माणसाच्या मनावर मायेचा पगडा कसा बसतो, हे नवनारायणांपैकी एक अंतरीक्ष हा राजा जनकाला सांगत आहे. त्यातील ६१व्या ओवीचा मागोवा घेत असतानाच ६२वी ओवीही आपण आता पाहणार आहोत. या दोन ओव्यांत जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांचा उल्लेख आहे. अंतरीक्षाच्या माध्यमातून एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘जागृति देहाचा विसरु पडे। सवेंचि स्वप्नदेह दुजें जोडे। तेणें मिथ्या प्रपंच वाढे। स्वप्नीं स्वप्न कुडें कदा न मने॥६१॥ सुषुप्तीं देहाचा असंभवो। तेथ नाहीं भवभावो। जन्ममरण तेंही वावो। संसारसंभवो देहाभिमानें॥६२॥’’ आता ‘जागृति देहाचा विसर पडे’चा आणखी विचार करताना जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांचा अर्थ लक्षात घेऊ. जागृति म्हणजे जागेपणाची अवस्था, स्वप्न म्हणजे निद्राधीन असतानाही ‘मी’ जागा असण्याची आणि ‘मी’केंद्रित स्वप्नात रममाण असण्याची अवस्था. सुषुप्ति म्हणजे गाढ निद्रेची अशी अवस्था ज्यात देह जिवंत आहे, पण देहजाणीव पूर्ण लोपली आहे! आता जागृत अवस्थेत देहाचा विसर पडतो. म्हणजे काय? तर ‘देहच मी’ या अहंभावात आपण वावरत असलो तरी देहाचं भान मात्र प्रत्येक क्षणी नसतं. उलट ‘देहसुख’ भोगताना देहभान हरपतं. देहाची जोवर काही तक्रार उद्भवत नाही, तोवर देहाची आपली जाणीव जागी नसते. जागृतीतही स्वप्नावस्थेचं थोडं मायिक मिश्रणही आहे. त्यामुळेच अनेकदा अनेक जण जागेपणीच ‘दिवास्वप्न’देखील पाहातात. स्वप्न मग ते जागेपणीचं असो वा निद्रावस्थेतलं असो; त्या क्षणी माणूस त्यात रमतोच. जागेपणी फार थोडे लोक असे असतात की जे लोककल्याणाची स्वप्नं पाहतात. बहुतांश स्वप्नं ही ‘मी’केंद्रितच असतात आणि ती स्वप्न प्रपंचच वाढवत असतात. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेच्या अवस्थेत देहजाणीव तात्पुरती का होईना, पण पुरती लोपली असते. म्हणूनच ‘तेथ नाही भवभावो,’ असं नाथ सांगतात. म्हणजे भवविषयांविषयी भावजागृती त्या गाढ निद्रावस्थेत नसते. तेव्हा संसार संभवाला वाव देण्याचं आणि जन्म-मरणाचं चक्र अविरत राखण्याचं काम देहाभिमानच करतो! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘तेवीं आत्मत्वाचा विसरू। तेणें मी देह हा अहंकारू। तेणें अहंकारें संसारू। अतिदुस्तरू थोरावे॥६३॥’’ आत्मस्वरूपाचा विसर पडल्यावर ‘देहाचा अहंकार’ उत्पन्न होतो. त्यायोगे पार करण्यास अतिशय दुस्तर असा प्रपंच पसारा वाढत जातो. एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की, ‘‘दु:खाच्या खडकीं आदळती प्राणी। परि संसाराचा मनीं वीट नये॥१॥ कामाचिया लाटे कर्दमाचे पुरीं। बुडे तरी हाव धरी अधिकाराची॥२॥ वारितां नायके भ्रमलासे कीर। सांपडे सत्वर पारधीया॥३॥ एका जनार्दनीं यमाचीयां फांसां। पडेल तो सहसा न कळे मूढा॥४॥’’ म्हणजे भवसागरात भवदु:खाच्या खडकांवर माणूस ठेचकाळत आहे, पण तरी सतत रूप पालटत असलेल्या या संसाराचा त्यांना वीट येत नाही! या भवसागरात अनंत कामनांच्या लाटा उसळत आहेत आणि देहभावाच्या चिखलात बुडत असतानाही ‘माझे’पणाचा अधिकार गाजवू पाहण्याची माणसाची हाव काही सुटत नाही. मनेच्या प्रेमात गुंतलेल्या पोपटाला पारध्याची जाणीवच नसते आणि तो अलगद जाळ्यात सापडतो. तसा स्वप्नप्रपंचात मग्न माणसावर काळाचा फासा कधी पडेल, याचा काही नेम नाही!
– चैतन्य प्रेम