परमात्ममय सद्गुरू आणि सद्गुरूमय परमात्मा यांचं ऐक्य आहे.. आणि जसं अ=ब आणि ब=क असेल, तर अ=क होतंच, त्याचप्रमाणे परमात्ममय सद्गुरूचा शिष्य जर सद्गुरूमय झाला की तो परमात्ममय होतोच, हे सांगितलं खरं, पण ही प्रक्रिया एवढी सोपी आहे का हो? नक्कीच नाही. कारण, ‘अ=ब’ आहेच, पण ‘ब=क’ या घडीला तरी नाही! किंबहुना ते होणं एवढं सोपंही नाही. म्हणजेच परमात्मा सद्गुरूमय आहे आणि सद्गुरूही परमात्मामय आहे, पण त्या सद्गुरूचा शिष्य म्हणवणारा, साधक म्हणवणारा सद्गुरूमय नाही! आता थोडं आणखी खोलवर जाऊ! श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक वाक्य आहे की, ‘‘जो माझ्या हाती हात देतो, त्याचा हात मी रामाच्या हाती दिल्याशिवाय राहात नाही.’’ हे वाक्य वाचताना फार आनंद वाटतो आणि त्याच वेळी या वाक्यातला मोठा चकवा लक्षात येत नाही. तो म्हणजे, एक वेळ रामाच्या हाती हात देता येणं शक्य आहे, पण सद्गुरूच्या हाती हात देता येणं एवढं सोपं नाही! हात म्हणजे कर्तेपणा! तेव्हा सद्गुरूंच्या हाती हात देणं म्हणजे समस्त कर्तेपण सद्गुरूकडे देणं, सद्गुरूमय होणं. पण आपल्याला सद्गुरूपेक्षा परमात्मा मोठा वाटत असतो आणि त्यामुळे सद्गुरूपलीकडे अजून कुठे तरी जायचं आहे, सद्गुरूपलीकडे आणखी कशाची तरी प्राप्ती आहे, आणखी काही तरी दिव्यत्व आहे, असा भ्रम आपल्या मनात असतो. एकनाथांनी एका अभंगात याचा स्पष्ट फैसला मांडला आहे. ते म्हणतात : ‘‘संत आधीं देव मग। हाचि उगम आणा मना।। १।। देव निर्गुण संत सगुण। म्हणोनि महिमान देवासी।। २।। नाम रूप अर्चिला जाण। संतीं सगुण वर्णिलें।। ३।। मुळीं अलक्ष लक्षा न ये। संती सोय दाविली।। ४।। एका जनार्दनीं संत थोर। देव निर्धार धाकला।। ५।।’’ संत आधी आणि देव मग आहेत. म्हणजे आधी आपण संतांना भेटतो आणि नंतर त्यांनी सांगितलेली साधना करून ‘देव’ भेटतो, असा क्रम इथे अभिप्रेत नाही. कारण इथं ‘उगम’ हा शब्द आला आहे! तेव्हा सद्गुरूचा उगम आधी आहे, देवाचा मग आहे! ‘आधी’ म्हणजे कधी? तर ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२९व्या ‘नासदीय सूक्ता’त सृष्टीच्या आरंभाचं जे वर्णन आहे.. तेव्हा ना दिवस होता – ना रात्र, ना काही होतं, असं नव्हे – ना काही नव्हतं, असंही नव्हे, तेव्हा ना जन्म होता – ना मृत्यू होता तेव्हा! देवसुद्धा सृष्टीच्या रचनेनंतर आले, असं त्या सूक्तात म्हटलंय आणि मग तेव्हा कोण होतं, असा सूचक सवालही आहे! तर ज्यानं भांबावलेल्या ब्रह्मदेवाला तप करायचा आदेश दिला, ते सद्गुरूतत्त्वच अनादि अनंत विद्यमान आहे. पण एकनाथ महाराज म्हणतात, देव निर्गुण आहे आणि संत देहात आहेत म्हणून देवाचा महिमा, देवाचं मोठेपण अधिक भासतं! जे दिसत नाही, त्याचीच ओढ आणि मोल अधिक वाटतं आणि जे समोर उघडं परब्रह्म नांदत आहे त्याच्या असण्याचं महत्त्वच समजत नाही! जो नामरूपानं अर्चिला जातो तोच संतरूपानं सगुणात आला आहे. जो अलक्ष आहे, लक्षात येत नाही त्याला पाहण्याची सोय संतांनी स्वत: देहरूपात येऊन करून दिली आहे. एकनाथ महाराज म्हणतात की, मी निर्धारानं सांगतो की सद्गुरू हाच थोर आहे आणि देव हा त्यांच्यासमोर धाकला आहे, लहान आहे! तेव्हा साधकाचं खरं ध्येय म्हणजे खऱ्या सद्गुरूशी एकरूपता साधणं. ही एकरूपता कशी साधावी, आंतरिक ऐक्य कसं साधावं, याचंच चिंतन म्हणजे एकात्मयोग!
– चैतन्य प्रेम