चैतन्य प्रेम
माझ्या नव्हे रे, माझ्या भक्ताच्या नामात जो बुडून जातो त्याच्या परमसुखाचीही चिंता मला लागते.. भगवंताच्या या वाक्यानं मनात किती विचारतरंग निर्माण झाले.. माझं नाम माझा अनन्य भक्त उच्चारतो म्हणून त्या नामाला महत्त्व आलंय, हा भगवंताचा आत्मीय भाव! नाव तेच असतं, पण आईच्या मुखातून ते उमटतं तेव्हा ते वात्सल्यचिंब असतं ना? तसं या अनन्यभक्ताच्या मुखातून येणाऱ्या नामानं भगवंतच त्याचा अंकित होऊन जातो. हा अनन्य भक्त म्हणजे सद्गुरू! भगवंत उच्चरवानं सांगतो की, ‘‘मी शरीर तो माझा आत्मा!’’ अरे मी शरीर आहे, तो आत्मा आहे.. ज्याप्रमाणे शरीर नश्वर असतं, पण आत्मा नव्हे! त्याप्रमाणे माझी रूपं येतील अन् जातील.. पण माझा हा भक्त आणि त्याची भक्ती मात्र अखंड राहील, अमर राहील! सद्गुरूतत्त्व या चराचरात अखंड राहील!! हा सद्गुरू आहे म्हणून माझं माहात्म्य टिकून आहे आणि माझ्या भक्तीची संधी जनांना सहजप्राप्य आहे, हा भगवंताचा भाव होता. म्हणूनच उद्धवासमोर त्या संतांचा भक्तीमहिमा भगवंत स्वत: भावविभोर होऊन गात होते.. सद्गुरूंचा उल्लेख संत म्हणून करीत त्यांचं माहात्म्य गाताना एकनाथ महाराजही म्हणतात..
संतांचा महिमा देवचि जाणें।
देवाची गोडी संतांसी पुसणें।। १।।
ऐसी आवडी एकमेकां।
परस्परें नोहे सुटिका।। २।।
बहुत रंग उदक एक।
यापरी देव संत दोन्ही देख।। ३।।
संताविण देवा न कंठे घडी।
उभयतां गोडी एक असे।। ४।।
मागे पुढें नहो कोणी।
शरण एका जनार्दनी।। ५।।
संतांचा महिमा कळणं सोपं नाही हो! एकनाथ महाराजही एके ठिकाणी सांगतात, ‘‘देव निर्गुण संत सगुण। म्हणोनि महिमान देवासी।।’’ देव दिसत नाही, निर्गुण, अलक्ष्य, अदृश्य आहे ना तो! म्हणून त्याचा महिमा अधिक भासतो. कारण जे दिसत नाही, त्याचंच महत्त्व माणसाला अधिक वाटतं ना? आणि संतसत्पुरुष काय दिसतो, आपल्यासारखाच हाडामांसाचा देह त्याला असतो, त्यामुळे त्याचं खरं रहस्य आणि खरं महत्त्व कळत नाही! मनुष्यभावानंत त्याच्याकडे पाहिलं जातं, त्याचं आकलन केलं जातं, त्याचं मूल्यमापन केलं जातं. जो देहात असतो आणि देहाला आणि देहाशी संबंधित ‘मी’ आणि ‘माझे’ला जपतो, जोपासतो अशा भणंग स्वयंघोषित ‘संता’मागे दुनिया धावते, पण जो देहात असूनही देहभावात कधीच नसतो, ज्याच्यात ‘मी’ आणि ‘माझे’चा लवलेशही नसतो आणि सदोदित ‘तू’ आणि ‘तुझे’चाच भाव विलसत असतो, त्या खऱ्या सद्गुरूचं, खऱ्या संतसत्पुरुषाचं महत्त्व फार थोडय़ा लोकांना आधी कळू लागतं. तेव्हा खऱ्या संताचा महिमा एका भगवंतावाचून कुणाला कळणार? आणि देवाची खरी गोडी एका खऱ्या संतावाचून, खऱ्या सद्गुरूवाचून कोणाला सांगता येणार? जोवर दुनियेची आसक्ती आहे तोवर निरासक्त देवाची गोडी लागणं शक्य नाही. संकुचितातच मन लाचारपणे चिकटून आहे, तोवर परमतत्त्वाशी त्याचा संयोग होणं नाही. तेव्हा स्वयंघोषित ‘संतां’चं लक्ष जेव्हा लोकेषणा, वित्तेषणा अर्थात मानसन्मान, पैसा आणि लौकिकात गुंतून असतं, तेव्हा देवाची गोडी त्यांना कुठून कळावी? आणि ती कळत नाही, तर ती त्यांना कुठून सांगता यावी?