चैतन्य प्रेम
श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘सुख तुम्हाला झोपवतं, तर दुख जागवतं!’’ सुखच सुख वाटय़ाला येतं तेव्हा माणसाचा विवेक, सदसद्विवेकबुद्धी लोप पावण्याचा धोका असतो. अहंभाव फुलून येण्याची शक्यता असते. त्यानं माणूस अधिकच संकुचित, देहबुद्धीमग्न होऊ शकतो. दुख वाटय़ाला येतं तेव्हा जो मानसिक धक्का बसतो तो माणसाला खडबडून जागं करतो. भानावर आणतो. जगण्याचा फेरविचार करायला भाग पाडतो. व्यक्तिगत दुखानं माणूस जागा होतो, तर मग जेव्हा हे दु:ख किंवा संकट एकटय़ापुरतं उरत नाही, व्यक्तीपुरतं न राहता समाजव्यापी होतं तेव्हा समाजमनही जागं झालं पाहिजे. आजच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही जाणीव प्रत्येकानं स्वत:ला करून दिली पाहिजे. एखादं समाजव्यापी संकट जेव्हा उग्रपणे समोर उभं ठाकतं तेव्हा त्यावर मात करण्यासाठी पसा आणि साधनांइतकीच आणखी एका गोष्टीची आत्यंतिक गरज असते ती गोष्ट म्हणजे माणुसकी! श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक वाक्य आहे की, ‘‘मनुष्य म्हणून जन्मलेला माणूस हा माणूस म्हणून मेला तर खरा!’’ म्हणजे या संकटात माणसातली माणुसकी जागी झाली पाहिजे. या जगात जेवढा विकास माणसानं केला तितका विकास अन्य कुणीही केला नाही आणि त्याचबरोबर जेवढा विनाश माणसानं केला तेवढा विनाशही अन्य कुणी केला नाही! माणूस म्हणून जन्माला येऊनही कित्येकदा पशूलाही लाजवील इतकं पशुवत् वर्तनही माणूस करतो. तेव्हा माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जागं करण्याचं, घडविण्याचं काम संतच सतत करीत असतात. साईकाका म्हणून एका संतावर ‘कल्पवृक्ष की छाँव में’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात एक कथा आहे. एक म्हातारी भिकारी स्त्री चार दिवसांची उपाशी होती. येईल-जाईल त्याच्याकडे ती काकुळतीनं याचना करीत होती. तिला एक साधू भेटला. त्याच्यासमोरही तिनं हात पसरले. त्यावर तो म्हणाला, ‘‘तुला द्यायला माझ्याकडे केवळ हा चष्मा आहे! हा घालून जो तुला माणूस दिसेल तो तुला खायला देईल!’’ म्हातारीनं चष्मा घातला, तर तिला धक्काच बसला. आजूबाजूच्या माणसांच्या जागी तिला जनावरं दिसू लागली! जनावरं कुठून खायला देणार? निराश मनानं ती फिरत असताना तिला एक अतिशय गरीब चर्मकार माणसाच्याच रूपात दिसला. तिला हायसं वाटलं. त्यानं तिला आपल्यातली एक भाकरी तर दिलीच, वर म्हणाला की, ‘‘इतक्यात राजाकरता मी शिवलेली पादत्राणं न्यायला वजीर येणार आहे. त्यानं मला मेहनताना दिला की मी तुला थोडे पैसेही देईन.’’ वजीर आला, तोही माणसासारखाच दिसत होता. त्यानं सर्व ऐकलं आणि मनाशी काही विचार करून म्हातारीला राजाकडे नेलं. राजाला त्या चष्म्याबद्दल कळताच नवल वाटलं. त्यानं तो चष्मा घालून आरशात पाहताच त्याला आपल्या जागी गाढवाचा चेहरा दिसला. दरबारात पाहिलं, तर सगळीच जनावरं! त्यानं म्हातारीला विनंती केली की, ‘‘तू राजवाडय़ातच राहा आणि आम्हाला माणूस कर!’’ म्हातारी म्हणाली, ‘‘साधूनं फक्त चष्मा दिला. पशुवत् माणसाला माणूस बनविण्याची कला नव्हे! ती शिकायची, तर त्या साधूकडेच जावं लागेल!’’ तसं आजही समाजातली माणुसकी जागी करायची, तर माणसाला माणूस करावं लागेल आणि ती कला केवळ संतांच्या बोधाच्या आधारावरच शिकता येईल.