आपल्याला लाभलेला मनुष्य देह आणि पाचही ज्ञानेंद्रियं आणि कर्मेद्रियांच्या क्षमता अतुलनीय आहेत. मात्र त्याच क्षमता विषयांच्या ओढीत अडकल्या तर त्या माणसाला आसक्तीच्या बेडीत अडकवतात. मग जे जे सुखाचं भासत असतं तेच दुखरूप भासू लागतं. नाथ महाराज सांगतात, ‘‘केवळ नश्वर विषय देख। तेंचि मानिती परम सुख। तें सुखचि दुखदायक। स्त्रीकामें मुख्य माया बाधे।।२३२।।’’ ज्याचं मन आणि चित्त नश्वर, अशाश्वत गोष्टींच्या ओढीत रममाण असतं आणि त्यांनाच परम सुख मानत असतं तेच सुख नंतर दुखदायक होतं. या ओवीच्या अखेरीस ‘स्त्रीकामें मुख्य माया बाधे,’ असा जो उल्लेख आहे त्याचा खरा रोख लक्षात घेतला पाहिजे. इथे स्त्रीची निंदा नाही. कारण या ओवीच्या विवरणात, जिनं आपल्याला नऊ महिने पोटात वाढवलं त्या आईलाही स्त्रीकामनेपोटी अवमानित करण्याचा गुन्हा केला जातो, अशी टीका आहे (जे नवमास वाहे उदरांत। ते माता करुनि अनाप्त। स्त्रियेसी मानिती अतिआप्त। ऐशी माया समर्थ स्त्रीकामें ।।२३६।।). इतकंच नव्हे, तर मातेच्या सेवेनं पुण्य लाभतं, हे जाणणारे ज्ञानीसुद्धा स्त्रीमोहापुढे मातेला दुर्लक्षित करतात, असंही नमूद आहे. म्हणजेच हा स्त्रीविरोध नव्हे. पुन्हा मागेच म्हटल्याप्रमाणे स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू मानून स्त्री देहाचं जे वर्णन मध्ययुगात सुरू होतं त्या पाश्र्वभूमीवर संतांनी केलेली निंदा लक्षात घेतली पाहिजे. बरं ही निंदा ‘कामिनी’ची नसून काम्य विषयातील आसक्तीची आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. मग ती कामनासक्ती कामविषयाची असो, संपत्तीची असो, नावलौकिकाची असो की कुठलीही असो! एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘निजदेहोचि नश्वर येथ। त्यासि प्रपंच नव्हे गा शाश्वत। अवघें जगचि काळग्रस्त। इहलोकीं समस्त ठकिले विषयीं ।। २५८।।’ म्हणजे जिथं हा देहच शाश्वत नाही, तर त्या देहाचा प्रपंच तरी कायम टिकणारा कसा असेल? अहो हे अवघं जगच काळाच्या पकडीत असताना आणि क्षणभंगुर म्हणजे कोणत्या क्षणी त्या जगाचं जीवासाठीचं अस्तित्व भंग पावेल, याची शाश्वती नसताना समस्त जीवमात्र मोहविषयांनी ठकविले गेले आहेत. या नश्वर जगातच शाश्वत सुखासाठी माणूस धडपडतो, पण मृत्यूनंतर स्वर्गसुख मिळावं, या हेतूनं ‘पुण्यकम्रे’ही करतो. पण हा जीव या जगात जसा नश्वर आहे तसाच स्वर्गातदेखील नश्वर आहे! (हा जैसा नश्वर येथ। तसाच निश्चित नश्वर स्वर्गु ।।२५९). पण तरी तो यज्ञादि कम्रे यथासांग करून स्वर्गातही जातो, पण ज्या स्वर्गात देवराज इंद्रालादेखील पद गमावण्याचं भय आहे तो स्वर्ग भयमुक्त तरी आहे का? नाथ म्हणतात, ‘‘स्वर्गसुखा इंद्र अधिपती। तोही पतनार्थ धाके चित्तीं।’’ जो स्वर्ग पुण्यबळानं प्राप्त होतो तिथं पुण्य गमावण्याचं भयही आहेच! (यापरी निजपुण्यें स्वर्गप्राप्ती। त्या लोकातें ‘पुण्यजित’ म्हणती। तेही पुण्यक्षयें क्षया जाती। तेणें धाकें धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ ।।२६२।।). समान पुण्य असेल त्यांना समान पद मिळत असल्याने स्वर्गस्थ देवांमध्येही कलह आणि द्वेष आहे. नाथमहाराज सांगतात, ‘‘समान पुण्यें समपदप्राप्ती। त्यांसी स्पर्धाकलहो करिती। आपणाहूनि ज्यां अधिक स्थिती। त्यांचा द्वेष चित्तीं अहíनशीं।।२६४।। जैसे राजे मंडळवर्ती। राज्यलोभें कलहो करिती। तशी स्वर्गस्थां कलहस्थिती। द्वेषें होती अतिदुखी।।२६५।।’’ म्हणजेच अशाश्वतात खरं सुख नाही, मग भले तो स्वर्गही का असेना. मग प्रश्न हा की खरं परमसुख आहे कुठे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा