भारत नवउद्यमींची राजधानी झाल्यामुळे नवउद्यमींच्या वाढत चाललेल्या उत्साहाला आणि उन्मादाच्या फुग्याला अमेरिकी वित्तसंस्थेच्या कृतीमुळे आता टाचणी लागेल..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रत्येक नव्या गोष्टीचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करण्याची एक नवीनच अजागळ सवय आपल्याकडे अनेकांस लागल्याचे दिसते. जणू जे काही घडते आहे ते अभूतपूर्व आहे; सबब त्याचे स्वागत करणे आपले कर्तव्यच, असा अनेकांचा आविर्भाव. एकंदरच सामाजिक विवेक नावाचा प्रकार अलीकडे झपाटय़ाने कमी होऊ लागल्याने अनेक जण या लाटेत वाहून जातात आणि आपण वाहवत गेल्याचे त्यांस उमजतही नाही; इतके ते विचारांनी हलके असतात. या विवेकास सामुदायिक रजा दिली गेल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्टार्टअप्स’ वर्गवारीतील नवउद्यमी. वास्तविक हे नवउद्यमी जन्मास येईपर्यंत उद्योग आणि उद्योजक आपल्याकडे अवतरलेच नाहीत; असे नाही. पण तरीही या ‘स्टार्टअप्स’चे चोचले जरा जास्तच झाले. त्यात देशाच्या सर्वोच्च अधिकारी व्यक्तीने भारत ही कशी नवउद्यमींची भूमी होत असल्याचे नेहमीप्रमाणे ‘ठोकून देतो ऐसाजे’ छापाचे विधान केल्यानंतर जेथे भले भले चेकाळले; तिथे भक्तगणांची काय कथा? तथापि ‘बैजु’ या शिक्षण-तंत्रज्ञान-अॅप स्टार्टअपबाबत जी ताजी घटना घडली तीमुळे यातील काही जण तरी भानावर येऊ शकतील. अमेरिकी वित्तसंस्थेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज फेडणे ‘बैजु’ने नाकारले असून त्यामुळे एका नव्याच कज्जेदलालीस तोंड फुटण्याची शक्यता दिसते. बैजु हे आपल्याकडील सर्वात मोठे आणि यशस्वी स्टार्टअप. त्याच्यावर ही वेळ आल्यामुळे सदर विषयाचा ऊहापोह आवश्यक ठरतो.
तसे पाहू जाता ‘बैजु’ हे केवळ शिकवणी वर्ग. फक्त ते ऑनलाइन पद्धतीने घेता येत असल्याने त्याने भौगोलिक मर्यादा ओलांडल्या. तसेच प्रत्यक्ष, सदेह शिकवणी घ्यावयाची झाल्यास तज्ज्ञांच्या उपलब्धतेस ज्या मर्यादा येतात त्यावर तंत्रज्ञानाने मात करून या ‘बैजु’ने आभासी जगातील शिकवण्या सुरू केल्या. या प्रक्रियेत सहभागी झाल्याने आपले पुत्र/पुत्री आता बृहस्पतीला मागे सारणार असा अनेकांचा समज झाला आणि त्यास धो धो प्रतिसाद मिळाला. कोणास व्यावसायिक यश मिळाले म्हणून अन्यांस पोटदुखी होण्याचे कारण नाही. पण या यशातील तात्कालिकता विचारातही घेण्यास कोणी तयार नव्हते; ही यातील चिंतेची बाब. यामुळे सदर आणि अन्य अनेक नवउद्यमींचे बाजारमूल्य अवाच्या सवा फुगले आणि परिणामी गुंतवणूकदारही सेन्सेक्सच्या विक्रमात गुंगून गेले. या सर्व नवउद्यमींचा गल्ला महसुलाने ओसंडून वाहताना दिसला असता तर याबाबतही एरवी आक्षेप असायचे कारण नव्हते. महसूल वाढताना दिसणे आणि जुने-नवे कोणीही असो उद्यमींनी नफा कमावणे नैसर्गिक ठरले असते. पण यातील अनेक नवउद्यमींचा ना महसूल वाढला आणि ना त्यामुळे नफावृद्धी झाली. तरीही गुंतवणूकदारांकडून आलेल्या निधीद्वारे यातील अनेक नवउद्यमींचे बेफाट विस्तारीकरण सुरू राहिले आणि सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादासाठी हे ‘यश’ साजरे केल्याने अनेक नवउद्यमींच्या बेडक्या फुगून औद्योगिक विश्वास वाकुल्या दाखवू लागल्या. तथापि आज ना उद्या वास्तव सर्वासमोर येणे अटळ होते. तसे ते येण्यास सुरुवात झाली असून देशातील सर्वाधिक यशस्वी, बलाढय़ वगैरे म्हणून साजरे केले गेलेल्या ‘बैजु’बाबत समोर आलेला तपशील धक्कादायक ठरतो.
आपल्या बाजारपेठ विस्तार मोहिमेचा भाग म्हणून ‘बैजु’ने अमेरिकी गुंतवणूकदाराकडून १२० कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले. ते ‘टर्म लोन बी’ या वर्गवारीतील होते. या वर्गातील ऋणकोस सुरुवातीस दीर्घ काळ कर्जावरील फक्त व्याजाचीच परतफेड करावयाची असते आणि मुद्दल परतफेडीस बराच वेळ दिला जातो. त्यानुसार या कर्जफेडीसाठी ‘बैजु’स पुरेसा अवधी होता. तथापि दरम्यानच्या काळात ‘बैजु’च्या आर्थिक स्वास्थ्याविषयी अनेक उलटसुलट बातम्या आल्याने असावे बहुधा; पण या अमेरिकी धनकोने या कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीसाठी आगाऊ तगादा लावणे सुरू केले. त्याचे प्रमाण वाढल्याने ‘बैजु’ने अमेरिकेत न्यायालयाकडे धाव घेतली. सदर प्रकरणी निकाल अद्याप आलेला नाही. दरम्यान जूनच्या पहिल्या आठवडय़ात या कर्जावरील व्याजाचा हप्ता भरण्याचा दिवस जवळ आला. पण आर्थिक तसेच न्यायालयीन कारणांमुळे ‘बैजु’ने हा हप्ता भरणे साफ टाळले. कारणे काहीही असोत. असे करणे हे ‘हप्ता चुकवणे’ या वर्गवारीतच मोडते. आपण हा हप्ता जाणीवपूर्वक भरत नसल्याचे ‘बैजु’चे म्हणणे! म्हणजे कर्जाचा हप्ता भरणे चुकलेले नाही; तर ते ठरवून चुकवलेले आहे. चुकणे असो वा चुकवणे! दोन्हींचा परिणाम एकच असतो. तसेच देशी असो वा परदेशी, कर्जाचा हप्ता चुकवणे हे कोणत्याही अर्थव्यवहारात गंभीरच असते आणि असे झाल्यानंतर कज्जे-दलाली सुरू होते. ‘बैजु’बाबत ती सुरू झाली असून या एकाच विषयावर अमेरिकेत दोन ठिकाणी खटले गुदरण्यात आले आहेत. हे दुर्दैवी म्हणायला हवे. कारण अशा तऱ्हेने ‘बैजु’ ही अमेरिकी धनकोचे कर्ज बुडवणारी पहिली भारतीय नवउद्यमी कंपनी ठरली. म्हणजे जे चांगले शिक्षण देणे हे या शिक्षण क्षेत्रातील कंपनीचे उद्दिष्ट होते त्याला खुद्द कंपनीच्या वर्तनानेच तडा गेला.
या पार्श्वभूमीवर ‘बैजु’च्या आर्थिक आरोग्याची परखड चिकित्सा गरजेची ठरते. तसे करू गेल्यास डोळय़ात भरणारी बाब म्हणजे २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षांत वाऱ्याच्या वेगाने वाढलेला या कंपनीचा तोटा. त्या आकडेवारीनुसार त्या वर्षांत ‘बैजु’चा तोटा दररोज सरासरी १२ कोटी रुपये इतक्या जोमाने वाढत गेला. त्या वर्षांत ‘बैजु’चा महसूल २४२८ कोटी रुपये होता तर त्या तुलनेत कंपनीचा तोटा ४५०० कोटी रुपयांवर गेला. हाही विक्रमी म्हणायचा. कोणत्याही भारतीय नवउद्यमीस इतका तोटा सहन करावा लागल्याचे अन्य उदाहरण नाही. आतापर्यंत ‘नास्पर्स’, ‘टायगर ग्लोबल’, ‘सिल्व्हर लेक’, ‘बी कॅपिटल बॅरन फंड्स’, ‘यूबीएस ग्रुप’ आदी अनेक बहुराष्ट्रीय धनकोंकडून ‘बैजु’स आर्थिक मदत मिळाली असून अशा अनेक गुंतवणूकदारांमुळे ‘बैजु’चे मूल्यांकन वाढण्यास मोठय़ा प्रमाणावर मदत झाली. या आणि अशा पद्धतींमुळे केवळ ‘बैजु’च असे नव्हे तर जवळपास सर्वच नवउद्यमींचे मूल्यांकन वाढत राहिले. यातील बहुतांश नवउद्यमींकडे त्यांची स्वत:ची महसूल योजना नाही. म्हणजे आपली कमाई कोठून येणार, ती किती असेल आणि मुख्य म्हणजे ती कधी सुरू होणार या प्रश्नाची उत्तरे देण्यात या नवउद्यमींना काडीचाही रस नसतो. त्यांचा अहं तर असा की महसूल, नफा इत्यादी संकल्पना कालबाह्य झाल्या आहेत की काय, असे वाटावे. या मंडळींचे पाठीराखेही असेच. नवउद्यमींस हे असे काळ-काम-वेग, नफा-तोटा यांचे हिशेब विचारणे अयोग्य असे या वावदुकांसही वाटते. त्यात या सर्वाचे राजकीय कौतुक झाल्यामुळे आणि भारत हा नवउद्यमींची राजधानी झाल्यामुळे या सर्वाचा उत्साह आणि उन्माद चांगलाच वाढू लागला होता. अमेरिकी वित्तसंस्थेच्या कृतीमुळे या सर्वाच्या फुग्यास टाचणी लागेल. एक उद्योजक, व्यावसायिक म्हणून ‘बैजु’ जे करतो ते त्याचे त्यांस लखलाभ. पण इतरांनी अक्कल गहाण टाकून उगाच बावरे होण्याची गरज नाही. तसे केल्यास ते अंगाशी येते याचे भान या मंडळींस आणि त्यास फुकाचे उत्तेजन देणाऱ्यांस येईल, ही आशा.