चैतन्य प्रेम

संत आणि भगवंत यांच्यातील ऐक्याची महती गाताना एकनाथ महाराज भारावून जातात. ते म्हणतात, ‘‘संतापोटीं देव वसे। देवा पोटीं संत असे।।१।।’’ पोट म्हणजे गाभा. संतांचा गाभा देवच आहे आणि देवाचा गाभा म्हणजे संतच. ‘‘ऐसा परस्परें मेळा। देव संतांचा अंकिला।। २।।’’ असं दोघांचं मिलन झालंय आणि संतांनी देवाला अंकित करून टाकलंय. ‘‘संतांठायीं देव तिष्ठे। देव तेथे संत वसे।। ३।।’’ त्या संतांच्या ठिकाणी देव तिष्ठत असतो! माउलींच्या माध्यमातून भगवंत सांगतात, ‘‘तो मी वैकुंठीं नसें। एक वेळ भानुबिंबींही न दिसें। वरी योगियांचींही मानसें। उमरडोनी जाय।। परी तयांपाशीं पांडवा। मी हारपला गिंवसावा। जेथ नामघोषु बरवा। करिती ते माझे।। कैसे माझां गुणीं घाले। देशकाळातें विसरले। कीर्तनसुखें झाले। आपणपांचि।।’’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ९, ओव्या २०७ ते २०९). अरे मी माझ्या वैकुंठलोकातही नसतो, एकवेळ सूर्यबिंबातही नसतो अर्थात तेज हे माझं आवरण असून त्या आवरणातही एकवेळ मी नसेन! योग्यांची मनंही मी ओलांडून जाईन, पण हे पार्था जे माझ्या नामानं स्वत:च अनाम झाले आहेत, ज्यांच्या सर्व जाणिवा केवळ माझ्याशीच केंद्रित आहेत, त्यांच्यापाशी हे पार्था मी स्वत:चं भान हरपून ताटकळत असतो. ते माझ्या गुणांच्या चिंतनात स्वत:च निर्गुण होतात! काळाचं आणि भवतालाचं भान विसरतात आणि कीर-तनाने म्हणजे तुच्छ देहाच्या आधारानं, त्या देहाला राबवून प्राप्त होणारं अभेदभक्तीचं जे सुख आहे ते स्वत:तंच भोगू लागतात! ते सुख भगवंतालाही माहीत नाही. तुकाराम महाराजही म्हणतात ना? ‘‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ। भ्रमर सकळ भोगितसे।। तैसे तुज ठावे नाही तुझे नाम। आम्हीच ते प्रेम सुख जाणो।।’’ फुलाला आपल्या गंधाची जाणीव नसतेच, भ्रमर मात्र त्या सुखभोगात गुंतून असतो. तसं तुझ्या नामाचं सुख तुला काय उमगावं? आम्हीच ते जाणतो! प्रेमाची गोडी ज्याच्यावर प्रेम केलं जातं त्याच्यापेक्षा जो त्या प्रेमात बुडून असतो त्यालाच कळत असते ना! पण इथं भगवंताला मात्र संताचंही प्रेम लागलं आहे. त्या संतावाचून त्याला किती करमत नसावं? एकनाथ महाराज सांगतात, ‘‘भांबावला देव संतांमागे धांवें!’’ त्यामुळे संतच देवामागे असतो, असं नव्हे, तर देवही पावलोपावली संताच्या पाठीशी असतो. हा संत म्हणजेच सद्गुरू, हे स्पष्ट करताना एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘एका जनार्दनी संत। देव तयांचा अंकित।। ४।।’’ एकनाथांचा भाव असा आहे की, जनार्दन हे सद्गुरू आहेत, असंच नव्हे, तर सर्वच सद्गुरूंची रूपं त्यांच्यातच आहेत! त्या माझ्या सद्गुरूंचा देव अंकीत आहे. या दोघांचं ऐक्य कसं आहे? एका अभंगात एकनाथ महाराज सांगतात, ‘‘हेम अलंकारवत। तैसे देव भक्त भासत।। पुष्पीं तो परिमळ असे। एका जनार्दनी देव दिसे।।’’ सोनं आणि सुवर्णालंकार यांच्यात जसा भेद करता येत नाही, फूल आणि त्याचा सुगंध यांना जसं वेगळं करता येत नाही तसं माझ्या सद्गुरूतून परमात्म्याला वेगळं काढता येत नाही! याप्रमाणे परमात्ममय सद्गुरू आणि सद्गुरूमय परमात्मा यांचं ऐक्य आहे.. आणि जसं अ=ब आणि ब=क असेल, तर अ=क होतंच, त्याचप्रमाणे परमात्ममय सद्गुरूचा शिष्य जर सद्गुरूमय झाला की तो परमात्ममय होतोच! त्या ऐक्यतेचा मागोवा म्हणजेच.. एकात्मयोग!

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…