स्वजागृती आणि स्वसुधारणा या दोनच गोष्टी साधक जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जागृती कसली? तर ‘स्व’ची! ‘मी’ खरा कोण आहे, याचा शोध. ‘मी’ म्हणजे हा देह, ‘मी’ म्हणजे या शरीराला लाभलेलं नाव, या शरीराची त्या नावानं जगात असलेली ओळख- असं मानणं आणि त्या ‘मी’च्या अखंड जपणुकीत, जोपासनेत गुंतणं ही मोहनिद्रा आहे. त्या ओळखीपलीकडे जे अस्तित्व आहे त्याचा शोध सुरू होणं, हा स्वजागृतीचा प्रारंभ आहे. मी या देहगत ओळखीनं, परिस्थितीनं, मर्यादांनी बद्ध असेन, मात्र तरी मी या सगळ्यापलीकडे आहे. सगळ्यात असून सगळ्यापलीकडे सहज राहण्याची अपार क्षमता खरं तर माझ्यात आहे, ही जाणीव सद्गुरू आधारावरच होऊ शकते. मग त्या खऱ्या ‘मी’च्या आड, माझ्याच मोह-भ्रमातून ज्या ज्या गोष्टी येतात त्यातून मोकळं होणं, ही स्वसुधारणा आहे. सुधारणा हा शब्दच फार मनोज्ञ आहे. ‘सु’ म्हणजे सर्वोत्तम, मंगल, शुभ असं जे आहे ते आणि त्याची धारणा हीच सु-धारणा. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘अचेतन लोहचुंबकें चळे। लोहकर्मे चुंबक न मैळे। तेवि हा कर्मे करूनि सकळें। अनहंकृतिबळें अकर्ता।।७०८।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय दुसरा). लोहचुंबकाच्या शक्तीनं अचेतन असं लोखंड त्याच्याकडे खेचलं जाऊन चिकटतं, पण चुंबक काही लोखंडाच्या तालानुसार हालचाल करीत नाही! त्याप्रमाणे खरा साधक भक्त हा कर्मे करूनही त्या कर्मप्रभावात अडकत नाही. तो कर्तव्यकर्मे अचूक पार पाडूनही त्यापासून अलिप्तच राहतो. हे आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांच्या आवाक्यात आहे का हो? तर आहे! केवळ सद्गुरुबोध ध्यानात घेऊन त्यानुसार जगण्याचा अभ्यास, हाच त्यावरचा उपाय आहे. या अभ्यासासाठी खऱ्या भक्ताची जी लक्षणं नाथांनी ‘एकनाथी भागवता’च्या दहाव्या अध्यायात सांगितली आहेत, त्यावर वारंवार मनन, चिंतन केलं पाहिजे. ती लक्षणं आचरणात कशी येतील, याची तळमळ लागली पाहिजे. काय आहेत ही लक्षणं? तर पहिलं लक्षण म्हणजे सन्मानाविषयी उदासीनता! एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘मान देखोनियां दिठीं। लपे देहउपेक्षेच्या पोटीं। जेवीं चोर लागलिया पाठीं। लपे संकटीं धनवंतु।।१५४।।’’ म्हणजे चोराला पाहून एखाद्या धनवंताला जसं दु:ख होतं, तसं मानसन्मान, स्तुती आपल्याकडे चालून येत असल्याचं पाहून भक्ताला झालं पाहिजे. त्यानं तात्काळ ‘मी’पणाची उपेक्षाच केली पाहिजे. आता हा ‘मान’ कुठला हो? तर तो साधकपणाचाच आहे! आपल्या साधनेची, ज्ञानाची कुणी स्तुती करू लागला तर ती नकोशी वाटली पाहिजे. कारण त्यातून अहंकार बळावतो आणि साधकाची योग्यतादेखील अंगी आली नसताना स्वत:ला ज्ञानी मानण्याची चूक होऊ शकते. दुसरं लक्षण आहे निर्मत्सरत्व. म्हणजे कुणाचाच मत्सर न करणं. मत्सराचा उगम कशात आहे? तर आपण स्वत:ला मोठं वा ज्ञानी मानत असताना आपल्यापेक्षा अन्य कुणी ज्ञानात वा मोठेपणात आपल्याहून श्रेष्ठ असल्याची जाणीव होते, तेव्हा मत्सर निर्माण होतो! म्हणून नाथ महाराज सांगतात की, ‘‘निर्मत्सर होणें ज्यासी। तेणें सांडावें ज्ञानाभिमानासी।’’ आपण कुणीतरी आहोत, हा फुकटचा दर्पच साधकानं सोडून द्यावा. तरच तो निर्मत्सरी होऊ शकतो. भक्ताचं तिसरं लक्षण म्हणजे दक्षता! श्रीगोंदवलेकर महाराज यांची व्याख्याच आहे की, ‘‘साधक म्हणजे सदा सावध’’! नाथ महाराज सांगतात, ‘‘आळस विलंबु नातळे मना। त्या नांव ‘दक्षता’ जाणा।’’ आळस आणि विलंब ज्याच्या मनाला शिवत नाहीत, तोच खरा दक्ष असतो!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा