झेलेन्स्की यांना फटकारून पुतिन यांना कुरवाळल्यामुळे आपण प्रत्यक्षात रशियाचीन संबंधांस अप्रत्यक्षपणे बळकट करत आहोत याचेही भान ट्रम्प यांस नाही…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लादल्या गेलेल्या युद्धात विदग्ध झालेल्या युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाऊस’मध्ये जी वागणूक दिली ती पाहून अनेकांस आपल्याकडील गावगुंडांची आठवण झाली असल्यास आश्चर्य नाही. आपला समर्थक नसलेल्यास ‘वाड्यावर’ बोलवायचे आणि ‘कोपच्यात’ घ्यायचे ही आपल्या राजकीय नेत्यांत रूपांतर झालेल्या गावगुंडांची तऱ्हा. अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स या उभयतांचे झेलेन्स्की यांच्याशी वर्तन हे या तऱ्हेचे होते. आतापर्यंत ‘व्हाइट हाऊस’मध्ये वा अन्यत्रही देशप्रमुखांत मतभेद झालेले नाहीत असे नाही. जागतिक शीतयुद्धाच्या तप्त झळा जगास जाळत होत्या त्यावेळेस तत्कालीन सोव्हिएत रशियाचे प्रमुख लिओनिद ब्रेझनेव्ह हे निक्सन यांच्या ‘व्हाइट हाऊस’चे पाहुणे होते आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून उभयतांनी विविध विषयांवर चर्चा केली. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर या काही गोड बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हत्या. सुरुवातीस त्या आणि रशियाचे विविध देशप्रमुख यांच्यातील संबंधही सौहार्दाचे नव्हते. जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील मतभेद तर सर्वश्रुत आहेत. असे अन्य अनेक दाखले देता येतील. ते अशासाठी द्यायचे की यातील सर्व नेत्यांस राजनैतिक आणि वैयक्तिक मतभेद, आवडी-निवडी यांत सुयोग्य अंतर राखण्याची समज होती आणि हे मतभेद चार भिंतीच्या आड राहतील याची खबरदारी हे सर्व घेत. हे सर्व प्रकारचे शहाणपण, समंजस सभ्यता, संकेत यांस तिलांजली देण्याचा निश्चयच ट्रम्प आणि कंपनीने केलेला दिसतो. त्यांचे ‘व्हाइट हाऊस’मधील वागणे, प्रचलित लोकप्रिय शब्द वापरायचा तर, शुद्ध ‘सडकछाप’ दर्जाचे म्हणावे लागेल. अर्थात अमेरिकी समाजजीवनातील सर्व वैगुण्ये हा ट्रम्प यांच्या राजकीय ‘टॉवर’चा पाया हे सत्य लक्षात घेतल्यास या ‘टपोरी’ नेत्याचे वर्तन त्याच दर्जाचे असणार हे उघड आहे. असो. जे झाले ते साऱ्या जगाने पाहिले. आता चर्चा हवी ती घटिताच्या परिणामांची.
तिचे मूळ ‘व्हाइट हाऊस’मध्ये पत्रकारांनी झेलेन्स्की यांच्या समोर ट्रम्प यांना विचारलेल्या टोकदार प्रश्नांत आहे. ट्रम्प आणि चांगले पत्रकार यांचे संबंध अजिबात सौहार्दाचे नाहीत. पण तरीही ट्रम्प पत्रकारांस सामोरे जाणे टाळत नाहीत हे कौतुकास्पद. झेलेन्स्की यांच्यासमवेतची चर्चा सौहार्दपूर्ण असणार नाही, याचा अंदाज असतानाही ट्रम्प यांनी पत्रकारांस टाळले नाही. ‘‘तुमचे पुतिन यांच्याबाबतचे धोरण जरा जास्तच मऊ आहे का’’, असा थेट प्रश्न ट्रम्प यांस झेलेन्स्की यांच्यासमोर विचारणे स्फोटकांनी भरलेल्या वाहनासमोर फटाका लावण्यासारखे. ते पत्रकारांचे कर्तव्यच. ते त्यांनी चोख केले. अशावेळी एखादा शहाणा नेता पत्रकारांच्या या ‘मनोवैग्यानिक’ खेळास बळी न पडण्याचे चातुर्य दाखवता. पण हे पडले ट्रम्प. मुत्सद्देगिरीतील ‘मु’शी देखील दूरान्वयाने संबंध न आलेल्या ट्रम्प यांची शांतता ढळली आणि जे काही घडले ते घडले. त्या आगीत तेल ओतले ते ट्रम्प यांचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी. अलीकडे आहे तो नेता परवडला असे त्याच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याकडे पाहून म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे हा ‘असा’ अध्यक्षही बरा वाटावा असे अमेरिकेचे हे उपाध्यक्ष. त्यांनी या चर्चेत भलताच सूर लावला. ‘‘इतकी मदत करूनही तुम्ही अमेरिकेचे, अध्यक्षांचे आभार मानले नाहीत… गेल्या वर्षी आमच्या विरोधकांच्या प्रचारसभेत हजेरी लावलीत’’ इत्यादी आपल्या प्रचलित राजकारणात शोभेल अशा दर्जाची भाषा केली. हे सर्व पाहिल्यावर काय लायकीचे हे नेते आहेत असा प्रश्न पडून हताशा यावी.
कारण अमेरिकेने युद्धग्रस्त युक्रेनला मदत केली आणि झेलेन्स्की यांस निमंत्रण दिले हे काही उपकार केले नाहीत. पुतिन यांस रोखणे ही शहाण्या अमेरिकेची गरज होती आणि युक्रेनमधील दुर्मीळ खनिजे (रेअर अर्थ्स) मिळवणे ही अमेरिकेच्या तंत्रविश्वाची निकड आहे. तेव्हा आपण म्हणजे जगाच्या उद्धाराकरिता अमेरिकेच्या अध्यक्षपदी आकाशातील बापाने बसवलेले कोणी दिव्यपुरुष आहोत असे ट्रम्प यांचे मानणे शुद्ध मूर्खपणाचे आणि उबग आणणारे आहे. हा माणूस सतत स्वत:स प्रथमपुरुषी बहुवचनी संबोधतो. म्हणजे ते स्वत:च ‘‘ट्रम्प यांनी असे केले’’, ‘‘ट्रम्प असे म्हणाले’’ अशा भाषेत बोलतात. त्यात वर तपशिलाच्या चुका. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनीही गेल्या आठवड्यातील ‘व्हाइट हाऊस’ भेटीत आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर ट्रम्प यांना बोलताना मध्येच थांबवून त्यांच्या तपशिलातील चूक दाखवून दिली आणि आताही झेलेन्स्की यांनी निडरपणे तेच केले. मुद्दा होता पुतिन यांच्या रशियाने युक्रेनच्या क्रीमिआ प्रांताचा लचका तोडण्याचा. हे युद्ध झाले २०१४ साली. पण ‘ठोकून देतो ऐसाजे’ या नेहमीच्या शैलीत ट्रम्प यांनी ते २०१५ साली झाले असे दामटून सांगितले. त्यांची ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न झेलेन्स्की यांनी केला. त्यावरून हे महाशय आणखी संतापले. त्यामागील हा ‘गरीब, असहाय याचक’ आपल्यासारख्या बलाढ्य, धनाढ्य यजमानाची चूक दाखवून देतो म्हणजे काय, ही ट्रम्प यांची घमेंड ठसठशीतपणे दिसून येत होती. यातही बराक ओबामा, जो बायडेन या आपल्या पूर्वसुरींचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करून आपण किती क्षुद्र आहोत हे दाखवून देण्यास ट्रम्प चुकले नाहीत. या सर्वाचे थेट प्रक्षेपण होत आहे हे ठाऊक असूनही जगातील एकमेव महासत्तेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचे वर्तन उर्वरित जगास हादरवून टाकणारे तर आहेच; पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.
कारण जे झाले ते सध्याच्या जगापुढील दोन आव्हानवीरांस सुखावणारे आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे पुतिन हे ते दोन आव्हानवीर. अनेक मुद्द्यांवर जिनपिंग आणि पुतिन यांचे साटेलोटे आहे आणि जिनपिंग यांचा चीन ही अमेरिकेची डोकेदुखी आहे. अशा वेळी खरे तर जिनपिंग यांचे हात बळकट होणार नाहीत यासाठी ट्रम्प यांनी अधिक खबरदारी घ्यायला हवी. जिनपिंग हे युक्रेनविरोधात पुतिन यांचे समर्थक. पण झेलेन्स्की यांना फटकारून पुतिन यांना कुरवाळल्यामुळे आपण प्रत्यक्षात रशिया-चीन संबंधांस अप्रत्यक्षपणे बळकट करत आहोत याचेही भान ट्रम्प यांस नाही. म्हणजे उद्या चीनने अमेरिका-धार्जिण्या तैवान या देशाचा घास घेण्याचा प्रयत्न केल्यास आणि त्यास पुतिन यांनी साथ दिल्यास ट्रम्प यांस स्वत:चे मनगट चावत बसावे लागेल हे उघड. पुतिन यांनी देशांतर्गत राजकारणातील अनेक ट्रम्प पचवलेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रम्प यांनाही पचवणे त्यांच्यासाठी अवघड नाही. कारण ट्रम्प स्वत:हून स्वत:च्या पायांनी चालत पुतिन यांच्या सापळ्याकडे निघालेले आहेत. नवे, जगावेगळे काही करून दाखवण्याच्या नादात आपण आपल्या जुन्या चिरेबंदी वाड्यास सुरुंग लावत आहोत हे कळण्याइतकीही समज ट्रम्प यांच्या ठायी नसेल तर लवकरच अमेरिकेस पश्चात्ताप झाल्याखेरीज राहणार नाही, हे निश्चित. तो देश आपल्या अध्यक्षाचे सर्व प्रमाद पोटात घालू शकतो. अपवाद फक्त एक.
रशिया-धार्जिणेपण. ते सामान्य अमेरिकनांसही आवडत नाही. झेलेन्स्की यांचा जाहीर पाणउतारा करून ट्रम्प यांनी आपले पुतिन-प्रेम उघड केले. या घोडचुकीविरोधात ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षातून टीकेचे सूर उमटू लागल्यास आश्चर्य वाटू नये. दुसरी बाब म्हणजे आपल्या वागण्याने ट्रम्प यांनी स्वत:च सर्व जगास अमेरिकेविरोधात एकत्र येण्याची गरज दाखवून दिली. युरोपीय महासंघ शिष्टमंडळाची ताजी भारतभेट ही ती गरज प्रत्यक्षात कशी येऊ शकते हेच दाखवून देते. झेलेन्स्की यांस अपमानित करण्याचा आनंद ट्रम्प यांस भले मिळाला असेल. पण एका महाप्रचंड, महासंपन्न अर्थव्यवस्थेच्या प्रमुखाने एका भिकेला लागलेल्या, विच्छिन्न देश प्रमुखास असे वागवणे हे ट्रम्प यांचे दारिद्र्यनिदर्शक आहे. झेलेन्स्की आणि युक्रेन यांचे काय व्हायचे ते होईल. पण ‘मारिता मारिता मरावे’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे झेलेन्स्की यांनी ट्रम्प हे कसे ‘विश्व’गुंड आहेत हे दाखवून देण्याची हिंमत दाखवली. अंतिमत: ट्रम्प हे खलनायक ठरले. हे झेलेन्स्की यांचे यश.