अंतरीक्ष राजा जनकाला सांगतो की, ‘‘हे राजा, मनुष्य देहाची जी कर्मेद्रियं आणि ज्ञानेंद्रियं आहेत ना, ती अचेतन आहेत!’’ म्हणजे काय? आपल्याला वाटेल की, डोळे अचेतन कसे असतील? पण मृत्यूनंतरही कधी कधी डोळे उघडेच राहिलेले असतात, पण ते हालचाल करतात किंवा पाहतात का? तर नाही. मृत्यूनंतरही हात-पाय असतात, पण त्या पायांनी चाललं जात नाही की हातांनी काम करता येत नाही. याचाच अर्थ, सगळी इंद्रियं जागच्या जागी असूनही त्या इंद्रियांद्वारे कृती करवून घेणारी चैतन्यशक्तीच देहात न उरल्यानं त्या इंद्रियांच्या अचेतनेचं वास्तव उघड होतं. तर ही दहाही इंद्रियं अचेतन असतात आणि त्यांच्यात प्रवेश करून तो नारायण, तो परमात्मा त्यांच्यात चैतन्य भरतो आणि त्यांच्याकरवी वर्तन करतो. मग अंतरीक्ष, सहज लक्षात न येणारं, पण गूढमधुर असं सत्य सांगतो : एक परमात्म शक्तीच सर्वत्र भरून आहे व तो एकरूप परमात्माच दोन होऊन स्वत:च स्वत:चं निजसुख, आत्मसुख भोगत आहे! म्हणजे काय? तर डोळ्यांत पाहण्याची शक्ती बनून डोळ्यांकरवी बाह्य़ जग पाहवितो. पण या बाह्य़ जगातही तोच तर भरून आहे! म्हणजेच या देहाच्या डोळ्यांकरवी तो सृष्टीत स्वत:लाच पाहत असतो! (दृष्टीमाजीं झाला ‘देखणें’। दृश्य प्रकाशी दृश्यपणें। ऐसेनि प्रकाशकपणें। दृश्याभरणें दाखवी।।११७।।) मग कानांनी तोच शब्द ऐकवतो; पण तो शब्ददेखील तोच आहे, त्या शब्दातला अर्थही तोच आहे. (श्रवणीं झाला तो ‘ऐकणें’। शब्द प्रकाशी शब्दलक्षणें। मग अर्थावबोधकपणें। शब्दविंदानें ऐकवी।।११८।।) जिव्हेद्वारे तो रसाची रुची चाखवतो, पण रसातली रुचीही तोच आहे! याप्रकारे तो जनार्दनच जनांना अनेक प्रकारचे रससेवन करवितो. (रसीं ‘रसस्वादु’ नारायण। रसने तोचि रसस्वादन। यापरी नाना रससेवन। करवी जनार्दन जनांमाजीं।।११९।।) इथं जन म्हणजे निजजन, शिष्य व जनार्दन म्हणजे सद्गुरू! तर भक्तिरसातला रस सद्गुरुप्रेम हेच आहे आणि त्या रसाचा आस्वाद घेण्याची क्षमताही तोच भक्तामध्ये निर्माण करतो! म्हणजे, या जगात सद्गुरू सत्ताच कार्यरत आहे, याचं दर्शन तो याच डोळ्यांना घडवतो आणि ते पाहून जाणण्याची क्षमताही तोच देतो. कानांना ऐकण्याची क्षमता तोच देतो; पण भोवतालच्या माणसांच्या बोलण्यातूनही तोच काही सांगत आहे, हे उमजण्याची आणि त्या साध्या बोलण्यातील नेमका बोध ऐकण्याची क्षमताही तोच देतो. पाहणं व ऐकणं याबाबतची उदाहरणं आता पाहू. एकदा ‘गझनी’ हा चित्रपट एकाच दिवशी दोनदा पाहिला गेला. प्रथम पाहताना त्यात लपलेला बोध ‘दिसला’ नाही, पण पुन्हा पाहताना जाणवलं की, अरे, या नायकाप्रमाणेच सर्वसामान्य माणसाचीही गत आहे! त्यालाही अल्पमुदतीच्या स्मरणाचा विकार जडला आहे. त्यामुळे तो वारंवार जगण्याचं उद्दिष्ट विसरतो. ते त्याला आठवावं म्हणून तर देवादिकांची-सत्पुरुषांची छायाचित्रं, स्तोत्रं आहेत! ती पाहताच त्याला जीवनहेतूचंच पुन:पुन्हा दर्शन आणि स्मरण होतं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com