चैतन्य प्रेम

अंत:करण आणि देहाचे अवयव यात पूर्ण ऐक्य असतं ना? म्हणजे, अमुक गोष्ट करावी, असा विचार अंत:करणात उमटताच ती कृती करण्यासाठी ज्या ज्या इंद्रियांचा सहभाग आवश्यक असतो ती ती इंद्रियं अगदी सहजपणे त्या कृतीसाठी तत्परतेनं कार्यरत होतात ना? अमुक वस्तू उचलावी, असं मनानं सांगितलं, पण हातांनी ‘ऐकलं’ नाही, असं कधी होतं का? म्हणजेच अंत:करणाचा जो अत्यंत सूक्ष्म विचार आहे तो जसा एखाद्या स्थूल इंद्रियांकडून तत्काळ पार पाडला जात असतो, तसं सद्गुरूशी त्याच्या सत्शिष्याचं ऐक्य असतं. तसं एकनाथ महाराज यांचं सद्गुरू जनार्दनस्वामी यांच्याशी अखंड ऐक्य होतं.  त्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या सांगण्यावरून त्यांनी ‘चतु:श्लोकी भागवता’ची रचना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर क्षेत्री केली. त्यानंतर दीर्घ तीर्थाटन झालं आणि मग सद्गुरूंच्या आज्ञेवरूनच गृहस्थाश्रमाचा स्वीकार झाला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी देवगिरी येथील त्रिविक्रमशास्त्री यांची कन्या गिरिजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि प्रपंच हाच परमार्थ कसा असू शकतो, याचा एक उत्तम आदर्श जगाला मिळाला. आपला मुख्य विषय नाथांचं चरित्र हा नाही आणि ते अनेक मार्गानी उपलब्ध आहे. पण या विवाहोत्तर जीवनात एकनाथांच्या हातून जी काही अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक कार्ये झाली त्यात ‘एकनाथी भागवता’चं प्रकटन, हे एक प्रमुख कार्य आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीनंतर जवळपास सव्वादोन शतकांनी नाथांचा जन्म झालेला. त्यामुळे माउलींची समाधी आणि त्यांची ज्ञानेश्वरी ही समाजमनाच्या नित्यचिंतनात नव्हती. म्हणजे ज्ञानेश्वरीला पूज्यत्व होतं, पण ती आचरण शिकवणारी दिव्यवाणी आहे, हे भान नव्हतं. शिवाय तिच्यात काही ओव्या नंतरही घुसडल्या गेल्या होत्या. त्यामुळे मूळच्या अर्थसौंदर्यालाही बाधा येत होती. त्यामुळे माउलींची समाधी आणि ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत समाजासमोर पुन्हा आणणं आवश्यक होतं. ही दोन्ही कार्ये नाथांनी केली. असं सांगतात की, माउलींनी नाथांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की, अजानवृक्षाची मुळी माझ्या कंठाला टोचत आहे तर समाधीत उतरून ती दूर करावी! नाथांनी त्यासाठी समाधी शोधून काढली आणि ती मुळी दूर केली.. कंठात रूतलेल्या मुळीचं रूपकच फार मनोज्ञ आहे. कारण ज्या दिव्य कंठातून ज्ञानेश्वरी प्रकटली होती, त्या कंठानं आता एकनाथांवर कृपा केली होती! अध्यात्माचा मूळ गाभाच जणू नाथांच्या हाती दिला होता आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीच्याच पावलावर पाउल टाकत ‘एकनाथी भागवत’ अवतरलं. वारकरी पंथाच्या प्रस्थानत्रयीत ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकारामांची गाथा’ या दोन ग्रंथांच्या मध्ये ‘एकनाथी भागवता’ला स्थान आहे. जणू तो मध्य आहे. ‘ज्ञानेश्वरी’ ही संस्कृतमधील ‘श्रीमद्भगवद्गीते’ची मराठीतील टीका आहे, तर ‘एकनाथी भागवत’ हे ‘श्रीमद्भागवता’च्या केवळ अकराव्या अध्यायावरील मराठी टीका आहे. हा अकरावा अध्याय गीतेच्या दुप्पट आहे. त्यावरील नाथांची ही टीका त्या अकराव्या अध्यायाच्या चौदा पट मोठी आहे! मूळ ‘श्रीमद्भागवता’चे १२ स्कंध असून त्यांची श्लोकसंख्या १८ हजार आहे. तर त्यातल्या अवघ्या एका, म्हणजे अकराव्या अध्यायाच्या तत्त्वविचारावर नाथांनी लिहिलेली टीका १५ हजार ओव्यांच्या पुढे आहे. तेव्हा नाथांच्या भागवताचा विस्तार हा असा व्यापक आहे.

Story img Loader