पोलीस बंदोबस्तातील महिलांना विवस्त्र करून अत्याचार झाले, त्याआधी शस्त्रागार लुटले गेले, त्या मणिपूरबद्दल तीन महिन्यांनी का असेना पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त झाले ते बरे झाले..
ही घटना अशी की तिचा निषेध, धिक्कार करण्यास भाषाकोविदही योग्य शब्दांअभावी सुन्न होतील. हे असे व्हावे असे काय घडले? त्या राज्यातील दोन समुदायांत कित्येक महिन्यांची तेढ आहे. त्यातून उफाळलेल्या हिंसाचारात अनेकांचा बळी गेलेला आहे. अशा वेळी अप्रत्यक्ष सरकार समर्थक जमावातील गुंडांची एक तुकडी दुसऱ्या समाजाच्या वस्तीवर सशस्त्र हल्ला करते. त्यास घाबरून स्थानिक महिला पळून जातात. स्थानिक पोलीस त्यांना गाठून सरकारी यंत्रणेद्वारे सुरक्षित स्थळी नेऊ लागतात. या मार्गातील एक वस्ती हल्लेखोर समाजाची. तेथून जात असताना हा समाज त्या महिलांवर हल्ला करतो. त्यांना पोलीस बंदोबस्तातून वेगळे केले जाते. सज्जन पोलीस ते होऊ देतात. मग जमाव त्यातील एकीच्या वडिलांस ठार करतो. या महिलांना विवस्त्र करतो. त्यातील सर्वात तरुण महिलेवर सामुदायिक बलात्कार होतो. या अभागी तरुणीच्या अब्रूरक्षणार्थ प्रयत्न करणाऱ्या तिच्या भावास तेथल्या तेथे मारून टाकले जाते. हे वासनाकांड शमल्यानंतर जीव कसाबसा वाचवलेल्या या महिला स्वत:स सावरतात. एव्हाना पोलीस गायब झालेले असतात. या महिलाच पोलीस ठाणे गाठतात. तक्रार करण्याची, हिंमत दाखवतात. पण ती नोंदवली जाते ती तब्बल एक महिन्याने आणि घटनेच्या दोन महिन्यांनंतर या प्रकरणी एकाही आरोपीस साधी अटकही होत नाही. अखेर समाजमाध्यमांतून त्यास वाचा फुटल्यानंतर आणि संपूर्ण जगात पुरेशी छी थू झाल्यानंतर जगातील सर्वात मोठय़ा पक्षाचे सर्वोच्च नेते, ‘लोकशाहीची जननी’ असलेल्या देशाचे पंतप्रधान गुन्हेगारांस ‘कडी से कडी’ शिक्षा होईल, इतकी प्रतिक्रिया देतात. तीन महिन्यांहून अधिक काळ पेटत असलेल्या, धुमसत असलेल्या, अभागींचे प्राण घेणाऱ्या प्रदेशातील खदखदीवर माननीय पंतप्रधानांचे हे पहिले भाष्य असते. ते त्यांच्या मुखातून निघावे यासाठी ‘बेटी बचाओ..’ अभियान हाती घेणाऱ्या सरकारसमोर महिलांवरील या आदिम अत्याचाराची घटना समोर यावी लागली, यापरते अधिक दुर्दैव ते कोणते? मे महिन्यातील या घटनेस साधी वाचा फुटण्यासाठी इतका काळ जावा लागला यावरून मणिपूरमधील त्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृतांनी केवळ त्या भगिनींनाच विवस्त्र केले नाही, तर येथील संपूर्ण व्यवस्थेसही नग्न केले हे सत्य. म्हणून हा प्रश्न : नागडे कोण?
खरे तर या व्यवस्थेच्या नग्नीकरणाची प्रक्रिया मणिपूर राज्यात गेले कित्येक महिने सुरू आहे. कुकी आणि मैतेई समाजाच्या गटांनी चक्क सरकारी शस्त्रागारे लुटली. त्यानंतर सूचक सरकारी दुर्लक्षाचे अभय मिळालेल्या मैतेईंनी ठरवून ठरवून कुकींस वेचून मारणे सुरू केले आणि कुकींनी मैतेईंस. परिस्थिती इतकी गंभीर बनली की सरकारी कर्मचाऱ्यांतही हा दुभंग उफाळून आला आणि या दोन समाजाच्या कर्मचाऱ्यांनी परस्परविरोधी भागांत काम करण्यास नकार दिला. आंदोलक ‘कार्यकर्ते’ शस्त्रे चोरत असताना मैतेई समाजाच्या कर्मचाऱ्यांनी ते ‘आपल्या’ समाजाचे आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या आंदोलकांची भीड इतकी चेपली की शांतता प्रस्थापित करण्यास पाचारण केलेल्या लष्करावरही हात उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आपल्या पक्षाकडे असलेले सरकार यातून ‘विवस्त्र’ होत आहे हे दिसल्यावर त्याच्या लज्जारक्षणार्थ साक्षात गृहमंत्री अमित शहा मणिपुरात चार दिवस तळ ठोकून राहून आले. तरीही मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना स्वसरकारच्या नग्नीकरणाची प्रक्रिया थांबवता आली नाही. अशा वेळी या सिंहाने खरे तर स्वत: पदावरून दूर होणे हे निदान स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी तरी योग्य ठरले असते. पण नाही. आहे त्या चतकोर तुकडय़ासह ते पदास चिकटून राहिले. स्वत:च्या समर्थनार्थ फोकनाड मेळावे घेत राहिले. खरे तर या सिंहाचा पक्ष अब्रूरक्षण, नैतिकता इत्यादींस केवढे महत्त्व देतो. त्यामुळे खरे तर या पक्षाने या सिंहाचा राजीनामा घेऊन त्यास परत गुहेत पाठवणे आवश्यक होते. पण तसे काही झाले नाही. म्हणून मणिपुरातील हा भयानक प्रकार समस्त देशास प्रश्न करतो : नागडे कोण?
हा भयंकर प्रकार परवा उघडकीस आला आणि त्यामुळे व्यवस्थेचे वस्त्रहरण सहन करण्याची वेळ आपल्यावर आली. आता सर्वोच्च सत्ताधीश यावर धक्का बसल्यासारखे दाखवतात. त्याचे स्वागत. या देशातील अनेक विवेकी व्यक्ती आणि माध्यमे गेले तीन-चार महिने मणिपूरच्या अवस्थेबाबत अक्षरश: टाहो फोडत आहेत. पण केवळ स्वत:चाच आवाज ऐकून फक्त त्यालाच दाद देण्याची सवय लागलेल्या नेतृत्वाने त्या सगळय़ाकडे काणाडोळा केला. या प्रकरणाचे गांभीर्य असे की ‘लोकसत्ता’ने ‘ईशान्येची आग’ (५ एप्रिल), ‘डबल इंजिनाचे मिथक’ (१० मे), ‘मुख्यमंत्र्यांना हाकलाच’ (३१ मे), ‘सिंह आणि सिंग’ (२० जून) इत्यादी संपादकीयांतून यावर भाष्य केले. इतकेच काय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे मुख्यालय असलेल्या युरोपीय संघटनेच्या प्रतिनिधीगृहानेही मणिपुरातील परिस्थितीची दखल घेतली. विद्यमान सरकारच्या कोणत्याही अपयशापासून सुरक्षित अंतरावर राहणाऱ्या रा.स्व. संघालाही मणिपुरातील परिस्थितीबाबत भाष्य करावे लागले. संघाने हिंसाचाराचा निषेध केला आणि राज्यातून त्यामुळे परागंदा व्हावे लागणाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली. तरीही काही घडले नाही. सत्तेवर राहण्याचे सर्व नैतिक अधिकार गमावलेल्या मुख्यमंत्री सिंहास त्याच्या पक्षाकडून सातत्याने अभय मिळत राहिले. त्या राज्यातील अत्याचाराच्या ताज्या वृत्ताने सर्वोच्च न्यायालयही अस्वस्थ झाले आणि सरन्यायाधीशांनी कारवाईचा इशारा दिला, हे ठीकच. पण पंतप्रधानांस तुम्ही आंबा कसा खाता.. असा अत्यंत बुद्धिमान, गुह्य प्रश्न विचारणाऱ्या, ‘भारत’ मनोजकुमारचा त्याच्या हयातीतच पुनर्जन्म असलेला महान अभिनेता अक्षयकुमार यांसही मणिपुरातील घटनांनी अस्वस्थ केले. सामाजिक जाणिवेचा कडेलोटच म्हणायचा हा. तो होण्यास कारणीभूत असलेल्या या घटनेतून म्हणून प्रश्न निर्माण होतो: नागडे कोण? तेव्हा तीन महिन्यांनी का असेना पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर व्यक्त झाले ते बरे झाले. तसे व्यक्त होताना त्यांनी अन्य राज्यांतील अशा अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख केला तेही बरे झाले. तो का केला हे सांगण्याची गरज वाटावी इतकी आपली जनता राजकीय अशिक्षित निश्चितच नाही. या पाठोपाठ सत्ताधारी भाजपचे नेते अन्य कोणत्या राज्यांत महिलांवर किती अत्याचार झाले याचे साद्यंत वृत्तांत देतील. समाजमाध्यमी टोळ आणि भक्तभैरव या ज्ञानप्रसादाचा योग्य तो प्रसार करतील. त्यातील काही अधिक निष्ठावान ‘‘सुमारे ७८ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेस संसद अधिवेशनाच्या तोंडावरच वाचा फुटते ते कसे?’’, असा चतुर प्रश्न विचारून टाळय़ांची देवाण-घेवाणही करतील. ‘आपल्या’ विचारांचे सरकार असलेल्या राज्यातील पोलिसांच्या बंदोबस्तात असताना हे असे कसे काय घडू शकते, हा प्रश्न मात्र या चतुरांच्या तैलबुद्धीस स्पर्श करणार नाही. पण ज्यांना हे भयानक, जीवघेणे आयुष्यात कधीही विसरता न येणारे अत्याचार सहन करावे लागले, त्या महिलांचे याच्याशी काहीही देणेघेणे नसेल. अशा तऱ्हेने राजकारणाच्या दलदलीत ही अत्याचार कहाणी अशीच दबली जाईल. ‘माझ्या पक्षाच्या राज्यातील अत्याचार’ विरुद्ध ‘तुझ्या पक्षाच्या राज्यातील अत्याचार’ याचे तपशील वाहू लागतील. आणि मग ‘नागडे कोण’ या प्रश्नाचा आकार अधिकच मोठा होईल. तथापि त्यास सामोरे जाण्याइतका समाजविवेक अद्याप शिल्लक आहे काय इतकीच काय ती शंका.