बाह्य़ जगाचं उद्धवाचं भान जणू लोपलं होतं. त्याचं सर्वस्व असा कृष्णसखा त्याच्यासमोर होता आणि त्याच्यासमोर भक्ताचं आख्यान करीत होता! भक्तानं आजवर भगवंताची कित्येक स्तुतीस्तोत्रं गायली असतील, आख्यानं केली असतील.. पण भगवंतानं भक्ताचं गुणगान करावं! राधाच केवळ कृष्णमय झाली नव्हती, कृष्णही राधामय झालाच ना? हनुमानानं प्रभू रामांना जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा ते भरताचंच नाम जपत देहभान विसरत होते आणि नंतर संजीवनी पर्वत घेऊन रणभूमीकडे परतताना अयोध्येत जेव्हा त्यानं  भरताला पाहिलं तेव्हा एका रामावाचून भरताच्या सर्व संवेदनाच लोपल्या होत्या! खऱ्या भक्ताची आणि भगवंताची हीच गत असते. भगवंताला भक्तावाचून आणि भक्ताला भगवंतावाचून दुसरं सुचत नाही, स्मरत नाही. त्या भक्तासाठी व्याकूळ होऊन कृष्णसखा उद्धवाला भक्तांचं माहात्म्य सांगत आहे.. उद्धव तरी कृष्णावेगळा का होता? म्हणून जणू कृष्ण आरशासमोर बसून आपलंच प्रतिबिंब न्याहाळत भक्ताचं आख्यान गात होता! ते गाताना त्याचं अंत:करण पिळवटलं होतं. डोळे भरून आले होते. रोमारोमांतून भक्ताचं प्रेमच जणू ओसंडून जात होतं. भगवंत आर्ततेनं सांगत होते.. बाबा रे.. माझ्या भक्तांना कुठं जावं, काय करावं कशाचीच जाण उरलेली नाही.. वैकुंठाला माझा गजर करीत जनांचा किती प्रवाहो ओढला जात असतो.. पण हे माझे भक्त जणू सर्वत्रच वैकुंठ पाहत असल्यानं देहभान हरपून असतील तिथंच वावरत राहतात.. पण मला का करमते? मग मीच त्यांच्याकडे धाव घेतो.. ‘‘ते न घेती वैकुंठींची वाट। त्यांचें घरचि मी करीं वैकुंठ। तेथें चिन्मात्रें फुटे पाहांट। पिके पेंठ संतांची।।’’ ते येत नाहीत ना, मग मीच त्यांचं घर वैकुंठ करून टाकतो! तिथं ज्ञानाची पहाट फुटते आणि अनेकानेक संतांची पेठ भावभक्तीनं भरून जाते.. ‘‘तेथ सायुज्यादि चारी मुक्ती। त्यांचे सेवेसी स्वयें येती।’’ चारी मुक्ती त्यांच्या पायाशी सेवातत्परतेनं पडून असतात.. पण त्यांना ना त्या मुक्तीशी काही देणंघेणं, ना ऋद्धीसिद्धीशी काही देणंघेणं. माझ्याशिवाय आणखी या जगात आहेच काय मिळवायचं, माझ्याशिवाय कशाची आस धरावी, याच वृत्तीनं ते आत्मतृप्त आणि आत्ममग्न असतात.. उद्धवा, अशा निश्चयी भक्तांनी मला ऋणी करून ठेवलंय रे! ‘‘ऐशी देखोनि निश्चयें भक्ती। मीही करीं अनन्य प्रीती। भक्त जेउती वास पाहती। तेउता मी श्रीपती स्वयें प्रकटें।।’’ मीदेखील मग त्यांच्यावर अनन्य प्रेम करू लागतो. ते जिथं जिथं दृष्टी टाकतात तिथं तिथं मी प्रकट होऊन त्यांच्याकडे आर्ततेनं पाहू लागतो! ‘‘भक्त स्वभावें बोलों जाये। त्याचें बोलणें मीचि होयें। त्याचे बोलण्या सबाह्य़ें। मीचि राहें शब्दार्थे।।’’ भक्त बोलू लागला की त्याचं बोलणं मीच होतो, त्याच्या शब्दाशब्दांत मीच अर्थरूपानं ओतप्रोत असतो.. ‘‘जेवीं तान्ह्य़ालागीं माता। तेवीं भक्तांची मज चिंता। त्यांची सेवाही करितां। मी सर्वथा लाजेंना।।’’ तान्ह्य़ा मुलासाठी जशी माय तसा मी भक्तांची माउली आहे.. त्यांच्या सेवेत मला लाज कसली? त्यांना थोडं जरी संकट पडलं, तर मी धाव घेतो, माझं नव्हे रे, माझ्या भक्ताच्या नामात जो बुडून जातो त्याच्या परमसुखाचीही चिंता मला लागते.. हा भक्त किती मोलाचा आहे सांगू? अरे, ‘‘मी शरीर तो माझा आत्मा!’’ अरे मी शरीर आहे, तो आत्मा आहे.. शरीर नश्वर आहे, आत्मा नव्हे! माझी रूपं येतील अन् जातील.. माझा भक्त आणि त्याची भक्ती मात्र अमर राहील!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

– चैतन्य प्रेम