चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजा रहूगणानं भरताला विचारलं की, मला आत्मज्ञान कसं होईल? त्या प्रश्नाचं जे उत्तर भरतानं दिलं ते संक्षेपानं पाहूच, पण त्याआधी राजाला सर्वप्रथम भरतानं जे सांगितलं त्याचाही अर्थ थोडा लक्षात घेऊ. तू एवढा धष्टपुष्ट दिसतोस, तर तुला साधं पालखीचं ओझं उचलता येत नाही का, रस्त्यानं नीट चालता येत नाही का, असं राजानं विचारलं होतं. त्या अनुषंगानं भरतानं जे उत्तर दिलं ते प्रपंचात राहून परमार्थ करू पाहणाऱ्या संसारी साधकांसाठीसुद्धा मार्मिक आहे. भरत म्हणाला की, ‘‘हे राजा!  ओझं म्हणून काही असेलच, तर जो ते वाहतो त्याच्यापुरतंच ते खरं आहे. जर काही रस्ता असेल, तर तो चालणाऱ्यापुरताच अस्तित्वात आहे. स्थूलपणा, कृशपणा, आधि व्याधि, भूक, तहान, भीती, कलह, इच्छा, क्रोध, अहंकार आणि शोक हे सर्व मनोधर्म देहबुद्धीतूनच उत्पन्न होणारे आहेत.  माझ्यात ते लेशमात्रही नाहीत.’’ प्रपंचात असलेला माणूस हा स्वत:कडे कर्तेपणा घेतो आणि म्हणून कर्माचं आणि कर्मफळाचं ओझंही त्याच्याच शिरी येतं. भरत म्हणतात, मी तर निमित्तमात्र आहे. तो परमात्माच माझ्याकडून सर्व करवून घेत आहे.. आणि भरत हे जे सांगत आहेत त्याचं दर्शन त्यांच्या जीवनात आधीच आपल्याला घडलं आहे. कारण जो ज्या कामाला जुंपत असे ते ते काम भरत एक शब्द न बोलता करीत असत. म्हणजेच आहे त्या परिस्थितीचा स्वीकार किती सहज करता येतो, हेच ते साधकांना शिकवत आहेत. तेव्हा मी कर्ता नाही म्हणूनच पालखीचं ओझंही मला नाही! आता जो रस्ता म्हटला आहे ना, तो कोणता? तर प्रपंच करायचा म्हणजे अमुक करावंच लागतं, अमुक तऱ्हेची लबाडीही अटळ असते, वगैरेही मानलं जातं. म्हणजेच प्रपंचाचे मार्ग ठरलेले आहेत आणि अनेकदा परमार्थ करणारे परमार्थाशी विसंगत अशी प्रापंचिक वर्तणूक करतात आणि प्रपंचात राहायचं म्हणजे हे करावंच लागतं, असा मुलामा देत आपल्या कृत्यांचं समर्थनही करतात. तेव्हा ज्याचा एकच मार्ग आहे, एकच ध्येय आहे, एकच चाल आहे त्याला या जगाच्या प्रापंचिक मार्गाशी काय देणं-घेणं? त्यामुळे भरत सांगतो की, रस्ता असेलच तर तो ज्याला त्यावरून चालायचं आहे त्याच्यासाठी खरा आहे. मग स्थूलपणा, कृशपणा, भूक, भीती, कलह, इच्छा आदी हे मनोधर्म आहेत, असं भरत सांगतो. आता कुणाला वाटेल की, भीती, क्रोध, अहंकार यांना मनोधर्म म्हणता येईल, पण स्थूलता आणि कृशपणा हे मनोधर्म कसे असू शकतात. तर भरत सांगतात त्याचं तात्पर्य असं, की स्थूलता आणि कृशपणा हा अखेरीस आकार आहे आणि त्याचं आकलन देहबुद्धीच तर करीत असते. पण माझ्यात देहबुद्धीच नसल्यानं ना माझ्यात आकाराचं ओझं आहे ना भीती, कलह, इच्छा, क्रोध यांचा लवलेश आहे. पुढे ते सांगतात की, या जगातल्या जेवढय़ा म्हणून वस्तू, व्यक्ती आहेत, परिस्थिती आहे ते सर्व काळाच्या पकडीत असल्यानं या दृश्य जगातील यच्चयावत वस्तूमात्रांना आदि आणि अंत हे काळाचे नियम लागू आहेत. अगदी त्याचप्रमाणे व्यवहार सोडला तर कुणी स्वामी नाही की कुणी सेवक नाही. भरत सांगतो की, ‘‘जिथे स्वामी आणि सेवक भाव स्थिर असतो तिथंच आज्ञापालनाचा नियम लागू होतो. तरीही हे राजन, तुम्हाला तुमच्या स्वामीपणाचा अहंकार असेल, तर सांगा मी तुमची काय सेवा करू?’’ तेव्हा राजा स्वत:ला स्वामी मानत असेल तर भरतानं सेवकपणा स्वीकारायची तयारी दाखवली. ही तयारीही देहबुद्धी नसल्यानंच प्रकटली होती!