‘एकनाथी भागवता’च्या कथनानंतर एकनाथांनी सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडे एक मागणं मागितलं. ते असं की, ‘‘ जे ये ग्रंथीं अर्थार्थी होती। त्यांसी ब्रह्मभावें ब्राह्मणीं भक्ती। नामीं प्रीती अखंड द्यावी।।’’ (अध्याय ३१, ओवी ५३९).   म्हणजे जे जे या ग्रंथातील अर्थाचं ग्रहण करतील, त्यांना ब्रह्मभावनेनं ब्राह्मणांची भक्ती आणि नामावरील अखंड प्रेम द्या! इथं ‘ब्रह्मभावनेनं ब्राह्मणाचं प्रेम’ असं म्हटलं आहे आणि त्याचा अर्थ जातिवाचक नाही. या संदर्भात एक प्रसंग आठवतो. हरिकाका म्हणून एक फार मोठे सत्पुरुष कर्नाटकात होऊन गेले. त्यांच्याकडे माझा एक आप्त त्याच्या तरुणपणापासून जात असे. जन्मापासून त्याच्या तोवरच्या जीवनातला बराचसा काळ राजस्थानात गेलेला. तिथलं वातावरण उच्चभ्रू आणि पाश्चात्य वळणाचं. त्यामुळे तिथं अध्यात्मातील संकल्पनांशी परिचय होण्याची संधी तोवरच्या आयुष्यात कधी लाभली नव्हती. त्यामुळे तो जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या दर्शनाला गेला तेव्हा हरिकाकांनी त्याला विचारलं, ‘‘तुम्ही कोण?’’ त्याला काय उत्तर द्यावं कळेना. मठातलं वातावरण आणि भक्तांची गर्दी याचा परिणाम म्हणून असेल, तो भांबावून म्हणाला, ‘‘मी ब्राह्मण!’’ हरिकाका हसले आणि खोलीतील सगळ्यांकडे नजर फिरवत म्हणाले, ‘‘इथं अजून कोण कोण ब्राह्मण आहेत?’’ एकानंही हात वर केला नाही! याला थोडा अभिमान वाटला, पण तो क्षणभरच टिकला. कारण त्याच्या लक्षात आलं की पूजा अर्चा करणाऱ्या भटजींनीही हात वर केलेला नाही! तोच हरिकाकांचे परमशिष्य डॉ. सोनार त्या खोलीत आले. त्यांच्याकडे पाहात हरिकाका प्रसन्नपणे म्हणाले, ‘‘हा सोनार खरा ब्राह्मण आहे! ज्यानं ब्रह्म जाणलं आणि जो ब्रह्मभावात सदैव लीन असतो तोच खरा ब्राह्मण!’’ तेव्हा इथंही ‘ब्रह्मभावें ब्राह्मणीं भक्ती,’ म्हणताना योजलेला ‘ब्राह्मण’ हा शब्द जो सदैव ब्रह्मभावात लीन आहे, एकरूप आहे अशा सद्गुरूंसाठीच आहे. एकनाथ महाराज सांगत आहेत की या ग्रंथाच्या पारायणानं वाचणाऱ्याचं सद्गुरूंवर प्रेम जडू दे! आणि ते प्रेमही कसं? तर ब्रह्मभावानं! अर्थात व्यापक अशा सद्गुरूमय भावनेनं! उजेडाची भीती वाटत असेल, तर सूर्यावर प्रेम नाही करता येणार! अंधारातच आनंद वाटतो आणि त्याचवेळी सूर्याशिवाय क्षणभरही राहवत नाही, असं नाही होऊ शकत. तेव्हा सद्गुरूंवर जर प्रेम असेल तर ते सद्गुरूमय भावानंच होईल. ‘शिवो भूत्वा शिवं यजेत,’ असं सूत्र हेच सांगतं ना? की शिवाचं यजन करायचं असेल, शिवाची उपासना करायची असेल तर ती शिव होऊनच अर्थात सर्वार्थानं विशुद्ध होऊनच शक्य आहे. तसं हे आहे. त्यापुढे एकनाथ महाराज आणखी एक मागणं मागतात की, ‘‘नामीं प्रीती अखंड द्यावी।।’’ नामामध्ये अखंड प्रेम द्या. याची आणखी एक अर्थच्छटा अशी की, ‘ना-मी’ प्रीती जडू दे! सर्वत्र ‘मी’ ‘मी’ करण्याची सवय ओसरून मी नाही तूच, हीच अखंड धारणा व्हावी.  त्यानंतर जनार्दनस्वामी यांनी जो आशीर्वाद दिला तोदेखील ‘एकनाथी भागवता’च्या अखेरीस नमूद आहे. तो आशीर्वादपर वर असा की, ‘‘ग्रंथ सिद्धी पावेल यथार्थी। येणें सज्ञानही सुखी होती। मुमुक्षु परमार्थ पावती। साधक तरती भवसिंधु।। ५३६।। भाळेभोळे विषयी जन। याचें करितां श्रवण पठण। ते हरिभक्त होती जाण। सन्मार्गी पूर्ण बहुत होती।।५३७।। ये ग्रंथीं ज्या अत्यंत भक्ती। निंदाद्वेष न रिघे त्याचे चित्तीं। श्रीरामनामीं अतिप्रीती। सुनिश्चितीं वाढेल।। ५५२।।’’

चैतन्य प्रेम

Story img Loader