चैतन्य प्रेम

खरा सद्गुरू हाच खऱ्या भक्तीचा आधार असतो! भगवंत म्हणजे काय, त्याची भक्ती म्हणजे काय, हे त्याच्याशिवाय कळणं अशक्य. तेव्हा अशा संताचं माहात्म्य एका देवालाच माहीत असतं आणि असा संतच देवाच्या दिव्य प्रेमाची खरी गोडी चाखवू शकतो. या परस्परप्रेमात हे दोघं असे मग्न आहेत, तृप्त आहेत, की त्यांना एकमेकांवाचून करमणं शक्य नाही! नाथमहाराज एक मनोज्ञ रूपक वापरून त्यांच्या या ऐक्यतेचं दर्शन घडवतात. ते म्हणतात, ‘‘बहुत रंग उदक एक। यापरी देव संत दोन्ही देख।।’’ पाण्यात रंग मिसळला तर मग पाणी  कुठलं आणि रंग कुठला, काही वेगळेपणानं सांगता येतं का? अगदी तसंच देव आणि संतांची एकरूपता आहे. त्या एकरूपतेशी एकनाथही एकरूप झाले आहेत आणि सांगत आहेत.. मला आता मागे-पुढे दुसरं कुणी नाही! मी एका जनार्दनाला अर्थात सद्गुरूला शरण आहे!! ‘मागे-पुढे कुणी नाही,’ हे फार महत्त्वाचं आहे बरं का! एका सद्गुरूची भेट झाली की, मग त्याच्या सांगण्याप्रमाणे साधना करून भगवंताची भेट होईल, असं आपण मानतो. सर्वसाधारणपणे असं वाटणं स्वाभाविकच वाटतं, पण ते खरं नाही! श्रीगोंदवलेकर महाराजांच्या बोधाचा आधार इथं घ्यावासा वाटतो. ते सांगतात, ‘‘साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग वगैरे आपण कशाकरिता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून, साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही; नाहीतर त्याचाच अभिमान होतोआणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो.’’ (प्रवचने, २ जुलै). आता ज्या महाराजांनी सदैव नामस्मरणच करायला सांगितलं, तेच ‘साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही,’ असं का सांगतात आणि कुणाला सांगतात, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. मुळात साधनाची ‘आटाआटी’ म्हणजे काय हो? तर आटाआटी म्हणजे धडपड. समजा एकजण पाण्यात बुडत आहे आणि ‘वाचवा वाचवा’ असं ओरडत आहे. त्याचं ओरडणं ऐकून वाचवणारा आला, तरी तो बुडणारा ‘वाचवा वाचवा,’ असं ओरडत राहील का? नाही ना! अगदी त्याचप्रमाणे, ‘‘साधनाची आटाआटी आपण कशाकरिता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची?’’ हा प्रश्न समजून घेतला पाहिजे. हा ‘देव’ म्हणजेच खरा सद्गुरू! वाचवणारा आला की ज्याप्रमाणे बुडणारा ओरडणं थांबवतो आणि वाचवणारा ज्या सूचना देईल त्याप्रमाणे करू लागतो, अगदी त्याचप्रमाणे खरा ‘देव’ म्हणजेच सद्गुरू समोर आल्यावर त्याच्या सांगण्यानुसार वागण्यापलीकडे साधनेची आटाआटी कुठली? आणखी कुठल्या देवाचं दर्शन बाकी राहिलं? कुठल्या तीर्थक्षेत्री जाणं शेष राहिलं?  म्हणून तर नाथांचा भाव होता की, आता ‘‘मागे पुढें नहो कोणी। शरण एका जनार्दनी।।’’ एका जनार्दनाशिवाय आता मागे-पुढे कुणीच नसल्यानं मी त्या एकाला शरण आहे! आणखी एका अभंगात ते उच्चरवानं सांगतात, ‘‘संत ते देव देव ते संत। ऐसा हेत दोघांचा।। देव ते संत संत ते देव। हाचि भाव दोघांचा।। संताविण देवा कोण। संत ते जाण देवासी।।’’ संत हेच देव आहेत आणि देवच संतरूपानं आला आहे. त्या संताशिवाय या जगात देवाचं आहेच कोण? अहो, देवाच्या अस्तित्वाची आकारात आलेली जाणीव म्हणजेच संत आहेत हो!

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Itishree, physical health, mental health , Itishree article ,
इतिश्री : ‘क्लोजर’ हाच अंतिम उपाय
Story img Loader