कर्माची आणि प्रारब्धाची साखळी कशी अतूट असते, हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी हिराभाई ठक्कर यांचं ‘कर्माचा सिद्धांत’ हे पुस्तक अवश्य वाचावं. त्यात संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध कर्माचा अतिशय सोप्या शब्दांत ऊहापोह आहे. त्यांच्या सांगण्यानुसार काही कर्माची फळं तात्काळ मिळतात. उदाहरणार्थ तहान लागली की आपण पाणी पितो त्या कर्माचं जे फळ, म्हणजेच तहान शमणं हे तात्काळ प्राप्त होतं. काही कर्माची फळं कालांतरानं मिळतात. उदाहरणार्थ परीक्षा देण्याचं कर्म घडलं, पण त्याचं फळ म्हणजे निकाल लागणं, ते परीक्षा देताक्षणी लाभत नाही, तर कालांतरानं प्राप्त होतं. पण काही कर्माची फळं कित्येक वर्षांनी, नव्हे काही जन्मांनीदेखील काळ आणि परिस्थितीनुसार प्राप्त होतात. तीच प्रारब्ध कर्मे! त्याचबरोबर निव्वळ कर्मच नव्हे, तर इच्छायुक्त संकल्पांचंही प्रारब्ध तयार होत असतं. इच्छित फळ मिळेपर्यंत जन्म आणि मृत्यूचं हे चक्र थांबत नाही. म्हणूनच अंतरीक्ष सांगतो, ‘‘फळाशा कर्म अतिदारुण। अमरां आणी अमित मरण। अजन्म्या अंगीं जन्म पूर्ण। पुन: पुन: जाण आदळती ॥१३८॥’’ हे राजा! प्रत्येक माणूस कोणती ना कोणती अपेक्षा मनात बाळगूनच कर्म करीत असतो. सर्व अपेक्षांचा पाया ‘सुख मिळावं’ हाच असतो! या सुखाच्या कल्पनेत मात्र गोंधळ असू शकतो. सुख म्हणजे नेमकं कोणतं, याच्या आकलनात गोंधळ असतो. त्यामुळे भ्रामक सुखासाठी धडपडताना माणूस नकळत दु:खाचीच तजवीज करीत असतो! कोणत्याही आणि कसल्याही प्रकारच्या कर्मानं मी सुखच मिळवीन, ही आशा मोठी दारुण असते. ती अमर अशा आत्मतत्त्वाला जन्म-मृत्यूचा धनी असलेल्या जीवात गोवते आणि मग जो अजन्मा आहे त्यालाही जन्मचौकटीत अडकवते, पुन्हा पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात ढकलते. इतकंच नाही तर, ‘‘एवं स्वर्ग आणि संसारा। जन्ममरणांच्या येरझारा। नाना योनि अपारा। निजकर्मद्वारा स्वयें भोगी॥१३९॥’’ असंही अंतरीक्ष सांगतो आणि एकप्रकारे ‘स्वर्गसुखा’ची मर्यादाही दाखवून देतो! स्वर्गप्राप्ती म्हणजे जणू माणसाला उत्तम गति लाभणं, असंही मानलं जातं. पण स्वर्गही अडकवतोच. इतकंच नाही तर गीतेतही म्हटल्याप्रमाणे, पुण्यभोग संपताच स्वर्गलोकातून पुन्हा मृत्युलोकात म्हणजे पृथ्वीवर ढकललं जातं! स्वर्ग आणि सतत सरत असलेल्या नश्वर संसारात जन्ममरणाच्या येरझारा सुरू होतात. सत्कर्म केल्यानं स्वर्गसुख आणि दुष्कर्मानं नरकदु:ख वाटय़ाला येत राहतं. त्या त्या जन्मांत नव्यानं निर्माण होणारं प्रारब्ध ते वेगळंच. मात्र तरीही आसक्तीच्या घाण्याला जुंपून घेण्याचा वीट काही येत नाही. अंतरीक्ष सांगतो, ‘‘डोळे बांधुनि जुंपिला घाणा। तेलियाचा ढोरु जाणा। करकरीतु परिभ्रमणा। अविश्रम जाणा भोंवतसे ॥१४०॥ तेवीं बांधोनि ज्ञानाचे डोळे। भोगूं जातां निजकर्मफळें। तंव जन्ममरणांचे सोहळे। भोगी आगळे अनिवार ॥१४१॥’’ तेलाच्या घाण्याला डोळे बांधलेला बैल जुंपला की तो अविश्रांतपणे गोल गोल फिरत राहातो. त्याप्रमाणे आसक्तीच्या घाण्याला जुंपलेला माणूस आपल्या मोह आणि भ्रमजन्य इच्छांच्या पूर्तीसाठी जन्मभर वणवण करतो, पण तरीही आसक्तीच्या चिखलातून तसूभरही पुढे सरकत नाही. जागच्या जागी राहतो. याचं कारण काय? तर त्यानं आत्मज्ञान चक्षूंवर मोहाची पट्टी बांधून जीवानं स्वत:ला आसक्तीच्या घाण्याला जुंपून घेतलं आहे. त्यामुळे जन्म-मरणाची अविरत येरझार त्याच्या वाटय़ाला आली आहे.                                                                   – चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा