विश्व करंडक क्रिकेटचे सामने (वर्ल्ड कप क्रिकेट) २०१५ सालात १४ फेब्रुवारी (शनिवार) ते २९ मार्च (रविवार) पर्यंत आहेत. सर्व लहानथोर मंडळींना या वर्ल्ड कप क्रिकेटच्या सामन्यांचे आकर्षण असते. दहावी बोर्डाची परीक्षा नेमकी त्याच दरम्यान असणार. माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाने व मा. शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता २३ फेब्रुवारी (सोमवार) २०१५ पासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू केल्यास १६ मार्च (२०१५) पर्यंत परीक्षा संपू शकेल आणि विद्यार्थी वर्ल्ड कप क्रिकेटचे शेवटी असलेले सामने छानपैकी पाहू शकतील. ६ मार्चला धूलिवंदनाची सुटी (२०१५ सालात) असणार आहे. तोंडी परीक्षा (भाषा विषयांच्या) व प्रात्यक्षिक परीक्षा (विज्ञान- तंत्रज्ञानाची) वाटल्यास १६ मार्चनंतर घ्याव्यात, असे सुचवावेसे वाटते.
दिवाळी सुटी रविवार सोडून दहा दिवसांची द्यावी, म्हणजे दहावीला शिकवायला पुरेसे दिवस मिळतील. नाही तरी गणितासह विज्ञान-तंत्रज्ञान व समाजशास्त्र विषयांच्या कमी गुणांच्या उत्तरपत्रिका (नववी व दहावीच्या) शिक्षकांना गेल्या वर्षीपासून तपासाव्या लागत असल्याने रविवारसह १२ दिवसांची दिवाळी सुटी सर्वाना पुरेशी आहे असे वाटते. वाटल्यास नाताळ सुटी सर्व शाळांनी २५ डिसेंबर (गुरुवार) ते २८ डिसेंबर (रविवार) अशी सलग चार दिवसांची (रविवार धरून) द्यावी. दिवाळी २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान असल्याने दिवाळी सुटी १७ ऑक्टोबर (शुक्रवार) ते २८ ऑक्टोबर (मंगळवार) दरम्यान घ्यावी आणि सरकारने दुसऱ्या सत्रात शाळा २९ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू कराव्यात.
गेली दोन-तीन वर्षे दिवाळीच्या तोंडावर दिवाळी सुटी सुरू केली जाते. त्यामुळे परगावी जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांना खूप गैरसोयीला सामोरे जावे लागते, हे गेल्या वर्षीच्या वर्तमानपत्रांतून सर्वानी वाचले असेलच.
दीनानाथ गोरे, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा