधिक जाऊ लागला. हे केवळ परराष्ट्र धोरणातील बदल नव्हते. ते एर्दोगान यांच्या राजकीय शैलीतील परिवर्तन होते. पुतिन यांनी राजधानी मॉस्कोपासून काही अंतरावरील डोंगरावर स्वत:साठी स्वतंत्र आलिशान हवेली बांधली. ते तेथे राहतात. एर्दोगान यांनीही तसेच केले. तेही अंकारापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावर स्वनिर्मित महालात राहतात. अमेरिका आणि पाश्चात्त्य जगास रशियाचा कसा मत्सर वाटतो, हे पुतिन नेहमी सांगतात. एर्दोगान यांचीही भाषा तशीच. नागरिकांचा मतदानाचा अधिकार अबाधित आहे म्हणजे आपण लोकशाहीस नख लावले हा आरोप चुकीचा आहे, असा पुतिन यांचा युक्तिवाद. एर्दोगानही असे म्हणतात. त्यांचे हे खरे रूप अलीकडच्या काळात प्रकर्षांने समोर येत गेल्याने त्यांच्या पराभवाची आस जगातील अनेक लोकशाहीप्रेमींस होती. ती तूर्त अपूर्ण राहिली. खरे तर एर्दोगान यांना धूळ चारता यावी यासाठी या वेळी तुर्कीतील समस्त विरोधकांनी समंजस एकजुटीचे दर्शन घडवले. पण ते एर्दोगान यांचा पराजय होईल; इतके समर्थ ठरले नाही. पण तरीही एर्दोगान यांच्या विजयाच्या दु:खात एक समाधानाची बाब निश्चितच आहे.
ती म्हणजे एर्दोगान यांच्या विजयाचा आकसलेला आकार. कोणत्याही स्वप्रेमी हुकूमशहाप्रमाणे एर्दोगान यांनी याही निवडणुकीत विरोधकांची शेलक्या विशेषणांनी वासलात लावण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांस राष्ट्रद्वेषी ठरवले. पण आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे मतदारांनी एर्दोगान यांच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही, ही समाधानाची बाब. त्यामुळेच त्यांना पहिल्या फेरीत निर्विवाद यश मिळाले नाही आणि दुसऱ्या फेरीतील विजयही ‘कसाबसा’ म्हणावा इतकाच मोठा आहे. एर्दोगान यांच्या दोन दशकी राजवटीतील हे आतापर्यंतच सर्वात मोठे आव्हान मानले जाते. विरोधकांची एकी अशीच राहिली तर एर्दोगान यांचा हुकूमशाही पैस अधिकच आक्रसेल हे उघड आहे. एर्दोगान यांच्यासारख्या एककल्लीस रोखायचे असेल तर विरोधकांस एकत्र यावेच लागेल हे तुर्कीतील निकालातून ध्वनित होते. म्हणूनही हा निकाल लक्षणीय ठरतो.